You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोण होणार करोडपती: कोणत्या स्पर्धकाला कोणता प्रश्न करोडपतीमध्ये विचारला जाईल कसं ठरतं?
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
"मी प्रश्न विचारत असलो तरी मला उत्तरं आधीच सांगितली जात नाहीत. मला माझ्या ज्ञानाने ज्या प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत ते आहेच पण मला आधीपासून उत्तरं माहिती नसतात. स्पर्धकाने उत्तर लॉक केल्यावरच मला उत्तर कळते." 'कोण होणार करोडपती' कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अभिनेते सचिन खेडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
सामान्य मराठी माणसाला एका खेळातून करोडपती होण्याचं स्वप्न दाखवणारा आणि त्यासाठी संधी देणारा कार्यक्रम 'कोण होणार करोडपती' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
येत्या 6 जूनपासून सोनी मराठीवर 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व सुरू होत आहे. यंदाही या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत. या निमित्त सचिन खेडेकर यांनी बीबीसी मराठीला मुलाखत दिली.
पाहूया ते काय म्हणाले,
प्रश्न- यंदाच्या खेळात काय वेगळेपण आहे? खेळाचं स्वरूप बदललं आहे की तेच आहे?
सचिन खेडेकर - 'आता आली आहे आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भूत खेळ' असं या वेळच्या पर्वाचं ब्रीदवाक्य आहे. यंदाही महाराष्ट्रभरातून स्पर्धक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. माझी जबाबदारी म्हणजे हॉटसीटवर बसल्यानंतर स्पर्धकाचं दडपण कमी व्हावं. त्याने दडपण बाजूला ठेऊन खेळावं असंच आम्हाला वाटत असतं आणि त्यासाठी आम्ही मदत करत असतो. हा केवळ खेळ नाहीये तर यात प्रेक्षक स्पर्धकासोबत भावनिकरित्या गुंतलेल्या असतो. या स्पर्धकाने जिंकावं किंवा हा खेळत का नाहीये, अशा गोष्टींबाबत त्याला उत्सुकता असते, त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा सुद्धा वाढते.
कोण होणार करोडपतीच्या यंदाच्या पर्वात एक लाईफलाईन बदलण्यात आलीय. 50-50 लाईफलाईन ऐवजी स्पर्धकांना नवीन पर्याय देण्यात आला आहे. त्यांनी ही लाईफलाईन घेतल्यास त्यांना विषयांची एक यादी दाखवली जाते. त्यापैकी एक विषय स्पर्धकाने निवडायचा आणि मग त्यावर त्यांना प्रश्न विचारला जाणार. एकूण लाईफलाईन तीनच राहणार आहेत.
प्रश्न- कौन बनेगा करोडपती हा हिंदी भाषेतला कार्यक्रम लोकप्रिय झाल्यानंतर हा खेळ मराठी भाषेत आला. पण कौन बनेगा करोडपती म्हणजे अमिताभ बच्चन असं समीकरण लोकांच्याही तोंडपाठ झालंय. त्यामुळे तुम्हाला याचं दडपण होतं का?
सचिन खेडेकर- कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम बीग बी अमिताभ बच्चन यांच्या नावाने ओळखला जातो. मला खूप दडपण होतं. व्हू वाँट्स टू बी मिलिनियर हा कार्यक्रम जगभरात आतापर्यंत 121 भाषांमध्ये दाखवण्यात आला आहे.
अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाला जी उंची दिली, त्यांनी जी गरिमा राखली तोच प्रयत्न मी केला. सामान्य लोकांशी चर्चा करणं, त्यांची भीती कमी करणं, त्यांना धीर देणं हे त्यांनी उत्तम केलं. यामुळे तुम्ही माणूस म्हणून कळता. आता जवळपास तीन सीझन केल्यानंतर मी स्वत: काही गोष्टी अड करायला लागलो आहे.
प्रश्न- कोण होणार करोडपती या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासंदर्भात तुमची अमिताभ बच्चन यांच्याशी कधी चर्चा झाली का?
सचिन खेडेकर- गेल्यावर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आमचा सीझन उशिरा सुरू झाला. हिंदीचा आणि आमचा ओव्हरलॅप होत नाही. पण गेल्यावर्षी झाला. आम्हाला कळलं की अमिताभ बच्चन यांचं बाजूलाच त्याचं शूटींग सुरू आहे.
आम्ही त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी म्हणून गेलो. पण ते आम्हाला म्हणाले की तुमचा कार्यक्रम मी पाहिलाय. ते प्रश्न विचारताना म्हणतात 'अगला प्रश्न ये है आपके सामने' आणि मी मराठीतून जसं विचारतो ते म्हणाले की 'मी तुमचं हे कॉपी केलंय' आणि मी त्यांना म्हटलं की मी तर तुमचं सगळंच कॉपी केलंय. अगदी कपड्यांपासून ते स्टाईलपर्यंत सगळं.
प्रश्न - अनेकांना अशा कार्यक्रमांबाबत किंवा अशा चॅनेलवरील खेळांबाबत अनेक शंका असतात. कार्यक्रम स्क्रिप्टेड आहे का? असाही प्रश्न लोक विचारतात.
सचिन खेडेकर- कार्यक्रमाची सुरुवात आणि शेवट स्क्रिप्टेड म्हणजे ठरलेला असतो. प्रोडक्ट लाईन सुद्धा ठरलेली असते. पण इतर सर्व गोष्टी या स्क्रिप्टेड नाहीत. दहा स्पर्धकांपैकी कोण येणार, त्यांच्याशी काय गप्पा मारायच्या, काय चर्चा करायची हे काहीच ठरलेलं नसतं. हा रिअल रिअॅलिटी शो आहे.
प्रश्न- कोण होणार करोडपती या खेळाचे प्रश्न कसे ठरतात?
सचिन खेडेकर - या खेळासाठी निवड प्रक्रिया कार्यक्रम सुरू होण्याच्या चार हिने आधीपासून सुरू होते. मिस्ड कॉल्स येतात. यंदाही लाखो मिस्ड कॉल आहेत. त्यातून शॉर्टलिस्टिंग होतं. मग स्पर्धकांच्या गावी जातात, त्यांची गोष्ट शूट करतात. हॉटसीटवर कोण येणार आहे याची कल्पना कोणालाच नसते.
आम्हालाही नाही. 10 स्पर्धक एकावेळी असतात त्यांची माहिती आपल्याकडे असते. त्यांचे 15 प्रश्न ठरलेले असतात. शेतकऱ्याचा प्रश्न इंजिनीअरला येईल किंवा डॉक्टरला येईल असं नसतं. त्यांचा जीके स्कोअर असतो आपल्याकडे. 15 जणांचा प्रश्नसंच प्रत्येकाचा वेगळा असतो.
प्रश्न- चेहऱ्यावरील हावभाव निरपेक्ष ठेवणं आव्हानात्मक आहे का?
सचिन खेडेकर- स्पर्धक चुकीचं उत्तर देत असला तरी मला निरपेक्ष रहायचं आहे आणि बरोबर उत्तर देत असला तरी. पण प्रत्येक प्रश्न विचारण्याआधी मी लाईफलाईनच्या पर्यायांची आठवण करून देतो. उत्तराची खात्री नसेल तेव्हा मी कायम त्यांना सावध करतो. हा फॉरमॅट आहे. एकदा प्रश्न विचारल्यानंतर ती क्वीझ मास्टरची जागा आहे.
अनेकदा स्पर्धक मला उत्तर बी वाटतंय असं सांगतात आणि लगेच माझ्या चेहऱ्याकडे पाहतात की माझ्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून काही अंदाज येतो का. हा भाग आव्हानात्मक आहे आणि इथे अभिनयाचा कस लागतो.
प्रश्न - या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन की अभिनय काय जास्त आव्हानात्मक आहे?
सचिन खेडेकर- मी अनेक कार्यक्रमांचं, पुरस्कार सोहळ्यांचं यापूर्वी सूत्रसंचालन केलं आहे. पण हे इतर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आणि कोण होणार करोडपती याचं सूत्रसंचालन यात जमीन आसमानचा फरक आहे.
हे म्हणजे एखाद्या ट्रेनमधून प्रवास करण्यासारखं आहे. सतत काहीतरी सुरू असतं. लोकांशी बोलायचं आहे, फोन लावायचा आहे, लाईफलाईन पाहायची आहे, घडाळ्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांचं दडपण कमी करण्यासाठी माझी खूप शक्ती जाते. लोक खूप बावरलेले असतात.
हॉटसीटवर दडपण बाजूला ठेवून लोकांनी खेळावं असं आम्हाला वाटतं. खेळासाठी सर्व प्रकारची, विविध वयोगटातील माणसं येतात. लोकांची विविध व्यक्तिमत्त्व असतात आमि हाच भाग खेळात अधिक रंगत आणतो. त्यामुळे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन खूप कठीण आहे असं मी म्हणेन. व्यक्ती म्हणून ही माणसं मला समृद्ध करून जातात हे मी मान्य करेन. या कार्यक्रमामुळे सचिन खेडेकर व्यक्ती म्हणून तुम्हाला कळतो. हा जास्त आनंद देणारा भाग आहे.
प्रश्न- तुम्ही तीन दशकांहून अधिक काळ या क्षेत्रात काम करत आहात. काही दाक्षिणात्य सिनेमांमध्येही तुम्ही काम केलंय. ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे दाक्षिणात्य सिनेमांची चर्चा गेल्या काही वर्षांत जास्त होऊ लागली. गेल्या दोन वर्षांत तर मराठी सिनेमे आणि दाक्षिणात्य प्रादेशिक सिनेमे यांचीही तुलना झाली. जे त्यांना जमतं ते आपल्याला का जमत नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो. तुम्हाला याविषयी काय वाटतं?
सचिन खेडेकर- माझं निरीक्षण आहे की आता प्रेक्षकांची मनोरंजनाची व्याख्या भाषेपलीकडे गेली आहे. म्हणजे आता तुम्हाला त्या भाषेचं आकलन असेल तरच मनोरंजन होईल असं नाहीय. उदाहरण द्यायचं झाल्यास माझा एक मराठी सिनेमा आहे 'फायर ब्रँड' नावाचा. अरूणा राजे या सिनेमाच्या दिग्दर्शिका आहेत आणि प्रियंका चोप्रा निर्माती आहे.
हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला. आम्हाला वाईट वाटलं की हा सिनेमागृहात प्रदर्शित झाला नाही. पण ओटीटीवर दोन आठवड्यात तीन लाख लोकांनी हा सिनेमा पाहिला. आम्हाला वाटलं की आम्ही एवढी मेहनत करतो थिएटरमध्ये तर हजारो लोकच पाहतात. पण ओटीटीवर लाखो लोकांपर्यंत तो पोहचत आहे. आपण नार्कोस मेक्सिको पाहतो तर मेक्सिकोमधला मेक्सिको माणूसही माझा सिनेमा पाहतोय ना.
हे खरंय की आपल्या भाषेतला सिनेमा चालत नाहीये. दाक्षिणात्य भाषांमध्ये त्यांना हिंदीकडे वळावं लागत नाही. किंवा त्यांना मराठी मंडळींप्रमाणे हिंदी येत नाही. मराठी प्रेक्षकांना हिंदी येतं आणि त्यांना हिंदी सिनेमा पाहण्याची सवय आहे.
मराठी प्रेक्षकांची एक खास सवय आहे की त्यांना मराठी सिनेमा मराठमोळा आवडतो. त्यामुळे प्रेक्षकसंख्या कमी आहे. महामारीनंतर हे बदललं आहे. मोठे वेगळे सिनेमे आले आणि ते प्रेक्षकांना आवडले सुद्धा. मी आशावादी आहे की आमच्याकडेही मराठीत असे सिनेमे येतील आणि ही जबाबदारी प्रेक्षकांची सुद्धा तेवढीच आहे.
प्रश्न - 'रानबाजार' या सीरिजमधील अभिनेत्रींवर तीव्र टीका करण्यात आली. तुम्हीही या सीरिजमध्ये काम केलंय. बॉलिवुडमध्ये असे स्त्रीपात्र चालतात मग मराठीत टीका का होते?
सचिन खेडेकर- हे खरं आहे की प्रेक्षकांना हे हिंदीत चालतं पण मराठीत नाही. मराठी प्रेक्षक हिंदीत हे चालवून घेतात. पण मराठीत केलं तर तुम्ही विकावू झाला अशी प्रतिक्रिया येते. मला वाटतं मराठी प्रेक्षकांनी थोडं दिलदार व्हायला हवं. बॉलीवूडमध्ये तीच स्त्रीपात्र चालतात. मुलींनी रानबाजारमध्ये चांगलं काम केलं आहे. त्यांनी चांगला अभिनय केला आहे.
सोशल मीडियावर ट्रोल होतात पण ते केवळ मनोरंजन क्षेत्रावर केले जात नाहीत. राजकारणावरही किती टीका होते. पण सोशल मीडिया आता महत्त्वाचं माध्यम आहे. ट्रोलर्सनेही हे लक्षात घ्यावं आणि जबाबदारीने वागावं कारण आपण कुठल्या मतप्रवाहाला अधिक चालना देत आहोत याचं भान आपण राखलं पाहिजे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)