IPL 2022: यंदाचं आयपीएल फिकं का ठरलं?

फोटो स्रोत, BCCI/IPL
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी प्रतिनिधी
दरवर्षी एप्रिल मे महिन्याचा काळ हा हापूस आंब्याइतकाच आयपीएलसाठी ओळखला जातो. पण यंदा चित्र वेगळं होतं. अवेळी झालेल्या पावसामुळे आंबेही कमी होते आणि आयपीएलचा जोरही कमी झाल्याचं जाणवलं.
मुलांच्या परीक्षा संपलेल्या असतात. दररोज रात्री 8 ते 11.30 या वेळात पिपाण्यावालं संगीत सुरू होतं. नाक्यावर, कट्टयावर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अमुक इनिंग्ज, तमुक स्पेलची चर्चा सुरू होते. विविध संघांना फॉलो करणाऱ्यांमध्ये जोरदार हमरातुमरीही पाहायला मिळते. यंदाही आयपीएलचा रंगला.
8ऐवजी 10 संघ होते, अडीच महिने सामने सुरू होते मात्र आधीच्या हंगामांच्या तुलनेत यंदाचा हंगाम फिकाच राहिल्याची चर्चा आहे. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यापैकी एकही जण आयपीएल फायलनमध्ये नाही, असं 2014 नंतर पहिल्यांदाच घडत आहे.
आयपीएल ज्या कालावधीत होतं त्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट थांबतं. जेणेकरून खेळाडू आयपीएलमध्ये खेळू शकतील. दीड महिन्यात वर्षभराची पुंजी मिळवून देणारं आयपीएल खेळाडू तसंच विदेशी क्रिकेट बोर्डांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. आयपीएलमध्ये खेळणं हे खेळाडूंसाठी तसंच जगभरातल्या क्रिकेट बोर्डांसाठी सोन्याचं अंड मिळवून देणारी कोंबडी आहे.
म्हणूनच या स्पर्धेत खेळण्यासाठी खेळाडू उत्सुक असतात. आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या बरोबरीने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये छाप उमटवणाऱ्या खेळाडूंना पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवून देणारी अशी ही स्पर्धा आहे.
यंदाचं आयपीएल प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांमध्ये झालं. कोरोना काळातील निर्बंध हटल्यामुळे अनेकांनी प्रत्यक्ष मैदानात पाहून मॅच पाहण्याला पसंती दिली पण तरी दरवर्षी आयपीएल म्हटल्यावर जो उत्साह आणि चर्चा झडताना दिसतात तसं झालं नाही. का झालं असं, काय आहेत याची कारणं?
खेळाडूंची सरमिसळ
यंदाच्या हंगामापूर्वी लिलाव आयोजित करण्यात आला होता. त्याआधी प्रत्येक संघाला केवळ चारच खेळाडू रिटेन करता येणार होते. चारच खेळाडू संघात राहिल्यामुळे प्रत्येक संघांचा चेहरामोहराच बदलून गेला. दोन नवे संघ- गुजरात आणि लखनौ यांना प्रत्येकी तीन खेळाडू देण्यात आले.
काही खेळाडू विशिष्ट संघांची ओळख झालेले असतात. यंदाच्या आयपीएल हंगामात चाहत्यांना कुठला खेळाडू कुठे आहे, आपल्या आवडत्या संघात नेमकं कोण आहे हे समजून घेण्यातच अनेक सामने निघून गेले.

फोटो स्रोत, BCCI/IPL
उदाहरणार्थ दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि भरवशाचा फलंदाज फॅफ डू प्लेसिस अनेकवर्ष चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत होता. लिलावात पुरेसे पैसे नसल्याने चेन्नईला डू प्लेसिसला संघात घेता आलं नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने डू प्लेसिससाठी मोठी रक्कम खर्च करत त्याला ताफ्यात समाविष्ट केलं आणि कर्णधारपदही दिलं.
गेली अनेक वर्ष विराट कोहली म्हणजे आरसीबी अशी ओळख होती. यंदाच्या हंगामात मात्र डू प्लेसिस आरसीबीचा कर्णधार झाल्याने पाहणाऱ्यांची गल्लत झाली.
सहा महिन्यात दुसरं आयपीएल
गेल्या वर्षीचं आयपीएल नेहमीप्रमाणे एप्रिल-मे महिन्यांमध्ये भारतातच आयोजित करण्यात आलं होतं. मात्र याच काळात संपूर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं होतं. हजारो नागरिक जीव गमावत होते. अनेकांना आयसीयू बेड, ऑक्सिजन सिलिंडर अशा व्यवस्थाही मिळाल्या नाहीत.
आरोग्ययंत्रणेवर प्रचंड ताण होता. देशातली परिस्थिती चिंताजनक असताना आयपीएल स्पर्धा कशी आयोजित करण्यात येते यावरून सोशल मीडियावर जोरदार टीकाही झाली होती. यातच आयपीएल बायोबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला.
अनेक संघातल्या खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला. काही सामने रद्द करण्यात आले, काही पुढे ढकलण्यात आले. अखेर परिस्थिती सुधारणार नसल्याचं लक्षात आल्यानंतर 14वा हंगाम 2 मे रोजी स्थगित करण्यात आला.
भारतातली परिस्थिती नियंत्रणात नसल्याने उर्वरित हंगाम 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत युएईत खेळवण्यात आला. एरव्ही दोन आयपीएल हंगामाच्या दरम्यान वर्षभराचं अंतर असतं. पण गेल्या वर्षीचा हंगाम 15 ऑक्टोबरला संपला. यंदाचा हंगाम 26 मार्च रोजी सुरू झाला.
अवघ्या सहा महिन्यात आयपीएल पुन्हा सुरू झाल्याने प्रेक्षक-चाहत्यांना अजीर्ण झालं. काही दिवसांपूर्वीच तर आयपीएल संपलं, आता पुन्हा सुरू झालं अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या.
मोठे खेळाडू, मोठे संघ ठरले सपशेल अपयशी
विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा हे आयपीएलचे मानकरी आहेत. पाचवेळा जेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्स संघ तसंच लोकप्रियतेच्या बाबतीत शिखरावर असलेला चेन्नई सुपर किंग्सचा संघ हे आयपीएलच्या यशात महत्त्वाचे शिलेदार आहेत. यंदाच्या हंगामात मुंबई आणि चेन्नई या संघांनी चाहत्यांची सपशेल निराशा केली.
मुंबई आणि चेन्नई हे संघ नेहमीच जेतेपदाचे दावेदार असतात पण यंदा त्यांना बादफेरीसाठी पात्रदेखील ठरता आलं नाही. प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापती, संघाची विस्कळीत घडी, नवनवीन प्रयोग यामुळे मुंबई आणि चेन्नईला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. एरव्ही या दोन संघांना हरवणं हे प्रतिस्पर्ध्यांसमोरचं आव्हान असतं. यंदा मात्र नव्या संघांनीही चेन्नई आणि मुंबईला लोळवलं.

फोटो स्रोत, BCCI/IPL
विराट कोहलीचा ढासळलेला फॉर्म ही टीम इंडियासाठी नव्हे तर आरसीबी संघाचीही चिंता ठरली. 2019 नंतर विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलेलं नाही. याच काळात त्याने भारताचं कर्णधारपदही सोडलं. 2021 हंगामानंतर कोहलीने आरसीबी संघाचं कर्णधारपदही त्यागलं.
एवढं सगळं केल्यानंतरही कोहलीच्या बॅटला यंदाच्या हंगामातही सूर गवसला नाही. एकेकाळी आयपीएल स्पर्धेत धावांचे नवनवे विक्रम रचणाऱ्या कोहलीला धावांसाठी झगडताना पाहणं चाहत्यांसाठी वेदनादायी होतं.
टीम इंडियाचा आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. यंदा पहिल्यांदाच आयपीएलच्या अख्ख्या हंगामात रोहितला एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. मुंबई इंडियन्सच्या सर्वसाधारण कामगिरीत रोहितचं अपयश हे एक महत्त्वाचं कारण आहे.

फोटो स्रोत, BCCI/IPL
धोनी आणि आयपीएल हे एक अतूट नातं आहे. धोनीचं वय पाहता तो खेळाला कधी रामराम करेल सांगता येत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने याआधीच निवृत्ती घेतली आहे. यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी धोनीने चाहत्यांना धक्का देत चेन्नईचं कर्णधारपद सोडलं. रवींद्र जडेजा कर्णधार असेल असं चेन्नईने स्पष्ट केलं.
नव्या भूमिकेला न्याय देता येत नसल्याने जडेजाने कर्णधारपद सोडलं आणि धोनीने कर्णधारपदाची धुरा पुन्हा खांद्यावर घेतली. या सगळ्या स्थित्यंतरात चेन्नईची कामगिरी घसरतच गेली. चेन्नईला बाद फेरीसाठी पात्र होता आलं नाही. मोठे खेळाडू आणि मोठ्या संघांसाठी चाहते आवर्जून सामने बघतात. हे दोन्ही संघ प्राथमिक फेरीतूनच माघारी फिरल्याने मोठा वर्ग स्पर्धेपासून दुरावला.
टीम इंडियाचं अतिक्रिकेट
गेल्या वर्षी दोन टप्प्यात झालेलं आयपीएल आणि यंदाचं आयपीएल यादरम्यान टीम इंडिया सातत्याने खेळतेच आहे. भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडमध्ये होता. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 4 टेस्ट झाल्या. भारताचा पर्यायी संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर 5 वनडे सामन्यांसाठी गेला होता.
भारतीय संघ युएईत झालेल्या ट्वेन्टी20 विश्वचषकात सहभागी झाला होता. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. यामध्ये 3 टेस्ट आणि 5 वनडे सामने होते. त्यानंतर श्रीलंकेचा संघ भारतात 2 टेस्टसाठी आला होता.
भारतीय संघ सतत खेळतोच आहे. त्यामुळे टीव्हीवर, अॅपवर भारतीय खेळाडू सतत दिसतच असतात. याच खेळाडूंना पुन्हा आयपीएलमध्ये पाहायचं कंटाळवाणं ठरू शकतं. यंदाचं आयपीएल सुरू झाल्यानंतर दोन आठवड्यात टीव्ही रेटिंग्ज 33 टक्क्यांनी घसरल्याच्या बातम्या आल्या होत्या. भारतीय संघ 365 पैकी 300 दिवस खेळत असतो. त्याचा परिणाम आयपीएलवर पाहायसला मिळाला.
दवामुळे मॅचेस एकतर्फी
कोण जिंकतं, कोण हरतं या इतकंच चांगला दर्जेदार खेळ पाहायला मिळणं महत्त्वाचं असतं. आयपीएल स्पर्धा या दृष्टिकोनातून प्रेक्षकांना चांगल्या खेळाची मेजवानी देतं. पण यंदा मात्र दवाने सामने एकतर्फी केल्याचं जाणवलं.
नैसर्गिक कारणांमुळे आयपीएल सामन्यांदरम्यान दव पडायचं. दव पडल्यानंतर बॉल ग्रिप करून टाकणं कठीण होतं. क्षेत्ररक्षकांनाही बॉल पकडताना त्रास होते. टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारणं स्वाभाविक झालं होतं.
सामन्याच्या दुसऱ्या सत्रात गोलंदाजी करणं दवामुळे अवघड होत असल्याने मॅच जिंकण्यासाठी टॉस जिंकणं महत्त्वाचं झालं होतं. दवामुळे असा विपरीत परिणाम होत असल्यामुळे दुसऱ्या सत्रात खेळ रटाळही होत असल्याचं जाणवलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








