IPL मध्ये गुजरात आणि लखनऊ संघाने अशी मोडली मुंबई आणि चेन्नईच्या संघांची सद्दी

फोटो स्रोत, BCCI-IPL
गुजरात टायटन्स संघाने आयपीएल पदार्पणातच अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला. लखनऊ सुपर जायंट्स संघानेही पदार्पणात प्लेऑफ्ससाठी पात्र होण्याची कमाल केली आहे. दोन नव्या संघांनी हे कसं साध्य केलं?
आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचं वैशिष्ट्य म्हणजे आठऐवजी दहा संघ. संघांची संख्या वाढल्याने सामन्यांची संख्या वाढली. भारतीय खेळाडूंना मिळणारी संधी व्यापक झाल्या. परिस्थिती पूर्ववत होईल तेव्हा दोन नव्या ठिकाणी सामने आयोजित होण्याची शक्यता वाढली. हे सगळं झालंही, होईलही पण सगळ्यात मुख्य परिणाम झाला तो म्हणजे नवीन संघांनी प्रस्थापित संघांची मक्तेदारी मोडून काढली.
मुंबई आणि चेन्नई या दोन संघांनी मिळून आयपीएलची 8 जेतेपदं पटकावली आहेत. दरवर्षी हे दोन संघ जेतेपदाचे प्रबळ दावेदार असतात. सातत्याने चांगलं खेळून ते बहुतांशवेळा प्लेऑफमध्ये प्रवेश करतात. यंदा मात्र या दोन्ही संघांचं जहाज गाळात रुतलं आहे. पदार्पणाच्या सुरुवातीपासून स्पर्धेत असलेल्या संघांची रचना त्यांनी काळजीपूर्वक अभ्यासली.
गुजरात लायन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनी अतिशय अभ्यासपूर्वक संघबांधणी केली. आधीपासूनच स्पर्धेत असलेल्या संघातले कोणते खेळाडू कामी येतील याचा त्यांनी विचार केला. लिलावाचं कामकाज कसं चालतं हे पाहिलं. ट्वेन्टी-20 प्रकारात कसा संघ लागतो यावर मंथन केलं. गुजरात लायन्सने कशी संघबांधणी केली ते समजून घेऊया.
मुंबईकर हार्दिकला उचलण्याची खेळी
अष्टपैलू हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा महत्त्वाच्या शिलेदारांपैकी एक होता. सुसाट फटकेबाजीसह उपयुक्त गोलंदाजी आणि अफलातून क्षेत्ररक्षक असलेला हार्दिक चांगला कर्णधार होऊ शकतो असा धाडसी विचार गुजरात संघव्यस्थापनाने केला. याआधी हार्दिकने कोणत्याही प्रकारात नेतृत्वाची धुरा हाताळलेली नाही.
आयपीएलसारख्या अतिशय वेगवान आणि बहुविध खेळाडूंची मोट बांधावी लागणाऱ्या स्पर्धेत हार्दिकला कर्णधारपद देणं हे खरंच खूप मोठं धाडस होतं.
पण गुजरातने हार्दिकमधले नेतृत्वगुण हेरले. हार्दिकच्या बाबतीत दुखापत व्यवस्थापन हाही कळीचा मुद्दा होता. दुखापतीमुळे हार्दिक गोलंदाजी करू शकला नाही तर त्याच्याविनाही गोलंदाजी विभाग कणखर असेल याकडे गुजरातने लक्ष दिलं.
आधीपासून स्पर्धेत असलेल्या संघांना यंदाच्या हंगामापूर्वी चार खेळाडू रिटेन करण्याची मुभा होती. 5 जेतेपदांमध्ये कर्णधाराची भूमिका निर्णायक असल्याने मुंबई इंडियन्सने मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माला रिटेन केलं.
विकेटकीपिंग आणि बॅटिंग असा दुहेरी विचार करून इशान किशनला, प्रमुख फलंदाज म्हणून सूर्यकुमार यादवला तर अष्टपैलू खेळाडू म्हणून कायरेन पोलार्डला रिटेन करण्याचा निर्णय घेतला.
मुंबई इंडियन्सने हार्दिकला रिलीज केल्यानंतर गुजरातने शिस्तबद्ध पद्धतीने त्याच्यासाठी मोर्चेबांधणी केली. हार्दिकला ताफ्यात समाविष्ट करत आणि कर्णधारपदाची जबाबदारी देत गुजरातने एकप्रकारे जुगार खेळला पण तो तूर्तास यशस्वी ठरला आहे.
हार्दिकचं गुजराती असणं हा गुजरात टायटन्ससाठी बोनस ठरला. 'गुजराती संघाचा गुजराती कर्णधार' असं विपणनाच्या दृष्टीनेही टायटन्स संघव्यवस्थापनासाठी उपयोगी ठरलं.
हैदराबादची चूक गुजरातच्या पथ्यावर
गुजरातने हार्दिकच्या बरोबरीने रशीद खान आणि शुबमन गिल यांना संघात घेतलं. रशीद खान हा जागतिक ट्वेन्टी-20 सुपरस्टार मानला जातो. जगभरात होणाऱ्या ट्वेन्टी-20 लीगचा तो अविभाज्य घटक आहे.
सनरायझर्स हैदराबादसाठी रशीद खान हा कणा होता. हैदराबाद रशीदला रिटेन करणं स्वाभाविक मानलं जात होतं, पण घडलं भलतंच. हैदराबादने अनुभवी केन विल्यमसनला आपल्याकडे राखलं. पण त्याच्याबरोबरीने अब्दुल समद आणि उम्रान मलिकला रिटेन करत त्यांनी सगळ्यांना धक्का दिला.

फोटो स्रोत, BCCI-IPL
चार षटकांमध्ये कमीत कमी धावा देत जास्तीत जास्त विकेट्स काढणारा रशीद हा कोणत्याही संघासाठी हुकूमी एक्का ठरू शकतो. गेल्या 5 वर्षांत हैदराबादला जे यश मिळालं आहे त्यात रशीदचा सिंहाचा वाटा होता.
बॉलिंगच्या बरोबरीने आक्रमक बॅटिंग आणि उत्तम क्षेत्ररक्षण यामुळे रशीद एक पॅकेजच आहे. रशीद एकटा तीन खेळाडूंचं काम करतो. रशीदसारखा हिरा आपल्याबाजूने वळवत गुजरातने मोठी बाजी जिंकली.
रशीदसाठी त्यांनी 15 कोटी रुपये खर्च केले. रशीद असल्यामुळे आवश्यकता भासल्यास कर्णधारपदही सांभाळू शकतो. याचा प्रत्यय यंदाच्या हंगामात आला. हार्दिक दुखापतग्रस्त असताना रशीदने टायटन्सचं नेतृत्वही केलं.
भारताच्या U19 संघाचा कर्णधार, भरवशाचा बॅट्समन शुबमन गिल कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या भविष्यकालीन योजनेचा भाग असेल असं चित्र होतं, पण कोलकाताने वेंकटेश अय्यर, वरुण चक्रवर्ती, सुनील नरिन आणि आंद्रे रसेल यांना रिटेन केलं.
गिलला रिलीज करणं गुजरातच्या पथ्यावर पडलं. मुंबई-हैदराबाद आणि कोलकाता अशा तीन संघाने हुकूमी खेळाडू आपल्याकडे आणत गुजरातने पहिला तडाखा दिला.

फोटो स्रोत, BCCI-IPL
वनडे तसंच ट्वेन्टी20 प्रकारात दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर अव्वल फिनिशर्सपैकी एक आहे. त्याचा स्ट्राईकरेटही उत्तम आहे. पंजाब आणि राजस्थान या संघांनी मिलरला फलंदाजीचा ठराविक क्रमांक आणि विशिष्ट जबाबदारी दिली नाही.
गुजरातने ही संधी हेरली आणि लिलावात शिताफीने मिलरला घेतलं. यंदाच्या हंगामात मनमुराद फटकेबाजी करत मिलरने संघाचा विश्वास सार्थ ठरवला आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी सलामीवीर आणि गुजरातचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी मिलरला ठोस भूमिका देण्यात मोठा वाटा उचलला.
शारजा इथे शेल्डॉन कॉट्रेलच्या एका ओव्हरमध्ये 30 धावा लूटत राहुल टेवाटिया चर्चेत आला होता. राजस्थान-पंजाब-दिल्ली-राजस्थान असा टेवाटियाचा आयपीएल प्रवास झाला आहे.
प्रतिस्पर्धी खचून जातील अशी हाणामारी, स्ट्राईक रोटेट ठेवण्याची हातोटी, लेगस्पिन यामुळे टेवाटिया ट्वेन्टी20 संघासाठी उपयुक्त कार्यकर्ता आहे. राजस्थानने टेवाटियाला गमावलं आणि गुजरातने लिलावात 9 कोटी एवढी प्रचंड रक्कम खर्च करून त्याला आपल्याकडे वळवलं.
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये किरकोळ आकडेवारी नावावर असणाऱ्या टेवाटियासाठी गुजरात गंगाजळी रिती करत असताना बाकी संघ आणि जगभरातले क्रिकेटरसिक आ वासून पाहत होते. टेवाटियाने गुजरात संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवत सातत्याने फिनिशिरची भूमिका चोख निभावली. डेव्हिड मिलर-राहुल टेवाटिया जोडी गुजरातसाठी अनेकदा तारणहार ठरले.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली 'गन बॉलर' म्हणून ज्याचं वर्णन करतो त्या मोहम्मद शमीवर गुजरातने विश्वास दाखवला. प्रचंड वेगाने आणि अचूक टप्प्यावर बॉलिंग करत प्रतिस्पर्धी फलंदाजांची भंबेरी उडवण्यासाठी प्रसिद्ध लॉकी फर्ग्युसनला गुजरातने कोलकाताच्या तावडीतून मिळवलं.
आयपीएलचे सगळे हंगाम खेळूनही वृद्धिमान साहा प्रसिद्धीपासून दूरच असतो. देशातल्या सर्वोत्कृष्ट विकेटकीपर्सपैकी एक आणि आयपीएल फायनलमध्ये शतक झळकावण्याचा विक्रम नावावर असलेल्या साहाला गुजरातने लिलावात अगदी शेवटच्या क्षणी विकत घेतलं. हा निर्णय किती अचूक होता हे साहाच्या खेळातून दिसून येतंय.
हार्दिक पंड्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही तर लाईक-अ-लाईक रिप्लेसमेंट म्हणून गुजरातने विजय शंकर आणि डॉमिनिक ड्रेक्सला ताफ्यात समाविष्ट केलं. ट्वेन्टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मॅथ्यू वेडला त्यांनी घेतलं. वेडला अजूनही लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही पण तो डार्क हॉर्स आहे.
राहुलसाठी खजिना रिता, अष्टपैलूंवर भर
गौतम गंभीर, अँडी फ्लॉवर, विजय दहिया, नरेंद्र हिरवाणी या चमूने लिलावात चोख अभ्यास करून अत्यंत संतुलित संघ तयार केला. ट्वेन्टी-20 प्रकारात अष्टपैलू खेळाडूंची भूमिका निर्णायक ठरू शकते हे लक्षात घेऊन लखनऊने जेसन होल्डर, मार्कस स्टॉइनस, दीपक हुडा, कृणाल पंड्या यांना संघात घेतलं.
बडोदा संघासाठी एकत्र खेळणाऱ्या कृणाल आणि दीपक यांच्यात सय्यद मुश्ताक अली स्पर्धेदरम्यान कडाक्याचं भांडण झालं होतं. भांडणाचं पर्यावसान म्हणजे दीपक बडोदा संघाचं बायोबबल सोडून बाहेर पडला.
दीपकने बडोद्याला रामराम केला आणि तो राजस्थानकडून खेळू लागला. या सगळ्या प्रकरणाची पार्श्वभूमी असतानाही लखनऊनं दोघांना संघात घेतलं. या दोघांना एकत्र आणण्याचं कठीण काम लखनऊनं केलं.
होल्डर सनरायझर्स हैदराबादकडे होता तर स्टॉइनस दिल्लीकडे होता. होल्डरची गेल्या हंगामातली कामगिरी चांगली होती. ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश स्पर्धेत स्टॉइनस महत्त्वपूर्ण खेळाडू आहे.

फोटो स्रोत, IPL/BCCI
गेल्या पाच हंगामात लोकेश राहुलने 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे. विकेटकीपर, कॅप्टन आणि ओपनर अशा तिन्ही भूमिका राहुल लीलया पार पाडतो. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राहुल यांच्यात मानधनावरून एकवाक्यता झाली नाही. राहुलसाठी लखनऊनं तब्बल 17 कोटी रुपये खर्च केले. राहुलकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय लखनऊने लगेचच घेतला.
पंजाबच्याच संघात राहुलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रवी बिश्नोईला लखनऊने हेरलं. राहुल-स्टॉइनस-बिश्नोई या तिघांना लखनऊनं आपल्याकडे राखलं.
मुंबई इंडियन्ससाठी सलामीवीर आणि विकेटकीपिंग अशी दोन्ही कामं चोख बजावणाऱ्या क्विंटन डी कॉकसाठी लिलावात प्रचंड चुरस होती. लखनऊला राहुलला साथ देईल असा साथीदार लखनऊला हवा होता. 6.75 कोटी रुपये खर्चून लखनऊनं क्विंटनला मिळवलं.
दिल्ली कॅपिटल्ससाठी युवा अवेश खान सातत्याने चांगली कामगिरी करत होता. लखनऊने भविष्याचा विचार करून त्याला समाविष्ट केलं.
डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खान मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात होता पण त्याला संधीच मिळाली नाही. हट्टाकट्टा, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा मोहसीन उपयोगी ठरू शकतो हे लखनऊने हेरलं. मोहसीनला योग्यवेळी संधीही देण्यात आली आणि तेव्हापासून तो संघाचा अविभाज्य भाग झाला आहे.
दिल्ली क्रिकेटमधल्या राजकारणामुळे मागे पडलेल्या आयुष बदोनीला गौतम गंभीरने लखनऊकडे वळवलं. गंभीरच्या पुढाकाराने बदोनीचा अंतिम अकरातही समावेश झाला. पूर्वाधातल्या अनेक सामन्यांमध्ये बदोनीने उपयुक्त खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
सनरायझर्स हैदराबादसाठी मनीष पांडे हा भरवशाचा खेळाडू. रिटेन होणाऱ्यांच्या यादीत मनीषचं नाव नाही हे समजल्यानंतर लखनऊने त्याच्याकडे मोर्चा वळवला. आयपीएल स्पर्धेत शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू असलेला मनीष अतिशय अफलातून क्षेत्ररक्षक आहे. मनीषला लखनऊसाठी लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही पण त्याचा अनुभव लखनऊला उर्वरित सामन्यांमध्ये कामी येऊ शकतो.
हे वाचलंत?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








