उर्दू ही भाषा इस्लामी आक्रमकांकडून लादली गेलीये?

उर्दू भाषा

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, झोया मतीन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारतातील उजव्या विचारसरणीच्या पक्षांच्या मते उर्दू ही एक परदेशी भाषा आहे आणि ही भाषा तथाकथित इस्लामी आक्रमणकर्त्यांनी लादली आहे

अलीकडेच उर्दू भाषेवरून नव्याने वाद निर्माण झाला होता. उजव्या विचारसरणीच्या एका वृत्तवाहिनीची वार्ताहर रेस्टॉरंटमध्ये गेली होती. तिथल्या एका पदार्थाच्या पाकिटावर 'उर्दू मध्ये छापील माहिती' असल्यावरून तिने तिथल्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला.

खरे तर, त्या पदार्थातील जिन्नसांबद्दल माहिती देणारे ते लेबल अरबी भाषेतील होते.

'इस्लामी समाजाची पाळेमुळे राखण्यासाठी' एक प्रयत्न म्हणून अनेकांनी या प्रसंगाकडे पाहिले. गेल्या वर्षीसुद्धा 'फॅब इंडिया' या कपड्यांच्या ब्रँडला आपली एक जाहिरात परत घ्यावी लागली होती. कारण त्या कॅम्पेनचे शीर्षक उर्दू भाषेत होते आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांनी या जाहिरातीला विरोध केला होता.

या आधी विधानसभेत निवडून जाणाऱ्या नेत्यांना उर्दूत शपथ घेण्यापासून थांबवण्यात आले होतं, कलाकारांना उर्दू मध्ये भित्तीलिखाण म्हणजेच ग्राफिटी करण्यास मनाई करण्यात आली आहे. शहरांची व गावांची उर्दू भाषेतील नावे बदलण्यात आली आहेत.

अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकांमध्ये असलेले उर्दू शब्द काढून टाकण्यास न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.

भारतात मुसलमान लोकसंख्येचे खच्चीकरण करण्यासाठी उर्दू भाषेवर असे हल्ले करण्यात येत आहेत, असे अनेकांना वाटते.

कतार विद्यापीठातील भाषाशास्त्र विषयाचे प्राध्यापक रिझवान अहमद म्हणातात, "मुसलमानांशी संबंधित असलेल्या प्रतीकांवर हल्ला करण्याची वृत्तीच यातून दिसून येते."

उर्दू भाषेला विरोध का आहे?

अनेक जण असाही दावा करतात की, भारतातील उजव्या विचारसरणीच्या पक्षांना इतिहास नव्याने लिहिण्याच्या राजकीय अजेंड्याकडे या सगळ्या घटना अंगुलीनिर्देश करतात.

इतिहासतज्ज्ञ ऑड्री ट्रश्की म्हणतात की, "भारतीय भाषांना धर्माच्या बेड्यांमध्ये अडकवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आधुनिक भारतीयांना त्यांच्या इतिहासापासून तोडून टाकणं."

लाल किल्ला

फोटो स्रोत, Getty Images

त्या म्हणतात, "या वर्तनाचा कदाचित विद्यमान सरकारला फायदा होऊ शकतो, पण इतरांसाठी मात्र त्यांचा वारसा नाकारण्यासारखे आहे."

बीबीसीने या संदर्भात भाजपाच्या तीन प्रवक्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी उत्तर दिले नाही.

समजायला अत्यंत सोपी आणि भावना सहज व्यक्त करणारी उर्दू भाषा ही अनेक शायरांच्या आणि लेखकांच्या आवडीची भाषा आहे.

भारतातील अनेक लोकप्रिय पुस्तके सआदत हसन मंटो आणि इस्मत चुगताइ यांच्यासारख्या उर्दू लेखकांनी लिहिलेली आहेत.

उर्दू भाषेची अभिजातता आणि मोहक उच्चार यामुळे एकीकडे उर्दू भाषेत राष्ट्रभक्ती दर्शविणाऱ्या कविता, तर दुसरीकडे अनेक गझलही लिहिल्या गेल्या.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय गाण्यांमध्येही उर्दू शब्द आहेत.

या भाषेला विरोध करणाऱ्यांच्या मते, "उर्दू ही फक्त मुसलमानांची भाषा आणि हिंदू फक्त हिंदी भाषा बोलतात."

पण इतिहास आणि वस्तुस्थिती वेगळीच आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

आज आपल्याला जी उर्दू भाषा माहीत आहे, तिचा इतिहास आपल्याला तुर्की, अरबी आणि फारसी भाषेत मिळतो. व्यापाराच्या निमित्ताने किंवा तिथल्या शासकांनी भारतात केलेल्या लढायांच्या निमित्ताने विविध कालखंडांमध्ये या भाषा भारतात आल्या.

इतिहासकार अलोक राय म्हणतात, "भारतीय उपखंडात विविध संस्कृतींची सरमिसळ होऊन या भाषेचा जन्म झाला. विविध कालखंडांमध्ये या भाषेला हिंदवी, हिंदुस्तानी, हिंदी, उर्दू आणि रेख्ता अशी नावे होती.

डॉक्टर राय यांच्या मते, "उर्दूमधील बोली भाषेपेक्षा वेगळे वाक्प्रचार वापरून एक नवी साहित्यिक शैली 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात मोगल राजवटीच्या अखेरीस दिल्लीतील दरबारांभोवती गुंफलेल्या अभिजात वर्गाने निर्माण केली होती."

उर्दू भाषा

फोटो स्रोत, Getty Images

उर्दू ही आजच्याप्रमाणे त्यावेळी मुसलमानांची भाषा समजली जात नव्हती. उर्दू भाषेला एक अभिजात दर्जा प्राप्त होता. भारतातील उच्चभ्रू लोक उर्दू भाषा बोलत असत. यात हिंदूंचाही समावेश होता.

दुसरीकडे, हिंदी भाषेची साहित्यिक शैली 19 व्या व 20 व्या शतकात सध्याच्या उत्तरप्रदेशमध्ये विकसित झाली.

उर्दू भाषेतील शब्द फारसी भाषेतून घेतले गेले तर हिंदी भाषेतील शब्द प्राचीन हिंदू ग्रंथ ज्या भाषेत होते, त्या संस्कृत भाषेतून घेतले गेले.

"या दोन्ही भाषा समान व्याकरणाच्या आधारे विकसित झाल्या आहेत. पण हिंदी आणि उर्दू भाषांच्या उगमाबद्दल राजकीय कारणांमुळे गैरसमजही पसरले.

भाषेची फाळणी

डॉक्टर राय म्हणतात, "हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्माचे लोक ही बोली बोलत असत. पण आपली स्वतंत्र ओळख स्थापन करण्याच्या दबावामुळे या भाषांची फाळणी झाली.असं घडलं नसतं तर आपल्या कल्पनेपेक्षा काहीतरी वेगळंच चित्र दिसलं असतं." (अगर इन तमामल हालातों के अफ़सोसनाक़ नतीजे ना निकलते तो ये कुछ अजीब होती.)

इंग्रजांच्या शासनकाळात ही फाळणी अधिक रुंदावली. इंग्रजांनी हिंदी भाषेचा संबंध हिंदूंशी आणि उर्दू भाषेचा संबंध मुसलमानांशी जोडला. उजव्या विचारसरणीच्या लोकांनी उर्दूला परदेशी भाषा म्हणणे हे काही नवे नाही.

उर्दू भाषा

फोटो स्रोत, Getty Images

प्राध्यापक अहमद म्हणतात की, 19 व्या शतकाच्या शेवटी हिंदू राष्ट्रवाद्यांनी उत्तर भारतातील न्यायालयांमधील अधिकृत भाषा म्हणून हिंदी भाषेला मान्यता दिल्याचा दावा केला. इंग्रजांनी 1837 मध्ये फारसीऐवजी उर्दूला सरकारी भाषेचा दर्जा दिला.

डॉक्टर राय म्हणतात की, 1947 मध्ये भारताची फाळणी झाली तेव्हा भाषेच्या विभागणीनेही टोक गाठले होते. भारत तेव्हा भारत आणि पाकिस्तान अशा दोन देशांमध्ये विभागला गेला होता.

ते पुढे म्हणतात, "भारतातील मुसलमानांसाठी वेगळ्या देशाची मागणी करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या मुस्लिम लीग पार्टीसाठी आणि पाकिस्तानच्या मागणीसाठी लोकांना संघटित करण्यासाठी उर्दू भाषा हे एक साधन झाली होती."

उर्दू भाषा हे एक सोपे लक्ष्य होते आणि उत्तरप्रदेशने आपल्या शाळांमध्ये उर्दू भाषेवर बंदी घातली. डॉ. अहमद यांच्या मते त्या वेळी अनेक हिंदूंनी उर्दू भाषेशी फारकत घेतली.

डॉ. ट्रश्की म्हणतात की, उजव्या विचारसरणीच्या पक्षांनी उर्दू भाषेला अशा इतिहासाशी जोडण्याचा प्रयत्न केला, जो कधी घडलाच नाही.

त्या म्हणतात, "आपण उर्दूला फक्त मुसलमानांची भाषा समजलो तर ज्या हिंदूंनी उर्दू भाषेत लिखाण केले आहे किंवा काही प्राचीन फारसी-अरबी लिपीत लिहिलेल्या हिंदी ग्रंथांबद्दल आपण यापुढे वाच्यताच करायची नाही?"

"या व्यतिरिक्त आपल्या रोजच्या हिंदीमध्ये आपण ज्या उर्दू शब्दांचा वापर करतो, त्याचं काय करणार आहोत?

उर्दू भाषा

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. अहमद म्हणतात की, "जेब हा शब्द फारसी-अरबी भाषेतून आला आहे आणि हिंदी भाषेत याला काही पर्याय आहे का, बहुधा एकही शब्द नाही."

डॉ. अहमद म्हणतात, "भाषा आता अस्मितेचे प्रतीक झाली आहे. उर्दू बोलणारे मुसलमान सूर्यास्ताला मगरिब या शब्दाचा वापर करतात. जसं एकाच गावातील उच्च जातीच्या लोकांची भाषा आणि कथित खालच्या जातीच्या लोकांची भाषा भिन्न असते, हाही तसाच प्रकार आहे."

डॉ. राय म्हणतात की, हिंदी भाषेतून उर्दू शब्द काढून टाकण्याच्या या प्रयत्नांमुळे हिंदी भाषेचे वैभव खालावले आहे.

"ही हिंदी भाषा सामान्यांची भाषा नाही. ही पोकळ भाषा आहे आणि या भाषेतून व्यक्त केलेल्या भावना कोरड्या वाटतात."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)