कोंकणी भाषेची गोष्ट : मराठी-कोंकणी वाद काय होता? गोव्याच्या इतिहासाशी त्याचा काय संबंध आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
चांन्न्याचे रातीं माडांचे सावळेंत
सारयिल्या सोबीत मांडार,
हातांत घालून हात, नाचूया गावया,
घुमटांच्या मधुर तालार...
हे गाणं तुम्ही कदाचित ऐकलं असेल. मराठीसारख्याच वाटणाऱ्या या ओळी, खरं तर कोंकणी भाषेतल्या आहेत. मराठीशी तिचं साधर्म्य आहे, पण मराठीपेक्षा तिचं वेगळं अस्तित्व आहे.
खरं तर कोंकणी म्हटलं तर एखाद्याला लगेच गोवा, तिथला किनारा आणि सानुनासिक उच्चार आठवतील. पण कोंकणी भाषेची कहाणी गोवाच नाही, तर महाराष्ट्र, कर्नाटक, पोर्तुगाल आणि ब्राझिलच्याही इतिहास-भूगोलाशी जोडली गेली आहे.
कोकणातल्या निसर्गाची लय, आंबे-फणसा-नारळाचा गोडवा आणि समुद्रातला भरती ओहोटीदरम्यानचा ठहराव घेऊन नटणारी ही भाषा. ज्ञानेश्वरीतल्या प्राकृतसोबत कोंकणीचं नातं आहे, तसंच दूरदेशातून आलेल्या पोर्तुगीजलाही तिनं जवळ केलंय.
पण 'माय'मराठीच्या लेकरांची 'मावशी' असलेल्या या भाषेला भाषा म्हणून दर्जा मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागला आहे.
कोंकणी म्हणजे नेमकी कोणती भाषा?
आज महाराष्ट्राचा किनारी प्रदेश कोकण म्हणून ओळखला जातो. पण एकेकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्र आणि पश्चिम घाट यांच्यादरम्यानचा चिंचोळा प्रदेश सप्तकोकण म्हणून ओळखळा जायचा.
याच किनारी प्रदेशात, आजच्या गोव्यात कोंकणी उदयास आली. आज महाराष्ट्रातल्या मालवण-कुडाळ-सावंतवाडीपासून ते खाली कर्नाटकात कारवार आणि अगदी मंगळुरूपर्यंत ही भाषा बोलली जाते. केरळमध्येही काही प्रमाणात कोंकणी भाषिक आहेत.

कोंकणी ही इंडो-आर्यन कुळातली भाषा आहे आणि बहुतांश अभ्यासकांच्या मते भाषेच्या एकाच प्रवाहातून महाराष्ट्री प्राकृतमधून मराठी आणि कोंकणी भाषांचा जन्म झाला आहे. त्यामुळेच या दोघींमध्ये एवढी समानता आढळते.
लेखक-संपादक आणि कोंकणी भाषेसाठी काम करणारे कार्यकर्ते उदय भेंब्रे सांगतात, "महाराष्ट्री प्राकृत - जिला पैशाची किंवा अपभ्रंश भाषाही म्हणतात, त्यातूनच दोन्ही भाषा आल्या.
"एका गोष्टीविषयी तज्ज्ञांचं एकमत आहे, की प्राकृतमधून आधी कोंकणी वेगळी झाली आणि मग त्याच प्राकृतमधून मराठी भाषेचा जन्म झाला. साधारण आठव्या शतकात प्राकृतमधून बोली आणि मग बोलीची भाषा, अशी कोंकणीच्या विकासाची प्रक्रिया झाली. म्हणजे कोंकणीला किमान हजार ते बाराशे वर्षांचा इतिहास आहे."
पण भाषेनं लिखित स्वरूप घेण्याची प्रक्रिया मात्र मराठीत आधी झाली, असं ते सांगतात. त्या काळातल्या ग्रंथांमधून काही रंजक माहिती समोर येते.
ज्ञानेश्वरीशी कोंकणीचं नातं
काही अभ्यासकांनी नमूद केलंय, की कोंकणी म्हणून स्वतंत्र उल्लेख पहिल्यांदा संत नामदेवांच्या लिखाणात दिसून येतो. ते या गौळणीचा दाखला देतात.
'मराठी कानडिया|एक मुसलमानी | कोंकणी गुजरणी| अशा पाचीजणी गौळणी ठकविल्या|'
महानुभाव पंथाचं 'लीळाचरित्र' तसंच ज्ञानेश्वरांनी लिहिलेली 'ज्ञानेश्वरी आणि 'अमृतानुभव' या मराठी ग्रंथांमध्ये अनेक कोंकणी शब्द आढळतात.
दिवो (दिवा), राति (रात्र), नेणों (माहिती नाही) ही त्यातली काही उदाहरणं आहेत.
"काही वाक्यरचना कोंकणीची आठवण करून देतात. आता ज्ञानेश्वर कोकणात आले, कोकणी भाषा शिकले, असं काही दिसत नाही. मग हे कसं झालं? तर सुरुवातीच्या काळात कोंकणी आणि मराठी या दोन्ही भाषा समान शब्द वापरत होत्या. पण हळूहळू काही शब्द कोंकणीत राहिले पण मराठीतून गेले."
मराठीवर ज्या इतर भाषांचे संस्कार, सरमिसळ झाली, ते प्रवाह कोंकणीत फारसे आले नाहीत. कोंकण बाकीच्या महाराष्ट्रापासून भौगोलिकदृष्ट्या वेगळा आणि काहीसा दुर्गम असल्यानं कोंकणीचा प्रवाह स्वतंत्रपणे वाहात राहिला.
कृष्णदास शामा
बाराव्या आणि चौदाव्या शतकात कोंकणीचा समावेश असलेले काही शिलालेखही आढळतात. पण कोंकणीत साहित्य निर्मिती करून खऱ्या अर्थानं भाषेचा विकास करण्याचं काम कृष्णदास शामा यांनी केलं.
त्यांचं मूळ नाव होतं शामराज आणि ते शांतादुर्गा मंदिरात काम करायचे. पण कृष्णदास शामा या नावानं त्यांनी मराठी आणि कोंकणीतही लिखाण केलं.
त्यांनी मराठीत कृष्णचरित्रकथा लिहिली, त्यात उल्लेख आहे:
वेय संवत्सरी। राजा शालिवाहनु राज्य करी। चौदाशी अठ्ठेचाळीसावरी वरूसें जाहली॥२४६॥ जो शकु चालता ते वरुसी॥ वैशाख मधु मधुर मासीं। शुक्लपक्षी त्रयोदशी। आरंभु केला॥२४७॥
म्हणजे वैशाख शुक्ल त्रयोदशी शके 1448 अर्थात 25 एप्रिल 1526 मध्ये शांतादुर्गेच्या मंदिरात बसून हे काव्य लिहायला सुरुवात केली. या ग्रंथाच्या दोन प्रती काणकोण आणि उज्जैनमध्ये सापडल्या आहेत.
पण सर्वसामान्यांना मराठी समजत नसल्यानं कृष्णदासांनी त्यानंतर गद्यरूपात रामायण आणि महाभारतातील कथा कोंकणीतून लिहिल्याचं सांगितलं जातं. कोंकणीतलं हे पहिलंच साहित्यिक दर्जाचं लिखाण मानलं जातं.
कृष्णदासांच्या या कोंकणी रचनांची मूळ हस्तलिखितं किंवा तिच्या भारतीय लिपींतील प्रती आज उपलब्ध नाहीत. पण रोमन लिपीत लिहिलेल्या दोन प्रती पोर्तुगालच्या ब्रागामधील वाचनालयात उपलब्ध आहेत. त्या तिथे कशा पोहोचल्या आणि गोव्यात एकही प्रत का शिल्लक राहिली नाही?
गोव्याचं वसाहतीकरण त्यासाठी कारणीभूत आहे.
मिशनरींचं आगमन आणि कोंकणीवर परिणाम
सन 1510 साली नोव्हेंबर महिन्यात अफोन्सो डी अलबुकर्क (ज्याच्या नावावरून हापूस आंब्याला नाव मिळालं) याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीज फौजांनी आदिलशाहीकडून गोव्याचा प्रदेश जिंकून घेतला.
1546 साली जेझुईट मिशनरी गोव्यात आले आणि त्यांनी ख्रिश्चन धर्मप्रसार सुरू झाला. त्याची परिणती धर्मछळात (inquisition) मध्ये झाली.

फोटो स्रोत, Getty Images
त्या काळात गोव्यातील अनेक मंदिरं मोडली गेली, धर्मग्रंथ जाळले गेले, ज्यात कृष्णदास शामा यांच्या प्रती नष्ट झाल्या असाव्यात.
ज्ञानपीठ विजेते कोंकणी लेखक आणि अभ्यासक दामोदर मावजो सांगतात, "देवळं म्हणजे त्या काळात विद्येची घरं होती. कोणाला काही शिकायचं असेल, धार्मिक ग्रंथ असतील ते देवाच्या प्राकारातच असायचे. अगदी थोड्या घरी, प्रामुख्यानं ब्राह्मणांकडे ग्रंथ असायचे. पण जेझुईट्सनी त्या काळात अनेक ग्रंथ नष्ट करून टाकले."
पण पुढे धर्माचा प्रसार करण्यासाठी गोव्यात आलेल्या युरोपियनांना स्थानिक भाषेची गरज वाटू लागली. त्यातून 1556 मध्ये गोव्यात प्रिंटिंग प्रेसही आला. भारतात पहिल्यांदा छापली गेलेली पुस्तकं कोंकणीत छापली गेली, असं कोंकणी लेखक आणि कोंकणी साहित्याच्या इतिहासावरील ग्रंथाचे लेखक मनोहरराय सरदेसाई यांनी लिहिलं आहे. अर्थात तेव्हा बहुतेक छपाई रोमी लिपीतच होत होती.
1579 साली थॉमस स्टीफन्स हे इंग्लिश जेझुईट पोर्तुगालमार्गे गोव्यात पोहोचले. त्यांचा भाषेचा अभ्यास दांडगा होता आणि त्यांनीच 'ख्रिस्तपुराण' हा मराठीतला ग्रंथही लिहिला तसंच कोंकणी भाषेचं व्याकरणही लिहिलं.
कोंकणी भाषेचा अभ्यास याच काळात खऱ्या अर्थानं सुरू झाला. पण शंभर वर्षांत हे चित्र बदललं.
संभाजी महाराजांची गोवा मोहीम
1682 साली छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्याला जवळपास महिनाभर वेढा घातला. जेरीस आलेल्या पोर्तुगीजांनी शरण जायची तयारी सुरू झाली, पण मुघलांचं सैन्य आल्याचा संदेश आल्यानं मराठा फौजांना माघारी परावं लागलं.
मग गोव्यात मराठा सैन्याला साथ दिल्याच्या आरोपांवरून स्थानिकांना निर्बंधांना सामोरं जावं लागलं.
त्याआधीपासूनच फ्रान्सिस्कन मिशनरींनी व्हाईसरॉयकडे मागणी केली होती, की 'आपण कोंकणी का शिकायची? उलट स्थानिक मागासले आहेत आणि त्यांना आपण आपली भाषा द्यायला हवी.'
पोर्तुगीज व्हाईसरॉय फ्रान्सिस्को डी टव्होरा यांनी 1684 साली एक फर्मान (decree) काढलं आणि कोंकणी भाषेवर संपूर्ण बंदी आणली आणि पोर्तुगीज सक्तीची केली. तिथून दोन-अडीचशे वर्ष या भाषेची तिच्याच जन्मभूमीत गळचेपी होत राहिली.

फोटो स्रोत, Getty Images
पुढे चौल, वसई हे भाग मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून काबीज केले, तसा कोंकणीभोवतीचा पाश आणखी आवळला गेला.
1822 मध्ये ब्राझिलनं स्वातंत्र्य घोषित केलं आणि लवकरच तो देश प्रजासत्ताक बनला. पोर्तुगालमध्येही राजकीय स्थित्यंतरं होऊ लागली, तिथे पहिलं संविधान अस्तित्वात आलं आणि गोंयकरांना कोंकणीवरच्या निर्बंधातून थोडी सूट मिळू लागली.
पण त्यानंतरही गोव्यात बराचा काळ कोंकणी शाळा नव्हत्या आणि पोर्तुगीज आणि मराठी हे शिक्षणाचं माध्यम होतं. कोंकणीतून साहित्यनिर्मिती आणि लिखाण बंद झाल्यानं ती बाजूला पडली. तिला स्वतःची लिपी विकसित होऊ शकली नाही.
पाच लिपींची भाषा
हिंदू आणि कॅथलीक उच्चवर्गीय लोक मराठी आणि पोर्तुगीजकडे वळले आणि कोंकणी 'चाकरांची भाषा' (lingua de criados) म्हणून उरली.
बाहेर मराठी, पोर्तुगीज वापरत असले तरी कोंकणीभाषकांनी घरी लोकांनी कोंकणी टिकवून ठेवली होती, असं दामोदर मावजो आवर्जून सांगतात.
व्यवहारातून हद्दपार झाली असली, तरी बहुजनांनी कोंकणीची कास सोडली नाही.
या सगळ्या काळात गोव्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतरही झालं. कर्नाटकात मंगळुरूपर्यंत आणि खाली केरळच्या काही प्रदेशात कोंकणी लोक जाऊन वसले.

फोटो स्रोत, Supriya Vohra
तिथे त्यांनी आपली भाषा जपून ठेवली पण, त्यासाठी स्थानिक लिपींचा वापर केला. त्यामुळेच एकेकाळी कोंकणी भाषा लिहिण्यासाठी एक-दोन नाही तर चक्क पाच लिपींचा वापर व्हायचा.
हिंदू लोक देवनागरी लिपीचा तर कॅथलिक ख्रिश्चन लोक पोर्तुगीज वळणाच्या रोमन लिपीचा वापर करायचे. त्याशिवाय कारवार-मंगळुरू परिसरात कन्नड आणि केरळमध्ये मल्याळममध्ये कोंकणी लिहिली जायची. तर कोंकणी भाषिक मुस्लिम (प्रामुख्यानं भटकळ भागातील) फारसी-अरबी लिपीचा वापर करायचे.
निर्बंध शिथिल झाले, तशी कोंकणी पुन्हा श्वास घेऊ लागली. 1889 साली एडुआर्डो ब्रुनो डीसोझा यांनी कोंकणी आणि पोर्तुगीज भाषेतलं, रोमन लिपीतलं द्विभाषिक पाक्षिक 'उदंतेचे साळक' (उगवतीचे कमळ) सुरू केलं. पण गोव्यात नाही, तर पुण्यातून.
शणै गोंयबाब आणि कोंकणीचं पुनरुज्जीवन
"शणैं गोयंबाब नसते तर कोंकणी भाषा अस्तित्व टिकवू शकली नसती," असं कोकणी साहित्यिक, अभ्यासक आणि आकाशवाणीचे वृत्तनिवेदक मुकेश थळी सांगतात.
"कोंकणी भाषेचे ते आद्य 'पायोनियर'च आहेत. कोंकणी ही बोली नाही, तर स्वतंत्र भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनीन एकला चलो रे सारखा लढा दिला."
शणै गोंयबाब यांचं मूळ नाव होतं वामन रघुनाथ शणै वर्दे वालावलीकार. शिक्षणासाठी ते 1893 मध्ये मुंबईत आले. त्यानंतर काहीकाळ गोवा आणि कराचीत नोकरी केल्यावर मुंबईतच स्थायिक झाले.

फोटो स्रोत, Mukesh Thali
बहुभाषिक असूनही कोंकणी भाषेवर त्यांचा जीव होता. माणसाला कितीही भाषा येत असल्या तरी मातृभाषेत, आत्म्याच्या भाषेत, बोलता येत नसेल तर तो भरकटला आहे असं ते म्हणायचे
त्यांनी कोंकणी लोकांना त्यांच्या मातृभाषेचं महत्त्व पटवून देण्यास सुरूवात केली आणि त्यासाठी कोंकणीतून लिखाणही केलं.
1910 च्या दशकात त्यांनी हे लिखाण सुरू केलं. दामोदर मावजो सांगतात, "गोंयबाब यांनी पाणिनीची सगळी सूत्रं शिकून घेतली. इंडो आर्यन भाषांचा अभ्यास केला. त्यांनी मॉलिएरच्या नाटकांचं कोंकणीत रुपांतर केलं. गोंयबाब यांनी साहित्यात भर घातली आणि भाषेची वृद्धी केलीच शिवाय गोमांतकीयांच्या स्थलांतराचा अभ्यासही केला."
9 एप्रिल 1946 रोजी शणै गोंयबाब यांचं निधन झालं. त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस विश्व कोंकणी दिवस म्हणून पाळला जातो.
गोंयबाब यांच्यानंतर लक्ष्मणराव सरदेसाई, बा. भ. बोरकर अशा साहित्यिकांनीही मराठी आणि कोंकणीतून लिखाण केलं. कोंकणीत खऱ्या अर्थानं साहित्यपर्वाला सुरुवात झाली.
मराठी-कोंकणी वाद
शणै गोंयबाब यांनी देवनागरी लिपीतून कोंकणी पुस्तकं काढली, तिथूनच मराठी कोंकणी वादाचीही सुरुवात झाली, असं उदय भेंब्रे सांगतात.
"जोवर ख्रिश्चन लोक रोमी लिपीत लिहित होते तोवर मराठी लोकांनी त्याची दखल घेतली नाही. पण शणैं गोयंबाब यांनी नागरी लिपीतून लिहायला सुरावात केली, तेव्हा असं मत मांडलं गेलं की कोंकणी ही मराठीची बोली आहे. या भाषेतून नुसतं बोलायचं, तुम्ही लिहिता म्हणजे काय?"
मराठी-कोंकणी साहित्यात त्यानंतर दोन तट पडले.

फोटो स्रोत, Getty Images
लेखक-संपादक अनंत प्रियोळकर यांच्यासारख्यांनी दावा केला की मराठी भाषा शतकांपासून गोमांतकात बोलली जात होती आणि कोंकणी ही मराठीची बोलीभाषा आहे. कोंकणी साहित्यिकांना तो दावा मान्य नव्हता.
दामोदर मावजो सांगतात, "ज्यांच्या हातात मराठीची मक्तेदारी होती आणि ज्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा होती, त्यांनी कोंकणी ही मराठीची बोली असल्याचा आग्रह धरला. कोंकणी ही जर मराठीची बोली असेल, तर कोंकणीतून लिहिलेलं साहित्य बोलीतील साहित्य म्हणून उचलून धरा ना. काय हरकत होती?"
कोंकणी-मराठी वाद निकालात निघेपर्यंत 1975 साल उजाडलं. तोवर मराठी-कोंकणी असं दोन्ही भाषांत लिखाण करणाऱ्या साहित्यिकांना कटू प्रसंगांना सामोरं जावं लागलं. बा. भ. बोरकर त्यापैकीच एक.
मराठी साहित्यात आपल्या कवितांनी वेगळा ठसा उमटवूनही बोरकरांना मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, त्यात बोरकरांचं कोंकणीवरचं प्रेमही कारणीभूत होतं.
"खरं तर बा भ बोरकरांनी जोजविली, बिंदुली (कळशी), बाय (विहिर) असे अनेक शब्द कळत नकळत मराठीच्या प्रांगणात आणून सोडले, त्याचा एकप्रकारे मराठीला फायदा झाला. पण तरीही त्यांना ही अवहेलना सहन करावी लागली," असं मावजो सांगतात.
बोरकर हे पु. ल. देशपांडे यांचे चांगले मित्र, पण पुलंनी त्यांच्या बाजूनं जाहीर भूमिका का घेतली नाही असा प्रश्न ते विचारतात.
"पुलं हे अतिशय विद्वान, चांगले साहित्यिक, विचारवंत. पण कोंकणीचा मुद्दा आला की गप्प राहणं पसंत करायचे. अशा लोकांविषयी मला तिटकारा आहे, साहित्यिक म्हणून त्यांचा आदर असला तरी."
हा वाद साहित्यासाठी मारक ठरल्याची भावना ते मांडतात, "आम्हाला झिडकारलं गेलं. मराठी साहित्यिकांकडून आणि राजकारण्यांकडून. तसं व्हायला नको होतं. त्यावेळी जर संवाद साधला असता आणि कोंकणीला जवळ केलं असतं, तर कोंकणी साहित्यातही भर पडली असती आणि मराठीलाही त्याचा फायदा झाला असता."
कोंकणीला राजभाषेचा दर्जा
भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईनंतर डिसेंबर 1961 मध्ये गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला.
त्यानंतर गोव्याचं महाराष्ट्रात विलिनीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली. गोव्यातल्या काही मराठी भाषिकांनी महाराष्ट्रात जायची तयारी सुरू केली. पण मग या मुद्द्यावरून सार्वमत घेण्यात आलं आणि गोंयकरांनी महराषट्रात न जाता स्वतंत्र राहण्याच्या बाजूनं कौल दिला. स्वतंत्र भारतात त्यानंतर कधीही सार्वमत (referendum) घेण्यात आलं नाही.
दरम्यान, कोंकणी ही भाषा की बोली? हा मुद्दा साहित्य अकादमीसमोर गेला. साहित्य अकादमीनं भाषातज्ज्ञांची समिती स्थापन केली. त्या समितीनं एकमतानं निर्णय दिला की कोंकणी मराठीची बोली नाही तर स्वतंत्र साहित्यिक भाषा आहे.
संस्कृत आणि कन्नड भाषेतले अनेक शब्दही स्वतंत्रपणे कोंकणीत आले आहेत. उदा. कन्नड आणि कोंकणीत सोन्यासाठी भांगर हा एकच शब्द वापला जातो. हे सामाईक शब्द कोंकणी भाषा मराठीपेक्षा स्वतंत्रपणे विकसित झाल्याचं दर्शवतात, असं कोंकणी भाषेचा अभ्यास करणारे मानववंशशास्त्रज्ञ डॉ. व्ही. पी. चव्हाण यांनी नमूद केलंय. ते हेही सांगतात, की गुजरातीतले काही शब्द कोंकणीतही आहेत, पण ते मराठीत सहसा वापरले जात नाहीत. (उदा. चोपडी, किंवा काही ओकारांत शब्द)
साहित्य अकादमीचं एक तत्व आहे की एका भाषेची एकच लिपी ते मान्य करतात. कोंकणीचा प्रश्न आला. शेवटी देवनागरी हीच कोंकणीसाठी वापरायची असं ठरलं. 1987 साली कोंकणीला गोव्याच्या राजभाषेचा दर्जा मिळाला, त्यासाठीही वर्षभर आंदोलन झालं.
मग ऑगस्ट 1992 मध्ये राजघटनेतील 71व्या दुरुस्तीनुसार भारताच्या अधिकृत भाषांमध्ये कोंकणीचा समावेश झाला.
गेल्या तीस वर्षांत कोंकणी फोफावत गेली. आता जवळपास 23.3 लाखांहून अधिक लोक कोंकणी भाषा बोलतात. (2011 ची जनगणना)
साहित्याच्या जगानंही या भाषेची वेगळी दखल घेतली. रवींद्र केळेकर (2006) आणि दामोदर मावजो (2021) या कोंकणी साहित्यिकांना देशातला साहित्यासाठीचा सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
नवी पिढी मराठी-कोंकणी वाद मागे टाकून पुढे जातानाही दिसते. कोंकणी भाषिकांचा संघर्ष, स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यासाठीचा कोंकणी भाषिकांचा लढा काय सांगतो?
दामोदर मावजोंच्या शब्दांत सांगायचं, तर "मराठीला माझा विरोध नाही, मी तुमच्याशी मराठीत बोलतोय. पण मराठीत माझं बोलणं पुस्तकी होतं. तेच कोंकणीत अभिव्यक्त होताना मला कसलीच अडचण येत नाही. एक लक्षात घ्यायला हवं भाषा हा संस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. आपल्याकडे जितक्या भाषा आहेत, तितक्या संस्कृती आहेत. दुर्दैवानं आपण प्रमाणीकरणाच्या ध्यासापायी भाषा मारून टाकतो आहोत. "
भारताचं वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वैभव टिकवून ठेवायचं असेल तर वेगवेगळ्या भाषांचं अस्तित्व जपणं, त्यांचा आदर ठेवणं आणि एकमेकांत मिसळणारे भाषांचे प्रवाह समजून घेणं म्हणूनच महत्त्वाचं आहे.
संदर्भ
- दामोदर मावजो, उदय भेंब्रे आणि मुकेश थळी यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखती
- ए हिस्ट्री ऑफ कोंकणी लिटरेचर : फ्रॉम 1500 टू 1992 (मनोहर राय सरदेसाई)
- कोंकणी विश्वकोश - मनोहरराय सरदेसाई, गोवा विद्यापीठ
- द कोंकण अँड द कोंकणी लँग्वेज - व्ही. पी. चव्हाण
- ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ कोंकणी पिरियॉडिकल्स - जे.बी मोरेस
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








