You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लग्नाआधी 'व्हर्जिनिटी'साठी 'ही' शस्त्रक्रिया करून घेण्याचं प्रमाण वाढतंय, कारण...
- Author, सुशीला सिंह
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
निम्मी (नाव बदललं आहे) एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. गेल्या 10 वर्षांपासून ती दिल्लीतचं आहे.
तिने दिल्लीतूनचं ग्रॅज्युएशन केलं आणि आता ती इथंच नोकरी करते. जेव्हा तिला तिच्या बॉयफ्रेंडविषयी विचारलं तेव्हा तिचं म्हणणं होतं, "खूप सारे होते, पण मी त्याच्याशी लग्न करेन त्याच्यासाठी मी माझी व्हर्जिनिटी राखून ठेवली आहे."
निम्मीच्या बोलण्यावरून हे तरी स्पष्ट होतं की, लग्नापर्यंत तरी तिला तिची व्हर्जिनिटी अर्थातच तिचं कौमार्य भंग करायचं नाही. याबाबत जेव्हा मी माझ्या ऑफिसमधील तरुणांशी बोलले तेव्हा ते म्हणाले की, त्यांच्या वयाच्या म्हणजेच 22 ते 30 वर्षांच्या मुलांमध्ये कॅज्युअल सेक्स करणं सामान्य गोष्ट आहे. लग्नापूर्वी सेक्स करणं याविषयी त्यांच्यात कोणता टॅबू नाहीये.
मग अशा परिस्थितीत प्रश्न पडतो तो म्हणजे, या मुली कुठून येतात, ज्यांना हायमेनोप्लास्टी म्हणजेच सेक्सनंतर हायमेन रिस्टोर करण्याची शस्त्रक्रिया करायची असते.
गेल्या 15 वर्षांत हायमेनोप्लास्टी करवून घेण्याकडे मुलींचा कल वाढला असून या प्रकारच्या शस्त्रक्रिया करवून घेण्यासाठी अविवाहित मुली मोठ्या प्रमाणावर येत असल्याचं डॉक्टरांचे म्हणणं आहे.
डॉक्टरांच्या मते, मुलींच्या योनीमध्ये एक पडदा असतो ज्याला हायमेन म्हणतात. सेक्स केल्यानंतर किंवा कधी कधी ज्या मुली स्पोर्ट्स मध्ये असतात, त्यांचा तो पडदा डॅमेज होतो. शस्त्रक्रिया करून डॉक्टर हा पडदा रिस्टोर करतात ज्याला 'हायमेनोप्लास्टी' म्हणतात.
डॉक्टर सांगतात की, हायमेन रिस्टोरेशनसाठी आलेल्या बहुतेक मुलींचं वय हे साधारण 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असतं. या मुली लग्नापूर्वी लैंगिकदृष्ट्या सक्रिय असतात किंवा मग जोडीदाराशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. मग लग्नापूर्वी हायमेनोप्लास्टीसाठी करवून घेतात.
अविवाहित मुली
मॅक्स हॉस्पिटलच्या प्रिन्सिपल कन्सल्टंट आणि गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. भावना चौधरी सांगतात की, त्या देशाच्या कोणत्या कोपऱ्यातून येतात हे नेमकं सांगणं कठीण असलं तरी या मुली नोकरदार वर्गातल्या असतात. तसेच मध्यम आणि उच्चवर्गीय उत्पन्न गटात या मुली मोडतात.
लग्नाआधी आपण लैंगिकरित्या सक्रिय होतो हे आपल्या भावी जोडीदाराला कळू नये म्हणून मुली लग्नाआधी ही सर्जरी करवून घ्यायला येतात.
डॉक्टरांच्या मते, या ज्या मुली शस्त्रक्रियेसंबंधी विचारायला येतात त्यांच्या संभाषणातून त्यांच्यात आत्मविश्वास असल्याचं जाणवतं. या मुली सहसा त्यांच्या बहिणी किंवा मैत्रिणींसोबत येतात.
मात्र, डॉ भावना चौधरी सांगतात की, काही मुली खेळांमध्ये सक्रिय असतात. जसं की, सायकलिंग करणे, घोडेस्वारी करणे किंवा मासिक पाळीच्या वेळी टॅम्फॉन वापरणं यामुळे देखील हायमेन ब्रेक होतो.
सर गंगाराम हॉस्पिटलमधील सर्जन डॉ. ललित चौधरी हायमेनोप्लास्टीसाठी येणाऱ्या महिलांना दोन गटात विभागतात. ते म्हणतात की 80 टक्के मुली तरुण असतात. त्यांचं वय सुमारे 25 वर्षांच्या आसपास असतं. काही घटस्फोटित महिला असतात मात्र त्यांची संख्या खूपच कमी आहे.
ते सांगतात की, आमच्याकडे चौकशी करण्यासाठी आठवड्यातून चार-पाच फोन येतातचं. पण 10 पैकी एकच मुलगी आमच्याकडे शस्त्रक्रियेसाठी येते.
डॉ ललित यामागचं कारण सांगतात, "या मुली आधी डॉक्टरांना भेटतात आणि मगचं शस्त्रक्रियेबाबत निर्णय घेतात. कोणत्याही मोठ्या रुग्णालयात या शस्त्रक्रियेचा खर्च 50 ते 70 हजारांपर्यंत येतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या मुली मोठ्या रुग्णालयांपेक्षा पर्यायाने स्वस्त अशा छोट्या दवाखान्यात शस्त्रक्रिया करून घेतात. यासाठी कोणतंही पेपर वर्क नसतं आणि छोट्या क्लिनिकमध्ये गोपनीयता ही पाळली जाते.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या शस्त्रक्रियेसाठी फक्त अर्धा तास लागतो. जर मुलीवर मोठ्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होत असेल तर तिला दोन तास आधी येऊन पेपर वर्क पूर्ण करावं लागतं. त्यानंतर लोकल किंवा जनरल ऍनेस्थेशिया देऊन हायमेन रिस्टोर केलं जातं. त्यानंतर मुलीला डिस्चार्ज दिला जातो. या संपूर्ण प्रक्रियेला पाच ते सहा तास लागतात.
खाजगी दवाखान्यात शस्त्रक्रिया
अपोलो हॉस्पिटलचे प्लास्टिक सर्जन अनुप धीर स्वतःची ओळख दिल्लीत हायमेनोप्लास्टी सुरू करणारे पहिले सर्जन म्हणून करून देतात. ते दिल्लीत खाजगी दवाखानाही चालवतात. या प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी एक तृतीयांश मुली हरियाणातून आल्याचं ते सांगतात. याशिवाय मुस्लीम कुटुंबातून आणि मध्यपूर्वेतील देशांतूनही मुली येतात.
ते सांगतात की बहुतेक मुली आपली ओळख लपवतात. त्या आम्हाला त्यांचं नेमकं नाव सांगत नाही किंवा खरा फोन नंबर शेअर करत नाही. अनेकदा या मुलींच्या मैत्रिणी भेटीसाठी किंवा सल्ल्यासाठी आमच्याशी संपर्क साधतात. शस्त्रक्रियेनंतर कोणत्याही प्रकारची समस्या आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र त्या उपलब्ध होत नाहीत.
त्यांच्या म्हणण्यानुसार, ते मुलींना लग्नाच्या आठ किंवा सहा आठवडे आधी हायमेनोप्लास्टी करण्याचा सल्ला देतात. जेणेकरून लग्नाच्या रात्री जास्त रक्तस्त्राव होऊ शकेल. या शस्त्रक्रियेनंतर कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्याचं ते सांगतात. मात्र स्वच्छता करणे, लगेच सेक्स न करणं, सायकल किंवा टू व्हिलर चालवण्यास मनाई अशा काही खबरदारी घेण्याचा सल्ला त्यांना दिला जातो.
डॉ ललित चौधरी सांगतात की, अनेक उच्चवर्गीय उत्पन्न गटातील मुली त्यांच्या आईसोबत येतात. या वर्गातील मुली या गोष्टी आपल्या आईसोबत करतात, पण आई स्वतःचं लग्नापूर्वी या शस्त्रक्रियेसाठी आपल्या मुलींना घेऊन येतात.
एकीकडे मुलगी तिच्या आवडत्या मुलासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेते, तर दुसरीकडे ती दुसऱ्याशी लग्न करत असताना तिला तिच्या कथित शुद्धतेचा दाखला द्यावा लागतो हे समाजाचं विडंबन म्हणावं लागेल.
महिलांची पवित्रता
ज्या मुलीला कोणीही स्पर्शही केला नसेल त्याच मुलीशी लग्न करण्याचं स्वप्न पुरुष पाहतो, हा पुरुषप्रधान विचारसरणीचा परिणाम आहे. त्याच वेळी निम्मीसारख्या अनेक मुली आहेत ज्या लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी आपलं कौमार्य राखून ठेवू इच्छितात.
पण हे फक्त भारतातचं नाही तर असे अनेक देश आहेत जिथं स्त्रियांच्या कौमार्याला पवित्र मानलं जातं. स्त्रियांच पावित्र्य आणि आदर तिच्या लैंगिकतेपुरता मर्यादित ठेवला जातो. भारतीय चित्रपटांमध्येही बलात्काराच्या घटनांमध्ये तिची 'इज्जत लुटली गेली' किंवा घर, पती किंवा वडिलांची इज्जत गेली, असे संवाद वापरले जातात.
कौमार्य हे केवळ समाजातील एका विशिष्ट वर्गासाठी महत्त्वाचं नसतं, तर ते गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत, ग्रामीणभागापासून शहरीभागापर्यंत प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते.
फेमिनिझम इन इंडियाच्या संस्थापिका जेपेलीन पसरिचा, स्त्रियांसाठी वापरल्या जाणार्या डिफ्लॉअर या इंग्रजी शब्दाचं उदाहरण देतात आणि विचारतात की, मुली काय कोणतं फुल आहेत का ? की त्यांना कोणी स्पर्श केला किंवा सेक्स केलं तर त्या कोमेजून जातील. ऑनर किलिंगच्या घटनांमध्येही इभ्रतीचा अर्थ स्त्रियांच्या शरीराशीचं जोडला जातो असं त्या सांगतात.
त्या सांगतात, "भारतीय समाजात मुलीचं लग्न होत असताना तिच्या व्हर्जिनिटीला एवढं का महत्त्व दिलं जातं? एखाद्या मुलाला तो व्हर्जिन आहे की नाही हे का विचारलं जातं नाही? अनेक भागात लग्नाच्या पहिल्या रात्रीची चादर बाहेर दाखवली जाते. का तर, समाजाला कळावं की त्यांची सून पवित्र आहे. ती आमच्या घरचा मान आहे आणि तिला कोणीही हात लावला नाही हे दाखवण्याचा हा प्रयत्न असतो. हे केवळ भारतातच नाही तर आफ्रिकेतील अनेक समाजांमध्ये असं घडतं.
मुलींची कौमार्य चाचणी
महाराष्ट्रातील कंजारभाट समाजात शतकानुशतके मुलींची कौमार्य चाचणी घेण्याची परंपरा आहे. या समाजात लग्नाच्या पहिल्या रात्री पांढरी चादर घातली जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती तपासली जाते. त्याचबरोबर या समाजातील लोक आपल्या मुलींची लग्न त्यांच्या किशोरवयातच करतात, असं ही दिसून आलं आहे.
महिलांच्या व्हर्जिनिटीचा बाजार
महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या आणि मणिपाल विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापिका जागृती गंगोपाध्याय म्हणतात, "सगळा दबाव स्त्रीवर असतो, ती पुरुषासोबत संबंध तर ठेवते पण नंतर आयपीलचा वापर करते आणि लग्नसाठी हाइमनोप्लास्टी करून घेते.
ती केवळ तिच्या पतीचीच नाही तर तिच्या कुटुंबाचीही मालमत्ता बनत आहे. या गोष्टी म्हणजे त्यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन आहे हे त्यांना समजतं नाहीये."
या प्रकारच्या विचारसरणीमुळे महिलांसाठी एक बाजार निर्माण झालाय. या इंटरनेटवरील बाजारात तुम्हाला लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी योनीतून रक्त किंवा कॅप्सूल मिळतील, असं त्या म्हणतात.
हायमेनोप्लास्टी व्यतिरिक्त, योनीला सुंदर करण्यासाठी, तिचा काळेपणा दूर करणाऱ्या उत्पादनांची जाहिरात केली जाते. स्त्रीच्या सामान्य प्रसूतीनंतर, तिच्या योनीला आलेला ढिलेपणा घट्ट करण्यासाठी तिला 'हजबंड स्टीच' दिल्या जातात.
याव्यतिरिक्त, स्त्रियांचा योनीमार्ग सुंदर करण्यासाठी अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया बाजारात आल्या असून ही पॉर्नची देणं असल्याचं तज्ञांचं मत आहे. कारण त्यांना पत्नी किंवा जोडीदाराचा विशेष भाग सुंदर असावा अशी इच्छा असते.
आज असं कोणतंच क्षेत्र राहिलेलं नाही ज्यात स्त्रियांनी आपला ठसा उमटवलेला नाही, पण व्हर्जिनिटी संबंधी प्रश्न फक्त त्यांनाच विचारले जातात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)