You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
केतकी चितळेची 'या' नेत्यांनी केली पाठराखण
अभिनेत्री केतकी चितळेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे तिला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे. तिचा लॅपटॉप आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. तिच्या या कृत्याचा सार्वत्रिक निषेध झाला असला तरी काही नेते तिच्या समर्थनार्थ उतरले आहे. त्यांनी काय म्हटलं आहे ते बघूया
सदाभाऊ खोत
रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, "केतकी चितळे कणखर आहे. तिला कोणाच्या समर्थनाची गरज नाही. त्यामुळे तिला मानावं लागेल. तिने शरद पवार यांच्यावर पोस्ट केल्यानंतर त्या पोस्टखाली तुमच्या कार्यकत्यांनी काय कमेंट केल्या आहेत ते एकदा बघा म्हणजे तुम्ही केलं की पाटलाच्या पोरानं केलं आणि दुसऱ्याच्या पोराने केलं हे धंदे बंद करा," असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.
तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना तुमची नैतिकता कुठे गेली? आताच नैतिकता का उफाळून येत आहे?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
"सरकार पुरस्कृत दहशतवाद कशाला वाढवता? देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चंद्रकांत पाटील यांच्याबाबत अपशब्द वापरून टीका केली होती. अमोल मिटकरी ब्राह्मण समाजाला टार्गेट करतात त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हतं का?" असं ते म्हणाले. सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
तृप्ती देसाई
सदाभाऊ खोत यांच्यापाठोपाठ भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईसुद्धा केतकी चितळेच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत.
"केतकी चितळेने जी आक्षेपार्ह पोस्ट टाकली त्यात पवार असा उल्लेख होता. शरद पवार असं पूर्ण नाव लिहिलेलं नाही. त्यामुळे नेमकं ती काय बोलली या विषयावर न्यायालयामध्ये केस टिकू शकणार नाही" असं त्या म्हणाल्या आहेत. प्रसारमाध्यमांसाठी केलेल्या एका व्हीडिओच्या माध्यमातून त्यांनी हे वक्तव्य जारी केलं आहे.
तसंच केतकी विरोधात घाणेरडं ट्रोलिंग करून आपण संस्कारहिन असल्याचं दाखवू नका, असंसुद्धा त्या म्हणाल्या आहेत.
धर्मेंद्र प्रधान
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही एक ट्वीट केलं आहे. त्यांनी याच प्रकरणाच्या अनुषंगाने एक ट्विट केलं आहे.
"अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्तेच आता या स्वातंत्र्याच्या संकल्पनेला खरा धोका आहे. मविआ असो, आप असो किंवा तृणमूल असो, विरोधी पक्षाचे नेते सोशल मीडियाच्या पोस्टस, आणि टीकेला फारच मनावर घेऊ लागले आहेत"
"द्वेषमुलक कमेंटचं मी समर्थन करत नाही. मात्र अरविंद केजरीवाल आणि शरद पवार यांनी हे प्रकरण फारच मनावर घेतलं आहे. त्यांचा आत्मसन्मान इतका तकलादू आहे का? इगो नियंत्रणाबाहेर गेला की काय होतं याचं हे उत्तम उदाहरण आहे" असं ते म्हणालेत.
धर्मेद्र प्रधान यांनी केतकीचं थेट समर्थन केलेलं नाही. पण त्यांनी त्या अनुषंगाने राज्य सरकारवर टीका मात्र केली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)