कोरोना शिक्षण : पहिली ते आठवीची ऑनलाईन शाळा दीड तासापेक्षा जास्त वेळ नको- केंद्र सरकार #5मोठ्याबातम्या

आज सकाळी विविध वर्तमानपत्रं तसंच वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:

1. पहिली ते आठवीची ऑनलाईन शाळा दीड तासापेक्षा जास्त वेळ नको- केंद्र सरकार

तज्ज्ञांच्या शिफारसीनंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ऑनलाईन शिक्षणाबाबत नवे नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार बालवाडीच्या मुलांनाची ऑनलाईन शाळा आता फक्त अर्धा तास घेता येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

शिवाय पहिली ते आठवीची ऑनलाईन शाळा फक्त दीड तास तर नववी ते बारावीचे ऑनलाईन वर्ग तीन 3 तासांमध्ये घ्यावे लागणार आहेत.

महत्त्वाचं म्हणजे गृहपाठ देऊन इतर उपक्रम राबविण्याची शिफारसही मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली आहे.

सतत स्क्रीन समोर राहिल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे नियम आखण्यात आले आहेत.

2. कोरानावरील दोन भारतीय लसींच्या मानवी चाचणीला परवानगी

कोरोना व्हायरसवरील दोन भारतीय लसींच्या मानवी चाचणीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (DGCI)ने परवानगी दिली गेली आहे. ICMRचे महासंचालक बलराम भार्गव यांनी ही माहिती दिली आहे.

उंदीर आणि सशांवर या लशींची चाचणी यशस्वी झाली आहे, असं आयसीएमआरने म्हटलंय.

महाराष्ट्र टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही लसींसाठी किमान 1-1 हजार नागरिकांचा क्लिनिकल स्टडीही करण्यात येत आहे.

जगभरात वापरण्यात येणाऱ्या लसींपैकी 60 टक्के लसी या भारत बनतात. ही गोष्ट जगातील प्रत्येक देशाला माहिती आहे. यामुळे हे सर्व देश भारताच्या संपर्कात आहेत, अशी माहिती भार्गव यांनी दिली आहे.

3. बकरी ईद साधेपणाने साजरी करा - उद्धव ठाकरे

"वारकऱ्यांनी साधेपणाने वारी साजरी केली, लालबागच्या राजाने यावर्षी प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनीही ईदीची प्रार्थना घरातच करावी," असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

बकरी ईदबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक झाली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे मत मांडलं. मुस्लीम धर्मीयांचा महत्त्वाचा सण बकरी ईदमध्ये कुर्बानीसाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

गेल्या 4 महिन्यात सर्व समाज घटकांनी आपले सण घरात साजरे केलेत. त्यामुळं मुस्लिम बांधवांनी ईदीची प्रार्थना घरातच करावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

4. '5 हजारांचा चेक राहू द्या तुम्हालाच'

'शासनाने मदत देऊन एका प्रकारे माझी चेष्टा केली. यापेक्षा जास्त खर्च तर मंत्री, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यावर झाला असेल', असा आरोप करत एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदाराकडे मदतीचा चेक परत दिला आहे.

3 जूनला निसर्ग चक्रीवादळाने राज्याच्या इतर भागासह येवल्यात देखील धुमाकूळ घातला होता. वादळात अंदरसुल येथील गजानन देशमुख या शेतकऱ्याचे पोल्ट्री फार्म उद्ध्वस्त झालं होतं. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार भारती पवार यांनी या नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर देशमुख यांना देखील मदत मिळाली. मात्र, चेक पाहून त्यांना मोठा धक्का बसला. या शेतकऱ्याचे नुकसान झालं होतं सुमारे अडीच लाख रुपयाचे, तर मदत फक्त 5 हजार रुपयांची मिळाली. न्यूज18 लोकमतनं ही बातमी दिलीये.

5. शिवसेना धमकी दिल्याचा केतकी चितळेचा आरोप

अभिनेत्री केतकी चितळेने फेसबुकवर एक पोस्ट करत शिवसेनेच्या एका विभागप्रमुखाने धमकी दिल्याचा आरोप केला आहे. लोकसत्तानं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

केतकीने शिवाजी महाराजांबाबत लिहिलेल्या एका पोस्टवरून तिला ट्रोल केलं जात आहे.

केतकीने तिच्या नव्या पोस्टमध्ये 'शिवसेना अध्यक्ष प्रमुख आणि तरीही यांना पोस्ट कळली नाही. हे आहेत नेते, ज्यांना मराठी कळत नाही. कळतं काय तर लोकांचे पर्सनल नंबर घेऊन, त्यांच्यावर खोटे आरोप करून, त्यांना धमक्या देणे,' असं लिहिलं आहे. त्याचबरोबर तिने काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)