You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना मुंबई: शहरात कोरोनाग्रस्तांची झपाट्यानं वाढणारी संख्या स्थिरावली आहे का?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठीसाठी
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोव्हिड-19 चा कर्व्ह फ्लॅट झालाय? मुंबई शहरात कोरोनाग्रस्तांची झपाट्याने वाढणारी संख्या स्थिरावलीय? मुंबई महापालिकेचा दावा आहे की गेल्या महिनाभरातील कोव्हिड-19 रुग्णांची संख्या पाहाता, शहरात कोरोनाग्रस्तांच्या वाढीचा दर आता स्थिरावलाय.
एप्रिल-मे महिन्यात मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली. अत्यंत संसर्गजन्य आजार असल्याने कोरोना शहरात झपाट्याने पसरला. पण मुंबई महापालिकेचा दावा आहे की, 3 जूनपासून मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या स्थिरावली आहे.
मनिषा म्हैसकर या मंत्रालयात प्रधान सचिव आहेत. मुंबई शहरातील कोव्हिड रुग्णांचं काँटॅक्ट ट्रेसिंग करण्याची विशेष जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कोव्हिड रुग्णांना शोधून काढणं, रुग्णालयांचं मॉनिटरिंग करणं आणि विलगीकरण याची जबाबदारी त्यांना देण्यात आली.
मुंबईचा कर्व्ह फ्लॅट झाला आहे का? असं विचारलं असता त्या सांगतात, "मुंबईत कोव्हिड-19 च्या केसेस वाढण्याचा कर्व्ह फ्लॅटन झालाय किंवा स्थिरावलाय असं आपण म्हणू शकतो. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. याचं कारण गेल्या महिनाभरापासून मुंबई शहरात दिवसाला सरासरी 1,000 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद होत आहे. साधारणत: रुग्णांची संख्या 800 ते 1300 या मध्ये आपल्याला पहायला मिळतेय. 10 जूनला मुंबईत जवळपास 1500 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले होते."
मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या (14 जुलैची आकडेवारी)
- एकूण रुग्णसंख्या - 94, 863
- बरे झालेले रुग्ण - 66,633
- मृत्यू - 5,405
- मृत्यू दर - 5.70
- सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्ण - 22,773
- गंभीर रुग्ण - 1,126
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
"6 जूनला मुंबईत 47,128 कोरोनाग्रस्त रुग्ण होते. 14 जुलैला रुग्णांची संख्या 94, 863 वर पोहोचली. कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट होण्याचा वेग म्हणजेच डबलिंग रेटही वाढला आहे. रुग्ण संख्या वाढण्याचा दरही 1.5 टक्क्याच्या आसपास आहे." असं मनिषा म्हैसकरांनी म्हटलं.
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, सद्यस्थितीत मुंबईचा सरासरी ग्रोथ रेट म्हणजेच कोव्हिड-19 रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी 51 दिवसांपर्यंत पोहोचलाय.
मुंबईतील जून महिन्यातील रुग्णसंख्या
"मुंबईत सध्या दिवसाला 5000 टेस्ट केल्या जात आहे. टेस्टिंग कपॅसिटी 25 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. गेल्या चार आठवड्यांचा अभ्यास केल्यास फक्त एक दिवस मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. या सर्व गोष्टी पाहता मुंबईने कर्व्ह फ्लॅटन केलाय असं आपण म्हणू शकतो," असं त्या सांगतात.
ग्रोथ रेटबरोबरच डबलिंग रेट म्हणजे कोव्हिड रुग्ण किती दिवसांनी दुप्पट होत आहेत याची देखील चर्चा आहे. याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सांगतात, "मुंबईचा डबलिंग रेट 50 दिवसांपेक्षा जास्त आहे. रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरिंग रेट जवळपास 70 टक्के आहे. मुंबई शहर चांगल्या पद्धतीने इंप्रूव्ह होत आहे. त्यामुळे मुंबईत स्थिती आता नियंत्रणात आहे. पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज नाही."
मुंबईतील जुलै महिन्यातील रुग्णसंख्या
मुंबईतील जून आणि जुलै महिन्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता. देशाच्या आर्थिक राजधानीत हळूहळू कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढीचा कर्व्ह फ्लॅट होण्याच्या दिशेने चालला आहे असं आपण म्हणू शकतो.
मुंबईत कोरोनाच्या वाढीच्या कर्व्ह फ्लॅट झाला. या दाव्याबाबत बीबीसीशी बोलताना महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले, "मुंबई शहराने नक्कीच कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढीचा कर्व्ह फ्लॅट केला आहे. मी मुंबई महापालिकेच्या मताशी सहमत आहे. मुंबईत केसेस दुप्पट होण्याचा दर वाढलाय. रुग्ण बरे होण्याचा रेटही वाढतोय. सद्य स्थितीत रुग्णांच्या वाढीचा दर कमी होणं हा चांगला संकेत आहे."
"मुंबईत आता कोणीही जावून कोव्हिड-19 ची चाचणी करू शकतो. हा अत्यंत चांगला निर्णय सरकारने घेतलाय. टेस्ट कमी होतायत म्हणून संख्या कमी आहे असं म्हणणं योग्य नाही. आता मुंबईत होणाऱ्या टेस्ट आणि रुग्णांची संख्या या समीकरणावर विसंबून राहू नये," असं डॉ. जोशी म्हणतात.
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार -
- मुंबईत सध्या 5254 ऑक्सिजन बेड्स रिकामे
- 226 आयसीयू बेड्स रिकामे
- कोव्हिड केअर सेंटर-2 मध्ये 3339
- तर, डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल आणि डेडिकेटेड कोव्हिड केअर सेंटरमध्ये 7255 बेड्स रिकामे आहेत.
मुंबईतील परिस्थिती समाधानकारक असली तरी, मुंबई प्राधिकरणातील उत्तरेकडील शहरांमध्ये कोरोनाची वाढ झपाट्याने होत आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भायंदर या भागात मोठ्या संख्येने केसेस आढळून येत आहे. डॉ. जोशींच्या म्हणण्याप्रमाणे ही परिस्थिती चिंताजनक आहे.
मुंबई महापालिकेचा मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढण्याचा कर्व्ह फ्लॅट झालाय का? हा दावा तपासून पाहण्याचा प्रयत्न केला. आम्ही जून आणि जुलै महिन्यात मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय का? किंवा स्थिरावली आहे का? याचा अभ्यास केला.
2 जून - उत्तर आणि पूर्व मुंबईतील भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढीची टक्केवारी
उत्तर मुंबई
- RN (आर नॉर्थ) वॉर्डमध्ये 7.5 टक्के
- PN (पी नॉर्थ) 7 टक्के
- RC (आर सेंट्रल) 6.1 टक्के
- RS (आर साऊथ) 6.7 टक्के
पूर्व मुंबई
- S (एस) वॉर्डमध्ये 6.8 टक्के
- N (एन) वॉर्डमध्ये 6.1 टक्के
- T (टी) वॉर्ड 5.4 टक्के
जून महिन्यातील कोरोनाग्रस्तांच्या वाढीची तुलना आम्ही जुलै महिन्यातील कोरोनाग्रस्तांच्या वाढीच्या दरासोबत केली.
12 जुलै - उत्तर आणि पूर्व मुंबईतील भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढीची टक्केवारी
उत्तर मुंबई
- RN (आर नॉर्थ) 2.1 टक्के
- PN (पी नॉर्थ) 1.7 टक्के
- RC (आर सेंट्रल) 2.5 टक्के
- RS (आर साऊथ) 2.2 टक्के
पूर्व मुंबई
- S (एस) वॉर्डमध्ये 1.4 टक्के
- N (एन) वॉर्डमध्ये 1.4 टक्के
- T (टी) वॉर्ड 2.4 टक्के
या आकड्यांवरून एक गोष्ट तर स्पष्ट आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढीचा दर हळुहळू स्थिरावण्याच्या दिशेने चालला आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेने प्रिस्क्रिप्शनशिवाय मुंबईकर कोव्हिड-19 टेस्ट करू शकतात असं जाहीर केलं.
बीबीसीशी बोलताना महापालिका आयुक्त इकबल चहल म्हणाले होते, "आता कोणीही जावून कोव्हिड-19 ची तपासणी करू शकतो. यासाठी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन जरूरी नाही. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची अट महापालिकेने काढून टाकली आहे."
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची अट काढून टाकल्यानंतर मुंबईत टेस्ट आणखी वाढतील. त्यामुळे याचा परिणाम आकड्यांवर किंवा रुग्णांच्या वाढीवर होतो का हे मात्र पाहावं लागेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)