You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना महाराष्ट्र: पुण्यातलं 10 दिवसांचं लॉकडाऊन संपलं, मात्र या अटी-नियम लागू राहणार
पुण्यात कोरोना व्हायरसचे प्रसार वाढत असल्यानं 10 दिवसांचा (13 जुलै ते 23 जुलै) लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. 23 जुलैला हा लॉकडाऊन संपत असल्यानं पुणे महापालिका प्रशासनानं नवीन नियम जारी केले आहेत.
येत्या 31 जुलैपर्यंत पुणे महापालिकेनं गेल्या 10 दिवसातील नियम शिथिल केले आहेत. मात्र, काही अटी-शर्थींसह हे अनलॉक असेल, असंही सांगितलंय.
नव्या नियमांमधील महत्त्वाचे मुद्दे -
- केंद्र सरकारचे कोरोनाच्या नियंत्रणासाठी केलेले आदेश लागू राहतील
- महापालिका हद्दीत कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक कारण किंवा सेवा वगळता रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत घराबाहेर जाता येणार नाही.
- 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुलं यांना अत्यावश्यक सेवा आणि आरोग्यविषयक अडचणींशिवाय घराबाहेर जाता येणार नाही.
हे तिन्ही नियम सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रासाठी (Micro Containment Zone) यांसाठी लागू राहतील.
पुणे महापालिकेनं प्रतिबंधित क्षेत्रासाठी (Containment Zone) स्वंतंत्र नियमावली जाहीर केलीय. त्यानुसार,
- प्रतिबंधित क्षेत्रात वैद्यकीय सेवा, आपत्कालीन सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा सुरू राहतील. इतर व्यक्तींना या क्षेत्रात प्रवेशास बंदी.
- दूध आणि भाजीपाला किंवा स्वयंपाकाचा गॅस इत्यादी इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे, औषध विक्रेते, अत्यावश्यक सेवा पुरवणारे कार्यालयं, कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या वाहनांना या प्रतिबंधित क्षेत्रात बंदी नसेल.
- महापालिकेकडून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वांना या क्षेत्रात प्रवेश मिळेल. त्यांना कोणत्याही पासची आवश्यकता नाही.
- प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक वस्तूंची (किराणा दुकान, भाजीपाला विक्री, औषध विक्री, दवाखाने, दूध विक्री, रेशन दुकाने इत्यादी) दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडी राहतील.
वाहनांचा कसा वापर करता येईल?
नागरिकांच्या अत्यावश्यक सोयीसाठी पुणे महापालिकेनं काही नियम आखून दिले आहेत.
- टॅक्सी किंवा कॅब - वाहनचालक + 2 व्यक्ती
- रिक्षा - वाहनचालक + 2 व्यक्ती
- चारचाकी वाहन - वाहनचालक + 2 व्यक्ती
- दुचाकी वाहन - केवळ वाहन चालवणारी व्यक्ती
प्रतिबंधित क्षेत्राबाहेर दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी काही नियम-अटी लागू करण्यात आलेत. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेतच दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आलीय. दुकानातील कर्मचारी प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील असावा, अशी अट आहे. आरोग्याच्या दृष्टीनं घ्यायच्या सर्व खबरदारी घेणे बंधनकारक आहे.
खासगी कार्यालयांमध्ये 10 टक्के कर्मचारी किंवा जास्तीत जास्त 10 कर्मचारी कामावर येऊ शकतात. उर्वरीत कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करावे, असं महापालिकेचं म्हणणं आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात खालील गोष्टी पूर्णपणे बंद राहतील -
- शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण वर्ग, विद्यार्थ्यांच्या शिकवण्या इत्यादी.
- सिनेमा हॉल, व्यायामशाळा, पोहण्याचे तलाव, करमणुकीची ठिकाणे, नाट्यगृहे
- सामाजिक, राजकीय, क्रीड, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि कोणत्याही कारणाने होणारी मोठी गर्दी
- सर्वसामान्य व्यक्तींसाठी असलेली धार्मिक स्थळं
- स्पा
- मॉल, हॉटेल उपहारगृहे आणि इतर आदरातिथ्य करणाऱ्या सेवा
पुण्यात रुग्णांची संख्या 44 हजारांहून अधिक
नव्याने 1599 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 44,065 झाली आहे. तर 779 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 17,053 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण तपासणी आता 2,29,704 झाली असून आज 6 हजार 665 टेस्ट घेण्यात आल्या. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही आकडेवारी दिली.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
पुणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर याआधी 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या काळात शहरात अत्यावश्यक सेवाच सुरू होत्या. याआधीचं 10 दिवसांचं लॉकडाऊन कसं होतं, हे खालील मुद्दा्यातून लक्षात येईल.
असं होतं याआधीचं 10 दिवसांचं लॉकडाऊन -
- पहिले पाच दिवस म्हणजे 13 जुलै ते 18 जुलै दरम्यान कडक लॉकडाऊन असेल. या पहिल्या पाच दिवसात केवळ औषधं आणि दूध याच गोष्टी सुरू राहतील. इतर सर्व व्यवहार बंद राहतील.
- त्यानंतर शेवटच्या पाच दिवसात म्हणजेच 19 जुलै ते 23 जुलै दरम्यान सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
- या पूर्ण 10 दिवसांदरम्यान ऑनलाईन पासची व्यवस्था असेल. मात्र, ज्या वस्तू लागतील त्या खरेदी करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
- पुणे, पिंपरी चिंचवड या शहरी भागात हा लॉकडाऊन असून, ग्रामीण भागात लॉकडाऊन नसेल, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
- या 10 दिवसांच्या लॉकडाऊनचा विस्तृत आदेश उद्या (11 जुलै) संध्याकाळी काढला जाणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)