खिचडीत मीठ जास्त झालं म्हणून बायकोचा खून, असे गुन्हे का घडतात?

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी न्यूज

गेल्या महिन्यात पोलिसांनी एका 46 वर्षांच्या माणसाला अटक केली. नाश्त्यात मीठ जास्त झालं म्हणून पत्नीची हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

"निकेश घाग ठाण्यात बँकेत क्लार्क म्हणून काम करतात. त्यांनी त्यांच्या पत्नीचा खून केला कारण साबुदाण्याच्या खिचडीत मीठ जास्त होतं," असं मिलिंद देसाई या पोलीस अधिकाऱ्याने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

या दाम्पत्याला 12 वर्षांचा मुलगा आहे. त्याने हा सगळा प्रकार स्वत:च्या डोळ्यांनी पाहिला आहे. मीठ जास्त झालं म्हणून वडील संतापले आणि आईच्या मागे बेडरुममध्ये गेले आणि तिला मारहाण करायला सुरुवात केली.

"तो मुलगा धाय मोकलून रडू लागला आणि वडिलांना थांबण्याची विनवणी करू लागला. मात्र आरोपी त्याच्या बायकोला मारत राहिला आणि दोरीने गळा आवळला," देसाई सांगत होते.

हा सगळा प्रकार झाल्यावर घाग घराबाहेर गेले. मुलाने त्याच्या आजी आजोबांना आणि मामाला फोन केला.

"जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तोपर्यंत कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केलं होतं. पण तेव्हापर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता," असं देसाई म्हणतात.

आरोपीने पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केलं. आरोपीला रक्तदाबाचा त्रास आहे असं त्याने सांगितलं. त्याला तातडीने अटक करण्यात आली.

निर्मलाच्या कुटुंबियांनी सांगितलं की, घाग गेल्या 15 दिवसांपासून कौटुंबिक कारणांनी वाद घालत होते. मात्र अशी कोणतीही तक्रार आमच्याकडे आली नाही असं देसाई म्हणाले.

स्वयंपाक या विषयामुळे पत्नीची हत्या होण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. अशा घटना वारंवार घडताहेत. वानगीदाखल काही उदाहरणं पाहूया-

  • जानेवारी महिन्यात नोएडा मध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली. जेवण वाढायला नकार दिला या कारणाने या व्यक्तीची हत्या करण्यात आली.
  • जून 2021 मध्ये एका व्यक्तीने पत्नीची हत्या केली कारण तिने जेवणात तिला सॅलड दिलं नाही.
  • या घटनेच्या चार महिन्यानंतर बंगलोरमध्ये एका माणसाने त्याच्या बायकोची हत्या केली.
  • 2017 मध्ये बीबीसीनेच दिलेल्या एका बातमीनुसार जेवण उशीरा वाढलं म्हणून नवऱ्याने बायकोची हत्या केली.

जेंडर अॅक्टिव्हिस्ट माधवी कुकरेजा यांच्या मते मृत्युमुळे लक्ष वेधून घेतात. पण असे गुन्हे कायम नजरेआड होतात.

अगदी कायद्याच्या दृष्टीने विचार केला तर हा नवऱ्याने किंवा नातेवाईकांनी केलेला हिंसाचार या वर्गवारीत मोडतो. मात्र कौटुंबिक हिंसाचार हा बहुसंख्येने भारतात घडतो. हे वर्षानुवर्षं सुरू आहे. 2020 मध्ये 112292 बायकांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. दर पाच मिनिटाला अशा पद्धतीने एक तक्रार येते.

असा हिंसाचार भारतासाठी नवीन नाही. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार तीन पैकी एका बाईने लिंगाधारित गुन्ह्याची तक्रार नोंदवली होती. यात बहुसंख्येने जवळचेच लोक असतात. भारतातील आकडेवारीही जवळपास सारखीच आहे.

राष्ट्रीय कौटुबिंक सर्वेक्षणातही अशीच आकडेवारी समोर आली आहे.

40 टक्के पुरुष आणि 38 टक्के बायकांनी सांगितलं आहे की, जर एखाद्या स्त्रीने तिच्या सासरच्यांचा अनादर केला, घरच्यांकडे दुर्लक्ष केलं, त्यांना न सांगता घराबाहेर गेलं, सेक्स करण्यास नकार दिला किंवा स्वयंपाक चांगला केला नाही तर एखाद्यावेळेस मारणं अगदीच योग्य आहे. चार राज्यांत 77 टक्के बायकांनी मारहाणीचं समर्थन केलं.

बहुसंख्य राज्यात स्त्रियांनीच मारहाणीचं समर्थन केलं. कर्नाटक फक्त त्याला अपवाद होतं. पुरुषांपेक्षा बायकांनीच मारहाणीचं समर्थन केलं आहे. 52 टक्के बायकांनी आणि 42 टक्के पुरुषांनी बायकांना मारहाण करण्याचं समर्थन केलं, पण तरीही वृत्ती बदललेली नाही असं अमिता पित्रे म्हणतात. त्या ऑक्सफॅम च्या जेंडर जस्टिस कार्यक्रमाच्या प्रमुख आहेत.

"स्त्रियांविरुद्ध हिंसाचार आणि त्याचं समर्थन याचं मूळ पुरुषसत्ताक अवस्थेत आहे. लिंगाधारित हिंसाचाराला भारतात मान्यता आहे. स्त्रियांना कायम दुयय्म समजलं जातं." असं त्या पुढे म्हणतात.

"बायकांनी कसं वागावं याचं काही सामाजिक आडाखे आहेत. निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नाही. तिने त्यांना जेवण वाढलं पाहिजे. तिने त्याच्यापेक्षा कमी पैसे कमावले पाहिजे. मात्र हेच उलटं स्वीकार केलं जात नाही. जर बाईने त्याला आव्हान दिलं, तर नवऱ्याने तिची जागा दाखवणं अगदी सामान्य समजलं जातं."

बायका मारहाणीचं समर्थ करतात याचं कारण असं की, पितृसत्ताक पद्धतीने प्रत्येकाच्या भूमिका आखून दिल्या आहेत आणि बायकांनी त्या मान्य केल्या आहेत. त्यांची मूल्यं समाजाने आणि कुटुंबाने ठरवून दिलेली असतात.

कुकरेजा बुंदेलखंड मध्ये एक संस्था चालवतात. त्यांच्या मते नवविवाहित मुलींना असा सल्ला दिला जातो की, आता तू त्या घरची झाली आहेस. आता तुझी अंत्ययात्रा या घरातूनच जाईल हे लक्षात ठेवावं.,

त्यामुळे बहुतांश बायका हिंसाचाराचा स्वीकार करतात आणि हेच नशीब आहे असं समजून चालतात.

"गेल्या दशकात बायकांना मारहाणीच्या अनेक घटना समोर येताहेत. तरीही बायकांना मारहाणीच्या तक्रारी म्हणाव्या तशा समोर येत नाही. अशा केसेस समोर येणं कठीण असतं. जे घरात होतं, ते घरातच रहावं असं अनेकांना वाटतं. त्यामुळे बायका माहेरी जात नाही," असं कुकरेजा म्हणतात.

जर सासरचं घर सोडलं तर त्यांना रहायला कोणतंही घर नसतं, असंही त्या पुढे म्हणतात.

"अनेक केसेस मध्ये तो बट्टा आहे म्हणून मुलींना माहेरी आणणं नकोसं वाटतं. कारण एक तर गरीबी असते त्यामुळे खाणारं आणखी एक तोंड घरात येतं. त्यांना कुणाचाही पाठिंबा नसतो. त्यांना नुकसानभरपाईही अत्यंत कमी मिळते. अगदी 500 ते 1000 पर्यंत. ही रक्कम बायकांसाठीच पुरेशी नसते त्यामुळे तिच्या मुलांचा तर संबंधच नाही."

पुष्पा शर्मा वनांगनासाठी काम करतात. त्यांनी मला अशा दोन केसेसबदद्ल सांगितलं जिथे बायकांना मारहाण करण्यात आली आणि नवऱ्याने मुलाबाळांसकट सोडून दिलं.

"दोन्ही केसेस मध्ये नवऱ्याने त्यांना केस ओढून घराच्या बाहेर काढलं आणि शेजाऱ्यांमोर अपमान केला. त्यांचं असं म्हणणं आहे की नवऱ्यांच्या मते त्या चांगला स्वयंपाक करत नव्हत्या.खरंतर स्वयंपाक हे फक्त एक निमित्त असतं." पुष्पा वर्मा सांगतात.

1997 मध्ये ही वनांगनाची चळवळ सुरू झाली आहे.

"मात्र गेल्या 25 वर्षांत फारसं काहीही बदललेलं नाही. कारण लग्न वाचवण्यासाठी सगळी धडपड केली जाते. ते पवित्र असतं. ते टिकायलाच हवं," असं कुकरेजा सांगतात

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)