मंगेशकर कुटुंबीयांची कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी- आव्हाड #5मोठ्याबातम्या

विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1.मंगेशकर कुटुंबीयांची कृती 12 कोटी माणसांचा अपमान करणारी- आव्हाड

या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे अशी टीका गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. पण, या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचा उल्लेख टाळण्यात आला होता. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त करत ट्वीट केलं. 'लोकमत न्यूज18'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

मुंबईतील ष्णमुखानंद हॉलमध्ये हा सोहळा रंगला. दरम्यान, या कार्यक्रमाला राज्य सरकारच्या वतीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हजेरी लावली होते. राजशिष्टाचार म्हणून आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई हे मुंबई विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी गेले होते. या कार्यक्रमाला विशेष करून, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थितीत होते.

दरम्यान, पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण हा पुरस्कार देशाच्या जनतेला समर्पित करत असल्याचं ते म्हणाले. यावेळी मोदींनी लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला.

माझ्यासाठी लतादीदी सूरसम्राज्ञीसह मोठी बहीण होती. मला त्यांच्याकडून नेहमी मोठ्या बहीणीसारखं अपार प्रेम मिळालं आहे. यापेक्षा माझ्या आयुष्यातलं मोठं सौभाग्य काय असू शकतं! आता राखी पौर्णिमेला दीदी राहणार नाहीत. लता दीदींच्या नावाने पुरस्कार मिळणं हे सौभाग्य आहे. हा पुरस्कार स्वीकारणं माझं दायित्व आहे. मी या पुरस्काराला संपूर्ण देशवासींना समर्पित करतो", अशा भावना नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या.

2.मुख्यमंत्र्यांनी घेतली आजींची भेट

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचाविरोधात मातोश्री बाहेर पहारा देणाऱ्या आजींच्या घरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब भेट दिली.

92 वर्षीय चंद्रभागा शिंदे यांच्या शिवडी येथील घरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना आंब्याची पेटी भेट म्हणून दिली. तर रश्मी ठाकरे यांनी त्यांची गळाभेट घेतली. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ''शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे जी व्यक्ती वयाने मोठी होत असते ती मानाने तरुण असली पाहिजे. या आजी देखील वयाने ज्येष्ठ असल्या तरी मनाने त्या अजूनही युवा सैनिक आहेत. हे असे शिवसैनिक मला मिळाले, हा बाळासाहेबांचा मला आशीर्वाद आहे.'' ते म्हणाले, ''काल कडाक्याच्या उन्हात या आजी बसल्या होत्या. आता त्यांनी करून दाखवलं झुकेगा नहीं, हे बाळासाहेबांनी जे शिवसैनिक तयार केले आहेत, ते झुकणारे शिवसैनिक नाही.''

3.पाकिस्तानातली पदवी भारतात चालणार नाही, युजीसीचा निर्णय

पाकिस्तानातील पदव्या भारतात नोकऱ्या आणि उच्च शिक्षणासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, असे विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेनं स्पष्ट केलं आहे. जम्मू-काश्मीर भागातील सुमारे 350हून अधिक विद्यार्थी सीमेपलीकडे शिक्षण घेत असल्याची माहिती सरकारने प्रसिद्ध केली आहे.

या शिखर संस्थांनी चीन आणि युक्रेन येथील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही निर्बंध जाहीर केले आहेत. त्यापाठोपाठ आता पाकिस्तानातील पदवी देशात नोकरी तसेच उच्च शिक्षणासाठी ग्राह्य नसेल, असे स्पष्ट करणारे परिपत्रकही त्यांनी काढले आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

देशातील अनेक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी नवनवीन संधी उपलब्ध करून आकर्षित केले जाते. मात्र तेथील शिक्षणातील दर्जाबाबत जागतिक स्तरावर मान्यता नसल्याने अनेकदा विद्यार्थ्यांची फसवणूक होते. यामुळे या सूचना काढण्यात आल्याचे आयोगातर्फे सांगण्यात आले.

4.धार्मिक क्षेत्रातील लोकच अधिक नास्तिक-सुनील सुकथनकर

देवाच्या दर्शनासाठी तिकिट आणि अधिक पैसे देणाऱ्या भाविकांना आधी दर्शन असे उपक्रम राबविणारे धार्मिक क्षेत्रातील लोकच अधिक नास्तिक आहेत," असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी व्यक्त केले. पुण्यात शहीद भगतसिंग विचारमंचातर्फे आयोजित नास्तिक मेळाव्यात बोलत होते.

कला क्षेत्रात तर अंधश्रद्धेचा सुकाळ आहे. मी स्वतःला नास्तिक मानत असलो, तरी चित्रीकरणापूर्वी पूजा करणाऱ्यांच्या भावना दुखावू नये ही सहिष्णुता माझ्याकडे आहे. बहुसंख्यांच्या धर्माला प्रश्न विचारतात म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केली गेली. वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला नको आहे का? जो अधिक पैसे देतो त्याला आधी दर्शन दिले जाते हे न समजणाऱ्या देवाला असहाय्य कोणी केले? धर्म, देव आणि सणसमारंभ आपण काढून कसे टाकणार?" असा सवाल सुकथनकर यांनी केला. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

चिकित्सा आणि प्रश्न विचारण्याची ताकद फक्त नास्तिकतेतून येते. वैचारिकदृष्ट्या स्वतंत्र माणूस खरा साहिष्णुभाव जपू शकतो. धर्मासाठी 'गर्व से कहो' म्हणणार असाल तर मी तुम्हाला विरोध करेन ही भूमिका घ्यावी लागेल,

5.घोटाळेबाजांचे हिंदुत्व- नुसताच थयथयाट

नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक केल्यानंतर भाजपची मळमळ बाहेर पडली. राणा दाम्पत्याचे गुन्हे हे फसवाफसवी आणि अफरातफरीचे आहेत. आयएनएस विक्रांत घोटाळ्यातील आरोपी किरीट सोमय्या राणा दाम्पत्याला भेटायला गेले. संतप्त लोकांनी चपला-दगड फेकले. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असं भाजपवाले म्हणत असतील तर ते एकप्रकारे चोर-लफंग्यांचं समर्थन करत आहेत. बनावट जात प्रमाणपत्राद्वारे लोकसभेत गेलेल्या कौर यांना केंद्र सरकारने सुरक्षा कवच दिलं आहे. 'सामनाच्या अग्रलेखात' जोरदार टीका करण्यात आली आहे.

भाजपने हिंदुत्वाच्या नावाने जो धांगडधिंगा सुरू केला आहे त्याचे समर्थन करता येणार नाही. हिंदुत्व हा संस्कार आहे आणि संस्कृती आहे. हिंदुत्व, श्रीरामाला जाहीरपणे विरोध करणारं दाम्पत्य काँग्रेस राष्ट्रवादीच्या धर्मनिरपेक्ष पाठिंब्याने निवडून आले व आता भाजपच्या कळपात शिरले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)