You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बासा: केवळ हाच मासा हॉटेलांमध्ये का दिला जातो? तो आरोग्यासाठी हानिकारक आहे का?
- Author, बल्ला सतीश,
- Role, बीबीसी तेलुगू
बासा या नावाचा मासा आता देशभरात लोकप्रिय झालेला आहे. देशाबाहेरून मासे आयात केले जातात अशाच ठिकाणी या माशाला मोठी मागणी आहे, असं नाही.
उदाहरणार्थ, कृष्णा नदीच्या काठी असणाऱ्या विजयवाडासारख्या ठिकाणी, गोदावरीच्या काठावरील राजमुंद्रीमध्ये, बंगालच्या उपसागराला लागून असणाऱ्या नेल्लोरमध्ये आणि अर्थातच हैदराबादमध्येसुद्धा हा मासा उपलब्ध होतो. अर्थात, सगळीकडे तो आयातच केलेला असतो.
नद्यांच्या काठावरील भागांमध्ये किंवा समुद्रकिनाऱ्यांजवळ असणाऱ्या शहरांमधील हॉटेलांमध्ये बहुतांशा बासा मासाच समोर येतो. अशा ठिकाणी स्थानिक लोकप्रिय माशांच्या प्रजाती मागे पडल्या आहेत.
एखाद्या हॉटेलात जाऊन तुम्ही 'फिश' अशी ऑर्डर दिलीत, तर समोर आलेल्या पदार्थाचा रंग किंवा चव कशीही असू दे, त्यातला मासा बासा हाच असणार. याला कोणतंही हॉटेल अपवाद नाही. अगदी चौकातलं एखादं छोटं हॉटेल असू दे किंवा मोठमोठी पंचतारांकित हॉटेलं असू देत.
बासा म्हणजे काय?
बासा या माशाचं मूळ नाव किंवा त्याची प्रजाती माहिती नसतानाही बहुसंख्य मत्स्याहारी भारतीयांनी या माशाची चव चाखलेली आहे. भारतीय बाजारपेठेत आल्यानंतर दहा वर्षांमध्ये हा मासा सर्वत्र वेगाने पसरला. देशादेशांमध्ये त्यावरून वाद झाले आहेत. या माशावर पर्यावरणवाद्यांनी आक्षेपही घेतले आहेत.
बासा हा 'कॅट फिश'चा एक प्रकार आहे. त्याचं शास्त्रीय नाव आहे- Pangasius Bocourti. व्हिएतनाम व थायलंड यांसारख्या आग्नेय आशियाई देशांमध्ये हा माशाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. एके काळी गोड्या पाण्यामध्ये हा मासा सापडत असे, पण आता निर्यातीसाठी त्याची शेती केली जाते.
आग्नेय आशियाई देशांमधून हा मासा अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, भारत, इत्यादी देशांमध्ये निर्यात केला जातो.
वेगवेगळ्या देशांमध्ये हा मासा वेगवेगळ्या नावांनी विकला जातो. स्वाई, बोकोर्ती, रिव्हर कॉब्लर, पँगासिअस, कॅट फिश अशी त्याची काही वापरातील नावं आहेत. या पँगासिअस प्रजातीमधील बासा हा सर्वांत प्रसिद्ध मासा आहे.
त्याच्यात स्नायूंचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे अर्थातच मांस जास्त मिळतं. हा मासा वेगाने वाढतो आणि त्याचा आकार मोठा असतो.
व्हिएतनाम आघाडीवर
आग्नेय आशियातील मेकाँग व चाओ फ्राया या नद्यांमध्ये बासा मासा नैसर्गिकरित्या वाढतो. या नद्या व्हिएतनाम, चीन, कंबोडिया, थायलंड, इत्यादी देशांमधून वाहतात, त्यामुळे तिथे हे मासे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात.
परंतु, भारतात उपलब्ध असणारा बासा मासेमारी करून पकडलेला नसून मत्स्यशेतीद्वारे उत्पादित केलेला आहे.
या माशाच्या व्यापारातील लाभांचा विचार करता, निव्वळ मासेमारी करून निर्यातीची वाढती मागणी भागवणं शक्य नाही. त्यामुळे लोकांनी त्याची मत्स्यशेती सुरू केली.
पिंजऱ्यांमधील शेती- नद्यांमध्ये जाळी बसवून या माशांची शेती करण्याचं प्रमाण वाढलं. वेगाने वाढण्याचा या माशाचा नैसर्गिक गुणही उपकारक ठरला.
आज मेकाँग नदीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये या माशाची शेती बऱ्याच ठिकाणी होते. या माशाला जगभरात वर्षभर मागणी असते, त्यामुळे या मत्स्यशेतीतून चांगलं उत्पन्न मिळतं.
व्हिएतनाममधून होणारी माशांची निर्यात जानेवारी 2021 ते जानेवारी 2022 या काळात 44 टक्क्यांनी वाढली. निव्वळ जानेवारीत व्हिएतनाममधून झालेल्या माशांच्या निर्यातीचं मूल्य 6,500 कोटी रुपये असल्याचं, व्हिएतनामी मत्स्य निर्यातदार व उत्पादक संघटनेने सांगितलं.
भारताने 2020-21मध्ये माशांची जितकी निर्यात केली, त्याच्या एक षष्ठांश माशांची निर्यात व्हिएतनामने एका महिन्यात केली. व्हिएतनामच्या बहुतांश मत्स्यनिर्यातीमध्ये बासा माशाचा समावेश आहे. व्हिएतनाममध्ये गेल्या 30 ते 40 वर्षांमध्ये बासाचं उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढलं.
भारतात मोठा पुरवठा
भारतातील बासा माशाला असलेली मागणी सुमारे 2007-08च्या सुमारास वाढली. फोर्ब्स नियतकालिकातील एका वृत्तानुसार, भारतात बासा मासा आयात करणारा पहिले विक्रेते योगेश ग्रोव्हर हे होते. अर्थात, आयात कोणीही सुरू केली असली, तरी आता लाखो टन बासा भारतात आयात केला जातो.
या माशाचं शिजवलेलं मांस साधं आणि पांढरं दिसतं. या माशामध्ये केवळ एकच हाड असतं. त्याचा फारसा वास येत नाही. सर्वसाधारणतः मासा खायला न आवडणाऱ्या लोकांना त्याचा वास आवडत नसतो. दुसरी अडचण असते ती हाडांची. बासाच्या बाबतीत या दोन्ही अडचणी येत नाहीत.
केवळ याच कारणांमुळे हा मासा बाजारपेठेत सर्वव्यापी झाला का? अर्थातच, नाही!
मोठा व्यवसाय
यामागे खूप मोठा व्यवसाय आहे. "बासा बराच स्वस्त असतो. व्हिएतनाममध्ये त्याचं लाखो टनांमध्ये उत्पादन होतं. त्यामुळे ते अतिशय कमी किंमतीत त्याची निर्यात करतात. भारतात मत्सशेतीमधून किंवा मासेमारीमधून मिळालेल्या माशांसाठी सर्वसाधारणतः जितकी किंमत मोजावी लागते, त्याच्या अर्ध्या किंमतीत व्हिएतनामा बासाचा पुरवठा करतो," असं हैदराबादमधील एका रेस्टॉरंटचे मालक रवी बीबीसीशी बोलताना म्हणाले.
याच कारणामुळे हॉटेलांमध्ये व रेस्टॉरंटमध्ये बासा माशाला पसंती दिली जाते. वेगवेगळ्या नावांनी हाच मासा विकला जातो. मग चव कोणतीही असो, मासा हाच असतो.
सध्या प्रक्रिया केलेला, पाकीटबंद बासा 250 ते 300 रुपयांना उपलब्ध होतो. रेस्टॉरंटसाठी तो अर्थातच अधिक स्वस्तात मिळतो.
केवळ कमी किंमत हा या माशासंबंधीचा सकारात्मक मुद्दा नाही. शिजवण्याशीही त्याचा संबंध आहे. "सर्वसाधारणतः स्टार्टर, ग्रिस आणि काही आमट्यांसाठी जास्त मांस असलेला मासा गरजेचा असतो. अशा वेळी हाड नसलेला आणि फक्त मांस असलेला मासा शिजवायला नि खायला अगदी सोयीचा ठरतो. त्यामुळेच बासा माशाला इतका प्रतिसाद मिळतो," असं विविध मोठ्या हॉटेलांमध्ये शेफ म्हणून काम केलेल्या रिझवान यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
बासा माशामध्ये एकच हाड असतं. त्याचे खवले काढून टाकणं सोपं असतं, आतलं एकच आडवं हाड काही सेकंदांमध्ये काढून टाकता येतं. निर्यातदार खवले आणि हाड काढून आकर्षिक पद्धतीने पॅकिंग करून मासे पाठवतात.
प्रचलित उपलब्ध माशांना आधी साफ करावं लागतं, मग त्यांचे खवले काढावे लागतात आणि हाडं काढावी लागतात. पण बासाच्या बाबतीत मात्र पाकीट उघडलं की तव्यावर परतून घ्यायचं, झालं काम! त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये स्टार्टर म्हणून बासाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
हे मासे ताजे कसे राहतात?
बासा मासा तळ्यातून व नदीतून बाहेर काढल्यावर प्रक्रियेसाठी नेईस्तोवर पाण्यातच ठेवला जातो, त्यामुळे प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यात जाईपर्यंत तो जिवंतच असतो. तिथे मग त्यांचे खवले, डोकं, शेपटी व हाड काढलं जातं, त्यांचं पॅकिंग केलं जातं आणि शीतगृहात ठेवलं जातं.
इतर खंडांमध्ये निर्यात करायची असली, तरी अशाच शीतपेटीतून त्यांची निर्यात केली जाते. त्यामुळे अनेक महिन्यांनी हॉटेलांमध्ये ही पाकिटं उघडण्यात आली तरी मासा ताजाच राहतो.
पण यात सगळंच सुशेगात आहे असं नाही. यात अनेक वादही उद्भवलेले आहेत.
मागणीसोबत बासा माशाचं उत्पादनही वाढत गेलं. मेकाँग नदीच्या त्रिभुज प्रदेशात त्याचं उत्पादन अधिक होतं. या मत्स्यशेतीमध्ये अनेक रसायनं वापरली जातात. नियमांची फिकीर क्वचितच केली जाते. त्यामुळे पर्यावरणाचा नाश होतो, असं सी फूड्स वॉच या संस्थेने म्हटलं आहे.
बासा माशाचं सेवन कमी करावं, असं आवाहन सी फूड्स् वॉच संस्थेने सर्वांना केलं आहे. आग्नेय आशियातील जाळ्यांचे पिंजरे करून मत्स्यशेती करण्याची पद्धती पर्यावरणासाठी विध्वंसक आहे, अशी चिंता या संस्थेने व्यक्त केली आहे.
बासामध्ये पाऱ्याचे अंश सापडल्याचं 'एफएसएसएआय' या भारतीय अन्न नियंत्रक संस्थेनेही जाहीर केलं आहे. पण प्रत्येक नमुन्यामध्ये पाऱ्याचे अंश नव्हते, असंही संस्थेने स्पष्ट केलं आहे.
इतर देशांमधील वाद
बासा माशांमध्ये रसायनं व अँटि-बायोटिक पदार्थ असतात, असं फ्रेंच माध्यमांनी 2008 साली प्रसिद्ध केलं होतं. त्या वेळी व्हिएतनामी मत्य निर्यातदार संघटनेने हे आरोप फेटाळून लावले. नाव वेगळं लावून बासा मासा अनेक पदार्थांमध्ये वापरला जात असल्याबद्दल ऑस्ट्रेलियातील अनेक ग्राहकांनी चिंता व्यक्त केली होती.
अमेरिका व व्हिएतनाम यांच्यात 2002 साली या माशावरून वाद झाला. बासा माशाची मोठ्या प्रमाणात निर्यात करून व्हिएतनाम अमेरिकी बाजारपेठा अतिरिक्त उत्पादनाने भरून टाकत असल्याचा आरोप अमेरिकी सरकारने केला.
शेवटी, अमेरिकी काँग्रेसने 2003 साली बासाच्या आयातीवर निर्बंध घातले. शिवाय, माशाचं नाव पाकिटावर स्पष्टपणे लिहिलेलं असायला हवं, असाही आदेश देण्यात आलं.
पँगासिअस कुळातील सर्व मासे सारखेच दिसतात आणि ते बासा या नावाखाली विकले जातात, असा या संदर्भातील मुख्य आरोप आहे. हा मुद्दा केवळ अमेरिकेपुरता मर्यादित राहिलेला नाही. ही एक जागतिक समस्या झालेली आहे. 2010 साली बासाच्या नावाखाली दुसरा कुठलातरी मासा ग्राहकाला दिल्याबद्दल ब्रिटनमधील स्थानिक प्रशासनाने एका रेस्टॉरंटला दंड केला होता.
ब्रिटनमध्ये स्वस्तात उपलब्ध मासा म्हणून बासा प्रचंड लोकप्रिय आहे.
या संदर्भात, ग्रीनपीस या संस्थेने 2015 साली एक मोहीम चालवली होती. माशांची मूळ नावं पाकिटांवर स्पष्टपणे लिहिलेली असायला हवीत, अशी मागणी या मोहिमेद्वारे करण्यात आली.
बासा खाणं इष्ट आहे का?
"या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर कोणाकडेही नाही. गेली 15 वर्षं भारतीय लोक बासा मासा मोठ्या प्रमाणात खात आहेत. याचे आरोग्यावर अमुक एक परिणाम होत असल्याचं काही संस्थांनी म्हटलं आहे, त्या व्यतिरिक्त मात्र यासंबंधीचा काही पुरावा नाही. साठवलेले मासे खाणं पसंत न करणारे लोक वगळता बाकीच्यांना बासाबाबत काही अडचण नाही.
"किंबहुना अलीकडच्या काळात ग्राहकांना ते केवळ खातायंत एवढंच माहीत असतं, आपण कोणता मासा खातोय यात त्यांना काही रस नसतो. अशा परिस्थितीत बासा खाण्याने काही धोका संभवत नाही," असं रवी म्हणतात.
बासा खाणं चांगलं की वाईट, यावरून इंटरनेटवरही वाद होत आहेत.
बासा माशाने भारतातील स्थानिक माशांना बाजूला सारलं आहे. बासाची मक्तेदारी भारतापुरती मर्यादित नाही. जगभरात हीच स्थिती आहे. या माशाची मागणी प्रचंड आहे आणि ती भागवण्याइतका पुरवठाही होतो आहे. हा मासा साफ करायला आणि शिजवायलाही सोपं असतं.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे विविध देशांमधील स्थानिक माशांपेक्षा बासा स्वस्त किंमतीला उपलब्ध होतो. तो साठवून ठेवणंही शक्य असतं. या सगळ्यामुळे बासा हा सध्या जागतिक बाठारपेठेत सर्वाधिक सेवन केला जाणारा मासा ठरला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)