You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हनुमान चालिसा ज्यांनी लिहिली ते संत तुलसीदास मुस्लिमांच्या विरोधात होते का?
- Author, उत्पल पाठक,
- Role, वाराणसीहून, बीबीसी मराठीसाठी
मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात हनुमान चालिसा मोठा मुद्दा बनला आहे. हनुमान चालिसेचा वापर मुस्लीमविरोधी राजकारणासाठी केला जात असल्याचंही या निमित्ताने दिसून येत आहे.
ज्या हनुमान चालिसेवरून सध्या घमासान सुरू आहे, ती हनुमान चालिसा 500 वर्षांपूर्वी संत तुलसीदास यांनी लिहिली होती. संत तुलसीदास यांनीच वाराणसीच्या जगप्रसिद्ध संकटमोचन मंदिराची स्थापना केली. आता या मंदिराचं कामकाज डॉ. विश्वंभरनाथ मिश्रा पाहतात.
हनुमान चालिसेवरून सध्या सुरू असलेल्या वादाबाबत डॉ. विश्वंभरनाथ मिश्रा यांना नेमकं काय वाटतं, संत तुलसीदास हे मुस्लिमविरोधी होते का, हनुमान चालिसा लिहिण्यामागची त्यांची भावना नेमकी काय होती, हे आपण जाणून घेऊ -
जेव्हा तुलसीदास यांनी अकबराची ऑफर नाकारली...
"संत तुलसीदास हे मुघट सम्राट अकबरच्या समकालीन होते. या पार्श्वभूमीवर अनेक कथा-किस्से सांगण्यात येतात. त्या काळी संत तुलसीदासांना अकबरच्या नवरत्नांमध्ये सहभागी होण्याचीही ऑफर आली होती. पण त्यांनी ती स्पष्टपणे नाकारली होती," अशी माहिती डॉ. विश्वंभरनाथ मिश्रा यांनी दिली.
ते सांगतात, "हनुमान चालिसेचा काळ हा मुघल काळ होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुघलांनी काय केलं ते सर्वांना माहिती आहे. संत तुलसीदास यांना अकबरच्या दरबारातून बोलावणं आलं होतं.
"पुढे दोघांमध्ये चांगले संबंध निर्माण झाले. अकबरसुद्धा संत तुलसीदासांना भेटण्यासाठी लवाजमा घेऊन एकदा तुलसी घाटात आले होते, असं एका चित्रामध्ये दर्शवण्यात आलं आहे. संत तुलसीदासांनी आपल्या नवरत्नांमध्ये सहभागी व्हावं, असं अकबरला वाटायचं. पण संत तुलसीदास यांनी त्याला नकार दिला होता. आपण आपलं जीवन रामाला समर्पित केलं असल्याने सरकार दरबारी येऊ शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं. अकबरनेही ते मान्य केलं होतं."
संत तुलसीदास मुस्लीम विरोधी होते का?
"ज्या हनुमान चालिसेवरून सध्या वातावरण तापलं आहे. ती मुळात मुस्लीमविरोधी विचारांतून लिहिण्यात आलीच नव्हती," असं डॉ. मिश्रा सांगतात.
याविषयी बोलताना ते म्हणाले, "हनुमान चालिसेचा असा वापर करण्याचा विचार का आला, हेच मुळात मला कळत नाही. संत तुलसीदास यांनी मुघल काळात गोस्वामीजी ओपन थिएटरप्रमाणे रामलीलासारखी संकल्पना राबवली. अशा प्रकारचे कार्यक्रम होऊ नये, असं जर त्या काळी सरकारला वाटलं असलं तर काय झालं असतं कल्पना करा. या स्थितीतही तुलसीदासांचं कार्य सुरू होतं."
ते पुढे म्हणतात, "त्याकाळी समाजावर ब्राह्मणांचं वर्चस्व होतं. संत तुलसीदास यांनी त्यांचंही वर्चस्व नाकारलं. मी फक्त रामाचा गुलाम आहे, मला तुमच्याशी काहीच देणं-घेणं नाही, असं त्यांच्या पदांमधून दिसतं. समाजातील प्रत्येक पुरुषात ते रामाला तर स्त्रीमध्ये सीतेला पाहायचे. ज्याची भावना अशी असेल, तर मग हिंदू-मुस्लीम, जात-पात, प्रांतवाद यामध्ये कुठून आला?"
'हनुमान चालिसेवरून भेद करणाऱ्यांच्या मनात विकार'
आपण कुणाला आनंदी करू शकत नाही, तर आपण कुणाला दुःखीही करू नये. तुम्ही खरंच रामाचे भक्त असाल. तर देवाच्या महात्म्याचा तुम्ही आदर कराल. सगळ्यांच्य भावनांचा तुम्ही आदर कराल. सध्या हनुमान चालिसेचा प्रयोग ज्या प्रकारे केला जात आहे, तसं व्हायला नको, अशा शब्दांत डॉ. विश्वंभरनाथ मिश्रा यांनी या संपूर्ण प्रकरणावर दुःख व्यक्त केलं.
ते म्हणतात, "तुम्ही मोठं जप वगैरे करू शकत नसाल, तर तुम्ही फक्त हनुमान चालिसा हनुमानासमोर वाचा. तुम्हाला पाहिजे ते फळ मिळेल. आजची स्थिती पाहिली तर बेरोजगारी, आर्थिक मंदी अशा समस्या आहेत. हे संकट दूर होण्यासाठी तुम्ही हनुमानासमोर हनुमान चालिसेचं वाचन करा. सगळे सुखी राहावेत, समाजात समृद्धी यावी, अशी तुम्ही प्रार्थना करा.
हनुमान चालिसेतून काय संदेश दिला?
विश्वंभरनाथ मिश्रा यांच्या मते, "जगतातील सर्व चराचर रामाची निर्मिती आहे. त्यातही मानवाला बुद्धी आणि मन दिलं आहे. त्याचा वापर करून तो या जगाचा आदर करेल. इथं प्रत्येकाला आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे, असा संदेश संत तुलसीदास यांनी दिला होता. पण हनुमान चालिसेवरून काही जण भेद निर्माण करत आहेत, याचा अर्थ त्यांच्या मनात काहीतरी विकार आहे. हा विकार नष्ट होण्यासाठी त्यांनी हनुमानाकडे प्रार्थना करावी. असा संदेश चालिसेतून हनुमान चालिसेतून देण्यात आला."
"आपण काय अनंत काळासाठी जगात आलेलो नाही. सगळ्यांची प्रगती होण्यासाठी, या देशाचं नाव विश्वगुरु म्हणून घेतो. विश्वगुरू असं विनाकारण म्हटलं जाणार नाही. या देशातील लोकांचं मन खूप मोठं आहे. संकुचित विचार सोडण्याची आपल्याला गरज आहे," असंही डॉ. मिश्रा यांनी म्हटलं.
रामासाठी जीवन समर्पित
विश्वंभरनाथ मिश्रा संत तुलसीदास यांच्या जीवन प्रवासाबाबत बोलताना म्हणतात, "काशीमध्ये संत तुलसीदास (गोस्वीमीजी) एक वेगळा विचार घेऊन आले होते. त्यांचं सगळं शिक्षण इथेच झालं. त्यांना भगवान रामाची साधना करायची होती. रामाचे दर्शन करणं याचाच त्यांना ध्यास लागला होता. त्यासाठीच त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं होतं. काशी शहरात एका ठिकाणी राहत असताना उपजीविकेसाठी ते कथाकथन करायचे. हळूहळू त्यांची लोकप्रियता वाढू लागली."
ते सांगतात, "इर्षेमुळे त्यांचा विरोध सुरू झाला. लोकांकडून त्यांना त्रास देणं सुरू झालं. त्याला कंटाळून त्यांनी तुलसीदास यांनी ते ठिकाण सोडलं. त्यानंतर ते एका ठिकाणी राहण्यासाठी गेले. ते ठिकाणही त्यांना सोडावं लागलं. अखेरीस, वाराणसीच्या सीमेवर अस्सी घाट परिसरात ते राहू लागले. इथं राहून शहरात कथाकथनासाठी ते जात असत. मी रामाचा उपासक आणि गुलाम आहे, असं तुलसीदास नेहमी म्हणायचे."
(शब्दांकन - हर्षल आकुडे, बीबीसी मराठी प्रतिनिधी)
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)