You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे: '4 तारखेनंतर मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा'
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी, औरंगाबादहून
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज (1 मे) औरंगाबादमध्ये सभा सुरू झाली आहे. त्यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून या ठिकाणी मनसैनिक आले आहेत.
जे लोक आपला इतिहास विसरतात त्या देशाचा भूगोल बदलतो असं राज ठाकरे औरंगाबाद येथील सभेत म्हणाले.
मी दुही माजवतोय असा आरोप शरद पवार यांनी माझ्यावर केला, पण मी कधीही दुही माजवली नाही. पण शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख कधी केला आहे का?
आता शरद पवार तल्लीन झालेले दिसत आहेत, गीता रामायण ऐकत आहेत आणि बाजूला शिवाजी महाराजांचा फोटो आहे, हे नाटक कशासाठी असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
पवारांनी जातीयवादाचे विष पसरवले आहे असं राज ठाकरे म्हणाले.
याआधी शरद पवारांनी म्हटले होते, की प्रबोधनकारांचे विचार राज यांनी वाचायला हवे होते. त्याला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की शरद पवारांनी केवळ सोयीनेच प्रबोधनकार वाचू नये.
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरच जातीयवादाचं विष पेरलं आहे असं राज ठाकरे म्हणाले.
मशिदींवरील भोंगे काढलेच पाहिजेत
याआधी मीच केवळ भोंग्यांबद्दल बोललो नव्हतो. पण मी पर्याय दिला. जर 4 तारखेनंतर मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावावी.
जर सरळ सांगून समजत नसेल तर कठोर पावलं उचलावीच लागतील, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांच्या सभेच्या वेळी त्यांनी असं म्हटलं की सभा सुरू असतानाच लाऊडस्पीकरवरून बांग ऐकू येत आहे. पोलिसांनी हे भोंगे तत्काळ थांबवावेत असं राज ठाकरे म्हणाले.
जर सरळ सांगून कळत नसेल तर एकदाच जे व्हायचं ते होऊ द्या असं राज ठाकरे म्हणाले.
औरंगाबादमध्ये सभा घेण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केल्यानंतर शहरासह राज्यभरातील राजकीय वातावरण तापल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलं.
आता, या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यात पोस्टर वॉर रंगल्याचं दिसून आलं.
राज ठाकरे यांची नियोजित सभा असल्यामुळे मनसेनं शहरातील चौकाचौकात सभेविषयीचे पोस्टर्स लावले आहेत.
तर त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेनं जिथं पोस्टर लावलेत, अगदी त्याच्या समोरच शिवसेनेही पोस्टर लावले आहेत.
मनसेच्या बॅनर्समध्ये राज ठाकरेंचा उल्लेख 'हिंदूजननायक' असा करण्यात आला आहे. तर अगदी त्याच्यासमोर 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या सम दुसरा होणे नाही' अशा आशयाचे बॅनर युवासेनेनं लावले आहेत.
याआधी मनसे आणि शिवसेना हे असंच पोस्टर वॉर मुंबईत पाहायला मिळालं होतं. आता ते औरंगाबादमध्येही पाहायला मिळत आहे.
राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल
1 मे रोजीच्या सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झाले. 29 व 30 एप्रिल रोजी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातून ते काल म्हणजेच 30 एप्रिल रोजी औरंगाबादकडे रवाना झाले.
पुण्याहून औरंगाबादला जाताना राज ठाकरे यांनी संभाजी महाराजांचं समाधीस्थळ वढू बुद्रूक येथे दर्शनही घेतलं. यानंतर रात्रीच्या सुमारास ते औरंगाबादमध्ये दाखल झाले.
तत्पूर्वी, राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हेसुद्धा सभेसाठी औरंगाबादमध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल झाले. त्यांनी गेले दोन दिवस औरंगाबादच्या सभेच्या तयारीचा आढावा घेतला. याशिवाय, या सभेसाठी राज्यभरातून मनसे कार्यकर्ते दाखल होण्याचा अंदाज असल्यामुळे त्यासाठी सर्व नियोजन पक्षाकडून केलं जात आहे.
सभेसाठी 16 अटी
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 1 मे 2022 रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार असल्याचे जाहीर केलं होतं. येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पण या सभेला पोलिसांची परवानगी मिळेल की नाही याबाबत संशय होता. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाम भूमिका घेतली. अखेर, पोलिसांनी 16 अटी व शर्थींसह राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली.
सभा घ्यायची असल्याच या अटींचं पालन राज ठाकरेंना करावं लागणार आहे, असं पोलीस प्रशासनाने म्हटलं आहे.
सभेसाठी मुख्य अट म्हणजे, "सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा वर्ण प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा- परंपरा यावरुन कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही, अगर त्याविरोधात चिथावणी दिली जाणार नाही अशी कृती वक्तव्य घोषणाबाजी कोणीही करणार नाही याची आयोजक व वक्त्यांनी काळजी घ्यावी."
औरंगाबादमध्ये जमावबंदी
औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी शहरात 13 दिवसांची जमावबंदी लागू केलेली आहे.
या आदेशात नमूद केल्यानुसार, "आगामी काळात मनसे पक्षाकडून मशिदीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. अनेक संघटनांचा त्याला विरोध आहे. त्याचबरोबर मुस्लिम आरक्षण, ओबीसी आरक्षण, कामगार मागण्या यासाठी आंदोलनात्मक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
औरंगाबाद हे एक संवेदनशील शहर असून तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि त्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येत आहेत. त्याचबरोबर पाचपेक्षा अधिक व्यक्तींना जमण्यास, मोर्चा काढण्यास, धरणे धरण्यास, घोषणाबाजी करण्यास आणि मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात येत आहे. "
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)