विद्रोही साहित्य संमेलन उदगीर : जिथं येणारा प्रत्येक श्रोता हा संभाव्य वक्ता असतो - ब्लॉग

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी, विद्रोही साहित्य संमेलन, उदगीरहून

ज्यावेळी लातूरच्या उदगीर येथे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरीमध्ये 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत होते, त्याच वेळी काहीच अंतरावर महात्मा बसवण्णा साहित्य वाचन नगरीमध्ये विद्रोही साहित्य संमेलन पार पडत होते.

23 तारखेला संध्याकाळी 'रॅप टोळी' नावाने प्रसिद्ध असलेला विपीन तातड गाणे सादर करत होता आणि अक्षरशः टाळ्यांचा पाऊस पडत होता.

विपीनने अवघ्या तीस सेकंदासाठी झुंड चित्रपटात गायलेला रॅप सर्वांना ठाऊक आहे. त्याच्या या गाण्याला दाद तर मिळालीच पण वन्स मोर, वन्स मोरचा आवाज पूर्ण कॅम्पसमध्ये घुमू लागला.

'जर माझा रॅप ऐकायचा असेल तर तुम्हाला डान्स करावा लागेल,' असं आवाहन विपीनने केलं आणि 10 सेकंदात सर्व बच्चे पार्टी स्टेजवर पोहचली. विपीन गाणे म्हणत असताना त्याच्यासोबत बेधुंद नाचली.

विपीन तातडने वूमन्स डे आणि लोकशाही काय की लोकशाही गाणी सादर केली आणि त्याच्या प्रत्येक कडव्याला वाहवा मिळतेय असं दृश्य विद्रोही साहित्य संमेलनात चित्र दिसलं.

जर साहित्य संमेलन, साहित्य विषयक चर्चा या गोष्टींची आवड असेल तर विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देणं कंपलसरी आहे असंच मला वाटतं. पाहणाऱ्यांना वाटू शकतं की हे भव्य नाही. एखाद्या भव्य ग्राउंडमध्ये होणाऱ्या राजकीय सभेला असलेली गर्दी, सुरक्षेसाठी पोलिसांची फौज, वाहनांच्या पार्किंगसाठी दाटीवाटी या गोष्टी कदाचित तुम्हाला दिसणार नाही.

पण एक गोष्ट तुम्हाला येथे नक्की दिसेल ती म्हणजे माहोल. जेव्हा विपीन तातड गात होता तेव्हा आपल्यापैकीच कुणीतरी एकजण उठून गाणे गात आहे अशीच श्रोत्यांची भावना होती.

'2006 खैरलांजी हत्याकांड न्याय मांगते मांगते मर गया उसके बाप,' हे जेव्हा तो बोलतो तेव्हा खाली बसलेल्या एखाद्या आजोबांचे डोळे ओले झालेले तुम्हाला दिसतील.

'चल कडक में मेरा जय भीम, मेरे शब्दो से सब भयभीत,' अशी जेव्हा तो सुरुवात करतो तेव्हा पब्लिक मोठ्याने जय भीमचा घोष करते आणि पुढचे काही शब्द देखील ऐकू येत नाही.

रॅप असो की, नाटक असो की एखादा परिसंवाद असो येथे केवळ श्रोता हा श्रोता नसतो तर त्याचवेळी तो सहभागी देखील असतो असं मला वाटतं. कारण समोर सादर होत असलेल्या कलाकृतीतून किंवा त्या परिसंवादातून खाली बसलेल्या व्यक्तीला आपल्या आयुष्याचं प्रतिबिंब त्यात दिसत असतं.

वर्णव्यवस्थेचं समर्थन करणे म्हणजे ब्राह्मण्य

23 तारखेला संध्याकाळी एकाधिकारशाहीची संस्कृती आणि माध्यमांचे ऱ्हासपर्व हा परिसंवाद झाला. यात लातूरचे सुधीर आणवले, इन गोवाचे संपादक प्रभाकर ढगे, दिल्ली येथील लेखक-विचारवंत अशोक कुमार पांडे, गोमंतक चॅनेलचे शैलेंद्र मेहता हे सहभागी झाले होते.

प्रस्थापित माध्यमांमध्ये स्थान मिळत नसल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचावे असा सूर यातून उमटला.

'एकाधिकारशाही जेव्हा आक्रमक होते तेव्हा तिचं रूपांतर हुकूमशाहीमध्ये होते.

जर संविधान समजून घेऊन अंमलबजावणी केली तर हा देश पुढील 1 हजार वर्षांसाठी गुलाम होणार नाही, असं डॉ. बाबसाहेब आंबेडकर म्हणाले होते, त्यासाठीच मीडियाने ही जबाबदारी समजून वागले पाहिजे,' असा मुद्दा प्रा. सुधीर आणवले यांनी मांडला.

विद्रोही साहित्य संमेलन ही सांस्कृतिक चळवळ न राहता राजकीय चळवळ बनावी असं प्रतिपादन डॉ. अशोक कुमार पांडे यांनी केलं.

"महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या प्रथेला पुनरुज्जीवन दिले, त्यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो. गेल्या 16 वर्षांपासून हे संमेलन सातत्याने होत आहे पण त्याच वेळी हे देखील सांगावेसे वाटते की वंचित समाजातील लोकांनी जे अधिकार प्राप्त केले ते पुन्हा हिसकावून घेण्याचे षड्यंत्र गेल्या 16 वर्षांत बळकट झाले आहे," असं डॉ. अशोक कुमार पांडे यांनी म्हटले.

"केवळ एक दोन दिवसांसाठी तथाकथित उच्चवर्णियांसोबत जेवण करून किंवा सहभोजन करून आमचे प्रश्न सुटणार नाहीत तर त्यासाठी वर्णव्यवस्थेचे समूळ उच्चाटन हाच एकमेव उपाय आहे," असं ते म्हणाले.

"विद्रोही चळवळ म्हणजे केवळ ब्राह्मणांविरोधातली चळवळ आहे असा गैरसमज करून घेऊ नका तर ही चळवळ त्या सर्व विचारांविरोधात आहे जे वर्णव्यवस्थेला मानतात मग तो कोणत्याही जातीचा असो. यालाच ब्राह्मण्य म्हणतात," असे पांडे म्हणाले.

पांडे यांनी 'काश्मीरनामा' हे पुस्तक लिहिले आहे. 'द काश्मीर फाइल्स' रिलीज झाल्यावर पांडेंना अनेक ठिकाणाहून भाषणासाठी निमंत्रण आले होते. पुण्यातूनही निमंत्रण आले होते पण त्यांचे भाषण होऊ दिले गेले नाही असे त्यांनी सांगितले.

'गेल्या काही वर्षांत परिस्थिती अत्यंत खडतर झाली आहे. कधी कुणाला तुरुंगात उचलून टाकतील हे सांगता येणार नाही. तेव्हा तुम्ही देखील मनाची तयारी करा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्रोही चळवळ निर्भीडपणे सुरू आहे, पण याच वेळी मी हे सांगू इच्छितो की ही चळवळ केवळ सांस्कृतिक न राहता ही राजकीय चळवळ व्हावी,' असे मत त्यांनी या कार्यक्रमात मांडले.

गटचर्चेत येणारी प्रत्येक व्यक्ती ही वक्ता

24 तारखेला सकाळी विद्रोही साहित्य संमेलनात गटचर्चा घेण्यात आली. या ठिकाणी संमेलनासाठी आलेल्या लोकांनीच यात सहभाग घेतला. गटचर्चेसाठी 10 गट तयार करण्यात आले होते. निमंत्रित किंवा कार्यकर्ते हे त्या गटचर्चेचे अध्यक्ष होते. संमेलनासाठी आलेल्या लोकांना आपले म्हणणे काय, त्यांचे अनुभव काय त्यांच्या संकल्पना काय हे मांडण्याची त्यांना संधी मिळाली. सर्व गट चर्चा पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गटाला आपला अहवाल पाच मिनिटात मांडण्याची संधी दिली.

जात पुरुषसत्ताक हिंसाचार आणि स्त्री शोषणाचा प्रश्न या विषयावर गटचर्चा झाली. प्रा. डॉ. संगीता ठोसर यांनी कोऑर्डिनेशन केले. महिलांनी आपले अनुभव मांडले. महिलांवर होणारी हिंसा ही केवळ घराबाहेरच होत नाही तर घरात देखील होते हे महिलांनी मांडले. नंदूरबार जिल्ह्यातून देखील महिला या ठिकाणी आल्या होत्या. महिलांना शेती करण्याचा अधिकार न मिळणं हा देखील हिंसाचारच आहे असं या ठिकाणी आलेल्या जमनाबाई यांनी मुद्दा मांडला.

जेव्हा गटचर्चा संपली आणि आपल्या गटाचा प्रतिनिधी पाठवण्यासाठी समन्वयकांनी सूचना केली तेव्हा संगीता ठोसर यांनी नंदूरबारहून आलेल्या शीतल गावित यांचे नाव पुढे केले. सुरुवातीला शीतलताई म्हणाल्या की मी बोलू शकेन की नाही माहीत नाही.

पण आता नाही तर केव्हा बोलणार आणि आता नाही तर केव्हा शिकणार असं संगीता ठोसर यांनी म्हणताच त्या स्टेजवर जाऊन आपल्या गटचर्चेतील मुद्दे मांडण्यास तयार झाल्या. संमेलनासाठी एक श्रोता म्हणून आलेल्या शीतलताई याच वक्ता बनल्या.

शेती, नास्तिकता वाद, कोरोनानंतरचे शिक्षण, जातनिहाय जनगणना, मराठवाड्याचे प्रश्न असे विविध विषय या गटचर्चांमध्ये मांडण्यात आले.

बुक स्टॉल्सवर उसळलेली गर्दी

विद्रोही संमेलन म्हटलं की आंबेडकरी चळवळीतील दुर्मीळ पुस्तकं मिळण्याचं ठिकाण. एकाच विषयाला समर्पित असलेले इतके बुकस्टॉल्स तुम्हाला दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाही. या बुकस्टॉल्सवर वाचकांची प्रचंड गर्दी असते. जितके लोक सभामंडपात असतील तितकेच लोक बुकस्टॉलवरही दिसतील.

या स्टॉलवर असलेल्या पुस्तकांपैकी एका पुस्तकावर मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वचन वाचले, 'जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपया भाकरीसाठी खर्च करा आणि एक रुपया पुस्तकांसाठी खर्च करा. भाकरी तुम्हाला जगवेल आणि पुस्तकं तुम्हाला का जगायचं हे सांगतील.'

बाबासाहेबांचा हा संदेश तंतोतंत पाळणारे लोकही तुम्हाला याच ठिकाणी पाहायला मिळतील. धनंजय कीरांनी लिहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र विकत घेताना एका मध्यमवयीन गृहस्थाच्या चेहऱ्यावरील आनंदच हे सांगत होता की माझ्याजवळ जगातील सर्वांतील मूल्यवान गोष्ट आहे.

संमेलनाच्या आदल्या दिवशी संमेलनाचे अध्यक्ष गणेश विसपुते यांची भेट घेतली होती संमेलनाचं स्वरूप सांगताना ते म्हणाले निर्भिडपणे व्यक्त होणं, संवैधानिक मुल्यांचे संवर्धन करणं आणि 'स्टेटमेंट' देणं हेच या संमेलनाचं स्वरूप आहे. तर संमेलनाच्या राज्याध्यक्ष प्रतिमा परदेशी यांनी सांगितलं की येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे त्याचं स्वतःचं संमेलन वाटलं पाहिजे त्या व्यक्तीचे प्रश्न, त्याचं जगणं या संमेलनात दिसलं पाहिजे हेच या संमेलनाचं स्वरूप आहे आणि गेल्या दोन दिवसात मला तेच दिसलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)