भारतीय बनावटीच्या विमानाचं पहिलं व्यावसायिक उड्डाण हा मोदींचा दावा किती खरा? फॅक्टचेक

    • Author, जुगल पुरोहित
    • Role, बीबीसी डिसइन्फर्मेशन युनिट, नवी दिल्ली

भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मागील आठवड्यात ट्विट करत स्वदेशी डॉर्नियर विमानाची पहिली व्यावसायिक उड्डाण सेवा सुरू करण्याबाबत माहिती दिली.

सिंधिया यांच्या ट्विटच्या एक दिवस आधी त्यांच्या मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक काढलं होतं. त्या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे, 'मेड इन इंडिया डॉर्नियर एअरक्राफ्ट एचएएल डॉर्नियर डो-228 ची पहिली उड्डाण सेवा आसाममधील दिब्रुगढ ते अरुणाचल प्रदेशातील पासीघाट दरम्यान सुरू होईल.'

प्रसिद्धीपत्रकात असंही म्हटलंय की, अलायन्स एअर ही भारताची पहिली व्यावसायिक उड्डाण सेवा आहे जी नागरी ऑपरेशन्ससाठी भारतीय बनावटीचे विमान वापरते.

सिंधियांव्यतिरिक्त केंद्रातील काही मंत्र्यांनी तसेच राज्य सरकारांमधील काही मंत्र्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. भारत सरकारचे सांस्कृतिक कार्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी ही पोस्ट केली होती की, "उडाण अंतर्गत मेड इन इंडिया डॉर्नियर 228 विमान आता सेवेत दाखल झाले असून या स्वदेशी विमानाने आपले पहिले उड्डाण केले आहे."

भारताचे कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी सुद्धा एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात की, "काही लोक मेक इन इंडिया या गोष्टीलाच नाकारतात. सोबतचं पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारत व्हिजनवरचं प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. मात्र मेड इन इंडिया डोर्नियर एयरक्राफ्ट आता भारताच्या क्षमतेचं प्रदर्शन करीत आहे."

अनेक प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा याचं नरेटिव्हला धरून बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या.

पण सरकारच्या दाव्यात कितपत तथ्य आहे ? याचं उत्तर मात्र मिळत नाही.

या दाव्यातील तथ्य जाणून घेण्यासाठी, आम्ही दोन गोष्टी शोधल्या.

यात पहिली गोष्ट म्हणजे भारतातील प्रवाशांसाठी बनवण्यात आलेलं पहिलं स्वदेशी विमान कोणतं होतं ? आणि दुसरं म्हणजे डॉर्नियर विमाना संबंधित केलेल्या दाव्यांमध्ये तथ्य आहेत का?

भारत सरकारकडे उपलब्ध असलेल्या नोंदीनुसार, नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी तयार करण्यात आलेलं पहिले स्वदेशी विमान डॉर्नियर नसून, ते एवरो हे विमान होतं.

25 जून, 1967 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय की, "28 जून रोजी कानपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात संरक्षण मंत्री सरदार स्वर्ण सिंह यांनी पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक मंत्री डॉ. कर्ण सिंह यांना देशात निर्मित 14 एवरो विमानांपैकी पहिलं विमान सुपूर्द केलं. सध्या एवरो हे देशातील एकमेव प्रवासी विमान असून ते स्वदेशी आहे. या प्रत्येक विमानाची किंमत 82.53 लाखांच्या घरात आहे."

या विमानाचे मूळ निर्माता बीएई सिस्टीम्सने या विमानाविषयी सांगितलं होतं की, "एकूण 381 विमाने तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी 89 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे निर्मित आहेत. भारतात निर्मित पहिल्या विमानाने 1 नोव्हेंबर 1961 रोजी पहिलं उड्डाण केलं. एचएएलने बनवलेली विमाने देखील इंडियन एयरलाइंसने वापरली होती."

आम्ही याविषयी एचएएलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र वारंवार प्रयत्न करूनही, एचएएलने आमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.

मात्र एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली की, "भारतीय एअरलाइन्स ही तेव्हा मोठी विमानसेवा होती आणि त्यांच्या ताफ्यात भारतात बनवलेली विमानेही होती."

यावर बीबीसीने काही विशेष तज्ज्ञांशी ही चर्चा केली. नागरी विमान वाहतूक विषयातील तज्ञ कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी बीबीसीला माहिती देताना सांगितलं की, इंडियन एअरलाइन्समध्ये असताना त्यांनी स्वतः एवरो विमान उडवलं होतं. नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी केलेला दावा 'खोटा' असल्याचं ते सांगतात.

फेडरेशन ऑफ इंडियन पायलटचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन मीनू वाडिया म्हणाले, "सरकारचा दावा दिशाभूल करणारा आहे."

नागरी सेवेसाठी भारतीय बनावटीचे विमान वापरणारी अलायन्स एअर ही पहिली व्यावसायिक एयरलाइन्स असल्याचा दावा सरकारने आपल्या प्रसिद्धीपत्रकात केला होता.

हा युक्तिवाद फोल असल्याचं मीनू वाडिया स्पष्ट करतात. ते सांगतात की, "जे कोणतेही विमान नागरी विमान म्हणून नोंदणीकृत आहे आणि तिकिटाच्या बदल्यात प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेते त्याला व्यावसायिक विमान म्हणतात. प्रवासी विमान आणि व्यावसायिक उड्डाण करणारे विमान यात कोणताही फरक नाही. भारतात बनलेल्या अर्थात स्वदेशी विमानांचा वापर भूतकाळात देखील होत होता."

आता भारतात बनवलेल्या डॉर्नियर विमानाबाबत केल्या जाणाऱ्या दाव्यांमधील तथ्य तपासूया.

डॉर्नियर विमान हे यापूर्वीचं देशात तयार करण्यात आल्याचं बीबीसीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होतं. सरकारी मालकीची हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी 1980 पासूनचं या विमानाची निर्मिती करत आहे. यापैकी काही विमानं भारतीय एअरलाइन्सच्या ताफ्याचा भाग होती.

भारतीय नौदलाच्या अधिकृत इतिहासाचं लेखन करताना व्हाइस अॅडमिरल जीएम हिरानंदानी (निवृत्त) लिहितात की, "1980 च्या दशकाच्या सुरुवातीस हवाई दल, नौदल, तटरक्षक दल आणि इंडियन एअरलाइन्स यांची फीडर सेवा असलेल्या वायूदूतला हलक्या वाहतूकक्षम विमानांची गरज होती. त्यामुळे स्वदेशी उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. तेव्हा चार विमानांचं मूल्यमापन करण्यात आलं. यात ब्रिटिश आयलँडर, जर्मन डॉर्नियर, इटालियन कासा आणि अमेरिकन ट्विन ऑटर यांचा समावेश होता. नौदल, तटरक्षक दल आणि वायूदूत यांच्या आवश्यकतेनुसार डॉर्नियरची निवड करण्यात आली. त्यानंतर एचएएल कानपूर मध्ये डॉर्नियरची उत्पादनासाठी निवड करण्यात आली."

बीबीसीकडे जुन्या डिफेन्स मॅगझिन, एअर एरोस्पेस आणि डिफेन्स रिव्ह्यूच्या जुन्या अंकांच्या प्रती आहेत. या नियतकालिकांच्या एप्रिल 1986 च्या अंकात, भारतीय बनावटीचे डॉर्नियर विमान भारतीय एअरलाइन्सशी संलग्न असलेल्या वायूदूत या व्यावसायिक उड्डाण सेवेमध्ये सामील झाल्याचा रिपोर्ट प्रसिद्ध झालायं.

"एचएएल निर्मित पाच डॉर्नियर 228 लाइट ट्रान्सपोर्ट विमानांपैकी पहिले विमान 22 मार्च 1986 रोजी सकाळी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कानपूर विभागातील चकेरी एअरफील्डवर वायूदूतला सुपूर्द करण्यात आले" असं अहवालात म्हटलंय.

ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनशी संबंधित अंगद सिंग सांगतात, "एचएएल-निर्मित डॉर्नियर (डीओ 228) वायुदूतला 1986 मध्ये सुपूर्द करण्यात आले. नोव्हेंबर 1984 नंतर त्या विमानाचा वापर सुरू झाला."

अंगद सिंग यांनी असं ही सांगितलं की, "12 एप्रिल 2002 रोजी उडवण्यात आलेलं विमान हे मूळ डॉर्नियर 228 विमानाचं अपग्रेडेड व्हर्जन आहे, मात्र त्याचा मूळ साचा आहे तसाच आहे. डॉर्नियर 228 हे पहिलं महसुली विमान होतं."

लहान लहान प्रदेशांना जोडण्यासाठी 26 जानेवारी 1981 रोजी वायूदूतची स्थापना करण्यात आली होती. मार्च 1982 मध्ये वायुदूतला ईशान्येसह 23 ठिकाणांहून ऑपरेशन सुरू करण्याची परवानगी मिळाली. नंतर वायूदूत इंडियन एअरलाइन्समध्ये सामील झाले आणि त्यांची विमान ही काही काळ वापरात होती.

त्यामुळे हे तरी स्पष्ट आहे की दशकांपूर्वी अशी स्वदेशी विमानं भारतात बनवली गेली होती. आणि त्यांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत होता. बीबीसीने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला आहे, मात्र त्यांच्याकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)