हनुमान चालिसा, भोंग्यांनी लोडशेडिंग, पेट्रोल डिझेल भाववाढीला रेटलं मागे

हनुमान चालिसा आणि मशिदीवरील भोंगे या दोन मुद्द्यांवरून महाराष्ट्रातील राजकारण गेला महिनाभर तापलेलं आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती.

आपला हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी राणा दांपत्य शुक्रवारी (22 एप्रिल) मुंबईत दाखल झाले. रविवारी मातोश्रीसमोर जाऊन हनुमान चालिसा वाचण्याचं त्यांचं नियोजन होतं. पण शिवसैनिकांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला.

दरम्यानच्या काळात, भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज, किरीट सोमय्या यांच्या वाहनांवर हल्ले झाले. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपने काही आरोप सत्ताधाऱ्यांवर केले. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

गुढी पाडव्याच्या दिवशी म्हणजे 2 एप्रिल रोजी राज ठाकरे यांनी सर्वप्रथम मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा मांडला होता. तेव्हापासून आजपर्यंत राणा दांपत्याच्या अटकेपर्यंत हे प्रकरण पोहोचलं आहे.

या प्रकरणातील सर्व बातम्यांना माध्यमांमध्येही दणदणीत कव्हरेज देण्यात आलं. या विषयावर प्राईम टाईम, चर्चासत्र, वादविवाद अशा सर्वच ठिकाणी या बातम्यांना स्पेस मिळाली. गेल्या तीन दिवसांपासून तर या बातम्यांचा वीट येईल, अशा स्वरुपात या बातम्यांचा मारा नागरिकांवर होत आहे.

मात्र, राजकारणातील या सगळ्या नाट्यमय बातम्यांच्या भाऊगर्दीत राज्य तसंच देशातील अनेक महत्त्वाचे विषय मागे पडत असल्याचं यादरम्यान दिसून येत आहे.

त्यातही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वाचे विषयच दुर्लक्षित होत असल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. हे मुद्दे नेमके कोणते ते जाणून घेऊ -

1. पेट्रोल-डिझेल दरवाढ

18 मार्च रोजी देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर 22 मार्च रोजी देशात पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवण्यात आले होते.

विशेष म्हणजे, याआधी 4 नोव्हेंबर रोजी शेवटची भाववाढ झाली होती. यानंतर तब्बल 137 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरवाढीचा संबंध निवडणुकीशीही जोडण्यात आला होता.

22 मार्च रोजी मुंबईत पेट्रोलचा दर 110.82 रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर 95 रुपये प्रतिलीटर इतका होता. यानंतर रोज पेट्रोल-डिझेलच्या दरात काही पैशांची वाढ करण्यात येत होती. आज (24 मार्च) रोजी मुंबईतील पेट्रोलचा दर प्रतिलीटर 120.51 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलीटर 104.77 इतका आहे.

2. महागाई

पेट्रोल-डिझेलच नव्हे तर इतर वस्तूंच्या महागाईनेही सामान्यांना छळलं आहे. सीएनजी गॅस, घरगुती गॅस सिलेंडर, भाजीपाला इत्यादींची यादी मोठी आहे. आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात 13.11 टक्के असलेला महागाई दर मार्च महिन्यात 14.55 वर पोहोचला. देशातील महागाईचा हा आजपर्यंतचा उच्चांक आहे.

या पार्श्वभूमीवर दैनंदिन उपयोगाच्या बहुतांश सर्वच वस्तूंचे दर पूर्वीपेक्षा वाढल्याचं बाजारपेठेत फेरफटका मारल्यानंतर जाणवतं. या सर्व कारणांमुळे सर्वसामान्यांचं बजेट मात्र कोलमडलं आहे. दरम्यान, देशातील महागाई अशाच प्रकारे वाढत जाणार असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे.

3. कोव्हिडचे वाढते आकडे

कोव्हिड साथीमुळे जगाला दोन वर्षे लॉकडाऊनमध्ये घालवावी लागली होती. मार्च 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आतापर्यंत देशाने या विषाणूच्या तीन लाटा पाहिल्या.

गेल्या महिन्यात मात्र या साथीचे निर्बंध हटवण्यास सर्वत्र सुरुवात झाली. त्यामुळे दिलासादायक चित्र निर्माण झालं होतं.

पण यादरम्यान, चीन, दक्षिण कोरियासह इतर काही देशांमध्ये कोव्हिड रुग्णांची संख्या हा सर्वत्र चिंतेचा विषय होता. त्याचप्रमाणे भारतातही काही ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत सौम्य वाढ पाहायला मिळत आहे.

दिल्ली तसंच उत्तर प्रदेश राज्य यामध्ये आघाडीवर असल्याचं आकडेवारीवरून दिसतं. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात गेल्या महिन्यात मास्कची सक्ती हटवून हा विषय ऐच्छिक करण्यात आला होता. पण कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं दिसून येताच प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी मास्कचे निर्बंध पुन्हा लागू केले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, शनिवारी (23 एप्रिल) रोजी 2593 नवे कोरोना रुग्ण देशात आढळून आले. सध्या देशात सक्रिय असलेल्या रुग्णांचा आकडा 15 हजार 873 इतका आहे. याशिवाय 44 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

कोरोना लॉकडाऊन संपल्यानंतर कंपन्यांची कार्यालये पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. धार्मिक ठिकाणे, पर्यटन स्थळे येथील गर्दीही पूर्वीप्रमाणे वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णसंख्येतील वाढ कशा पद्धतीने होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

4. भारनियमन

भारनियमन हा यंदाचा कळीचा मुद्दा बनला आहे. राज्यात विजेचं भारनियमन सुरू झालं असून राज्यातील वीज उपलब्धतेची सद्यस्थिती पाहता भारनियमन कधीपर्यंत असेल, हे सांगता येणार नसल्याचं वक्तव्य ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केलं आहे.

कोळसा आणि वीज टंचाईमुळे राज्यात वीज टंचाईचे अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. या बैठकीनंतर नितीन राऊत यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला होता.

अदानी कंपनीकडून होणाऱ्या वीज पुरवठयात अचानक कपात झाल्यामुळे राज्यात 1400 ते 1500 मेगावॉट विजेचे भारनियमन सुरू करण्यात आलं असून राज्यातील जनतेने वीज जपून वापरावी असे आवाहन उर्जामंत्र्यांनी केले आहे.

5. पाणी टंचाई

दरवर्षी उन्हाळा आला की राज्यासमोरील पाणी टंचाईचं संकट आ वासून उभं राहतं. पाण्याचा अतिवापर आणि वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन होऊन पाणीपातळी खालावते. अशा स्थितीत उन्हाळ्याचा आणखी एक महिना शिल्लक असल्यामुळे पाणीटंचाईच्या विषयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

टीव्ही 9 मराठीच्या बातमीनुसार, सध्या राज्यातील 3 हजर 276 प्रकल्पांमध्ये सुमारे 893.20 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण क्षमतेपेक्षा हा साठा 62 टक्के इतका आहे.

गेल्या वर्षी राज्यात परतीचा पाऊस चांगल्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे यंदा पाणीसाठा 13 टक्के जास्त आहे.

पण असं असलं तरी काही शहरी तसंच ग्रामीण भागांमध्ये पाण्याची समस्या स्पष्टपणे जाणवते. औरंगाबाद, सोलापूर यांसारख्या मोठ्या शहरांनाही पाणीटंचाईला तोंड द्यावं लागतं. या शहरांमध्ये चार ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो.

याच मुद्द्यावरून औरंगाबादमध्ये काही दिवसांपूर्वी लोकांनी गळ्यात टॉयलेट पेपर अडकवून आंदोलन केलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)