अक्षय कुमारः तंबाखू, दारू, गुटख्याच्या जाहिरातींवर बंदी तर रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरू नावाला कशी मिळाली परवानगी?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी

अभिनेता अक्षय कुमारवर इलायचीच्या आडून तंबाखू ब्रँडची जाहिरात केल्याप्रकरणी टीका होते आहे. पण फक्त अक्षय कुमारच नाही, असे प्रकार इतर सेलिब्रिटीजच्या बाबतीतही घडलेत.

त्यावरूनच चर्चा होते ती बंदी असलेल्या पदार्थांच्या छुप्या जाहिरातींची किंवा सरोगेट मार्केटिंगची.

बऱ्याचदा थिएटरमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी एका सॅनिटरी पॅडसंबंधी जाहिरातीत अक्षय एका व्यक्तीला सिगरेटवर पैसा वाया घालवू नकोस, अशा आशयाचा सल्ला देताना दिसतो.

अक्षयनं अनेकदा आपण गुटखा कंपन्यांनी दिलेल्या जाहिरातींच्या ऑफर्स नाकारल्याचं सांगितलं होतं.

पण तोच अक्षय कुमार काही दिवसांपूर्वी अजय देवगण आणि शाहरुख खानसोबत एका जाहिरातीत झळकला आणि सोशल मीडियावर त्याच्या विरोधात मीम्सचाही पाऊस पडला. त्यानंतर अक्षयनं ट्विटरवरून माफी मागितली आण पुढच्या काळात मी काळजीपूर्वक जाहिराती निवडेन अशी ग्वाही दिली.

पण मुळात भारतात तंबाखू, गुटखा, दारू अशा उत्पादनांच्या जाहिराती करता येत नाहीत. पण त्यासाठी एका पळवाटेचा, अर्थात सरोगेट अडव्हर्टायझिंगचा वापर केला जातो.

सरोगेट मार्केटिंग म्हणजे काय, हे समजून घेण्याआधी गुटखा, तंबाखू, दारूच्या जाहिरातीविषयी भारतात नियम काय सांगतात, ते जाणून घेऊयात.

भारतात गुटखा, तंबाखू, दारूच्या जाहिरातीवर बंदी

एकेकाळी भारतात विशेषतः तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास जाहिरात होत असे. भारतात 1996 साली झालेला क्रिकेटचा वर्ल्डकपही एका तंबाखू कंपनीनं स्पॉन्सर केला होता.

पण अशा जाहिरातींविषयी 1995 साली नवे नियम लागू झाले. अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौंसिल ऑफ इंडिया अर्थात ASCI या भारतीत जाहिरातक्षेत्रातील संस्थांच्या संघटनेनं अशा जाहिराती न करण्याची भूमिका घेतली. तेव्हापासून भारतात तंबाखू, गुटखा, दारू अशा उत्पादनांची जाहिरात करता येत नाही.

2003 साली संसदेनं सिगारेट्स अँड अदर प्रोडक्ट्स अ‍ॅक्ट (COTPA) हा कायदा पास केला आणि हे नियम आणखी कडक बनवले आहेत.

त्यानुसार सिग्रेटसह सर्व तंबाखू उत्पादनांची थेट किंवा छुपी जाहिरात व्हिडियो, प्रिंट लिफलेट्स, मोठे फलक अशा कुठल्याही स्वरुपात करता येत नाही. फक्त जिथे विक्री केली जाते, अशा दुकानांत किंवा आस्थापनांमध्येच या पदार्थांची जाहिरात करता येते.

हे नियम मोडणाऱ्या व्यक्तीला दंड किंवा दोन ते पाच वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते.

सरोगेट जाहिराती म्हणजे काय?

1995 साली नियम लागू झाल्यापासूनच त्यातून पळवाटाही शोधल्या जाऊ लागल्या. सरोगेट अडव्हर्टायझिंग ही अशीच एक पळवाट आहे. सरोगेट शब्दाचा अर्थ होतो बदली किंवा पर्यायी.

सरोगेट जाहिरात म्हणजे अशी जाहिरात ज्यात मूळ उत्पादनाचं नाव, ट्रेड मार्क, ब्रँड इमेज त्याच कंपनीच्या दुसऱ्या एखाद्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी वापरली जाते.

म्हणजे एखाद्या दारूच्या ब्रँडच्या नावानं सोडा किंवा मिनरल वॉटरची जाहिरात असो किंवा इलायचीच्या नावाखाली गुटखा, मुखवासच्या नावानं तंबाखू आणि कॅसेट, सीडीच्या नावानं दारूची जाहिरात असो. हे सगळे सरोगेट जाहिरातींचे प्रकार आहेत.

मग रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरूचं काय?

सरोगेट जाहिरातींविषयी काहीवेळा माध्यमही संयमाची भूमिका घेताना दिसतात. बीबीसीच्या गाईडलान्सनुसारही अशा बंदी असलेल्या उत्पादनांची जाहिरात केली जात नाही.

अशा जाहिराती करणाऱ्यांवर काहीवेळा ASCI कडून कारवाईही केली आहे.

गेल्या वर्षी आयपीएलमध्ये सरोगेट जाहिरातींवर ASCIनं कारवाईचा बडगा उगारला होता. या स्पर्धेदरम्यान मिनरल वॉटर, अल्कोहोलविरहीत पेयं आणि क्रिकेट मर्चंडाईजच्या नावाखाली सरोगेट जाहिराती करणाऱ्या आठ ब्रँड्सविरोधात ASCI नं तक्रारही दाखल केली होती.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग आयपीएलमधल्या एका टीमचं, रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरूचं नाव दारूच्या ब्रँडवरून घेतलेलं कसं चालू शकतं? तर ही टीम म्हणजे सरोगेट जाहिरात नसून ब्रँड एक्स्टेंशन आहे आणि ब्रँड एक्स्टेंशनला भारतात मान्यता आहे.

ब्रँड एक्स्टेंशन म्हणजे एखाद्या मूळ ब्रँडचं नाव वापरून त्याच कंपनीनं पूर्णपणे नवीन प्रोडक्ट तयार करणं. स्टील उद्योगानं मीठ विकणं असो, फ्रीज बनवणाऱ्या कंपनीचं घड्याळं किंवा स्मार्टफोन विकणं असो ही ब्रँड एक्स्टेंशनची उदाहरणं आहेत.

पण ब्रँड एक्स्टेंशनविषयीही ASCI चे काही नियम आहेत. ब्रँड एक्स्टेंशन म्हणून आणल्या जाणाऱ्या उत्पादनांची संबंधित सरकारी संस्थांकडे अधिकृत नोंदणी झालेली असणं आवश्यक आहे.

या उत्पादनांचा बाजारातला वाटा किमान दहा टक्के असायला हवा तसंच उत्पादनाची वार्षिक उलाढाल राज्यपातळीवर किमान 1 कोटी आणि देश पातळीवर किमान 5 कोटी असावी, असं हे नियम सांगतात. म्हणजे या उत्पादनाचं स्वतंत्र अस्तित्व असायला हवं आणि ते केवळ नावापुरतं नसावं.

ब्रँड एक्स्टेंशन सरोगेट जाहिरातीपेक्षा वेगळं कसं?

ब्रँड एक्स्टेंशनमध्ये जुनं नाव वापरून नव्या वस्तूचं प्रमोशन केलं जातं, या नव्या वस्तूंची विक्री वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. तर सरोगेट जाहिरातीत नव्या उत्पादनाच्या नावाखाली मूळ उत्पादनाचं म्हणजे दारू, तंबाखूचं प्रमोशन करण्यावर भर असतो.

नैतिकदृष्ट्या अशा जाहिरातीही चुकीच्या असल्याचं अनेकदा बोललं जातं. पण प्रत्यक्षात अनेक अभिनेते, खेळाडू आणि सेलिब्रिटीजही सर्रास अशा जाहिरातींमध्ये झळकले आहेत.

अक्षय कुमार, शाहरुख खान, अजय देवगणचं उदाहरण ताजंच आहे. पण एके काळी अमिताभ बच्चन यांनीही पान मसाल्याची जाहिरात केली होती. प्रियांका चोप्राही चांदीच्या गोळ्यांच्या नावाखाली पानमसाल्याच्या जाहिरातीत झळकली होती.

जेम्स बाँड फिल्म्ससाठी प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता पियर्स ब्रॉसनन आणि तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतला सुपरस्टार महेश बाबूलाही पानमसाल्याची जाहिरात केल्यामुळे टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)