You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कृष्ण प्रकाश: कधी वेशांतर तर कधी 'झाड फेकून' गुन्हेगारांना पकडणारे पोलीस आयुक्त
- Author, राहुल गायकवाड,
- Role, बीबीसी मराठीसाठी.
धडाकेबाज कारवाई करणारे अधिकारी म्हणून ख्याती असणारे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची कार्यकाळ संपण्यापूर्वी बदली करण्यात आली आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक व्ही.आय.पी सुरक्षा, मुंबई इथे कृष्ण प्रकाश यांची बदली करण्यात आली आहे, तर अंकुश शिंदे यांना आता पिंपरी चिंचवड आयुक्तपदी नेमण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवडच्या आयुक्तपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर कृष्ण प्रकाश यांनी कारवायांचा धडाका लावला होता. तर दुसरीकडे सतत प्रसिद्धीच्या झोत्यात राहिल्यामुळे आणि पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी म्हणावी तितकी आटोक्यात न आल्याने त्यांच्यावर टीका देखील होत आली आहे.
'कायदा सर्वांना सारखा आहे, मी कोणत्याही दबावाला जुमानत नाही' असं म्हणत कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता.
आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचून प्रसंगी वेशांतर करुन त्यांना रंगेहाथ पकडण्यात कृष्ण प्रकाश माहीर असल्याने सध्या त्यांची सर्वत्र चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी कृष्ण प्रकाश यांच्या नावाने खंडणी वसूल करणाऱ्या आरोपींना त्यांनी स्वतः सापळा रचून अटक केली. आरोपी रोशन बागुल, गायत्री बागुल, पूजा माने यांना अटक करण्यात आली आहे.
बागुल हा पोलीस असल्याचे सांगून आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने खंडणी मागायचा. चिखली येथे राहणाऱ्या विन्सेन्ट जोसेफ यांनी याबाबत क्राइम ब्रान्चकडे तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणाविषयी कृष्ण प्रकाश यांना कळाल्यावर त्यांनी स्वतः सापळा रचून आरोपींना अटक करण्याचे ठरवले. कृष्ण प्रकाश यांनी जोसेफ यांच्या सोबत मिळून सापळा रचला.
जोसेफ यांनी आरोपीला जमिनीच्या कामासंदर्भात भेटायला बोलावले. भेटण्यासाठी मुंबई - पुणे हायवेवरील एक हॉटेल निवडण्यात आलं.
जोसेफ यांनी कृष्ण प्रकाश हे मित्र असल्याचे आणि ते पैसे देणार असल्याचे आरोपीला सांगितले. कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर केले होते. वेशांतर करुन कृष्ण प्रकाश यांनी आरोपींना अटक केली होती. त्यांच्या या अनोख्या कारवाईची चर्चा होतीये.
झाड फेकून मारुन आरोपींना केली होती अटक
या आधीसुद्धा अनेक कारवायांमध्ये कृष्ण प्रकाश स्वतः सहभागी झाले आहेत. सांगवी येथील एका व्यक्तीची काही गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
आरोपींचा शोध पिंपरी चिंचवड पोलीस घेत होते. 26 डिसेंबरला मध्यरात्री पोलीस आणि आरोपी यांच्यात चाकण येथे चकमक झाली.
या कारवाईत स्वतः कृष्ण प्रकाश सहभागी झाले होते. आरोपींकडून गोळ्या झाडण्यात आल्या त्याला उत्तर म्हणून पोलिसांकडून देखील गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यात कोणीही जखमी झाले नव्हते.
पोलिसांवर गोळीबार करुन पळून जाणाऱ्या तीन आरोपींवर कृष्ण प्रकाश यांनी जवळ असलेले झाड फेकून मारले होते. त्यामुळे आरोपी खाली पडून पोलिसांच्या तावडीत सापडले, असं सांगण्यात आलं.
आयुक्तांनी आरोपींना निशस्त्र केले होते, असा दावा देखील पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला होता.
आयुक्तांनी फेकून मारलेले झाड चाकण पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले होते. पोलिसांच्या या दाव्यावर अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले होते.
सोशल मीडियावर याची चर्चा देखील झाली होती. आयुक्तांनी झाड फेकून मारल्याने खरंच आरोपी पकडले गेले का ? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला होता.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना याबाबत पत्रकारांनी विचारले होते, त्यावेळी ''कृष्ण प्रकाश यांनी झाड फेकले की नाही याबद्दल माहिती नाही, याबाबत चौकशी करतो'' असं ते म्हणाले होते.
त्याचबरोबर ''चकमकीच्या ठिकाणी ऐनवेळी पोलीस आयुक्त स्वतः दाखल झाले असतील तर त्यात गैर काही नाही'' असं देखील वळसे पाटील म्हणाले होते.
मे 2021 मध्ये देखील वेशांतर करुन विविध पोलीस स्टेशन आणि नाकाबंदीच्या ठिकाणांना भेट देऊन पोलीस व्यवस्थित काम करत आहेत का याची पाहणी आयुक्तांनी केली होती.
जे पोलीस योग्य काम करत नव्हते त्यांची कानउघडणी देखील आयुक्तांनी केली होती.
कृष्ण प्रकाश आणि वाद
कृष्ण प्रकाश यांनी सप्टेंबर 2020 ला पिंपरी चिंचवडच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अनेक धडाकेबाज कारवाया केल्या होत्या.
त्यांच्या या कारवायांचं कौतुक देखील झालं. परंतु कालांतराने यात बदल होत गेला.
कृष्ण प्रकाश छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना जातीने उपस्थित राहायचे. सातत्याने प्रसिद्धीच्या झोत्यात राहण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा.
पुणे पेपरफुटी प्रकरण आधी कृष्ण प्रकाश यांच्याकडे पोहोचलं होतं.
परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं याच प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पुणे पोलिसांनी मोठ्या अधिकाऱ्यांना आणि एजंटला पकडून शाबासकी मिळवली होती.
दुसरीकडे गोळीबार करुन खून केलेल्या आरोपींच्या शोधासाठी कृष्ण प्रकाश स्वतः गेले होते, तेव्हा त्यांनी आरोपींवर झाड फेकून मारुन त्यांना अटक केल्याच्या घटनेवर अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले होते.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांची अनेकदा कानउघडणी केली होती अशी चर्चा देखील पोलीस वर्तुळात होती.
सर्वसामान्यांना बंदुकीचे परवाने
कृष्ण प्रकाश त्यांच्या वक्तव्यांनी तसेच त्यांच्या कारवाई करण्याच्या पद्धतीमुळे नेहमीच चर्चेत असतात. 2020 च्या सप्टेंबरमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्याची देखील चर्चा झाली होती.
शहर सुरक्षित राखण्यासाठी नागरिकांनाही सहभागी करुन घेतलं जाईल. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा बंदुकीचे परवाने देण्यात येतील असं ते म्हणाले होते.
पिंपरी चिंचवड शहराचा भाग हा पूर्वी पुणे पोलिसांच्या हद्दीत येत होता. पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याने पिंपरी चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय व्हावं अशी मागणी करण्यात येत होती.
15 ऑगस्ट 2018 ला पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली.
कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्यांनी सर्वसामान्यांना बंदुकीचे परवाने देण्याचा निर्णय घेतला होता.
अध्यात्माची आवड
कृष्ण प्रकाश यांना वाचनाचीही प्रचंड आवड आहे. मी पुस्तके विकत घेत नाही, पण लोकांनी भेट दिलेली पुस्तके मी अत्यंत आवडीने वाचून काढतो, असं ते गंमतीने सांगतात.
यासोबतच कृष्ण प्रकाश हे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असल्याचं दिसून येतं. त्यातही विशेषतः त्यांचं अध्यात्मिक विषयांवर चांगलं प्रभुत्व आहेत. विशेषतः सण-उत्सवाच्या शुभेच्छा देताना ते पुराणांतील श्लोकांचा वापर ते अत्यंत खुबीने करतात.
त्यांना भगवदगीता, कुराण आणि बायबल पुस्तकांतील संदेश तोंडपाठ आहे, असं त्यांच्या भाषणांमधून अनेकवेळा दिसून आलं आहे. कोणत्याही कार्यक्रमात मार्गदर्शन करताना या धार्मिक ग्रंथांचा आधार घेऊन लोकांना ते मार्गदर्शन करतात, असंही अनेकवेळा दिसून आल्याचं लोक सांगतात.
आयर्नमॅन चॅलेंजचे विजेता ठरलेले पहिले भारतीय अधिकारी
कृष्ण प्रकाश हे 1998 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. पिंपरी चिंचवडच्या आयुक्तपदी रुजू होण्याआधी त्यांनी अनेक ठिकाणी काम केले आहे. गडचिरोली या नक्षली भागात त्यांनी सहाय्यक पोलीस अधिक्षक म्हणून काम पाहिले आहे, त्याचबरोबर मालेगाव, बुलढाणा, अमरावती, सांगली, अहमदनगर याठिकाणी त्यांनी पोलीस अधिक्षक म्हणून काम केले. मुंबईच्या दक्षिण विभागाचे ते अतिरिक्त आयुक्त होते.
फ्रान्समध्ये झालेल्या आयर्नमॅन चॅलेंजचे ते विजेता ठरले आहेत. हा किताब जिंकणारे ते भारतातील पहिले अधिकारी आहेत.
आयर्नमॅन या चॅलेंजमध्ये त्यांनी 3.86 किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग तर 42 किलोमीटर धावत अंतर पार केले होते. 14 तास 8 मिनिटांमध्ये त्यांनी हे चॅलेंज पूर्ण केले होते.
ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांनी अल्ट्रामॅन हा किताब पटकावला. या स्पर्धेत त्यांनी 10 किलोमीटर स्विमिंग, 421 किलोमीटर सायकलिंग तर 84 किलोमीटर धावत पार केले. या चॅलेंजसाठी त्यांना 34 तास 21 मिनिटं लागली होती.
कृष्ण प्रकाश जसे त्यांच्या धडाडीच्या कारवाईसाठी ओळखले जातात, तसेच ते त्यांच्या फिटनेससाठी देखील ओळखले जातात. अनेकदा सायकलवर प्रवास करुन त्यांनी पोलीस स्टेशनला भेटी दिल्या आहेत. त्यांच्या वाहनाला अनेकदा सायकल मागे लावलेली असते.
पिंपरी चिंचवडमध्ये कृष्ण प्रकाश यांचे काम जवळून पाहिलेले न्यूज 18 लोकमतचे पत्रकार गोविंद वाकडे सांगतात, ''कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील अवैध धंद्यांना निश्चितच आळा बसलाय. त्यांनी व्हाईट कॉलर गुन्हेगारीसुद्धा आटोक्यात आणली आहे. असं असलं तरी दुसरीकडे शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढतोच आहे हेही खरं आहे.
पिंपरी चिंचवडच्या आयुक्तालय सुरु होऊन तीन वर्ष झाली असली तरी अजूनही पुरेसं मनुष्यबळ, अधिकारी, वाहने यांची कमतरता आहे. त्यामुळे पोलिसांची कारवाई अनेक ठिकाणी कमी पडते. कृष्ण प्रकाश हे सर्वसामान्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी उपलब्ध होतात. एकूणच त्यांची कामाची पद्धत ही त्यांना प्रसिद्धी झोतात ठेवणारी असल्याने वादातीत देखील आहे.''
''कृष्ण प्रकाश हे प्रसिद्धीसाठी अनेक गोष्टी करतात, त्याबाबत ते जाहीरपणे बोलतातसुद्धा परंतु ते त्यांचं कामही योग्य पद्धतीने करतात'' असं एका वृत्तपत्रातील ज्येष्ठ पत्रकाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. ''कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यानी प्रशासनावर वचक ठेवला आहे. स्वतः फिल्डवर जाऊन ते अनेक कारवाया करतात असं देखील ज्येष्ठ पत्रकार म्हणाले.''
मालेगाव येथे कार्यरत असताना सामाजिक सलोखा राखल्याबद्दल कृष्ण प्रकाश यांना महात्मा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर सांगली आणि अहमदनगर येथे अनेक गावे तंटामुक्त केल्याने त्यांना महात्मा गांधी शांतता पुरस्कारसुद्धा देण्यात आला होता.
कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवडचा पदभार स्वीकारल्यानंतर अनेक गुंडांवर देखील कारवाई केली. गजा मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर रॅली काढण्यात आली होती. जेव्हा ही रॅली कृष्ण प्रकाश यांच्या हद्दीत आली होती तेव्हा तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये गजा मारणे याच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)