You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कृष्ण प्रकाश : पोलीस आयुक्त वेशांतर करून वेगवेगळ्या स्टेशन्सला भेट देतात तेव्हा....
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठी
पोलीस अधिकारी सामान्य माणसाचा वेश करुन स्टिंग ऑपरेशन करत असल्याचं सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल. पण पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनी हीच गोष्ट प्रत्यक्षात करुन दाखवली आहे. त्यांच्या या स्टिंग ऑपरेशनमुळे पिंपरी चिंचवडच्या पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बुधवारी (5 मे) रात्री पुणे मिररच्या साथीने स्टिंग ऑपरेशन केले. कृष्ण प्रकाश यांनी एका मुस्लीम व्यक्तीचा वेश करुन हिंजवडी, वाकड आणि पिंपरी पोलीस स्टेशनला भेट दिली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस किती तातडीने त्याची दखल घेतात, याची तपासणी त्यांनी केली.
हे वेशांतर करताना त्यांनी जमाल खान हे नाव धारण केलं. त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी देखील वेशांतर केलं. त्यांनी जमाल खान यांच्या पत्नीचं भूमिका केली. मध्यरात्री 12.30 च्या सुमारास त्यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलं.
कृष्ण प्रकाश सुरुवातीला हिंजवडी पोलीस स्टेशनला गेले. नमाजवरुन येत असताना काही टोळक्यांनी बावधन येथे आपल्या पत्नीला त्रास दिल्याची तक्रार त्यांनी केली. त्यावर पोलिसांनी तात्काळ दखल घेत कृष्ण प्रकाश यांनी सांगितलेल्या ठिकाणी पोलीस व्हॅन पाठवली.
बावधन भागात रात्रीच्या वेळी काही टोळकी फटाके फोडत असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी काही नागरिकांनी कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली होती.
कृष्णप्रकाश यांनी तोच पत्ता तक्रारीत दिला. पोलीस गेले तेव्हा त्यांना काही टोळकी फटाके फोडताना आढळून आली. पोलिसांना पाहून हे लोक पळून गेले. त्यात एकाचा मोबाईल पडला. पोलिसांनी तो मोबाईल ताब्यात घेतला. नंतर कृष्ण प्रकाश यांनी आपली ओळख सांगितली आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईचं कौतुक केलं.
अशाच पद्धतीने वेशांतर करुन त्यांनी वाकड आणि पिंपरी पोलीस स्टेशनलाही भेट दिली. वाकडमध्ये चेन स्नॅचिंगची तक्रार त्यांनी केली आणि तिथे देखील त्यांना चांगला अनुभव आला. त्यांची तक्रार दाखल करुन घेत पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. तसेच एवढ्या रात्री घरी पोहचविण्यासाठी त्यांना सोबत पोलीस देत असल्याचं देखील सांगितलं.
पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी अॅंब्युलन्सवाल्यांनी जादा दर आकारल्याची तक्रार केली, पण त्यांची तक्रार न घेता त्यांना इतर पोलीस चौकीला जाण्यास सांगितलं. त्यामुळे नंतर आयुक्तांनी तेथील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच प्रत्येक नागरिकाशी व्यवस्थित बोलून त्यांची तक्रार घेण्याच्या सूचना देखील केल्या.
तर वाकड येथे नाकाबंदीचा आढावा घेताना त्यांच्यावर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी मास्क न घातल्याची कारवाई केली. त्यानंतर त्यांनी त्यांची ओळख करुन दिली. अनेक ठिकाणी पोलीस वाहने तपासत नसल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रत्येक वाहन तपासण्याच्या सूचना देखील त्यांनी पोलिसांना दिल्या.
माध्यमांशी बोलताना कृष्ण प्रकाश म्हणाले, ''कोरोना काळात जनता त्रस्त आहे. त्यामुळे जनतेला पोलिसांनी चांगली वागणूक दिली पाहिजे. केवळ कोरोना काळातच नाही तर इतरवेळी देखील नागरिकांशी चांगली वर्तवणूक केली पाहिजे. नागरिकांची तक्रार नोंदवून घ्यावी. पोलीस कसे काम करतात याचा आढावा घेण्यासाठी वेशांतर करुन मी तीन पोलीस स्टेशनला भेट दिली. हिंजवडी आणि वाकड येथे पोलिसांचा चांगला अनुभव आला. पिंपरी येथे मात्र वेगळा अनुभव आला.
'त्यांनी दुसऱ्या पोलीस चौकीत जाण्यास सांगितले. ज्या प्रकारची वागणूक अपेक्षित होती ती दिली गेली नाही. परंतु तेथील एका पोलिसाला माझी काहीशी ओळख पटली आणि त्याने इतरांना सावध केले. त्यानंतर त्यांची वागणूक बदलली. परंतु सर्वांना समान वागणूक पोलिसांनी दिली पाहिजे. कोणी कुठेही तक्रार केली तरी त्याची तक्रार पोलिसांनी दाखल करुन घ्यायला हवी. ''
सामान्य नागरिकांच्या हातात बंदूक देण्याचा निर्णय
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश नेहमीच त्यांच्या निर्णयांमुळे तसेच कारवायांमुळे चर्चेत असतात. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्याची देखील चर्चा झाली होती. ''शहर सुरक्षित राखण्यासाठीच्या कामात नागरिकांनाही सहभागी करुन घेतलं जाईल. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा बंदुकीचे परवाने देण्यात येतील,'' असं ते म्हणाले होते.
पिंपरी चिंचवड शहराचा भाग पूर्वी पुणे पोलिसांच्या हद्दीत येत होता. पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी हा काळजीचा मुद्दा बनला होता. त्यामुळे पिंपरी चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्त व्हावं अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार 15 ऑगस्ट 2018 ला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली.
कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी त्यांनी सर्वसामान्यांना बंदुकीचे परवाने देण्याचा निर्णय घेतला होता.
''पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नवीन असल्यामुळे इथं मनुष्यबळाची कमतरता आहे. शहरात ज्वेलर्सची दुकाने फोडून चोरी, घरफोडी, वाहन चोरी यांच्यासह चेन स्नॅचिंग आदी प्रकार घडत असल्याचं सातत्याने समोर आलं आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून रात्रीचा बंदोबस्त तसेच गस्त आदी उपाय करण्यात येत आहेत. पण अशावेळी मनुष्यबळाची कमतरता निर्माण होते. त्यामुळे शहराच्या सुरक्षेसाठीच्या गस्तीच्या कामात सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी करुन घेण्यात येईल,'' असंही कृष्णप्रकाश म्हणाले होते.
कोण आहेत कृष्ण प्रकाश ?
कृष्णप्रकाश हे 1998 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. मुंबईच्या दक्षिण विभागाचे ते अतिरिक्त पोलीस आयुक्त देखील होते. फ्रान्समध्ये झालेल्या आयर्नमॅन चॅलेंजचे ते विजेता ठरले आहेत. हा किताब जिंकणारे ते भारतातील पहिले अधिकारी आहेत.
कृष्ण प्रकाश हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांसाठी तसेच कारवाईसाठी चर्चेत असतात. गजा मारणे याने तळोजा कारागृहातून रॅली काढल्यानंतर कृष्ण प्रकाश यांच्या आदेशानुसार तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताना ''मी कोणत्याही दबावाला जुमानत नाही'' असे कायदा न पाळणाऱ्या लोकांना त्यांनी सांगितले होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)