रवींद्र माळी: ज्योतिबा यात्रेत सासनकाठी नाचवल्यानंतर व्हायरल झालेल्या पोलिसाची गोष्ट

    • Author, स्वाती पाटील
    • Role, बीबीसी मराठीसाठी

पोलीस म्हटलं तर दरारा आणि करारी चेहऱ्याची व्यक्ती समोर येते पण वर्दीच्या आतही एक माणूस असतो आणि त्याला देखील भावभावना असतात, याचं उदाहरण नुकताच महाराष्ट्राने पाहिले आहे.

ज्योतिबाच्या यात्रेत सासनकाठी नाचवणाऱ्या पोलिसाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आणि हा पोलीस कोण आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागली. बीबीसी मराठीने या पोलिसाची भेट घेतली आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला की सासनकाठी नाचवताना नेमक्या कोणत्या भावना या पोलिसाच्या मनात होत्या.

त्यांच्या व्हीडिओवर तर कमेंट्साच पाऊस पडला आहे. 'नादखुळा, लय भारी, एक नंबर' अशा अनेक कमेंट्स या व्हीडिओवर दिसत आहेत.

16 एप्रिलच्या या व्हिडिओत कोल्हापूरमधल्या जोतिबा यात्रेत एक पोलीस कॉन्स्टेबल सासनकाठी नाचवताना दिसतात.

हलगीच्या ठेक्यावर गुलालाने माखलेला हा पोलीस तरुण लीलया तोल सांभाळत सासनकाठी नाचवताना पाहताना अनेकांचं भान हरपून गेलं आहे.

रवींद्र माळी असं यो पोलिसाचं नाव असून ते कोल्हापूर येथे त्यांचं पोस्टिंग आहे. सध्या ते पोलीस मुख्यालयात काम करतात. रवींद्र याचं मूळ गाव कुरूंदवाड आहे. बंदोबस्तासाठी रविंद्र ज्योतिबा डोंगरावर होते.

दरवर्षी चैत्र पोर्णिमेच्या दिवशी ज्योतिबा डोंगरावर देवाची यात्रा असते. यावेळी राज्यासह परराज्यातून लाखो भाविक डोंगरावर दर्शनासाठी येत असतात. कोरोनामुळे गेलीं दोन वर्षं यात्रेवर बंधनं होती. पण यावर्षी ही यात्रा उत्साहात झाली. भाविकांची संख्या मोठी असल्याने कोल्हापूर पोलीसांचा बंदोबस्त मोठा होता.

या यात्रेत सासनकाठी नाचवण्याची मोठी परंपरा आहे. गावोगावच्या सासनकाठ्या या यात्रेत नाचवल्या जातात. गुलाल खोबऱ्याची उधळण, हलगीचा ठेका आणि जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात इथं सासनकाठ्या नाचवल्या जातात.

ज्योतिबाच्या मुख्य मंदिर ते यमाई मंदिर या पालखी मार्गावर या सासनकाठ्यांची मिरवणूक निघते. याच मार्गावर गणपती मंदिराजवळ रवींद्र माळी बंदोबस्तासाठी उभे होते. त्याचवेळी त्यांच्या गावाची म्हणजेच कुरूंदवाडची सासनकाठी समोरून येताना त्यांना दिसली.

त्या अनुभवाबद्दल माळी सांगतात, "माझी काठी समोरून येताना दिसली. माझे वडील भाऊ, मित्र गावकरी सगळे उत्साहात काठी नाचवत येत होते. कधी एकदा ती काठी हातात घेऊन खांद्यावर नाचवेन असं झालं होते. जेव्हा काठी समोर आली तेव्हा मात्र मी स्वतःला रोखू शकलो नाही. सगळ्यांच्या सोबत देहभान विसरून सासनकाठी नाचवली. पोलिसाचा गणवेश अंगावर होता अन् मनातून देवाची भक्ती होती. सगळ्यांचा आग्रह झाला आणि मी क्षणात सासनकाठी डोक्यावर घेत तोल सांभाळत सासनकाठी नाचवली. सासनकाठी नाचवण्याचा मोह आवरला नाही."

सासनकाठी नाचवतानाचा रवींद्र यांचा व्हीडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. यावर विचारलं असता रवींद्र सांगतात, "त्या दिवशी बंदोबस्तासाठी डोंगरावर होतो. त्या आधी कोल्हापूरमध्ये पोटनिवडणूक होती. आंबेडकर जयंतीसाठी सगळीकडे पोलीस बंदोबस्तावर असावं लागत होतं. त्यामुळं कामाचा ताण सगळ्याच पोलिसांवर होता. पण सासनकाठी समोर दिसली आणि हा ताण कुठे गेला कळलंच नाही."

"हे सगळं करताना याचा कुणीतरी व्हिडिओ करेल आणि तो वायरल होईल हे ध्यानीमनी सुद्धा नव्हतं. पण आता खूप आनंद होतोय. लोक फोन करुन, मेसेज करुन अभिनंदन, कौतुक करतात यामुळं भारी वाटतंय."

सासनकाठी नाचवताना तोल सांभाळण्यावरुन अनेकांनी तुम्ही हे कसं केलं असं विचारल्यावर ते सांगतात, "लहानपणापासून सासनकाठी नाचवताना पाहत आलोय. ते पाहूनच शिकलो. त्यात काही वेगळं वाटत नाही. माझ्यासाठी ते सवयीचं आहे. "

रवींद्र 2014 साली पोलीस दलात भरती झाले. आधी सोलापूर ग्रामीण इथं काम करत होते. त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाली. रवींद्र हे राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते आहेत.

महाराष्ट्र पोलीस दलातून वेटलिफ्टिंग प्रकारात त्यांनी सुवर्णपदकासह अनेक पदकांची कमाई केली आहे. राष्ट्रीय खेळाडू असल्याने त्यांना व्यायामाची आवड आहे. ते सांगतात,"वयाच्या 12 व्या वर्षापासून व्यायाम करतो. सध्या नोकरीची वेळ ही सकाळी आठ ते संध्याकाळी आठ अशी आहे. नोकरीतून वेळ मिळाल्यावर व्यायाम करतो. मी निर्व्यसनी असल्याने स्वतःच्या तब्येतीबाबत जागृक असतो. माझी वर्दी माझ्या अंगावर शोभून दिसावी यासाठी मी प्रयत्नशील असतो."

रवींद्र पोलिसाची नोकरी सांभाळत सुट्टीच्या दिवशी शेतात काम करतात. एकीकडे पोलीसांसारखी सेवा देताना व्यायामाची आवड जपत लहान मुलांना व्यायामाचे धडे देतात. पुढची पिढी निरोगी राहावी, व्यायाम करू सृदृढ असावी यासाठी ते प्रयत्न करतात.

आम्ही रवींद्र यांची मुलाखत घेण्यासाठी गेलो तेव्हा चित्रण सुरू असताना अनेकांचे कौतुक करणारे फोन त्यांना येत होते. सध्या रवींद्र यांचं पोलीस दलातही मोठं कौतुक होत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी देखील रवींद्र माळी यांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं. तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याचं नाव केलं. अभिमानास्पद काम केलं अशा शब्दांत बलकवडे यांनी कौतुकाची दाद दिली.

रवींद्र माळी यांचा विडिओ अजूनही अनेकांच्या स्टेटसवर, फेसबुकच्या पेजवर झळकतोय. त्यांच्यासाठी मात्र आता पोलीस कर्तव्य महत्वाचं आहे. आताही ते कर्तव्यावर आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)