You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या मुसलमानांना हज यात्रा करण्यास बंदी आहे
जगभरातले लाखो मुसलमान हजयात्रा करायला दरवर्षी सौदी अरेबियाला पोहोचतात. पाच दिवस चालणारी ही यात्रा या वर्षी 19 ऑगस्टला सुरू झाली.
मक्का शहरातल्या काबा या चौकोनी वास्तूला इस्लाममधली सगळ्यांत पवित्र जागा म्हटलं जातं. ही प्राचीन जागा मुस्लीम धर्मीयांसाठी फार महत्त्वाची आहे. यावर्षी 20 लाखाहून जास्त मुस्लीम जगभरातून हजयात्रेला येतील, असा अंदाज आहे.
मुस्लीम धर्मीयांच्या पाच स्तभांपैकी एक हज आहे. सगळ्या शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि चांगली आर्थिक परिस्थिती असणाऱ्या मुस्लिमांनी जीवनात एकदा तरी हज यात्रा जरूर करावी, असा नियम आहे.
खरंतर इस्लामचे सगळे अनुयायी स्वतःला मुस्लीम म्हणतात, पण इस्लामिक कायदा (फिकह) आणि इस्लामिक इतिहासाच्या आपल्या आपल्या समजानुसार मुस्लीम अनेक पंथांमध्ये वाटले गेले आहेत. याच पंथांपैकी एक आहे अहमदिया.
अहमदियांना इतर इस्लामधर्मीय मुस्लीम मानत नाही. सौदी अरेबियाने अहमदियांच्या हज यात्रेवर बंदी घातली आहे.
असं असतानाही जे हज यात्रेसाठी मक्केला जातात त्यांना अटक होण्याची किंवा डिपोर्ट (मायदेशी परत पाठवून देणं) होण्याची भीती असते.
डिपोर्ट होण्याचा धोका
बीबीसीची टीम अशाच एका व्यक्तीला भेटली जिने मागच्या वर्षी लपून-छपून हज यात्रा केली होती.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं, "हजला जाण्यात धोका आहे, हे सतत तुमच्या डोक्यात असतं. पण तुम्ही त्या यात्रेला जाता तेव्हा मनात एक आनंद पण असतो, की तुम्ही अल्लाहसाठी तिथे जात आहात. तुम्हाला अल्लाहसुध्दा मदत करतात कारण त्यांना माहितेय की मी मुस्लीम आहे."
यूकेमधल्या मॅचेंस्टरस्थित दारुल उलूम मशिदीचे इमाम मोहम्मद सांगतात की, "काही देशांनी आणि संघटनांनी आम्हाला बिगरमुस्लीम घोषित केलं आहे. हे त्यांचं मत आहे. पण यामुळे गोष्टी जरा गुंतागुंतीच्या होतात. अहमदियांसाठी हजची यात्रा थोडी कठीण आहे. म्हणून ते जेव्हा हजसाठी जातात तेव्हा जास्त सतर्क असतात."
इमाम मोहम्मद सांगतात, "सहसा लोक विचारत नाहीत की तुम्ही कोणत्या पंथाचे आहात. तिथे आम्ही कुणाला त्रास देत नाही. तिथली परिस्थिती बदलायलाही आम्ही जात नाही आणि कुणाला दुखवायचा आमचा हेतू नसतो."
इमामांना वाटतं की असं सगळं असूनही अहमदिया मुस्लिमांना डिपोर्ट केलं जातं.
"जेव्हा अहमदिया मुस्लिमांना डिपोर्ट करायचा निर्णय घेतला जातो तेव्हाही तुम्ही पाहाल की ते काही विरोध करत नाहीत. कारण आम्ही त्या देशाचाही सन्मान करतो आणि जिथे आम्ही राहतो त्या देशाचाही."
मँचेस्टरच्या या मशिदीत येणाऱ्या अनेकांना त्या लोकांविषयी माहिती आहे जे हजयात्रेला जाऊन आले आहेत. या मशिदीत येणाऱ्या एक महिला सांगतात, "मी कधीही हजयात्रेला गेलेले नाही पण मला जायला आवडेल. माझी खूप इच्छा आहे कारण मी अल्लाहला मानते. मला तो आध्यात्मिक अनुभव घ्यायचा आहे जो मिळवायची इच्छा जगभरातल्या लोकांना आहे."
या मशिदीत येणारी आणखी एक व्यक्ती सांगते, "कधी कधी लोकांना त्यांच्या मनासारख्या गोष्टी करण्यापासून रोखलं जातं. पण त्यांनाही भावना असतात. तुमच्या लक्षात येईल की अहमदिया मुस्लिमांमध्ये हजला जाण्याची तीव्र इच्छा असते."
कोण आहेत अहमदिया मुसलमान
इस्लामच्या हनफी शाखेचं पालन करणाऱ्या मुस्लिमांचा एक समुदाय स्वतःला अहमदिया म्हणवतो. या पंथाची स्थापना भारतातल्या पंजाबमधल्या कादियानमध्ये मिर्झा गुलाम अहमद यांनी केली होती.
या पंथाचे अनुयायी मिर्झा गुलाम अहमद यांनाच अल्लाहचा एक अवतार मानतात. या अनुयायांच्या मते मिर्झा गुलाम अहमद यांनी नवीन शरीयत आणली नाही. ते स्वतः मोहम्मद पैगंबरांच्या शरीयतीचं पालन करत होते, पण ते अल्लाहचा अवतार होते.
पण इस्लाम धर्मातले सगळेच संप्रदाय हे मानतात की मोहम्मद पैगंबरानंतर अल्लाहने या जगात कोणताही प्रेषित पाठवला नाही.
पण अहमदियांची श्रद्धा आहे की मिर्झा गुलाम अहमद एक असे धर्म सुधारक होते ज्यांना प्रेषिताचा दर्जा होता.
या एका गोष्टीवरून मुस्लीम धर्मीयांच्या पंथामध्ये खूप गंभीर मतभेद आहेत. पण भारत, पाकिस्तान आणि UKमध्ये अहमदिया मुस्लिमांची बरीच संख्या आहे. पाकिस्तानने तर अहमदियांना इस्लाम धर्मातून हद्दपार केलं आहे.