You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्लीच्या जहांगीरपुरीत अवैध बांधकाम पाडण्याची कारवाई थांबली
दिल्लीच्या जहांगीरपुरीत 16 एप्रिलला झालेल्या हिंसाचारानंतर अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू झाली. ही कारवाई सुरू झाल्याबरोबर सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आणि हे तोडकाम तातडीने थांबवण्याचा आदेश दिला आणि आता ही कारवाई थांबल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी जहांगीरपुरी येथील कारवाई थांबल्याच्या माहितीला दुजोरा दिला. त्यांनी लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. बुलडोजर कायद्याच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या चिंध्या करत आहे त्यांना थांबवण्यासाठी मी इथे आले आहे असं त्या म्हणाल्या .
आज सकाळी ही कारवाई सुरू झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रार ने आदेश दिला आणि ही कारवाई तातडीने स्थगित करण्याच्या सूचना दिल्या.
मुख्य न्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठानं या प्रकरणाची पुढची सुनावणी गुरूवारी (21 एप्रिल) होईल असं स्पष्ट केलंय.
दिल्लीतील जहांगीरपुरी भागात 16 एप्रिल रोजी झालेल्या हिंसाचारानंतर बुधवारी (20 एप्रिल) अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली. अतिक्रमण हटवण्यासाठी काही भागात बुलडोझरही पोहोचले होते.
महानगरपालिकेने उत्तर दिल्लीतील अतिक्रमण हटविण्याची मोहीम यापूर्वी जाहीर केली होती. या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले.
अतिक्रमण हटवण्यापूर्वी दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) दीपेंद्र पाठक यांनी या संपूर्ण भागाचा आढावा घेतला.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं, "अतिक्रमण हटवण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईत आम्ही एनडीएमसीला सुरक्षा पुरवू. या भागात पुरेशा संख्येने सुरक्षा दल तैनात आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राहावी यावर आमचा भर आहे."
याआधी नॉर्थ वेस्टच्या डीसीपी उषा रंगनानीही जहांगीरपुरीला पोहोचल्या होत्या.
16 एप्रिलला हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान जहांगीरपुरीमध्ये दगडफेक आणि हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात एका पोलिस कर्मचाऱ्यासह नऊ जण जखमी झाले होते.
बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित यांनी जहांगीरपुरी परिसरात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
उत्तर दिल्ली महानगरपालिकेचे महापौर राजा इक्बाल सिंह यांनी अतिक्रमणविरोधी मोहिमेविषयी म्हटलंय की, "संपूर्ण दिल्लीतील अतिक्रमणे हटविली जातील. यापूर्वीही आम्ही अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेसाठी सुरक्षेची मागणी केली होती, परंतु काही कारणांमुळे कारवाई होऊ शकली नाही."
सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठाने जहांगीरपुरीत जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे. तसंच या प्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी (21 एप्रिल) घेण्यात येणार आहे.
जमियत आणि इतरांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बोलताना सरन्यायाधीश म्हणाले, "याप्रकरणी जैसे थे स्थिती कायम ठेवावी. उद्या (गुरुवारी) एका सक्षम पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी घेण्यात यावी.
तत्पूर्वी, याचिकाकर्त्यांची बाजू मांडत असलेले ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी सुप्रीम कोर्टासमोर म्हटलं की जहांगीरपुरीमध्ये सध्या बुलडोझर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई तत्काळ रोखण्यात यावी. हा प्रकार असंवैधानिक आणि बेकायदेशीर आहे.
दवे म्हणाले, "या प्रकरणात कोणतीही नोटीस देण्याची गरज नाही. आम्ही अर्ज दाखल केला आहे. मी न्यायालयाकडे तत्काळ सुनावणी करण्याची विनंती करतो."
कपिल सिब्बल, पी. व्ही. सुरेंद्रनाथ आणि प्रशांत भूषम हेसुद्धा या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल झाले होते.
सुप्रीम कोर्टाचा आदेश आल्यानंतर उत्तर दिल्ली महापालिकेचे महापौर राजा इक्बाल सिंह यांनी याचं पालन केलं जाईल, असं म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाबाबत पत्रकारांनी दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) दीपेंद्र पाठक यांच्याशी चर्चा केली. प्रशासनाच्या सूचनेप्रमाणेच काम केलं जात आहे, असं पाठक म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "आम्ही प्रत्येक काम कायद्याप्रमाणेच करतो. या प्रकरणात स्थानिक स्वराज्य संस्थाही सहभागी आहे. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार आम्ही काम करतो. या संस्थांना संरक्षण पुरवण्याचं काम आम्ही सध्या करत आहोत. आमची या प्रकरणातील भूमिका अत्यंत मर्यादित आहे."
मध्यप्रदेश पाठोपाठ दिल्लीतही कारवाई
मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश या भाजपशासित राज्यांमधील दंगलीत सहभागी असलेल्या लोकांवरील कारवाईचा भाग म्हणून त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवून अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली होती. यासंबंधी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
तेच दुसरीकडे मंगळवारी दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी उत्तर एमसीडीच्या महापौरांना पत्र लिहून जहांगीरपुरी हिंसाचारात अटक केलेल्या लोकांचे 'बेकायदेशीर अतिक्रमण' पाडण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
त्यांनी उत्तर एमसीडीच्या आयुक्तांना देखील एक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलयं की, "तुम्हाला माहिती आहे की, जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. काही समाजकंटक आणि दंगलखोरांनी त्या मिरवणुकीवर दगडफेक केली होती."
या पत्राद्वारे आदेश गुप्ता यांनी आरोप केलाय की, "या समाजकंटक आणि दंगलखोरांना स्थानिक आपचे आमदार आणि समुपदेशकाचे पाठबळ आहे. त्यामुळे या लोकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं आहे."
"या दंगलखोरांचे हे बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी ते शोधून त्याच्यावर बुलडोझर चालवावा."
दुसरीकडे जहांगीरपुरी हिंसाचारातील मुख्य आरोपी अन्सार हा भाजपचा नेता असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
16 एप्रिलला जहांगीरपुरीत काय झालं होतं?
दिल्लीत 16 एप्रिलला हनुमान जयंतीच्या जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने काढण्यात आलेलया शोभायात्रेवर दगडफेक केली गेली आणि त्या दरम्यान दोन गटात संघर्ष झाला. दोन्ही बाजूकडून दगडफेक सुरू झाली. या घटनेत 9 जण जखमी झाले असून यापैकी 8 पोलीस कर्मचारी आहेत. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दगडफेक झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 22 जणांना अटक केली आहे. यापैकी दोन अल्पवयीन आहेत.
अटक केलेल्यांपैकी 14 जणांना रविवारी (17 एप्रिल) कोर्टात हजर करण्यात आलं. अंसार आणि अस्लम या दोन आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, इतर 12 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली
तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, "हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत सहभागी झालेले लोक जय श्री रामचा नारा देत होते. तसंच प्रवृत्त करणारे नारेही दिले जात होते. ते बळजबरीने मशिदीत घुसले आणि परिसरात भगवा झेंडा बांधू लागले. तलवार दाखवून ते आम्हाला घाबरवत होते. त्यानंतर दगडफेक सुरू झाली. यापूर्वी जहांगीरपुरीमध्ये असं कधीही घडलं नाही."
जवळपास 50 लोक बळजबरीने मशिदीत घुसले असा दावा अमजद यांनी केला. मशिदीजवळ सी आणि डी ब्लॉकमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रत्येक 200 मीटर अंतरावर बॅरिकेड्स लावले आहेत. मशिदीच्या आसपासची दुकानं मात्र बंद होती.
मनोज कुमार सांगतात, हिंसा सुरू झाली तेव्हा ते सी ब्लॉक येथील आपल्या दुकानात होते. पीटीआयशी बोलताना ते म्हणाले, "लोक जोरजोरात ओरडत होते आणि आपल्या घराकडे धावत होते. आधी दोन समुदायांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाल्याचं मी पाहिलं. शोभायात्रेत सामील झालेल्या लोकांकडे शस्त्र होती. पण दगडफेक मुस्लीम लोकांकडून सुरू झाली."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)