RSS ला 'अखंड भारत' म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे?

    • Author, जयदीप वसंत
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

"अखंड भारताचं स्वप्न येत्या 20 ते 25 वर्षात पूर्ण होऊ शकेल. पण जर आपण आणखी थोडी मेहनत घेतली, तर हे स्वप्न आपण 15 वर्षात साकार करू शकतो," असं राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हरिद्वारमध्ये म्हटलं.

मोहन भागवत यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, शिवसेनेसह विरोधी पक्षातील अनेकांनी निषेध केला.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोहन भागवतांच्या वक्तव्यावर म्हटलं की, "त्यांनी हे स्वप्न 15 वर्षात नव्हे, 15 दिवसात साकार केलं पाहिजे. पाकव्याप्त काश्मीर, श्रीलंका आणि कंदाहार भारतात विलीन झाले पाहिजेत. त्याहीआधी काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन झालं पाहिजे."

भागवतांच्या वक्तव्यावर बोलताना एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसींनी म्हटलं, "मला मोहन भागवतांना सांगायचंय की, अखंड भारताबद्दल नव्हे, तर ज्यांनी भारताचा भूभाग ताब्यात घेतलाय त्या चीनबद्दल बोला, कारण तिथं भारतीय सैन्य पेट्रोलिंगसाठीही जाऊ शकत नाहीत."

माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी म्हणाले की, "राष्ट्रीय स्वंयसेवक संघ लोकांच्या भावनांशी खेळतंय."

"अखंड भारत म्हणजे नेमकं काय? ते प्रचंड विष, द्वेष आणि हिंसा पसरवतायेत. बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका आणि अफगाणिस्तानला हे 'अखंड भारत' म्हणजे काय ते सांगा," असं येचुरींनी एएनआयशी बोलताना म्हटलं.

संघ 'अखंड भारता'बद्दल सारखं का बोलत असतं?

सरसंघचालक मोहन भागवतांचं अखंड भारताबद्दलचं वक्तव्य फारसं आश्चर्याचं नाही. याचं कारण कलम 370 रद्द करणं आणि अयोध्येत राम मंदिराची उभारणी करणं हे मुद्दे जसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर उघडपणे असत, त्याचप्रमाणे अखंड भारताची निर्मिती हा मुद्दाही असतो.

देवेंद्र फडणवीस, राम माधव, इंद्रेश कुमार आणि मोहन भागवत यांसह संघाशी संबंधित अनेकजण अनेकदा जाहीर व्यासपीठांवरून अखंड भारताच्या निर्मितीबद्दल बोलत असतात. यावेळी वेगळं काय असेल तर अखंड भारताबद्दल बोलताना त्यांनी सांगितलेली 'टाईमलाईन'.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघानुसार, 'भारत देश' आणि 'हिंदू राष्ट्र' या दोन वेगळ्या कल्पना आहेत. तसंच, विनायक दामोदर सावरकर, स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या मांडणीतही 'राष्ट्र' ही संकल्पनाही वेगवेगळी आढळते.

काही विश्लेषकांच्या मते, 'अखंड भारता'ची संकल्पना आजच्या घडीला 'अव्यवहारिक' आणि 'अवास्तव' आहे. ही संकल्पना वास्तवात आणणं कठीण असेल. मात्र, संघाचे विचारवंत मानतात की, कुठल्याही दबावाशिवाय हे शक्य आहे.

विरोधकांच्या मते, हिंदुत्वाची विचारधारा पुढे नेण्यासाठी अखंड भारताच्या कल्पनेचा वापर केला जात असून, या विचारसरणीवर विश्वास ठेवणारे लोक मुस्लिम आणि दलितांना लक्ष्य करत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतात सध्या सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात हिंदुत्व आणि धर्माच्या नावानं राजकारण करत असल्याचा त्यांच्यावर आरोपही केला जातो. अखंड भारत किंवा हिंदू राष्ट्राची मागणी अनेक हिंदूत्ववादी नेत्यांनी अनेकदा केलीय.

भारत आणि हिंदू राष्ट्र

साधरणत: 'देश' आणि 'राष्ट्र' हे दोन्ही शब्द समानार्थी किंवा पर्यायी म्हणून वापरले जातात. मात्र, या दोन्ही संकल्पाना मुळात वेगळ्या आहेत.

पूर्वी 'साम्राज्यवाद' ही संकल्पना होती, ज्यात शासक (किंवादेश) त्याचं राज्यं किंवा साम्राज्यावर नियंत्रण ठेवत असे. शासक त्यांच्या साम्राज्याच्या सीमा विस्तारण्यासाठी प्रयत्न करत, ज्यामुळे रक्तपात होत असे.

ऑक्स्फर्ड शब्दकोशानुसार, 'Country' (देश) म्हणजे असं भौगोलिक क्षेत्र, जिथं कायदे करणारं सरकार असतं. सार्वभौम आणि भौगोलिक क्षेत्र हे त्याचे दोन मुख्य घटक असतात. 'Country' हा लॅटिन भाषेतील 'Contra' या शब्दातून आला आहे.

'Nation' (राष्ट्र) म्हणजे इतिहास, भाषा आणि मूळ सारखं असणाऱ्या समाजाचा किंवा समूहातील लोकांचा गट. तिथं त्यांचं स्वत:चं सरकार असतं. प्रत्येक 'Nation' (राष्ट्र) सार्वभौम असेलच असे नाही. 'Nation' हा शब्द फ्रेंच भाषेतील 'Nation'पासून तयार झालाय.

त्यामुळे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची 'हिंदू राष्ट्रा'ची कल्पना समजून घेण्यासाठी आधी 'देश' आणि 'राष्ट्र' यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'व्हिजन अँड मिशन'मध्ये 'हिंदू राष्ट्र' या संकल्पनेला स्थान मिळाल्याचं आढळतं.

संघाची हिंदू राष्ट्राची कल्पना नेमकी काय आहे?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासूनच 'अखंड भारता'ची संकल्पना मांडली गेलीय. जेव्हा स्वतंत्र पाकिस्तानची मागणी पुढे आली, तेव्हा असा वेगळा पाकिस्तान अस्तित्वात येईल का, याबाबत स्पष्टता नव्हती. 1947 साली संघाची प्रतिज्ञा बदलली आणि 'हिंदू राष्ट्र'ऐवजी 'सर्वांगीण उन्नती' असा बदल केला गेला.

संघाचे दुसरे सर्वोच्च नेते आणि माजी सरसंघचालक माधवराव सदाशिवराव गोळवलकर 'गुरुजी'च्या मती, "हिंदू राष्ट्र ही साम्राज्यवादी संकल्पना नसून, ती आर्थिक, सामाजिक आणि ऐतिहासिक संकल्पना आहे."

संघ नेहमी 'परम वैभव' साध्य करण्याबाबत बोलत असतं. यात ब्रिटिशांच्या सत्तेचा शेवट हा केवळ एक टप्पा मानला जातो. दरम्यान, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग हा कायमच वादाचा मुद्दा ठरतो. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसनं कायम आरोप केलाय की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ब्रिटीश सत्तेविरोधातील लढ्यात सहभाग घेतला नव्हता.

संघाच्या मते, 'परम वैभव' म्हणजे देशाची भौतिक उन्नती साध्य करणं असून त्यांची ओळख आणि हेतू हे इतरांच्या दयेवर आधारित नाही. संघाच्या मते, हिंदू राष्ट्र हे 'संस्कार' आणि 'संघटन' यांच्यावर आधारित आहे.

गोळवलकरांनी त्यांच्या 'बंच ऑफ थॉट्स' (पान क्र. 16-17) मध्ये म्हटलंय की, 'हिंदू समाज' हा एका बाजूला अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला चीन, जपान, कंबोडिया, मलाय, सियाम, इंडोनेशिया, मंगोलिया, दक्षिण-पूर्व आशियातील देश ते सायबेरियापर्यंत पसरला आहे.

भारतात स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनच 'राष्ट्र' आणि 'राष्ट्रवाद' यावरील वाद-विवाद सुरू झाला होता. 'जन-गण-मन' या भारताच्या राष्ट्रगीताचे गीतकार रविंद्रनाथ टागोर यांनी भारतीयांना राष्ट्रवादावरून सतर्कही केलं होतं.

ज्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखंड भारताची मांडणी करताना आर्थिक, सामाजिक, ऐतिहासिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या एकजूट असं म्हणते, तेव्हा रविंद्रनाथ टागोर लिहितात की, 'जेव्हा लोक त्यांच्या संस्कृतीच्या किंवा रक्ताच्या श्रेष्ठतेच्या आधारावर, व्यावसायिक लालसेपोटी, दुसर्‍या देशाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी किंवा दुसर्‍याचे शोषण करण्यासाठी एकत्र येतात, तेव्हा ते राष्ट्रवादाची स्थापना करतात, मानवी ऐक्याचा आदर्श नाही. अशी परिस्थिती मानवजातीसाठी काळी रात्र घेऊन येते. हा राष्ट्रवाद आज जगात पसरलेला क्रूर रोग आहे आणि मानवी नैतिकता नष्ट करत आहे.'

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी, म्हणजे 1940 च्या दरम्यान जेव्हा भारत आणि पाकिस्तान अशा फाळणीच्या चर्चेस सुरुवात झाली, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या आधारावर पाकिस्तान निर्मितीवरून इशारा दिला होता की, "जर हा देश हिंदू राष्ट्र होत असेल, तर यात कुठलीही शंका नाही की, देशाला हा सर्वात मोठा धोका आहे. हिंदू काहीही म्हणोत, पण हिंदूत्व हा देशाच्या स्वातंत्र्याला, समानतेला आणि बंधुत्वाला धोका आहे. कुठल्याही स्थिती हिंदू राज रोखलं पाहिजे."

'अखंड भारता'च्या दिशेनं पहिलं पाऊल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 14 ऑगस्ट (भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी) 'अखंड भारत संकल्प दिवस' साजरा करतं. कारण 14 ऑगस्टलाच पाकिस्तान अस्तित्वात आला. नंतर पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा झाला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अभ्यास करणारे पत्रकार आनंद शुक्ला सांगतात, "संघ आणि समाजातील मोठा वर्ग आजही असं मानतो की, 14 ऑगस्ट रोजी भारत म्हणून जो भूभाग होता, तो खऱ्या अर्थानं 'अखंड भारत' होता आणि तो सांस्कृतिक सीमेच्या आत पुन्हा परतायला पाहिजे."

गुजरातमध्ये 27 वर्षे हिंदूंचे सरकार असूनही हिंमतनगरमधून हिंदूंना पळावं लागत आहे आणि अशा परिस्थितीत 'अखंड भारता'ची कल्पना करणे कठीण आहे, अशी खंतही ते व्यक्त करतात.

नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सौराष्ट्र विभागातील पदाधिकारी सांगतात की, "मोहन भागवतांनी त्यांच्या भाषणात पुढे काय म्हटलं, याबद्दल कुणीच बोलत नाही. भागवत पुढे म्हणाले की, ज्योतिषांनुसार पाकिस्तान आणि भारत पुढच्या 20-25 वर्षात एकत्र होईल. म्हणजेच, त्यांचं विधान हे ज्योतिषांच्या अंदाजांवर आधारित होतं."

अखंड भारत या संकल्पनेबाबत ते म्हणतात की, "भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, भूतान, अफगाणिस्तान आणि कंबोडिया या देशांची महासंघ (यूनियन) होऊ शकते, जिथं हिंदू आणि हिंदूत्व प्रचलित आहे. यामुळे हे देशही स्वतंत्र राहू शकतील."

"अनेक शतकांपूर्वी जसं होतं, तसं भारत हा या देशांचा आर्थिक, संरक्षण आणि इतर गोष्टींसाठी केंद्र ठरू शकतं. अशाप्रकारचा महासंघ (यूनियन) कुठल्याही लष्करी जोरावर होऊ शकत नाही, तर मुत्सद्दीपणा किंवा परस्पर सहमतीनं होऊ शकतं. यासाठी भारताला आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या कणखर व्हावं लागेल."

ते युरोपियन युनियनचं उदाहरण देतात. त्यात ते पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीच्या एकत्रीकरणाबाबत सांगतात.

ते पुढे म्हणतात की, "जर 35 वर्षांपूर्वी साम्यवाद जगातून नामशेष होईल, असं कुणी म्हटलं असतं तर त्यावर अनेकजण हसले असते. पण आज आपण पाहिलं तर चीनमध्येच साम्यवाद अस्तित्वात आहे आणि तेही भांडवलशाहीच्या स्वरूपात."

मात्र, अशा पद्धतीची महासंघाची निर्मिती शुक्लांना साशंक वाटते.

ते म्हणतात की, "युरोपियन देशांमध्ये सांस्कृतिक भेद फार नाहीत, जसे भारतातल्याच हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दिसून येतात. कलम 370 रद्द करणं असो किंवा राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल असो किंवा तिहेरी तलाकचा मुद्दा असो, यांवर ते विरुद्ध बाजूला उभे असल्याचे दिसूतात."

भारत आणि इतर 'राष्ट्रं'

जेव्हा हरिद्वारमध्ये मोहन भागवत हिंदू राष्ट्राबद्दल बोलत होते, तेव्हा ते अरविंद आणि स्वामी विवेकानंद यांच्या 'अखंड भारता'च्या संकल्पनेचा संदर्भ देत होते.

स्वामी विवेकानंदांचं 'राऊजिंग कॉल टू हिंदू नेशन' (पान क्र. 42-44) हे पुस्तक एकनाथ रानडेंनी संपादित केलंय. या पुस्तकात स्वामी विवेकानंद लिहितात की, 'भारतीय लोक राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतात. मात्र, त्यांचं मुलभूत स्वातंत्र्य हे अध्यात्मिक आणि मुक्तीबाबत आहे. वेदिक, जैन, बुद्धिस्ट, द्वैत आणि अद्वैत हे सर्व पंथ मुक्तीबाबतच भाष्य करतात. हे क्षेत्र अस्पर्शित राहिले तर तुम्ही इतर सर्व बाबतीत काय करता, याची पर्वा 'हिंदू' करत नाही आणि मौन पाळतो.

सोमनाथचं उदाहरण देऊन विवेकानंद सांगतात की, सोमनाथवर सातत्यानं परदेशी आक्रमकांनी हल्ले केले, तरीही ते पुन्हा उभारलं गेलं. ते अधिक शक्तिशाली आणि मजबूत झालं. हीच 'राष्ट्रीय मन' आणि 'राष्ट्रीय जाणीव' आहे.'

अरविंद घोष यांचा राष्ट्रवाद 'अध्यात्मिक' होता आणि ते 'मातृभूमीच्या पवित्रते'बद्दल बोलत असत. राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करताना ते 'देशाच्या पुनर्शोधा'वर भर देतात. ते योगी, तत्वज्ञ, क्रांतिकारक, लेखक आणि विचारवंत होते. अलिपूर बॉम्बस्फोटाप्रकरणी त्यांच्यावर खटलाही चालवण्यात आला होता.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सुरुवातीच्या काळात राजकारणापासून अंतर राखलं, नंतर मात्र हे अंतर कमी होत गेलं. दुसरीकडे, हिंदू महासभा आणि विनायक दामोदर सावरकर हे तर राजकारणातून ध्येय साध्य करण्याच्या मताचे होते.

सावरकरांनी त्यांच्या 'हिंदू राष्ट्र दर्शन' (पान क्र. 51) मध्ये भौगोलिक सीमांची नोंद केली होती. त्यात त्यांनी ब्रिटिशांनी व्यापलेला भाग घेतला होताच, सोबत त्यात उत्तरेला तिबेट, नेपाळ, पूर्वेला गोमंतक आणि बंगाल (आताचा बांगलादेश), शिवाय पोर्तुगीज-व्याप्त भाग (गोवा, दिव, दमन, दादरा-नगर हवेली) आणि पाँडिचेरी (आताचं पद्दुचेरी) यांचा समावेश होता. सावरकर भारताला 'पुण्याभूमी' आणि 'राष्ट्रभूमी' मानत.

विनायक दामोदर सावरकर हे महात्मा गांधीजींच्या हत्या प्रकरणात आरोपी होते. संघाचे तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर यांनाही अटक करण्यात आली होती आणि संघावर बंदीही आणण्यात आली होती. संघावरील ही बंदी सहा महिन्यांनी उठवण्यात आली. संघानं तेव्हा 'सामाजिक आणि सांस्कृतिक' मुद्द्यांवरच लक्ष केंद्रीत करण्याचं वचन दिलं होतं.

सावरकरांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटची दोन दशकं जवळजवळ विस्मृतीत घालवली. मात्र, आता संघ त्यांचा गौरव करतं. तेच नव्हे, तर शिवसेना आणि हिंदू महासभेसारखे पक्षही सावरकरांच्या राजकीय विचारधारेचा सन्मान करतात.

गेल्या सात-साडेसात दशकांमध्ये भारताचं रूप अनेकदा बदललंय. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात तीनवेळा रूप बदललंय.

2020 मध्ये शेवटचा बदल झाला. दिव, दमन, दादरा आणि नगर हवेळी यांचं विलिनीकरण करण्यात आलं. हा प्रशासकीय बदलाचा भाग होता.

गेल्या काही वर्षातील सर्वात मोठा बदल 2019 मध्ये जम्मू-काश्मीरची विभागणी करून दोन केंद्रशासित प्रदेश करण्यातून झाला. यावेळी जम्मू, काश्मीर आणि लडाख असे तीन भाग तयार करण्यात आले.

2015 साली भारत आणि बांगलादेशने सीमावाद मिटवण्यासाठी काही भूभागांची अदलाबदल केली.

1947 साली पाकिस्तानी लष्कराचा पाठिंबा असलेल्या आदिवासी जमातींनी जम्मू आणि काश्मीरमधील काही भाग व्यापला होता. नंतर भारतानं प्रत्युत्तर देत त्यातला काही भाग पुन्हा मिळवला.

हा मुद्दा जेव्हा संयुक्त राष्ट्रात (UN) पोहोचला आणि तिथं शस्त्रसंधी झाली, त्यामुळे काही भाग पुन्हा भारताकडे राहिला. मात्र, आदिवासी जमातींनी व्यापलेल्या जम्मू-काश्मीरमधील भागाला भारत 'पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीर' असंच संबोधत आलाय. तर पाकिस्तान या भागाला 'आझाद काश्मीर' म्हणतं.

1962 मध्ये भारत आणि चीनमधील युद्धादरम्यान काश्मीरचा सुमारे 33,000 चौरस किलोमीटरचा भाग चीनने आपल्या ताब्यात घेतला होता. भारत जम्मू आणि काश्मीरचा जो संपूर्ण नकाशा दाखवतो, त्यामध्ये त्यांच्या नियंत्रणाखाली नसलेल्या भागांचाही समावेश होतो.

1949 साली त्रिपुरा भारतात विलीन झालं. 1950 साली भारतानं अंदमान आणि निकोबारवर कब्जा केला. ब्रिटिश त्या ठिकाणी अँग्लो-इंडियन आणि अँग्लो-बर्मिज लोकांना स्थायिक करू इच्छित होते. 1954 मध्ये फ्रान्सने पाँडिचेरी भारताच्या ताब्यात दिले.

1961 साली भारतानं दिव, दमन, गोवा, दादरा आणि नगर हवेली भारतात विलीन करून घेतलं. ही क्षेत्रं जवळपास 450 वर्षे पोर्तुगीजांच्या सत्तेखाली होते. सार्वमतानंतर, सिक्कीम 1975 मध्ये भारतात विलीन झालं आणि 22 वं राज्य बनलं.

भाषांच्या आधारे पुनर्रचना झाल्यामुळे पुढील नवी राज्यं अस्तित्वात आली - आंध्र प्रदेश (1956), कर्नाटक (1956, म्हैसूर राज्य), केरळपासून वेगळे झालेले निकोबार बेटे (1960), गुजरात (1960), महाराष्ट्र (1960), पंजाबपासून वेगळे होत हरियाणा (1966) आणि हिमाचल प्रदेश (1966). चंदीगडला हरियाणा आणि पंजाबची संयुक्त राजधानी म्हणून घोषित करण्यात आलं.

आसाममधून वेगळं होत मेघालय (1972) आणि मिझोराम (1972), मध्य प्रदेशमधून वेगळं होत छत्तीसगड (2000), उत्तर प्रदेशमधून वेगळं उत्तराखंड (2000), बिहारमधून वेगळं झारखंड (2000) आणि आंध्र प्रदेशमधून वेगळं होत तेलंगणा (2014) तयार झालं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)