महाराष्ट्राच्या काही भागात आजपासून भारनियमन #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. महाराष्ट्राच्या काही भागात आजपासून भारनियम
महाराष्ट्राच्या काही भागात आजपासून भारनियमन होणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार वीजेच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली आहे आणि त्या तुलनेत पुरवठा कमी आहे. त्यामुळे भारनियमनाचा निर्णय घ्यावा लागत आहे. मुंबईत भांडुप, मुलुंड, नवी मुंबई, ठाणे हा भाग भारनियमनातून वगळण्यात आला आहे.
विदर्भ, खानदेश, आणि मराठवाड्याच्या काही भागातही भारनियमन होणार आहे. काही शहरी भागात दोन तासापेक्षा अधिक भारनियमन केलं जाणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. सध्या कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज निर्मितीचं संकट महाराष्ट्रात असल्याचं महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितलं.
2. राज्यात एक जुलैपासून प्लॅस्टिकबंदी
एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तुंची साठवणूक, आयात, वाहतूक, वितरण आणि वापरावर राज्यात एक जुलैपासून बंदी घालण्यात आल्याचं वृत्त लोकसत्ता ने दिलं आहे. या प्लॅस्टिकमध्ये पिशव्या, ताटं, ग्लास, काटे, चमचे, अन्नपदार्थ यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
केंद्र सरकारच्या अधिसुचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या एक दीड वर्षात करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे 3 हजार टन प्लॅस्टिक वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्यामागे 10 ते 12 कोटी दंड वसूल करण्यात आला असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
3. ईडीचा कायदा रद्द करा- छगन भुजबळ
ईडीचा राक्षसी कायदा रद्द केला पाहिजे अशी मागणी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त समता परिषदेच्या वतीने आयोजित एका पुरस्कार सोहळ्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
लोकमत ने ही बातमी दिली आहे.

या कायद्याचा दुरुपयोग वाढला आहे. विशेषत: जी राज्ये बिगर भाजपशासित आहेत तिथे याचा मोठा त्रास आहे. जरा विरोधात बोललं की ईडीची पिडा लागलीच म्हणून समजा. हा लोकशाहीला धोका असून तो वेळीच दूर केला गेला असेल पाहिजे, असं त्यांनी म्हटलं.
4. आता 'भाग सोमय्या भाग' सिनेमा काढा- संजय राऊत
INS विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना अटकपूर्व जामीन नाकारला आहे. या प्रकरणी बोलताना आता भाग सोमय्या भाग असा सिनेमा काश्मीर फाईल्स च्या निर्मात्यांनी काढायला हवा अशी टिप्पणी केली आहे.
टीव्ही 9 ने ही बातमी दिली आहे.
जर तुम्ही गुन्हा केला नाही म्हणता मग पळता कशाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. INS विक्रांतसाठी निधी गोळा करण्यासाठी वापरलेले डबे गच्च भरले आहेत असंही त्यांनी म्हटलं.
सेव्ह विक्रांतच्या नावावर त्यांनी पैसे घेतले. त्याच्या पावत्या दिल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला.
5. '...तर उद्या पैलवानांच्या घरीही धाडी पडतील'
विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदाकसंघात भाजपने काँग्रेसला छुपी मदत केली. तशी छुपी युती आम्ही करत नाही. शिवसेना समोरून वार करते. पाठीवर वार करणारी आमची औलाद नाही हिंदुत्त्वाचं पेटंट भाजपने घेतलं आहे का, अशी विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
लोकमतने ही बातमी दिली आहे,

फोटो स्रोत, Facebook
भाजपने नकली भगव्याचा बुरखा पांघरला असून तो या निवडणुकीत फाटल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.
महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री बोलत होते.
'आम्ही काँग्रेसबरोबर गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलेलं नाही तुम्ही काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तींबरोबर सरकारमध्ये गेला तेव्हा हिंदुत्व कुठे गेले होते,' असा सवालही त्यांनी यावेळी केला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








