बीड: चोरट्यांनी बनवला केबीसीचा हुबेहूब सेट अन् लाखो रुपयांचं दिलं अमिष

केबीसी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

आज सकाळी टीव्हीचे चॅनल सर्फ करताना एका जाहिरात दिसली. ही जाहिरात तुम्ही, आम्ही सगळ्यांनी पाहिलीच असेल. एक फाटका तरूण आपल्या बायकोला सांगतोय की तुझ्यासाठी तीन मजली माडी बांधेन,

मुलांना शिकायला फॉरेनला पाठवेन, आपण फिरायला स्वीत्झरलँडला जाऊ. आणि वयाची सत्तरी उलटल्यानंतरही हा माणूस आपल्या बायकोला तीच वचनं देतं असतो, परिस्थिती बदलत नाही. मग अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ऐकू येतं, 'स्वप्न बघून खूश होऊ नका, पूर्ण करण्यासाठी फोन उचला.'

झटपट पैसा कोणाला नको असतो, आणि म्हणून काही प्रश्नांची उत्तर देऊन भरपूर पैसे देणारे रिअलिटी शो जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यातच एक भारतीय व्हर्जन म्हणजे 'कौन बनेगा करोडपती'.

अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय शोचा नवा सीझन येतोय. त्या जाहिरातीत तुम्ही नोंदणी कशी करायची हेही सांगितलं आहे. याचाच एक भाग म्हणून तुम्हाला केबीसीच्या नंबरवर एक एसएमएस पाठवायचा आहे.

आता विचार करा, समजा तुम्ही हा मेसेज पाठवला आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर रिप्लाय आला की तुमचा नंबर केबीसीच्या लॉटरीसाठी सिलेक्ट झालाय आणि तुम्हाला चक्क 'कौन बनेगा करोडपतीची' 25 लाखांची लॉटरी लागलीये तर?

मेसेज पाहून कोणीही हरखून जाईल. आणि समझा तुम्ही स्वतः हा मेसेज पाठवला नसेल, तरी तुमच्या व्हॉट्सअपवर मेसेज आला तर घरातल्या कोणी पाठवला असेल असा विचार करत कोणी हे खरंच आहे असंही समजेल.

या मानसिकतेचा फायदा घेत सायबर चोरट्यांनी देशातल्या हजारो लोकांना कोट्यवधी रूपयांचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे.

महाराष्ट्रात याचं कनेक्शन उघड झालं ते बीडमध्ये.

बीडच्या एका रहिवाशांना असाच मेसेज आला. त्यांना जाळ्यात ओढण्यात आलं आणि 25 लाख रूपयांची लॉटरी आणि महागड्या कारचं आमिष दाखवण्यात आलं.

बीडच्या या रहिवाशाने त्यांच्या जाळ्यात येत या भुरट्यांना 29 लाख रूपये दिले आणि नंतर लक्षात आलं की हा सगळा फ्रॉड होता.

पण यातला सगळ्यांत मोठा मुद्दा असा की या चोरांनी लोकांकडून जे पैसे मागवले ते अकाऊंटही भाड्याचे होते. म्हणजे वेगळ्याच लोकांच्या नावाने चालवले जात होते ज्या लोकांना या प्रकाराची कल्पनाही नव्हती.

कसा चालायचा फ्रॉड?

बीडच्या सायबर क्राईम युनिटचे पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांनी बीबीसी मराठीला याबद्दल अधिक माहिती दिली.

ते म्हणाले, "हे लोक बेरोजगार तरुणांना 10 हजार रूपये देऊन अकाऊंट उघडायला सांगायचे. हे अकाऊंट ओपन झालं की त्याचा ताबा आपल्या हातात घ्यायचे. गरीब लोकांसाठी किंवा बेरोजगार तरुणांसाठी 10 हजार ही पण फार मोठी रक्कम होती, त्यामुळे असे हजारो अकाऊंट उघडले गेले."

सायबर क्राइम

फोटो स्रोत, Getty Images

मग अकाऊंटवरून व्यवहार व्हायचे एकाच्या नावाने पण व्यवहार करणारे वेगळेच असायचे. सोप्या शब्दात सांगायचं तर हे अकाऊंट फ्रॉड करणाऱ्यांनी भाड्याने घेतलेलं असायचं आणि आपल्या अकाऊंटमधून काय व्यवहार होतात याचा खऱ्या मालकाला पत्ता नसायचा.

हा झाला एक भाग, दुसरा भाग लोकांना गंडा घालण्याचा. तो कसा चालायचा?

पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड याबद्द्लही सांगतात.

"कौन बनेगा करोडपतीच्या नावाने लोकांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अॅड केलं जायचं. या ग्रुपमध्ये एक जाहिरात दिली जायची की तुम्हाला 25 लाखाची लॉटरी लागली आहे."

या लोकांना नंतर वैयक्तिकही मेसेज केले जायचे. पण त्यात अट अशी असायची की तुम्हाला टॅक्स भरावा लागेल, काही फी भरावी लागेल आणि यासाठी एक अकाऊंट नंबर द्यायचे आणि त्या खात्यावर पैसे मागवायचे.

"ज्या खात्यावर पैसे यायचे, ते खातं वेगळ्याच माणसाचं असायचं. अशी अनेक खाती त्यांनी उघडली होती आणि या अकाऊंटवर लाखोंचे, कोट्यवधींचे व्यवहार व्हायचे," गायकवाड म्हणतात.

बऱ्याच मोठमोठ्या बँकांमध्ये ही खाती उघडली गेली होती. यात सेंट्रल बँक, आयसीआयसीआय, एचडीएफसी, एसबीआय, कॅनरा अशा बँकांची खाती होती.

रविंद्र गायकवाड पुढे माहिती देताना म्हणतात की भारतात रोज कोट्यवधींचा गंडा घातला जायचं. बीडच्याच माणसाला 29 लाखांचा गंडा घातला होता.

"आम्ही जेव्हा तपास करताना आरोपींचं संभाषण ऐकलं तेव्हा आम्हाला कळलं की त्यांचे रोजचं एक कोटीचं कलेक्शन असायचं."

या प्रकरणी चौघांना बीड पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे, पण पोलिसांचं म्हणणं आहे की यात अनेक लोक गुंतले असल्याची शक्यता आणि आणि याचा सुत्रधार अजून सापडलेला नाही.

कौन बनेगा करोडपतीच्या नावाने कशी व्हायची फसवणूक?

याबद्दल अधिक माहिती देताना पोलीस म्हणतात की या चोरट्यांनी हुबेहुब केबीसीच्या सेटसारखे दिसणारे व्हीडिओ तयार केले होते. त्या व्हीडिओत पूर्ण लुक केबीसीसारखा असायचा.

स्कॅम

"लोकांना सांगताना असं सांगितलं जायचं की तुमचा व्हॉट्सअप नंबर, तुमचा मोबाईल नंबर सिलेक्ट झाला आहे. मोठमोठे ब्रॅण्डस आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी केबीसीच्या माध्यमातून लॉटरी जाहीर करत आहेत. त्यांचा प्रचार करत आहेत. त्यामार्फतच आम्हाला तुमचा नंबर मिळाला आहे. मग या लोकांना ते कौन बनेगा करोडपतीचे खोटे व्हीडिओही पाठवले जायचे. काही व्हीडिओमध्ये तर कोट्यवधी रूपये दिसायचे आणि म्हटलं जायचं की, बघा आमच्याकडे किती पैसे आहेत आणि आम्ही हे तुम्हाला देणार आहोत," गायकवाड पुढे म्हणतात.

व्हीडिओ पाहून लोकांना या गोष्टी खऱ्या वाटायच्या.

मग या प्रकरणाचा छडा कसा लागला?

बीडच्या एका व्यक्तीने याबद्दल तक्रार दिल्यानंतर बीड पोलिसांनी विविध बँकांशी संपर्क साधला. यातले काही अकाऊंट बिहारचे होते हे लक्षात आल्यावर बीड पोलीस बिहारला गेले आणि तिथे 10 दिवस मुक्काम केला.

एचडीएफसी, आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक अशा बँकांनी आपल्याकडचं सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासाकरता दिलं.

वेळ, दिवस आणि एटीएममध्ये पैसे काढायला येणारे लोक यांची सांगड घालून पोलीस चार लोकांपर्यंत पोहचले आणि त्यांना बिहारच्या पाटणामधून अटक केली.

या प्रकरणी बीडच्या ज्या व्यक्तीने पहिल्यांदा तक्रार केली त्यांचं नाव पोलिसांच्या पुढच्या तपासामुळे उघड केलेलं नाही.

सायबर क्राइम

फोटो स्रोत, Getty Images

पण या व्यक्तीने आपल्या तक्रारीत असं म्हटलं होतं की, "हा फ्रॉड जवळपास दोन महिने सुरू होता आणि या दोन महिन्यात त्यांनी रोज कमीअधिक करत त्या अकाऊंटवर पैसे पाठवले होते. त्यांना असं सांगितलं की तुम्हाला लॉटरी लागली आहे हे तुम्ही कोणाला सांगितलं, किंवा ही माहिती उघड केली तर तुम्हाला धोका होईल, आणि तुमची लॉटरीही कॅन्सल होऊ शकते."

पण रोजच पैसे मागण्यात येत होते हे पाहून त्यांनी शेवटी ही गोष्ट आपल्या नातेवाईंकाना सांगितली आणि त्यांच्या लक्षात फसवणूक झालीये.

त्यांची सहनशक्ती संपल्यावर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

आपली फसवणूक होऊ नये म्हणून काय करावं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून असं लक्षात येतं की 'कौन बनेगा करोडपती'च्या नावाखाली गंडा घालणारं मोठं रॅकेट कार्यरत आहे. आता या शोचा नवा सीझन आला तर कदाचित तुम्हालाही असे मेसेज येऊ शकतात, तुमच्या घरातलंही कोणी याला बळी पडू शकतं.

आणि समजा हे रॅकेट नसेल तरी दुसऱ्या कुठल्या पैशांच्या किंवा महागड्या वस्तूचं आमिष दाखवणाऱ्या फ्रॉडला तुमचे आप्तस्वकीय बळी पडू शकतात.

मग अशा फ्रॉडपासून वाचण्यासाठी काय करावं? फ्रॉडपासून वाचण्यासाठी काय करावं? आम्ही बीडचे अप्पर पोलीस अधिक्षक सुनील लांजेवार यांच्याशी बोललो.

"बीडमधल्या ज्या कुटुंबाची फसवणूक झाली, ते दोघंही नवराबायको शिक्षक आहेत, म्हणजे सुशिक्षित परिवार आहे. तरीही ते फसवणुकीला बळी पडले कारण त्यांच्या किशोरवयीन मुलींनी सुरुवातीला उत्सुकता होती म्हणून या प्रकरणात व्हॉट्सअपला रिप्लाय केला."

सायबर स्कॅम

फोटो स्रोत, Getty Images

ते पुढे म्हणतात, "त्या मुली अकरावी-बारावीला शिकतात, घरच्यांना वाटलं की खरंच बक्षीस लागलं आहे, आणि मुली करत असतील तर काहीतरी चांगलंच असेल. बक्षीस लागलं हे कळल्यावर त्यांनाही लोभ जडला आणि ते अडकले."

सुनील लांजेवार काही मुद्दे सांगतात ज्यांचं पालन केलं तर सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होणार नाही.

1) मुलांच्या हातात मोबाईल देतात सतर्क रहा. अनेकदा मुलं उत्सुकतेपोटी या त्या लिंकवर क्लीक करतात आणि आई वडिलांच्या नकळत त्यांची फसवणूक होते.

2) झटपट श्रीमंत होण्याच्या लोभात अडकू नका. कोणतीही कंपनी काहीही फुकट देत नाही किंवा लॉटरी देत नाही.

3) जागरूक राहा, आसपास काय घडतंय याची माहिती घ्या. आमच्याकडे अनेक जागरूक लोकांचे फोन येतात जे चौकशी करतात की खरंच असं आहे का? तुम्हाला कोणी फसवणूक करतंय असा संशय असेल तर पोलिसांशी संपर्क करू शकता.

हेही वाचलंत का?