ब्लॅक अॅक्स : 'या' देशातल्या विद्यार्थ्यांचा एक गट तस्करी, सायबर गुन्हे, खून करणारी जागतिक टोळी कसा बनला?

ब्लॅक अॅक्स

नायजेरियातील विद्यार्थ्यांचा 'ब्लॅक अॅक्स' हा एक गट भयंकर टोळी म्हणून विस्तारत गेला. या संदर्भात बीबीसीने दोन वर्षं शोध घेतला, तेव्हा या गटाने राजकारणात केलेला शिरकाव, जागतिक व्याप्तीच्या घोटाळेबाजीची व हत्यांची योजना यासंबंधीचे नवीन पुरावे समोर आले.

सूचना- सदर लेखामध्ये हिंसाचाराचे तपशीलवार उल्लेख आहेत.

डॉ. जॉन स्टोन यांची त्या दिवशीची लेक्चरं घेऊन झाली की, एखाद्या निवांत क्षणी जुन्या काळच्या आठवणी त्यांच्या मनाचा ताबा घेतात. रक्त किंवा बंदुकांमधून सुटणाऱ्या गोळ्यांचे आवाज, या गोष्टी त्यांना भणाणून सोडत नाही. पण लोक मरत असताना दयेची भीक मागतायत, त्यांच्याकडे याचना करतायत, ईश्वराकडे याचना करतात, असे प्रसंगांच्या आठवणी मात्र त्यांचा पिच्छा सोडत नाहीत.

"ते खूपच वेदनादायी असतं. मृतांच्या कुटुंबातील लोक तुम्हाला शिव्यशाप देतात. तुमच्या आयुष्याचं वाटोळं व्हावं अशी प्रार्थना करतात," असं डॉ. स्टोन सांगतात आणि थरारून डोकं हलवतात.

नायजेरियाच्या दक्षिण भागातील बेनिन विद्यापीठात डॉ. स्टोन राज्यशास्त्र हा विषय शिकवतात. पण अनेक दशकं ते 'ब्लॅक अॅक्स' या गटाचे वरिष्ठ सदस्य होते. मानवी तस्करी, इंटरनेटवरील फसवणूक व खून अशा कृत्यांमध्ये गुंतलेली ही नायजेरियन टोळी आहे. स्थानिक पातळीवर 'ब्लॅक अॅक्स'ला 'पंथ' असं संबोधलं जातं.

या गटाचे गुप्त दीक्षादान समारंभ व्हायचे आणि सदस्यांची गटाशी घट्ट बांधिलकी असायची, त्यातून त्याची प्रतिमा पंथासारखी झाली होती. शिवाय, या गटाचे सदस्य आत्यंतिक हिंसाचारासाठीसुद्धा कुख्यात आहेत. त्यांच्याशी पंगा घेतलेल्या व्यक्तींची छिन्नविछिन्न झालेली प्रेतं किंवा मृतांच्या शरीरांवरील छळाच्या खुणा यासंबंधीची छायाचित्रं नायजेरियन समाजमाध्यमांवर नियमितपणे फिरत असतात.

'अॅक्समॅन' असतानाच्या काळात आपणही अत्याचारांमध्ये सहभागी झाल्याचं डॉ. स्टोन कबूल करतात. आम्ही त्यांची मुलाखत घेत होतो तेव्हा खून करण्याचा सर्वांत सक्षम मार्ग सांगत असताना, त्यांनी पुढे होऊन हाताच्या बोटांनी बंदुकीसारखी खूण केली आणि आमच्या निर्मात्याच्या कपाळावर ती बोटं दाबून दाखवली. बेनिन शहरामध्ये डॉ. स्टोन 'कसाई' म्हणून ओळखले जात असत.

त्या काळच्या भयंकर कृत्यांचे व्रण त्यांच्या मनावर उमटलेले आहेत. आपल्या भूतकाळाबद्दल डॉ. स्टोन यांना पश्चात्ताप वाटतो आणि एके काळी ते ज्या टोळीचा भाग होते तिच्यावर आता ते उघडपणे टीका करतात. 'ब्लॅक्स अॅक्स'संदर्भात मौन बाळगण्याची शपथ मोडून आपली गुपितं बीबीसीकडे उघड करण्याचा निर्णय घेतलेल्या या गटाशी संबंधित डझनभर स्त्रोतांपैकी स्टोन एक आहेत. हे सर्वच जण पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमाशी बोलत आहेत.

गेली दोन वर्षं 'बीबीसी आफ्रिका आय' 'ब्लॅक अॅक्स' या गटासंबंधी शोध घेतं आहे. या शोधामध्ये काही जागल्या व्यक्तींचं जाळं निर्माण झालं आणि या टोळीच्या खाजगी संदेशप्रक्रियेतून बाहेर फुटलेले शेकडो गोपनीय दस्तावेज तपासण्यात आले. गेल्या दशकभरामध्ये 'ब्लॅक अॅक्स' हा संघटित गुन्हेगारीत गुंतलेला जगातील सर्वांत दूरवर पोच असणारा व धोकादायक गट बनल्याचं या शोधातून स्पष्ट झालं.

आफ्रिका, युरोप, आशिया व उत्तर अमेरिका, या ठिकाणी ब्लॅक अॅक्सचे सदस्य वावरत आहेत. कदाचित त्यांच्यातल्या कोणाचा तरी एखादा ई-मेल तुम्हालाही येऊ शकतो.

Short presentational grey line

आमच्या शोधाची सुरुवात एका खुनाच्या धमकीने झाली. बीबीसीच्या एका पत्रकाराला 2018 साली बारीक हस्ताक्षरात लिहिलेलं एक पत्र आलं. त्या बातमीदाराच्या कारच्या काचेवर एका बाइकस्वाराने ते पत्र ठेवलं. नायजेरियामधील ऑपिऑइड या अंमली पदार्थाच्या बेकायदेशीर तस्करीचा तपास हा पत्रकार करत होता आणि त्या संदर्भात आधीच्या काही आठवड्यांमध्ये तो 'ब्लॅक अॅक्स'च्या काही सदस्यांना समोरासमोर भेटला होता. काही काळाने दुसरं पत्र त्या बातमीदाराच्या कुटुंबियांना देण्यात आलं. कोणीतरी त्याचा माग काढत त्याच्या घरापर्यंत पोचलं होतं.

ही धमकी 'ब्लॅक अॅक्स'ने दिली होती का? हे गुन्हेगारीचं जाळं किती ताकदीचं आहे आणि त्यामागे कोण आहे?

ब्लॅक अॅक्सची हजारो गोपनीय कागदपत्रं- शेकडो संशयित सदस्यांमधील खाजगी संदेशांचा प्रचंड साठा- आपण हॅकिंगद्वारे मिळवल्याचा दावा करणाऱ्या एका माणसापर्यंत आम्ही पोचलो. हे संदेश 2009 ते 2019 या कालावधीमधील असून त्यातील काही संदेश खून व अंमली पदार्थांची तस्करी यांबद्दलचे आहेत. त्यातील काही ई-मेलमधून तपशीलवार व प्रचंड पैशाशी निगडित इंटरनेटवरील फसवणुकीबद्दलही बोलणं झालेलं आहे. जागतिक विस्तार करण्याची योजनाही या संदेशांमधून पुढे आली. ब्लॅक अॅक्सच्या चार खंडांमध्ये पसरलेल्या कृत्यांची रचनाही यातून उघड झाली.

ब्लॅक अॅक्स आपला जीव घेण्यासाठी टपलेला आहे, असा दावा या हॅकिंगच्या स्त्रोताने केला. त्याने स्वतःचं खरं नाव उघड न करण्याचा निर्णय घेतला असून Uche Tobias असं टोपणनाव त्याने वापरलं आहे.

टोबिअसला ऑनलाइन मिळालेल्या धमक्यांमधली एक अशी आहे- "कधीतरी तुझी शिकार होईलच. कुऱ्हाड तुझ्या कवटीला छेदून जाईल... मी तुझं रक्त चाटेन आणि तुझे डोळे चघळून खाईन."

बीबीसीने काही महिने टोबिअसच्या कागदपत्रांचं विश्लेषण केलं. या माहितीच्या साठ्यातील काही महत्त्वाचे भाग पडताळणं आम्हाला शक्य झालं. या कागदपत्रांमध्ये उल्लेख आलेल्या व्यक्ती व त्यात नमूद केलेले अनेक गुन्हे प्रत्यक्षात घडल्याचं स्पष्ट होत होतं. हॅकिंगमधून बाहेर आलेली बहुतांश सामग्री प्रकाशित करता येणार नाही इतकी भयंकर आहे.

नुकत्याच केलेल्या खुनांची छायाचित्र अंतर्गत चॅट-ग्रुपमध्ये पसरवण्यासाठी ब्लॅक अॅक्सचे सदस्य पासवर्डने संरक्षित संकेतस्थळांचा गोपनीय मंच म्हणून वापर करतात. 'हिट' असा मथळा असणाऱ्या एका पोस्टमधल्या छायाचित्रात एक माणूस लहान खोलीत जमिनीवर आडवा पडलेला दिसतो. त्याच्या डोक्यावर चार वार झालेले आहेत. त्याचा पांढरा टी-शर्ट त्याच्या रक्ताने माखलेला आहे. बुटाचा लाल रंगाचा ठसा त्याच्या पाठीवर उमटलेला आहे.

ब्लॅक अॅक्स

नायजेरियामध्ये यीये, बुकानीअर्स, पायरेट्स व मॅफाइट्स अशी नाव असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांशी- प्रतिस्पर्धी 'पंथां'शी- ब्लॅक अॅक्सचा वर्चस्वाचा लढा सुरू आहे. पश्चिम आफ्रिकेमध्ये वापरल्या जाणाऱ्या एका व्यापारी बोलीतील या संदर्भातले संदेश बीबीसीने भाषांतरीत केले आहेत. त्या-त्या प्रदेशात प्रतिस्पर्धी गटांमधील किती जणांचे खूप आपण केले आहेत, याची फूटबॉलच्या स्कोअरसारखी यादी ब्लॅक अॅक्सचे सदस्य ठेवत असल्याचं या संदेशांवरून स्पष्ट झालं.

"सध्या स्कोअर 15-2 युद्ध बेनिनमध्ये सुरू आहे. अनाम्ब्रामधला हमला. स्कोअर- आये (ब्लॅक अॅक्सचे सदस्य) 4 आणि बुकानीअर्स 2," असं एका पोस्टमधे म्हटलं आहे.

पण खुनांपेक्षा इंटरनेटवरील फसवणुकीतून या टोळीला प्रामुख्याने उत्पन्न मिळतं. बीबीसीला मिळालेल्या कागदपत्रांमध्ये पावत्या, बँकेतील पैशांच्या हस्तांतरणाचे तपशील व जगभरातील ऑनलाइन घोटाळ्यांमध्ये ब्लॅक अॅक्सच्या सदस्यांचा सहभाग असल्याचं दाखवणाऱ्या हजारो ई-मेल आहेत. घोटाळा कसा करायचा याचा आराखडा 'फॉरमॅट' या मथळ्याखाली सदस्य एकमेकांना पाठवतात. प्रेमासंदर्भातील घोटाळे, वारसाहक्कासंदर्भातील घोटाळे, स्थावर मालमत्तेसंदर्भातील घोटाळे आणि व्यावसायिक ई-मेलसंदर्भातील घोटाळे, असे यातील पर्याय आहेत. यामध्ये पीडितांचे वकील किंवा लेखापालन करणारे इत्यादींच्या ई-मेल खात्यांसारखी ई-मेल खाती तयार केली जातात आणि आर्थिक हस्तांतरणात हस्तक्षेप करून पैसे लंपास केले जातात.

हे घोटाळे छोट्या स्तरावरील, लॅपटॉपवर बसलेल्या एखाद्या गुन्हेगाराने केलेले नसतात. एकमेकांशी संगनमत करू, संघटितपणे, प्रचंड पैसा गुंतवून आणि विविध खंडांमधील अनेक व्यक्तींचा त्यात सहभाग असतो.

यातलं एक प्रकरण कॅलिफोर्नियातील माणसाशी संबंधित होतं. 2010 साली ब्लॅक अॅक्सच्या संशयित सदस्यांनी या माणसाला लक्ष्य केलं आणि इटली व नायजेरिया इथे त्याची फसवणूक करण्यात आली. एकूण तीस लाख डॉलरांची फसवणूक झाल्याचं संबंधित पीडित व्यक्तीने बीबीसीला सांगितलं.

"मी ज्या बँकेशी व्यवहार करत होतो ती बहुधा अस्तित्वातच नाहीये की काय???" असं अस्वस्थ झालेल्या पीडिताने एका फसवणूककर्त्याला पाठवलेल्या ई-मेलमधे म्हटलं होतं. आपला पैसा गहाळ झाल्याचं त्या क्षणीच त्याला जाणवलं होतं. "आता याहून स्पष्ट काय सांगू??? बँक ऑफ स्विझर्लंड बनावट आहे असं दिसतंय." असंही त्याने लिहिलं.

ब्लॅक अॅक्सच्या संशयित सदस्यांनी बनावट नावं आणि ओळखी धारण केल्या- आणि बनावट किंवा चोरलेल्या पासपोर्टद्वारे लोकांना फसवलं, असं या ई-मेलवरून दिसतं. ते त्यांच्या पीडितांना "मुगू" किंवा "माये"- स्थानिक बोलीमध्ये 'मूर्ख' असं संबोधतात.

ब्लॅक अॅक्सचं आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीचं जाळं त्यांच्या सदस्यांसाठी अब्जावधी डॉलरचा महसूल गोळा करत असण्याची शक्यता आहे. कॅनडातील प्रशासनाने 2017 साली या टोळीशी संबंधित पाच अब्ज डॉलरांहून अधिक रकमेची आर्थिक अफरातफरीची योजना उघडकीस आणली. ब्लॅक अॅक्सने अशा किती योजना पसरवल्या आहेत, हे कोणालाही माहीत नाही. बाहेर फुटलेल्या कागदपत्रांनुसार, नायजेरिया, युनायटेड किंगडम, मलेशिया, आखातातील देश व इतर डझनभर देशांमध्ये असणारे सदस्य परस्परांशी संपर्क साधत असल्याचं स्पष्ट झालं.

"त्यांचं जाळं जगभर पसरलेलं आहे," असं या हॅकिंग प्रकल्पाच्या स्त्रोताने आम्हाला सांगितलं. वैयक्तिक पातळीवर हा स्त्रोत फसवणूकविरोधी तपासाचं काम करतो आणि ब्लॅक अॅक्सच्या घोटाळ्यांना बळी पडलेल्या अनेक पीडितांची भेट झाल्यावर त्याने या गटाच्या व्यवहारांचा मागोवा ठेवायला सुरुवात केली, असं त्याने सांगितलं.

"या गटाचे 30 हजारांहून अधिक सदस्य असावेत, असा माझा अंदाज आहे," असं तो सांगतो.

ब्लॅक अॅक्सचा जागतिक पातळीवरचा विस्तार काळजीपूर्वक घडवण्यात आला आहे. या गटाचे सदस्य विविध भूभागांची 'क्षेत्रां'मध्ये विभागणी करतात आणि त्या-त्या ठिकाणी स्थानी 'प्रमुख' नेमतात, असं त्यांच्यातील संदेशांवरून दिसतं. क्षेत्रीय प्रमुख आपापल्या कार्यक्षेत्रातून 'देय रक्कम'- सदस्य-शुल्कासारखाच हा प्रकार आहे- गोळा करतात, आणि नायजेरियातील बेनिन इथे नेत्यांकडे हा पैसा पाठवला जातो.

"युरोप, अमेरिका, दक्षिण अमेरिका व आशिया इथे हे जाळं पसरलेलं आहे. हा लहानसा गट उरलेला नाही, तर प्रचंड मोठी गुन्हेगारी संघटना झालेली आहे," असं टोबिअस म्हणतो.

टोबिअसच्या या निर्वाळ्याला आंतरराष्ट्रीय कायदा अंमलबजावणी संस्थांचे निष्कर्षही आधार पुरवतात. आफ्रिकेतील 120 तज्ज्ञांच्या विश्लेषणावर आधारीत 'ऑर्गनाइज्ड क्राइम इंडेक्स' (2021) अनुसार, आफ्रिका खंडातील संघटीत गुन्हेगारीची सर्वोच्च पातळी नायजेरियामध्ये आहे- आणि ही गुन्हेगारीची जाळी परदेशांमध्ये विस्तारत आहेत.

ब्लॅक अॅक्सच्या विस्ताराचा प्रतिकार करण्यासाठी इटलीत काही दशकांपूर्वीचे टोळीविरोधी कायदे पुनरुज्जीवित केले जात आहे. या टोळ्यांमुळे स्थानिक गुन्हेगारीची जाळी बळकट होत असल्याचं म्हटलं जातंय. एप्रिल 2021मध्ये इटलीत ब्लॅक अॅक्सच्या 30 संशयित सदस्यांना अटक झाली- मानवी तस्करी, शरीरविक्री व इंटरनेटवरील फसवणूक हे गुन्हे त्यांच्यावर लावण्यात आले.

अमेरिकेने या संदर्भात अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. ब्लॅक अॅक्सविरोधात एफबीआयने नोव्हेंबर 2019 व सप्टेंबर 2021 मध्ये कारवाई सुरू केली, त्यात अखेरीस लाखो डॉलरच्या इंटरनेट-फसवणुकीसंदर्भात ३५हून अधिक व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले. या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या दरम्यान अमेरिकेची गुप्तचर सेवा व इंटरपोल यांनी दक्षिण आफ्रिकेतून ब्लॅक अॅक्सच्या नऊ संशयित सदस्यांना अटक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कारवाईची आखणी केली होती.

Uche Tobias
फोटो कॅप्शन, ब्लॅक अॅक्स

"सायबर गुन्हेगारीचा उद्योग कित्येक खर्व-निखर्व डॉलरांचा उद्योग झाला आहे. ते आता हाताबाहेर गेलेलं आहे", असं एफबीआयचे एक माजी स्पेशल एजन्ट व सायबर-सुरक्षा तज्ज्ञ स्कॉट ऑगेनबॉम म्हणतात.

एफबीआयच्या सायबर गुन्हेगारीविभागामध्ये गेलेल्या 30 वर्षांच्या कारकीर्दीत आपण ब्लॅक अॅक्सच्या फसवणुकीला बळी पडलेल्या शेकडो लोकांना भेटल्याचं ते सांगतात. नुकत्याच फुटलेल्या कागदपत्रांसारखी फसवणुकीची ही प्रकरणं त्यांनी हाताळली आहेत.

"अनेकांची आयुष्यं उद्ध्वस्त होतात, कंपन्या बंद पडतात, आयुष्यभराची कमाई बुडते. सर्वांवरच त्याचा परिणाम होतो," असं ते सांगतात.

Short presentational grey line

ब्लॅक अॅक्सचं गुन्हेगारी साम्राज्य कितीही जागतिक झालं असलं, तरी त्याची मुळं नायजेरियात घट्ट रुजलेली आहेत. एडो राज्यात बेनिन या शहरामध्ये 40 वर्षांपूर्वी या गटाची स्थापना झाली.

ब्लॅक अॅक्सचे बहुतांश सदस्य या प्रांतातील आहेत आणि त्यांच्या संलग्नतेमुळे या गटाच्या आंतरराष्ट्रीय विस्ताराला हातभार लागला असेल. संयुक्त राष्ट्रांच्या निराश्रितविषयक आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, परदेशांमध्ये स्थलांतरित होणारे 70 टक्के नायजेरिन लोक एडो राज्यातील आहेत. बेकायदेशीररित्या प्रवास करणाऱ्यांच्या तस्करीमध्ये ब्लॅक अॅक्सची भूमिका कळीची असल्याचं दिसतं. या बेकायदेशीर स्थलांतरितांना बेनिन, उत्तर आफ्रिका व दक्षिण इटली अशा तळांमध्ये फिरवलं जातं.

ब्लॅक अॅक्सच्या मायभूमीत 16 ते 23 वर्षं वयोगटातील पुरुष विद्यापीठीय पदवीधरांना या गटात मुख्यत्वे भरती करवून घेतलं जातं. त्यांची दीक्षादानाची गोपनीय प्रक्रिया असते, तिला 'बॅमिंग' असं संबोधलं जातं आणि ती अत्यंत निष्ठूरपणासाठी कुख्यात आहे.

"त्या दिवशी मला बॅमिंगला सामोरं जावं लागणार आहे, हे मला माहीत नव्हतं," असं एका सदस्याने 2016 साली एका गोपनीय मंचावर त्याचे अनुभव सांगताना लिहिलं होतं. त्याला कॅम्पसमधून बाहेर नेण्यात आलं. आपल्याला एका खास पार्टीला नेण्यात येतं आहे, असा त्याचा समज झाला होता. त्याला एका जंगलात नेण्यात आलं, तिथे काही पुरुषांचा गट त्याची वाट बघत होता. त्यांनी त्याचे कपडे काढले, त्याला चिखलात पालथं झोपायला सांगितलं. मग त्यांनी बांबूने त्याला फटके मारायला सुरुवात केली आणि तो जवळपास बेशुद्ध पडेपर्यंत मारणं सुरू ठेवलं. आता 'आपण त्याच्या मैत्रिणीवर बलात्कार करायचा, मग हे झाल्यावर तो तिच्यावर पुन्हा बलात्कार करेल', असं कोणीतरी ओरडलं.

"मी मरेन त्याच दिवशी असं घडणं शक्य आहे," असं तो लिहितो.

पण की वेळाने या वेदना थांबल्या. पुढे काही विधी पार पडले. छळ करत असलेल्यांच्या पायांमधून रांगत जाणं, ही 'सैतानाची वाट' म्हणून ओळखला जाणारा पारंपरिक प्रकार करण्यात आला. त्याच्या बोटाला कापून त्यातलं रक्त त्याला प्यायला लावण्यात आलं, पश्चिम आफ्रिकेत सापडणारं कोला हे कठीण कवचाच फळ त्याला चघळायला देण्यात आलं. त्यानंतर गाणी नि घोषणा घुत असताना त्याने त्याचा छळ केलेल्या माणसांना आलिंगन दिलं. आता 'आये अॅक्समॅन' म्हणून त्याचा पुनर्जन्म झाला होता.

ब्लॅक अॅक्स

लोक ब्लॅक अॅक्समध्ये का दाखल होतात, याची अनेक कारणं आहेत. काही लोकांना भरतीची सक्ती केली जाते, तर इतर काही जण स्वेच्छेने या गटाचे सदस्य होतात. लागोस लगूनमध्ये लाकडी खांबांवर उभारण्यात आलेल्या मकोको या विशाल झोपडपट्टीमध्ये आम्ही ब्लॅक अॅक्सच्या काही सदस्यांना भेटलो. आपण इच्छेविरोधात या गटात दाखल झाल्याचं त्यातील काहींनी सांगितलं. पण त्यांची निष्ठा दृढ होती. तसंच दीक्षादानावेळच्या अध्यात्मिक बंधाने ही निष्ठा आणखी बळकट झाली.

"आम्ही कोरोफो या अदृश्य ईश्वराची प्रार्थना करतो आणि त्याने आम्हाला कायमच मार्गदर्शन केलं आहे," असं या गटाच्या नेत्याने आम्हाला सांगितलं. एका लहान लाकडी इमारतीमध्ये इतर सदस्यांच्या मधोमध आम्ही बसलो होतो. एका पोलीस अधिकाऱ्याने सक्तीने आपली भरती करून घेतली असली तरी ब्लॅक अॅक्सचा सदस्य असल्याचा आपल्याला 'अभिमान' आहे असं तो म्हणाला. शत्रू टोळीने वडिलांची हत्या केल्यानंतर आपण या गटात दाखल झालो, असा दावा दुसऱ्या एका सदस्याने केला. हे सदस्य कोणत्याही कारणाने दाखल होत असले, तरी याचे काही लाभ असल्याचं मात्र अनेक जण सांगतात.

"गोपनीयता, शिस्त व बंधुभाव" या कारणांमुळे आपण ब्लॅक अॅक्समध्ये दाखल झालो, असं दुसऱ्या एका सदस्याने एप्रिल 2021 मध्ये लागोस इथे झालेल्या संवादात आम्हाला सांगितलं होतं. या गटाच्या गुन्हेगारी कारवायांमधून आपल्याला चांगला पैसा मिळाला, एखाद्या बँकेत काम करून मिळेल त्याहून जास्त पैसा या गुन्ह्यांमधून मिळाला, असाही दावा त्याने केला.

"एकदा का तुम्ही या पंथाचा भाग झालात की कोणीच तुम्हाला स्पर्श करू शकत नाही, हा गट आपलं संरक्षण करतो," असं बेनिनस्थित सामाजिक कार्यकर्ते कर्टिस ऑग्बेबोर सांगतात. तरुणांना ब्लॅक अॅक्ससारख्या गटांमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्याचं काम ते करतात. "दीक्षादानाची प्रक्रिया जाळं विस्तारण्याशी संबंधित असते."

अनेक सदस्य निव्वळ संपर्काचं जाळं वाढवण्यासाठी यात सहभागी होतात, असं डॉ. स्टोन म्हणतात. नायजेरियामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बेरोजगारी आहे. या आव्हानात्मक वातावरणात ब्लॅक अॅक्समध्ये दाखल झाल्याने संरक्षणही मिळतं आणि व्यावसायिक संपर्कही जोडले जातात. सर्व सदस्य गुन्हेगार नसतात, असाही दावा त्यांनी केला.

"नायजेरियन लष्कर, नौदल व हवाई दल यांमध्येही या गटाचे सदस्य आहे. अकादमिक जगातही सदस्य आहेत. काही धर्मगुरूसुद्धा ब्लॅक अॅक्सचे सदस्य आहेत," असं ते म्हणतात.

परस्परांना पाठिंबा देणं हा ब्लॅक अॅक्सच्या मूळ उद्देशाचा आधार आहे. 'निओ ब्लॅक मूव्हमेन्ट ऑफ आफ्रिका' (एनबीएम) विद्यार्थी संघटनेमधून हा गट उदयाला आला. बेनिन विद्यापीठात 1970 च्या दशकात एनबीएम संघटनेची स्थापना झाली होती. साखळदंड तोडणारी काळी कुऱ्हाड, हे एनबीएमचं चिन्ह होतं, आणि दमनशाहीविरोधात लढणं हे आपलं ध्येय असल्याचं संघटनेचे संस्थापक म्हणत असत. दक्षिण आफ्रिकेतील वंशद्वेषविरोधी संघर्षातून एनबीएमने स्फूर्ती घेतली होती, पण रचना, गोपनीयता व बंधुभाव यांबाबतीत ही संघटना वासाहतिक काळातील नायजेरियामधल्या 'फ्रीमेसन्स'सारख्या संस्थांप्रमाणे होती.

Makoko

आजही एनबीएम अस्तित्वात आहे, आणि नायजेरिन कॉर्पोरेट कारभार आयोगाकडे कंपनी म्हणून तिची कादेशीररित्या नोंदणीही झाली आहे. या कंपनीचे जगभरात तीस लाख सदस्य असल्याचा दावा केला जातो आणि नायजेरिया व परदेशांमध्येही अनाथालयं, शाळा व पोलिस इत्यादींना संघटनेने देणग्या दिल्याची प्रसिद्धी नियमितपणे केली जाते. ही संघटना प्रचंड मोठ्या वार्षिक परिषदा भरवते. त्यातील काही परिषदांमध्ये प्रमुख राजकीय नेते व इतर प्रसिद्ध व्यक्तिमत्वंही उपस्थित असतात.

ब्लॅक अॅक्स हा गुंडगिरी करणारा, फुटून निघालेला गट आहे, असा दावा एनबीएमचे नेते करतात. सार्वजनिक पातळीवर एनबीएम स्वतःला ब्लॅक अॅक्सपासून तीव्रपणे वेगळं मानते आणि सर्व प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांना आपला विरोध असल्याचं आग्रही प्रतिपादन करते.

"एनबीएम म्हणजे ब्लॅक अॅक्स नव्हे. एनबीएमचा गुनहेगारीशी काहीही संबंध नाही. एनबीएम ही जगातील थोरवीला चालना देणारी संघटना आहे," असं या संघटनेचे सध्याचे नेते ओलोरोगन एसी काकोर यांनी जुलै 2021 मध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

ब्लॅक अॅक्सशी संबंधित कोणी एनबीएमचा सदस्य असल्याचं आढळलं, तर त्या व्यक्तीला 'तत्काळ निलंबित केलं जातं,' असं एनबीएमच्या वकिलांनी आम्हाला सांगितलं. आपली संघटना गुन्हेगारी अजिबात सहन करत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आंतरराष्ट्रीय कायदा अंमलबजावणी यंत्रणेचं मत मात्र वेगळं आहे. 2018 सालापासून ब्लॅक्स अॅक्सच्या सदस्यांविरोधात खटले चालवणाऱ्या अमेरिकेतील न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनांनुसार, एनबीएम ही 'गुन्हेगारी संघटना' असून 'ब्लॅक अॅक्स'चा भाग आहे. एनबीएम व ब्लॅक्स 'एकच' आहेत, असं विधान कॅनडातील प्रशासनानेही केलं आहे.

बीबीसीला उपलब्ध झालेल्या कागदपत्रांमध्येही ब्लॅक अॅक्सचे काही सदस्य आणि एनबीएम कंपनी यांच्यात संबंध असल्याचं निदर्शनास आलं.

यातील अनेक कागदपत्रं ऑगस्टस बेमिघो-इयेओयिबो यांच्या ई-मेल खात्यातून आलेली आहेत. बेमिघो २०१२ ते २०१६ या कालावधीमध्ये एनबीएमचे अध्यक्ष होते. नायजेरियातील यशस्वी गुंतवणूकदार व हॉटेलमालक असणारे बेमिघो मोठ्या प्रमाणात इंटरनेट-फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचं या कागदपत्रांवरून सूचित होतं. बीबीसीने यातील दोन मोठ्या प्रकरणांची पडताळणी केली आणि युनायटेड किंगडम व अमेरिका इथल्या नागरिकांना लक्षय करणाऱ्या वारसाहक्कविषयक घोटाळ्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचं समोर आलं. या प्रकरणांमध्ये आपली ३३ लाख डॉलरांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचं पीडितांनी आम्हाला सांगितलं.

"आम्ही त्याच्याकडून दहा लाख डॉलरपर्यंत रक्कम काढली आहे," असं एका संदेशात म्हटलं आहे. बेमिघो यांना एका संशयित सहगुन्हेगाराने पाठवलेला हा संदेश एका पीडिताकडे निर्देश करणारा होता. या ई-मेलमध्येपीडिताचं पूर्ण नाव, ई-मेल पत्ता व क्रमांक आहे आणि फसवणुकीची प्रक्रिया पुढे कशी न्यायची यासंबंधीच्या सूचनाही आहेत.

किमान ५० प्रसंगांमध्ये बेमिघो यांनी घोटाळ्याचा आराखडा संबंधित जाळ्यातील सदस्यांना पाठवल्याचं या कागदपत्रांवरून सूचित होतं. एनबीएमच्या विस्ताराची चर्चा करणाऱ्या एका संदेशामध्ये त्यांनी जभरातून 'लाखो डॉलर उकळण्याकरता' एनजीओ स्थापन करण्याची विनंती सदस्यांना केली होती.

Augustus Bemigho

एनबीएमच्या सदस्यांना पाठवलेल्या ई-मेलींमध्ये बेनिघो सदस्यांचा उल्लेख 'अये अॅक्समेन' असा करतात. फेसबुक मेसेंजरद्वारे बेमिघो यांना पाठवण्यात आलेल्या एका संदेशात त्यांना 'ब्लॅक अॅक्समधील राष्ट्रीय ज्येष्ठ व्यक्ती' असं संबोधण्यात आलं आहे.

बेमिघो यांच्या मेहुणीवर 2019 साली युनायटेड किंगडममधील दहा लाख पौंडांच्या आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वेळी 'क्राउन प्रोसिक्यूशन सर्व्हिस'ने प्रसिद्ध केलेल् निवेदनात बेमिघो चा उल्लेख 'ब्लॅक अॅक्सचे नेते' असा करण्यात आला होता.

बीबीसीने हा पुरावा एनबीएमच्या नेतृत्वासमोर ठेवला, तेव्हा या संदर्भात चौकशी करू असं त्यांनी सांगितलं. कोणीही आचारसंहितेचा भंग केला, तर त्यांना निलंबित करण्यात येईल, असंही एनबीएमच्या वतीने सांगण्यात आलं. बीबीसीने संपर्क साधल्यावर बेमिघो यांनी या आरोपांवर उत्तर देण्यास नकार दिला.

ब्लॅक अॅक्स व एनबीएम या आतून एकच आहेत, असा दावा डॉ. स्टोन करतात. ते अनुभवाच्या आधारे बोलत होते. ते केवळ ब्लॅक अॅक्सचे सदस्य नव्हते, तर बेनिनमध्ये एनबीएमचे एक अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.

"दोन्ही एकच आहेत. अनौपचारिक व्यवहारांवर पांघरूण घालण्यासाठी फक्त औपचारिकतेचा मुखवटा चढवण्यात आलेला आहे. या दोन संघटना म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत," असं ते म्हणतात.

टोबिअसच्या मते, ब्लॅक अॅक्सच्या जगभरातील छुप्या विस्ताराला एनबीएममुळे सुकरता आली. "निओ ब्लॅक मूव्हमेन्ट हा केवळ मुखवटा आहे, मुख्य संगटनेचा तो सार्वजनिक चेहरा आहे," असं ते म्हणतात. "आपलं खरं टोळीचं रूप लपवून लोकमत बदलणं, हा एनबीएमचा उद्देश आहे," असा दावा ते करतात.

एनबीएम या नावाखाली जगभरात नोंदणी झालेल्या अनेक संघटना कार्यरत आहेत. त्यातील काही युनायटेड किंगडम व कॅनडा इथेही आहेत. त्यांची किमान 50 खाती फेसबुक, इन्स्टाग्राम व यूट्यूबवर आहेत. याच नावाची वेगवेगळी रूपं ते वापरतात. शिवाय कंपनीचे अधिकृत चॅनलही समाजमाध्यमांवर आहेत. काही खात्यांचे एक लाखांहून अधिक फॉलोअर आहेत. इतर काही खात्यांमध्ये ब्लॅक अॅक्सचे अप्रत्यक्ष उल्लेख असतात, कुऱ्हाडीच्या इमोजी वापरल्या जातात, कुऱ्हाड किंवा बंदुका घेतलेल्या लोकांची छायाचित्रं प्रसिद्ध केली जातात आणि काही वेळा 'अये अॅक्समेन' हे घोषवाक्यही लिहिलं जातं.

एनबीएमने अनेक देशांमध्ये जागतिक ब्रँड म्हणून स्वतःला यशस्वीरित्या प्रस्थापित केलं आहे. नायजेरियामध्ये या जाळ्याचा प्रभाव राजकीय अवकाशापर्यंत पसरतो, असा दावा डॉ. स्टोन करतात.

"प्रतिनिधीगृहामध्ये, अगदी कार्यकारीमंडळातही अनेक सदस्य आहेत. हेच ब्लॅक अॅक्सचं रूप आहे. तुमच्या आवाक्यात असेल त्या कोणत्याही पदावर जा, हेच एनबीएममध्ये सांगितलं जातं-" असं ते म्हणतात.

Short presentational grey line

एनबीएमचे माजी अध्यक्ष ऑगस्टस बेमिघो यांना युनायटेड किंगडममधल्या न्यायालयीन कागदपत्रांमध्ये ब्लॅक अॅक्सचे माजी अध्यक्ष असं संबोधलं जातं. 2019 साली ते नायजेरियातील प्रतिनिधीगृहाच्या सदस्यत्वासाठी निवडणुकीत उतरले होते. सत्ताधारी ऑल प्रोग्रेसिव्ह काँग्रेस पार्टी (एपीसी) या पक्षासाठी त्यांनी प्रचार केला होता.

एडो राज्यातील राजकारणात ब्लॅक अॅक्सचे सदस्य मोठ्या संख्येने आहेत, असा दावा कर्टिस ओग्बेबोर हे सामाजिक कार्यकर्ते करतात. "नायजेरियात टोळीचं राजकारण आहे. आमचे राजकारणी, सरकार सर्व स्तरांवर तरुणांना पंथभक्तीच्या नादाला लावतात," असं ते म्हणतात.

नायजेरियातील भावी राजकीय नेते प्रतिस्पर्ध्यांना धमकावण्यासाठी, मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी आणि लोकांवर मतदानाची सक्ती करण्यासाठी ब्लॅक अॅक्सच्या सदस्यांना भाडोत्री गुंड म्हणून वापरतात. पद मिळाल्यावर हे नेते त्यांच्या सरकारी पदांचा लाभ या सदस्यांना करवून देतात, असा दावा ऑग्बेबोर करतात.

"ते त्यांना शस्त्रं पुरवतात, निवडणुकांवेळी पैसा देतात, आणि राजकीय नियुक्त्यांची आश्वासनंही देतात," असं ऑग्बेबोर म्हणतात.

एनबीएमच्या अंतर्गत संदेशयंत्रणेतून फुटलेल्या दोन कागदपत्रांनुसार, 2012 साली गव्हर्नरपदाच्या निवडणुकीला पाठबळ मिळवण्यासाठी व 'मतांचं संरक्षण' करण्यासाठी या संघटनेला तीन कोटी 50 लाख नायरा (६४ हजार पौंडांहून अधिक रक्कम) देण्यात आले होते. या पाठिंब्याच्या बदल्यात "राज्य सरकारने एनबीएमच्या बेनिन क्षेत्रीय विभागाला रोजगारासाठी तत्काळ 80 जागा उपलब्ध करून दिल्या." हा पैसा कथितरित्या "तत्कालीन मुख्याधिकारी सन्माननीय सॅम इरेदिया यांच्या माध्यमातून" थेट वाटण्यात आला, असंही या दस्तावेजात म्हटलं आहे. आता इरेदिया हयात नाहीत.

ब्लॅक अॅक्स

एनबीएमच्या वरिष्ठ सदस्यांशी लागोसमध्ये संवाद साधत असताना त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधीने कबूल केलं की "अनेक राजकारणी" संघटनेचे सदस्य आहेत. एडो राज्याचे उप-गव्हर्नर फिलीप सायबू यांचं उदाहरण त्यांनी दिलं.

"अनेक लोक आमच्या संघटनेचे सदस्य आहेत आणि त्यामध्ये लपवण्यासारखं काहीच नाही," सं एनबीएमचे एक वकील अलिऊ होप म्हणतात.

एडो राज्य सरकारच्या एका माजी सदस्याने बीबीसीच्या रूपात पहिल्यांदाच एखाद्या आंतरराष्ट्रीय माध्यमाला मुलाखत दिली. एडो राज्य प्रशासनाने संघटीत गुन्हेगारीशी कसं संगनमत साधलं आहे, याबद्दल त्यांनी जाहीर वाज्यता केली आहे.

टोनी कबाका यांनी स्वतःच्या 'पंथनिष्ठ' असण्याची कबुली दिली होती आणि ते एनबीएमचे सदस्यही राहिले हेत. बेनिनमध्ये सरकारसाठी काम करण्यात त्यांनी अनेक वर्षं घालवली. अखेर २०१९मध्ये ते त्यातून बाहेर पडले. या कालावधीमध्ये अकुग्बे व्हेन्चर्स या आपल्या कंपनीद्वारे त्यांनी सात हजारांहून अधिक कर संकलकांना कामावर ठेवलं होतं आणि त्यातून राज्याला अब्जावधींचा महसूल मिळाला.

राजकारण सोडल्यापासून कबाका यांच्या खुनाचा प्रयत्न वारंवार होत आला आहे. रोमन बांधणीच्या त्यांच्या प्रचंड मोठ्या पांढऱ्या प्रासादावर ठिकठिकाणी बंदुकीच्या गोळ्यांनी भोकं पाडलेली आहेत.

"सरकारमधील ब्लॅक अॅक्सच्या खुणा ओळखता येतील का, असा प्रश्न तुम्ही मला विचारलात, तर मी ओळखू शकतो. बहुतांश राजकारणी, जवळपास प्रत्येकच जण यात सहभागी आहे," असं ते म्हणतात.

निवडणुका जिंकण्यासाठी अशा पंथांना एकत्र आणण्याची सूचना आपल्याला करण्यात आल्याचा दावा कबाका करतात. आपण स्वतः हिंसाचारात कधीही सहभागी झालेलो नाही, असंही ते म्हणतात.

"सरकारला निवडणुका जिंकण्यासाठी त्यांची गरज असते. सरकारच्या सहभागामुळे हे पंथ अस्तित्वात आहेत, हेच सत्य आहे," असं ते म्हणतात.

आम्ही जुलै २०२१मध्ये बेनिन शहरात गेलो आणि उप-गव्हर्नर फिलीप शायबू यांची मुलाखतीसाठी वेळ घेतली. पण दोनदा ते मुलाखतीकरता आले नाहीत. ब्लॅक अॅक्सशी संबंध असल्याचे आरोप आम्ही एडो सरकारकडे व शायबू यांच्याकडे पाठवले, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Short presentational grey line

नायजेरियातील कायदा अंमलबजावणी यंत्रणा व राजकारणी ब्लॅक अॅक्समध्ये इतके गुंतलेले आहेत की ते या संघटनेशी परिणामकारक लढा देऊच शकणार नाहीत. या हिंसाचारावरचा तोडगा त्या पंथातच आहे, असं ते म्हणतात. हा गट खूपच धोकादायक झाला आहे, असं वाटणारे ते एकटेच माजी-सदस्य नाहीत.

"दमनशाहीशी लढण्याकरता आमच्यातील काही जण एनबीएममध्ये दाखल झाले," असं एका सदस्याने एका गोपनीय मंचावर लिहिलं होतं, यासंबंधीचं रेकॉर्ड बीबीसीच्या हाती लागलं आहे. "आम्हाला विविध पुराव्यांच्या आधारे गुन्हेगारी संघटना ठरवलं गेलं आहे."

Tony Kabaka

ब्लॅक अॅक्सच्या अंतर्गत संदेशांमध्ये सदस्यांच्या अशाच अनेक तक्रारी विखुरलेल्या आहेत.

"मी जीव घेण्यासाठी ब्लॅक अॅक्सचा सदस्य झालेलो नाही. मी बंधुभाव वाढवण्यासाठी या संघटनेत आलो," असं दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. "कृपया या हत्या थांबवा."

आपली संघटना पायाभूत तत्त्वांशी कटिबद्ध राहील आणि शांततेला चालना देईल, अशी खातरजमा आपण करतो असं एनबीएमचे नेते सांगतात. या संघटनेचे सध्याचे अध्यक्ष ओलोरोगुम एसे काकोर बीबीसीला म्हणाले की, गुन्हेगारी 'घुसखोरां'चं उच्चाटन करण्यासाठी ते निवडून आले. हे लोक 'संघटनेची इतकी हानी करत आहेत', असंही ते म्हणाले. हा बदल अधिक वेगवान करण्यासाठी डॉ. स्टोन यांनी 'रेन्बो आघाडी' सुरू केली. या समर्थक गटामध्ये माजी पंथवादी, प्रभावी नायजेरियन नागरिक व प्राध्यापक आदींचा समावेश आहे. प्रतिस्पर्धी टोळ्यांमध्ये संघर्ष होतो तेव्हा तणाव निवळवण्याचा प्रयत्न सदस्य करतात. ब्लॅक अॅक्सला अधिक शांततापूर्ण भविष्याच्या दिशेने नेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

"गुन्हेगारी कमी करणं, हे रेन्बोने समाजाला दिलेलं योगदान आहे. तरुणांमधील मृत्युदर कमी करणं, विधवा व अनाथ यांचं प्रमाण कमी करणं, हे त्यांनी केलं," असं डॉ. स्टोन म्हणतात.

रेन्बोचे सहसंस्थापक चुकवुका ओमेसाह यांच्या मते, ब्लॅक्स अॅक्सच्या सदस्यांनी ते कसा समाज निर्माण करता आहेत यावर चिंतन करायला हवं.

"प्रत्येकाचा सद्सद्विवेक असतो. तुम्ही हे कॅमेऱ्यासमोर नाकारू शकता, सार्वजनिक ठिकाणी नाकारू शकता, पण शांत असताना हे नाकारता येत नाही- ही गोष्ट तुम्हाला पछाडून टाकते," असं ते म्हणतात.

ब्लॅक अॅक्सला सुधारणांच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न धोकादायक असल्याचं डॉ. स्टोन यांना माहीत आहे. आपले माजी सहकारीच कदाचित आपल्याला ताब्यात घेण्यासाठी येतील, हेही त्यांना माहीत आहे. तसं त्यांनी केल्यास प्रत्युत्तरासाठी स्टोन तयार होते. प्राध्यापक स्टोन त्यांच्या कारमध्ये तीन फुटी तलवार लपवलेली आहे आणि घरी परवान्याची शॉट गन ठेवलेली आहे.

"वैयक्तिक संरक्षण, वैयक्तिक सुरक्षितता, यांचा विचार केला तर, ते माझ्यावर हल्ला करणार असतील, तर मीही त्यांना प्रत्युत्तर देऊ शकत नाही का?" असं ते स्मित करत विचारतात.

तपास- चार्ली नॉर्थकॉट, सॅम ज्यूडा व पीटर मॅकजॉब

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)