हाजी मस्तान- हातात कधीही पिस्तूल न धरता मुंबईच्या अंडरवर्ल्डवर राज्य करणारा गँगस्टर

फोटो स्रोत, SUNDER SHEKHAR
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जून 1980 मधील एक दिवस. मुंबईतील सर्वांत उच्चभ्रू भागांपैकी एक असलेल्या पेडर रोडवरच्या एका बंगल्याचं लोखंडी गेट उघडतं आणि त्यातून काळी मर्सिडीज कार बाहेर पडते. त्या वेळी जोरदार पाऊस पडत असतो. कार गेटमधून बाहेर पडत असताना त्या बंगल्याच्या बाल्कनीत उभा असलेला माणूस कारकडे बघत असतो.
तो थोडा अस्वस्थ आहे. तो स्वतःच्या पांढऱ्याशुभ्र कुर्त्याच्या खिशातून '555'च्या पाकिटातून एक सिगरेट काढून शिलगावतो. दोन तास जातात आणि सात सिगरेटी ओढून संपतात, तेव्हा मर्सिडीज कार परत घराच्या गेटातून आत येत असल्याचं त्याला दिसतं.
पाऊस कोसळत असतानाही ड्रायव्हर कारच्या मागच्या बाजूचा दरवाजा उघडतो. कारमधून 70 वर्षांची एक वयस्कर महिला उतरते.
या महिलेचं नाव होतं जेनाबाई दारूवाली आणि त्या बंगल्याच्या मालकाचं नाव होतं हाजी मस्तान. जेनाबाई अंडरवर्ल्डमधील एक प्रमुख महिला होती, आणि पोलिसांची खबरी म्हणूनही ती काम करत असे.
जेनाबाईने कागदावर रेषा काढली
मुंबईतील गुन्हेगारी विश्वासंबंधीच्या बहुचर्चित 'डोंगरी टू दुबई' या पुस्तकाचे लेखक एस. हुसैन झैदी म्हणतात, "मस्तान जेनाबाईंना स्वतःची बहीण मानत असत आणि अनेक अडचणीच्या प्रसंगी त्यांचा सल्ला घेत. त्या दिवशीसुद्धा त्यांनी स्वतःची कार पाठवून जेनाबाईंना आपल्या घरी बोलावून घेतलं होतं."
"खाणं खाऊन झाल्यावर हाजी मस्तान यांनी त्यांना सांगितलं की, मध्य मुंबईतील बेलासीस रोडवर त्यांची एक प्रॉपर्टी आहे, त्यावर गुजरातमधील बनासकाँठा जिल्ह्यातील चिलिया लोकांना कब्जा केलेला आहे. करीम लालाने मस्तान यांच्या सांगण्यावरून चिलिया लोकांना हुसकावण्यासाठी गुंड पाठवले, पण त्या लोकांनी या गुंडाचे हात-पाय तोडून परत पाठवलं."

फोटो स्रोत, SUNDER SHEKHAR
हुसैन झैदी पुढे सांगतात, "जेनाबाईने एक पेन आणि कागद मागवलं. कागदावर तिने एक रेषा काढली आणि मस्तानला म्हणाली, 'या रेषेला स्पर्श न करता ती लहान करून दाखवशील का?' यावर मस्तान म्हणाला, 'आपा, मी तुम्हाला एका गंभीर प्रश्नावर सल्ला द्यायला बोलावलं आणि तुम्ही मला कोडी घालताय.'
"जेनाबाई हसली आणि म्हणाली, 'तुझ्या अडचणीवरचं उत्तर याच कोड्यात लपलेलं आहे.' मस्तानने कपाळावर हात मारला आणि विचारलं, 'कसं काय?' जेनाबाईने पुन्हा पेन उचललं आणि त्या रेषेशेजारी एक मोठी रेषा आखली आणि म्हणाली, 'असं. या रेषेला स्पर्श न करता लहान करता येतं.'
"मग तिने मस्तानला समजावणीच्या सुरात सांगितलं की, 'चिलिया' लोकांपेक्षा खूप जास्त ताकद कमाव, मग तू आपोआप त्यांच्यापेक्षा जास्त बलवान होशील. पण हे कसं काय शक्य आहे, असं मस्तानने विचारलं. यावर जेनाबाई म्हणाली, 'तू पठाण आणि दाऊद इब्राहिम यांच्या टोळ्यांमध्ये समेट घडव आणि मग हे दोघे मिळून तुझं काम करतील.'"
पठाण आणि दाऊद यांच्यात समेट
असंच घडलं. मस्तानने त्याच्या घरी 'बैतुल-सुरूर' इथे मुंबईतील परस्परांशी लढणाऱ्या टोळ्यांची एक बैठक बोलावली. दोन्ही बाजूंना कुरआनची शपथ घालून खूनखराबा थांबवण्याची सूचना केली.
समेट घडवल्यावर मस्तानने त्याची अडचण या लोकांना सांगितली. त्यानंतर पठाण व दाऊदच्या माणसांनी मिळून 'चिलिया' लोकांना तिथून बाहेर काढलं.

फोटो स्रोत, SUNDAR SHAEKHA/BBC
कालांतराने त्याच ठिकाणी हाजी मस्तानने एक बहुमजली इमारत उभारली आणि त्याचं नाव 'मस्तान टॉवर्स' असं दिलं.
अरब शेखशी मैत्री
1 मार्च 1926 रोजी तामिळनाडूतील कुट्टालोर जिल्ह्यात जन्मलेला हाजी मस्तान आठ वर्षांचा असताना मुंबईला आला आणि सुरुवातीला क्रॉफर्ड मार्केटमध्ये त्याने वडिलांसोबत सायकलदुरुस्तीचं दुकान उघडलं आणि 1944 साली तो मुंबईतील गोदीमध्ये हमाल झाला.
तिथेच त्याची भेट मोहम्मद अल गालिब या अरब शेख माणसाशी झाली.
हुसैन झैदी सांगतात, "त्या काळी भारतात आलेले सर्व अरब लोक ऊर्दू बोलत असत. मस्तानने त्याच्या पगडीतून किंवा गमछ्यामधून काही घड्याळं नि सोन्याची बिस्किटं बाहेर आणली, तर त्या बदल्यात त्याला थोडे पैसे मिळतील, असं गालिबने त्याला सांगितलं."

फोटो स्रोत, SUNDER SHEKHAR
"हळूहळू तो त्या अरब माणसाचा खास माणूस झाला आणि तो स्वतःच्या मिळकतीमधला 10 टक्के वाटा मस्तानला द्यायला लागला. पण अचानक गालिबला अटक झाली. त्याच्या अटकेच्या थोडंसं आधीच मस्तानने त्याच्या वतीने सोन्याच्या बिस्किटांचा एक खोका विशिष्ट ठिकाणी पोचवायची जबाबदारी घेतली होती. मस्तानने तो खोका स्वतःच्या झोपडीत लपवला."
हाजी मस्तानचं आयुष्य कसं पालटलं?
तीन वर्षांनी गालिब तुरुंगवासाची शिक्षा भोगून परतला. त्याच्याकडे एक दमडीसुद्धा नव्हती. मस्तान गालिबला मदनपुरामधील एका झोपडीत घेऊन गेला आणि तिथला सोन्याच्या बिस्किटांनी भरलेला खोका दाखवला. तो खोका तीन वर्षांच्या काळात न उघडता सुरक्षित ठेवण्यात आला होता.
झैदी सांगतात, "सोन्याच्या बिस्किटांनी भरलेला तो खोका बघून गालिब आश्चर्यचकित झाला. गालिबने मस्तानला विचारलं, 'तुला ही बिस्किटं घेऊन पळून जाता आलं असतं.' यावर मस्तान म्हणाला, 'बाकी कोणाहीपासून तू स्वतःचा बचाव करू शकतोस, पण ईश्वरापासून बचाव करता येत नाही, असं माझ्या वडिलांनी मला शिकवलं आहे.'
"हे ऐकल्यावर गालिबच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हा खोका विकल्यावर मिळणाऱ्या रकमेतील अर्धा वाटा मस्तान घ्यायला तयार असेल तरच आपण हा खोका स्वीकारू, असं गालिबने त्याला सांगितलं. तसंच या व्यवसायात मस्तानने आपला पार्टनर व्हावं असाही आग्रह गालिबने धरला. यावर मस्तानने गालिबशी हस्तांदोलन केलं."

फोटो स्रोत, SUNDER SHEKHAR
सोन्याच्या बिस्किटांनी भरलेल्या या खोक्याने हाजी मस्तानचं आयुष्य पालटलं आणि तो एका रात्रीत लक्षाधीश झाला. त्याने नोकरी सोडून दिली आणि तस्करी हा पूर्ण वेळचा उद्योग सुरू केला.
गुंडाला मारहाण
मस्तानने मझगाव गोदीमध्ये हमालांकडून हप्ता वसूल करणाऱ्या शेर खाँ पठाण या स्थानिक गुंडाला मारहाण केली, तेव्हा मस्तानची प्रतिष्ठा आणखी वाढली. कालांतराने अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध 'दिवार' चित्रपटामधील एक दृश्य या घटनेवरून प्रेरित होतं.
हुसैन झैदी सांगतात, "गोदीमध्ये हमालसुद्धा नसलेला बाहेरचा माणूस कसा तरी तिथे येऊन मजुरांकडून हप्ता वसूल करत होता, हे मस्तानच्या लक्षात आलं. पुढच्या शुक्रवारी जेव्हा शेर खाँ हप्ता मागण्यासाठी तिथे गेला तेव्हा हप्ता देणाऱ्या लोकांच्या रांगेत दहा जण कमी असल्याचं त्याला कळलं."
"थोड्या वेळाने याच लोकांना काठ्या नि लोखंडी कांब्या घेऊन शेर खाँ नि त्याच्या माणसांवर हल्ला चढवला आणि मारहाण करून त्यांना हुसकावून लावलं."

फोटो स्रोत, SUNDER SHEKHAR
"दिवार चित्रपटात हे दृश्य एका गोदामामध्ये चित्रीत करण्यात आलं आहे. वास्तवात ही हाणामारी मझगाव गोदीसमोरच्या रस्त्यावर झाली होती. या घटनेनंतर हमालांमध्ये मस्तानला आदराचं स्थान प्राप्त झालं."
गँगस्टर वरदराजन मुदलियार यांच्याशी मैत्री
मुंबईतील एक विख्यात 'डॉन' असूनसुद्धा हाजी मस्तानने स्वतः कधी पिस्तूल हातातही घेतली नाही किंवा स्वतःच्या हाताने कधी गोळीसुद्धा चालवली नाही. असं काम करण्याची गरज त्याला जेव्हाकेव्हा भासायची तेव्हा तो वरदराजन मुदलियार व करीब लाला यांसारख्या दुसऱ्या गँगस्टर लोकांची मदत घेत असे.
वरदराजनसुद्धा मस्तान यांच्यासारखेच तामिळ होते आणि वर्सोवा, वसई, विरार अशा भागांमध्ये त्यांचा वावर होता. वरदराजन आणि हाजी मस्तान यांची गाठ कशी पडली याची कहाणीसुद्धा रोचक आहे.
हुसैन झैदी सांगतात, "आपल्या बाजूने हाणामारी करू शकेल आणि माल इकडून तिकडे नेण्यात मदत करू शकेल, अशा लोकांची स्मगलर माणसाला गरज असते."
"वरदराजनला एकदा पोलिसांनी कस्टम्स डॉक परिसरात अँटिना चोरल्याच्या आरोपाखाली अटक केलं. चोरीचा माल आणून दिला नाही तर त्याची पिटाई केली जाईल, असं पोलिसांनी त्याला सांगितलं."
"आता काय करायचं, याचा विचार करत वरदराजन आझाद मैदानाजवळच्या कोठडीत बसला होता, तेव्हा पांढराशुभ्र सूट घातलेला आणि हाताच्या बोटांमध्ये 555 ब्रँडची सिगरेट पकडलेला एक इसम तुरुंगापाशी येत होता. पोलिसांनी त्याला थांबवलं नाही. मस्तान वरदराजनच्या अगदी जवळ जाऊन तामिळमध्ये म्हणाला, 'वणक्कम थलाएवार' म्हणजे 'नमस्कार, साहेब.'"
मस्तानने आपल्याला असं आदराने संबोधित केल्याबद्दल वरदराजन आश्चर्यचकित झाला. एक प्रतिष्ठित शेठ माणूस आपल्यासारख्या गुंडाला इतका आदर देईल, असं त्याला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं.

फोटो स्रोत, SUNDER SHEKHAR
मस्तानने त्याला तामिळमध्येच चोरीचा माल परत करायला सांगितलं. तसंच, त्याला खूप पैसे कमवायला मिळतील, अशी आश्वस्तताही दिली. वरदराजनला हा प्रस्ताव टाळता आला नाही. तो तत्काळ तुरुंगातून सुटला आणि त्यानंतर मस्तानसाठी सर्व खराब मानली जाणारी कामं करू लागला.
मस्तानसंबंधी पसरलेल्या वेगवेगळ्या गोष्टी
ऐंशीच्या दशकात मस्तानचा जोर बराचसा कमी झाला होता, पण त्याच्याबाबत लोकांमध्ये वेगवेगळ्या खोट्यानाट्या गोष्टी पसरल्या होत्या.
प्रसिद्ध उर्दू पत्रकार खालिद जाहीद यांची मस्तानशी जवळून ओळख होती. मस्तानसोबत काशीला गेले असतानाचा एक रोचक किस्सा ते सांगतात.
जाहीद म्हणतात, "आम्ही लोक दालमंडी भागात एका स्वस्तातल्या हॉटेलात थांबलो होतो. तेव्हा तिथे हाजी मस्तान आल्याचं लोकांना कळलं. काही मिनिटांमधे तिथे सुमारे तीन हजार लोक गोळा झाले. मी पत्रकार होतो. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या इते येण्याचं कारण जाणून घ्यावं, असं मला वाटलं. त्यांना हाजी मस्तानबद्दल काय वाटत होतं?"
"हाजी मस्तान 365 दरवाजे असलेल्या बंगल्यात राहतो. रोज तो नवीन दरवाजातून बाहेर पडतो, तिथे एक कार त्याच्यासाठी थांबलेली असते. तो फक्त एकदाच ती कार वापरतो आणि मग ती कार विकून मिळालेला पैसा गरीबांमध्ये वाटून टाकतो, असं तिथल्या लोकांनी मला सांगितलं."

फोटो स्रोत, SUNDAR SHAEKHA/BBC
"वास्तविक तेव्हा मस्तान 15 वर्षं जुनी फियाट कार वापरत होते. त्यांचा बंगला होता, पण 365 दरवाजे असण्याइतका तो मोठा नव्हता. मी माझ्या वृत्तपत्रात खरा व खोटा मस्तान दाखवणारा एक लेख लिहिला. मस्तानला तो लेख आवडला नाही आणि तो माझ्यावर चिडला."
चित्रपट अभिनेत्रीशी लग्न
हाजी मस्तान यांना मुंबईतील चित्रपटसृष्टीबद्दल खूप आकर्षण होतं. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केलीच, शिवाय एका 'स्ट्रगलर' अभिनेत्रीशी लग्नसुद्धा केलं.
हुसैन झैदी सांगतात, "मस्तान तरुणपणी मधुबालाचे चाहते होते आणि तिच्याशी लग्न करायची त्याची इच्छा होती. पण मधुबालाचं लवकर निधन झालं, आणि तसंही ती जिवंत असती तरी मस्तानला तिच्याशी कधीच लग्न करता आलं नसतं."
"त्या काळी मुंबईत मधुबालासारखी दिसणारी एक अभिनेत्री काम करत होती. तिचं नाव होतं वीणा शर्मा उर्फ सोना. मस्तानने तिच्या समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि तिने तो तत्काळ स्वीकारला. मस्तानने सोनासाठी जुहूमध्ये एक घर विकत घेतलं आणि तिथे तिच्या सोबत राहू लागला."
हळूहळू मुंबईतील 'व्हीआयपी' लोकांच्या वर्तुळात मस्तानचं स्थान स्थिरस्थावर होऊ लागलं आणि त्याचा तस्करीचा कालखंड लोक विसरू लागले. हाजी मस्तानला पहिल्या पत्नीपासून तीन मुली होत्या आणि नंतर त्याने सुंदर शेखर नावाच्या एका मुलाला दत्तक घेतलं.

फोटो स्रोत, SUNDER SHEKHAR
सुंदर शेखर सांगतात, "चित्रपटसृष्टीतील अनेक लोक बाबांच्या जवळचे होते. राज कपूर, दिलीप कुमार आणि संजीव कुमार हे त्यापैकी प्रमुख लोक होते. दिवार चित्रपट तयार होत होता त्या काळात त्या चित्रपटाचे लेखक सलीम आणि अमिताभ बच्चन अनेकदा बाबांना भेटायला येत असत, जेणेकरून त्या पात्राचा सखोल वेध घेता यावा. बाबा केस कायम मागे वळवत असत. कोणी त्यांच्याशी इंग्रजीत बोलायला लागलं तर ते वारंवार 'या-या' असं म्हणत राहत."
नव्या टोळ्यांच्या उदयामुळे ताकद मंदावली
ऐंशीच्या दशकाच्या आरंभापासून हाजी मस्तानची ताकद कमी होऊ लागली, कारण मुंबईच्या गुन्हेगारीविश्वात नवीन शक्ती उदयाला येऊ लागल्या होत्या.
खालिद जाहीद सांगतात, "अनेक नवीन टोळ्या निर्माण झाल्या होत्या. त्यांची नाव मी घेणार नाही, पण या नवीन टोळ्यांमुळे हाजी मस्तानचा प्रभाव कमी झाला."

फोटो स्रोत, SUNDAR SHAEKHAR
इंदिरा गांधींनी 1974 साली मीसा कायद्याखाली पहिल्यांदा हाजी मस्तानला अटक केलं. आणीबाणीच्या काळात, 1975मध्ये हाजी मस्तान तुरुंगात होता.
निधनावेळी चित्रपटांमधील कलाकार आले नाहीत
त्या वेळी गुन्हेगारी प्रकरणांमधील खटले लढवण्यासाठी विख्यात असलेले वकील राम जेठमलानी यांची सेवा घेऊनसुद्धा मस्तानची सुटका झाली नाही. काही दिवसांनी तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याची जयप्रकाश नारायण यांच्याशी भेट झाली आणि यातून त्याचा राजकारणातील प्रवेशाचा मार्ग खुला झाला. त्याने 'दलित मुस्लीम सुरक्षा महासंघ' नावाचा एक पक्ष स्थापन केला. पण या पक्षाने फारशी ठोस कामगिरी केली नाही.
हुसैन झैदी म्हणतात, "प्रत्येक गुन्हेगाराला कोणत्या तरी टप्प्यावर पांढरपेशा व्हायची इच्छा असते. हाजी मस्तानसुद्धा याला अपवाद नव्हता. आपण स्थापन केलेला पक्ष कधीतरी शिवसेनेचं स्थान घेईल, असं त्याला वाटत होतं. पण असं झालं नाही."
9 मे 1994 रोजी 68व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्याने मस्तानचा मृत्यू झाला. अनेकदा चित्रपटसृष्टीतील व्यक्तींच्या आसपास राहिलेल्या मस्तान यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीशी संबंधित कोणाही मोठ्या व्यक्तीने त्यांच्या घरी जाऊन दुःख व्यक्त केलं नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








