लोकनाथ यशवंत : 'पुन्हा चाल करु या' म्हणत लोकांना विद्रोहाची हाक देणारा लोककवी

लोकनाथ यशवंत

फोटो स्रोत, Facebook/Loknath Yashwant

    • Author, योगेश महाले
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

(नांदेड येथे होणाऱ्या 20 व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत यांची निवड झाली आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या एकूण साहित्यिक कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा...)

मराठी कवितेच्या प्रवाहात गेल्या तीन दशकांपासून काव्यलेखन करणारे एक सशक्त कवी म्हणून लोकनाथ यशवंतांचा उल्लेख करता येईल.

प्रस्थापित मूल्यव्यवस्थेविरुध्द शोषणमुक्तीचा विचार मांडणारी संघर्षशील कविता त्यांनी लिहिलेली आहे.

दलित कवितेने सतत ढोंगी संस्कृती आणि कर्मकांडे पोसणाऱ्या समाजव्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारले आहे. या दलित कवितचे लोकनाथ यशवंत साक्षीदार आहेत.

सुरुवातीला 'ज्वालाग्राही विद्रोह आणि नकार' यांनी युक्त असलेलल्या दलित कवितांवर 'दलित कवितेत तोच तो पणा, साचलेपणा आला आहे अशी टीका 1980 च्या दशकात होत होती. या टीकेला उत्तर देणारी कविता म्हणून लोकनाथ यशवंतांच्या कवितेचा उल्लेख करता येईल.

आजतागायत त्यांचे चार कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. 'आता होऊन जाऊ द्या' (1989), 'आणि शेवटी काय झाले' (1994), 'पुन्हा चाल करु या' (2009) आणि 'बाकी सर्व ठीक आहे' (2014) हे कवितासंग्रह त्यांच्या विचारशील आणि संघर्षशील कवितेची साक्ष देणारे आहेत. परिचित झालेले आहे.

या कवीचे वैशिष्ट्य हे आहे की, विषमतेशी, वर्गजाणिवेशी, पुराणमूल्यांशी व पुराण संस्कृतीशी हा कवी कवितेच्या माध्यमातून संघर्ष करताना दिसतो. संघर्ष हा या कवितेचा स्थायीभाव आहे.

लोकनाथ यशवंतांची कविता पंरपरा व नवता यातील संघर्ष मांडते. आत्मशोध घेते. शिवाय आत्मपरिक्षण करायला भाग पाडते. समाजविघातक प्रवृत्तीविरोधात बंड पुकारते. 'शस्त्राच्या कविता' या कवितांमधील कवितेत कवी म्हणतो,

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"अनेक दिवसांपासून गप्प बसलेला

संतप्त जनांचा समूह जेव्हा रस्त्यावर येतो

तेव्हा निरर्थक पडलेले दगड शस्त्र बनतात

तुमच्याप्रमाणे मलाही हे शस्त्र महत्वाचे वाटते"

ज्या मानवतावादी मूल्यांपासून येथील व्यवस्थेने दलितांना हजारो वर्ष दूर ठेवले. त्या मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी कवी दलित, शोषित समूहाला रस्त्यावर येण्याचे आवाहन करतो. त्यामुळेच लोकनाथांची कविता मनुष्यत्वाला मूल्य देणारी कविता आहे, असे म्हणणे संयुक्तिक ठरते.

जागतिकीकरणाच्या युगाचा साक्षीदार असलेला कवी, देशाला स्वातंत्र्य मिळालं, राज्यघटना निर्माण होऊन तिची अंमलबजावणी झाली, स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे देशात समता, स्वातंत्र्य, बंधुभाव व न्याय प्रस्थापित होईल अशी आशा बाळगून राहिला.

परंतु येथील समाजव्यवस्था, वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था छुप्या पद्धतीने येथील समाजावर वार करीत राहिली. परिणामी लोकनाथ यशवंतांनी 'आता होऊन जाऊ द्या' हा नारा दिला. बदलाच्या प्रतिक्षेत कवीने समाजाकडे बदलाची अपेक्षा व्यक्त केली आणि नव्या जाणिवेचे, मूल्यव्यवस्थेचे जग अपेक्षिले.

प्रत्यक्षात समाजव्यवस्थेत स्थिरावलेली विकृत मनोवृत्ती मात्र बदलली नाही. लोकनाथ यशवंतांसारख्या कवीला ज्या समुहाकडून बदलाची अपेक्षा होती त्याच समूहातील काही 'लीडर' म्हणवणारे शोषण व्यवस्थेचा भाग बनून गेले हे चित्र अतिशय विदारक होते त्यामुळेचे त्यांनी

"इतरांना पोथीनिष्ठ म्हणता म्हणता

आमच्या डोक्यावर पोथ्या आल्या

विद्रोहाची भाषा करणारे सत्ताधारी होऊन

लाळ गाळू लागले."

असा लेखाजोगा मांडला. कर्मकांडे, पूजाविधी, देवदेवस्की यांना विरोध करणारेच जर या पुराणसंस्कृतीला खतपाणी घालण्याचा व ती वाढवण्याचा प्रयत्न करीत असतील तर परिवर्तन शक्य नाही.

किंबहूना विषमतावादी व विकृत मूल्यव्यवस्था अधिक जोरकस होत जाईल हे कटू सत्य पाहिल्यावर लोकनाथ यशवंतांनी 'आणि शेवटी काय झाले' या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून आत्मटीका, प्रस्थापित्त शोषण व्यवस्थेसोबतच स्वसमाजाचे मूल्यमापन केले आहे.

लोकनाथ यशवंत

फोटो स्रोत, Facebook/Loknath Yashwant

अपेक्षित असणाऱ्या नव समाजाच्या निर्मितीत अडथळा आणणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हे लक्षात आल्यामुळे विद्रोह थंडावला, चळवळी भरकटल्या, नकाराची भूमिका बदलली हे सहन न झाल्यामुळे स्वसमाजातील दांभिकपणावर लोकनाथ यशवंतांनी नेमकेपणाने बोट ठेवले आहे.

एकीकडे कवी स्वतः लढाईची तयारी करत असतांना आजूबाजूला विकाऊ आणि भ्रष्ट प्रवृत्तीची माणसं आहेत. मानव्याला काळीमा फासणाऱ्यांमध्ये त्यांचाही समावेश कवी करतो आणि अशा स्वकीयांविरुद्धही उपरोधिक शैलीत स्वतःची भूमिका व्यक्त करतो. 'लीडर' ही त्यांची कविता उपरोधाचे व पलायनवादी वृत्तीचे उत्तम उदाहरण आहे.

लोकनाथ यशवंतांच्या कवितेला प्रतिमा, प्रतिकांचा सोस नाही. ती साध्या सहज भाषेतून व्यक्त होते. त्यामुळे ती आकलनसुलभ आहे. भावनाभिव्यक्ती महत्त्वाची मानून त्यांनी सामान्यातल्या ससामान्य वाचकाला कळेल अशी भाषा कवितेत वापरलेली आहे. ही कविता सहज, सोपी असल्यामुळे ती वाचकांच्या काळजाला भिडते. वाचकाला विचार करायला भाग पाडते. हे या कवितेचे श्रेष्ठत्व आहे.

दलित कविता 'व्यक्तिलक्ष्यी' असण्यापेक्षा 'समाजलक्ष्यी' आहे. संपूर्ण समूहाचे प्रश्न, दुःख, शोषण, ती सार्वत्रिक पातळीवर आणते. त्यामुळे तिला व्यापकता प्राप्त होते. या दृष्टीने तिचे महत्व आपल्याला मान्य करावे लागेल.

लोकनाथ यशवंत यांच्या कवितेच्या बाबतीतही असे म्हणता होईल की, हा कवी मुळातच सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे त्यांची कविता ही समाजकेंद्री आहे. या कवितेवर ती विधानात्मक आहे, गद्यप्राय आहे अशी टीकाही होत आलेली आहे. मात्र लोकनाथ यशवंत प्रत्येक अनुभव, सामाजिक पातळीवर पाहतात. त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेला बदल आणि प्रत्यक्ष समाजव्यवस्था, वर्तमान यामध्ये निर्माण झालेल्या ताणातून ती गद्याकडे झुकते. मात्र तीत कविता म्हणून एक आंतरिक लय आहे, हे मान्य करावे लागेल.

दुसरा एक लोकनाथ यशवंत यांच्या कवितेचा विशेष मानावा लागेल तो म्हणजे संघर्ष. कारण संघर्ष केल्याशिवाय नवी व्यवस्था निर्माण होणार नाही. सर्व प्रकारचे शोषण आणि गुलामगिरी यातून मुक्तता मिळावी यासाठी कवी सतत संघर्षशील आहे. आणि हा संघर्ष सांस्कृतिक संघर्ष आहे.

तोही मानवतावादी मूल्यांसाठी चाललेला. या स्वरुपाचा संघर्ष त्यांच्या 'भिमराव मेश्रामाची कविता' यासारख्या कवितेतून स्पष्ट दिसतो. दलित साहित्याच्या मागे जी दलित चळवळ आहे. त्या चळवळीची ही कविता आहे.

मात्र चळवळीत जो बदल झाला, चढउतार आले ते या कवितेत नेमकेपणाने प्रतिबिंबित झालेले आहेत. मुळातच सुरुवातीला व्यापक दृष्टिकोण ठेवून सुरु झालेल्या चळवळी नंतर 'व्यक्तिवादी आणि दिशाहीन झाल्या त्यामुळे कार्यकर्ता असलेल्या कवीमनाला याचे अधिक दुःख होते. कारण चळवळीच्या माध्यमातून जो मूल्य संघर्ष उभा केला गेला. त्याकडे आज दुर्लक्ष झाल्याची खंत या कविला आहे.

लोकनाथ यशवंत

फोटो स्रोत, Facebook/Loknath Yashwant

चिंतनाच्या पातळीवरील ही कविता मानवी व संवेदनेला हाक देतांना दिसते. शिवाय वाचकांशी ती अधिकाधिक संवादी होतांना दिसते. म्हणूनच सर्वंकष 'परिवर्तनाचा आग्रह धरणारी ही कविता आहे. 1960 नंतरच्या लोकनाथ यशवंतांच्या दलित कवितेपर्यंतचा प्रवास जर पाहिला तर 'विद्रोह' आजही या कवितेत कायम आहे. विद्रोहाची भाषा बदललेली आहे.

लोकनाथ यशवंत यांनी त्यांच्या कवितेत विद्रोहाच्या माध्यमातून विषमतावादी मूल्यांच्या विरोधात उभा केलेला मूल्यसंघर्ष उभा केला आहे. म्हणूनच मानवतावादाकडे प्रवास करणाऱ्या दलित कवितेतील लोकनाथ यशवंत आजच्या पिढीतील एक महत्वपूर्ण कवी आहेत.

विषमताधिष्ठित समाजव्यवस्थेत 'विषमता' या मूल्याने माणूसपण नाकारलेले आहे. अशा माणूसपण नाकारलेल्या समूहाची कविता म्हणून ही कविता महत्त्वाची आहे. सामाजिक परिवर्तन, समताधिष्ठीत समाजरचनेसाठी आवश्यक असलेली मूल्ये या समाजव्यवस्थेत रुजावित ही अपेक्षा या कवितेला आहे. लोकनाथ यशवंतांचा 'पुन्हा चाल करु या' हा एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील महत्त्वपूर्ण कवितासंग्रह आहे.

'आता होऊन जाऊ द्या' चा नारा दिल्यानंतर लोकनाथ यशवंतांना आदर्शमय समतेचा समाज अपेक्षित होता, तो झाला नाही. अपेक्षित समाजपरिवर्तन झालेले त्यांना दिसले नाही असे का? याचे आत्मपरिक्षण केल्यानंतर 'आणि शेवटी काय झाले' दूसरा कविता संग्रह आला. लोकनाथ यशवंतांच्या पदरी निराशा आली मात्र ते तेथेच थांबले नाहीत अथवा मागेही सरकले नाहीत. परिणामी 2009 साली त्यांचा 'पुन्हा चाल करु या' हा कविता संग्रह साहित्यक्षेत्रात दाखल झाला.

जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण, नव उदारमतवाद व भांडवली अर्थव्यवस्था यामुळे संपूर्ण समाजव्यवस्थेत भौतिक बदल घडून आला. या नव्या व्यवस्थेने माणसाला उपभोक्ता करुन टाकले. माणसाच्या क्षमतेला बाजारपेठी मूल्य या नव्या व्यवस्थेने बहाल केली. माणसाचे 'माणूस' म्हणून असलेल्या मूल्याचे 'अवमूल्यन' झाले. माणसाचे जीवन अधिकाधिक असुरक्षित, उदासिन व असंवेदनशील होत गेले. या पार्श्वभूमीवर लोकनाथ यशवंत यांनी 'पुन्हा चाल करु या' च्या माध्यमातून या माणसाचे अवमूल्यन करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात पुन्हा चाल करण्याचे आवाहन केले आहे.

खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे एक नवी शोषणव्यवस्था उभी राहिलेली आहे. ती माणसाचे सर्व पातळ्यांवरील शोषण करते आहे. या अशा नव्या शोषणव्यवस्थेच्या विरोधात लोकनाथ यशवंतांची कविता अधिक संघर्षरत होतांना दिसते. "विषमताधिष्ठीत समाजव्यवस्थेत 'विषमता' या मूल्याने माणूसपण नाकारलेल्या तमाम शोषित, पिडित अशा समूहाची वेदना ही कविता व्यक्त करते.

लोकनाथ यशवंत

फोटो स्रोत, Facebook/Loknath Yashwant

समताधिष्ठीत समाजरचनेच्या मूल्यांची प्रतिष्ठापना हे या कवितेला अभिप्रेत आहे. ही कविता एका व्यक्तिकेंद्री नाही तर एकूण समूहा‌ची कविता आहे. या दांभिक व अप्रामाणिक उपभोगी जगात आपली मूल्ये कोणती याची जाणीव हा कवी करुन देतो. व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी ज्यांना सोबत घेऊन कवी रणांगणात उतरला होतो तेच व्यवस्थेचा भाग बनून गेलेले आहेत याबद्दल ते खंत व्यक्त करतात, म्हणून ते म्हणतात,

"ज्या व्यवस्थेविरुध्द सोबत्यांना घेऊन

सर्वशक्तिनिशी लढण्यास निघालो

कालान्तराने लक्षात आले सगळे सोबती

माझ्यासाठी नवी व्यवस्था झाले आहेत. "

परिवर्तन ही गरज आहे. परंतु जर व्यवस्था परिवर्तनाची अपेक्षा बाळगणारेच व्यवस्थेचा भाग बनत असतील तर ही कोणती नैतिकता? हे माणूसपणाचे लक्षण नाही. ही खंत कची व्यक्त करतो. या कवीने स्वातंत्र्योत्तर काळातील वास्तव जवळून पाहिले, त्यात कालखंडानुसार सातत्याने बदल होत गेला.

जागतिकीकरणात हे वास्तव अधिकच भीषण आणि दाहक होत गेले, धर्माधता, जातियता, अधिक बळकट होत गेली. या सर्व पातळ्यांवरील बदलाचे सूत्र लक्षात घेऊन नवव्यवस्थेचा माणसावर होणारा परिणाम ही कविता व्यक्त करते.

लोकनाथ यशवंत

फोटो स्रोत, Facebook/Loknath Yashwant

एकविसावे शतक अनेकार्थाने वेगळे आहे. राजकारण, समाजकारण, सांस्कृतिकता, शिक्षण या सर्वच पातळ्यांवर झालेली उलथापालथ आपण अनुभवत आहोत. या पार्श्वभूमीवर आलेला लोकनाथ यशवंत यांचा '...बाकी सर्व ठीक आहे' हा चौथा कवितासंग्रह 2014 साली प्रकाशित झाला. जात, धर्म, पंथ, प्रदेश यांच्या नावावर होणारे राजकारण आणि त्यातून आलेली मूल्यहीनता यावरील भाष्य म्हणजे या संग्रहातील कविता आहेत.

ढोंगी आणि असंवेदनशील प्रवृत्तीवर कडाडून प्रहार करणारी ही तिरकस शैलीतील कविता आपल्याला आपलाच चेहरा तपासून पाहण्याचे आवाहन करते. बाह्य जगातील विसंगती उपरोधिक शैलीत मांडणारी कविता असे या कवितेचे स्वरूप आहे.

इ.स. 1980 नंतरच्या कवितेत वास्तवाचे अचूक भान ठेवत मानवतावादी मूल्यांच्या आड येणाऱ्या व्यवस्थेविरोधात ही कविता उभी राहते. प्रस्थापित शोषणव्यवस्थेबरोबरच स्वसमाजातील जो समूह व्यवस्थेचा भाग बनून गेलेला आहे. त्याच्या विरोधात ही कविता संघर्षरत होते.

दलित कविता म्हणजे आक्रोश, जुन्याची मोडतोड ही समीकरणे लोकनाथ यशवंत यांच्या कवितेने बाद ठरविलेली आहेत. 'आत्मटीका' हा या कवितेचा विशेष आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव व न्याय या मूल्याच्या प्रस्थापनेसाठी ही कविता सतत शोषणव्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारते. बदललेल्या समाजव्यवस्थेचा व राजकीय विचारसरणीचा चेहरा या कवितेतून समोर येतो.

जागतिकीकरण, खाजगीकरण व उदारीकरण याचा मोठा परिणाम संपूर्ण देशावर झाला आणि भांडवली अर्थव्यवस्था आली. त्यामुळे समाजवादी मूल्ये नष्ट झाली. परिणामी या भांडवलशाही व्यवस्थेने येथील समाजात जो ताण निर्माण केला तो कवितेतून व्यक्त होतो.

स्वसमाजातील दोषांवर ती औपरोधिक शैलीत प्रहार करते. बदलणाऱ्या जगात अप्रामाणिकपणा व दांभिकता वाढत गेल्यामुळे मानवी मूल्ये लोप पावली त्या मूल्यांच्या प्रस्थापनेचा आग्रह ही कविता धरते. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे हरवत चाललेल्या मानवी मूल्यांचे महत्त्व या कवितेतून अधोरेखित होते.

समाजपरिवर्तनाचा आग्रह धरणाऱ्या समाजलक्ष्यी कवितेच्या परंपरेतील ही कविता 'समूहाचा स्वर' म्हणून अधिक महत्त्वाची आहे.समताधिष्ठीत समाजनिर्मितीचे स्वप्न बाळगणारी व नव्या मानवतावादी मूल्यांची रुजवणूक करणारी हो कविता आहे. आजच्या वर्तमानकालीन मराठी कवितेत मनुष्यत्वाला नवा आयाम देणारी कविता हेच लोकनाथ यशवंत यांच्या कवितेचे बलस्थान आहे.

(डॉ. योगेश महाले हे जळगावमधील मूळजी जेठा महाविद्यालयातील पदव्युत्तर मराठी विभागात सहयोगी प्राध्यापक आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून मराठी भाषा आणि साहित्य या विषयाचे अध्यापन करत असून, बोली अभ्यासक, समीक्षक, आदिवासी साहित्य आणि संस्कृती अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. तसंच, विविध नियतकालिकातून कविता आणि समीक्षापर लेख प्रकाशित झाले आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)