नागराज मंजुळे विद्रोही साहित्य संलेनात म्हणाले, 'प्रेम करणं हाच आजच्या काळातला विद्रोह'

फोटो स्रोत, Amol langar/bbc
"विद्रोह आपण म्हणतो. विद्रोह शब्द ऐकल्यावर काहीतरी निगेटिव्ह वाटतं. काहीतरी वाटतं की, रागानं, द्वेषानं दगडफेक करायची आहे, कुणाचा तरी निषेधच करायचाय. मला असं नाही वाटत," असं सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाले.
तसंच, नागराज मंजुळे पुढे म्हणाले की, "मला वाटतं, आजच्या काळात खरा विद्रोह म्हणजे प्रेम करणं. तू काही कर, द्वेष कर, दगड मार, मी प्रेम करतो, असं म्हणणंच विद्रोह आहे."
लातूरमधील उदगीरमध्ये पार पडलेल्या 16 व्या विद्रोही साहित्य संमेलनात सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते किरण माने, वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार हेही सहभागी झाले होते.
या संमेलनात एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे वरिष्ठ पत्रकार रवीश कुमारही सहभागी झाले होते. त्यांनी पत्रकारिता आणि साहित्य यांच्यातील नात्याबाबत स्पष्ट शब्दात भाष्य केलं.
सध्याची पत्रकारिता उद्ध्वस्त करणारी - पत्रकार रवीश कुमार
रवीश कुमार यांनी विद्रोह साहित्य संमेलनाचं कौतुक करत म्हटलं की, "विद्रोह आणि राष्ट्रद्रोह यांच्यातील अंतरच संपत चाललंय. या दोन्ही गोष्टीमुळे राष्ट्रीय सुरक्षा कायद्यापासून यूएपीएपर्यंतच्या कायद्यांचा सामना करावा लागू शकतो, असा सध्याचा काळ आहे. अशा काळात विद्रोह साहित्य संमेलन भरवणं मोठी गोष्ट आहे. तुम्ही ते काम करत आहात."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
साहित्य आणि पत्रकारिता यांच्यातील सध्याच्या काळातले संबंध स्पष्ट करताना रवीश कुमार म्हणाले, "मी ज्या व्यवसायातून येतो, तिथं उद्ध्वस्ततेची पत्रकारिता होतेय."
"तुम्ही साहित्यकार लिहिता आणि त्यातून प्रश्न उपस्थित करता. ओळख, जात, न्यायाच्या प्रश्नांना उभं करता. हे प्रश्न घेऊन समाज बरोबरीच्या पायऱ्या चढत जातो. याच गोष्टी आमचा व्यवसाय (पत्रकारिता) उद्ध्वस्त करून टाकतो," असंही रवीश कुमार यावेळी म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
"पत्रकारितेनं साहित्याच्या जवळ राहिलंच पाहिजे, असं एकेकाळी म्हटलं गेलं. संवेदनशीलता यावी आणि वेदना समाजावी असा त्यामागे उद्देश होता. मात्र, आज पत्रकारिताच साहित्याला वेदना देतेय. साहित्याच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरत आहे. आजच्या पत्रकारितेला माणूस नकोय, असा राजकीय माणूस हवाय, ज्याच्यामुळे पुनर्निमाणाची प्रक्रिया समाप्त होते.
"भारताची पत्रकारिता राजकीय माणसाच्या निर्मितीच्या मागे लागलीय, ज्याचा पाया धार्मिकता आहे," अशी खंतही रवीश कुमार यांनी विद्रोही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून व्यक्त केली.
चुकीचा इतिहास खोडून काढण्याची गरज - अभिनेते किरण माने
विद्रोही साहित्य संमेलनातील एका सत्रात अभिनेते किरण मानेंनीही आपले विचार मांडले.
अभिनेते किरण माने म्हणाले, "भेदाभेद करणारा मनुवादी विषाणू वेगाने वाढत असतानाच विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या विषाणूला गारद करण्यासाठी विवेकी विचारांची लस दिली जात आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. बहुजनांना गुलाम बनवणारा हा विषाणू वेळीच संपवण्यासाठीचा प्रयत्न गरजेचा ठरतो."

फोटो स्रोत, Facebook/Vidrohi Sahitya Sammelan
"तुकोबा, छत्रपती शिवाजी महाराज, आणि शाहू-फुले-आंबेडकरांच्या इतिहासाचं विद्रुपीकरण हे अनेक वर्षांपासून सुरू आहे. या सर्व महामानवांची विविध प्रतिके मनूवाद्यांनी आपल्या फायद्यासाठी, राजकीय हेतुपूर्वक वापरली आहे. तुकाराम वैकुंठाला गेले, ते व्यवहारी नव्हते, ते साधे भोळे होते, अशी चुकीची मांडणी या शक्तींनी केली आहे.
"या चुकीच्या इतिहासालाच आपला भाबडा बहुजन समाज खरं मानत आला आहे. परंतु ही चुकीची मांडणी खोडण्याची गरज आहे अन् ते काम आपण करायला हवं," असं किरण माने म्हणाले.
"छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना सोबत घेवून स्वराज्य उभं केलं. तोच सलोखा संपवण्यासाठी सध्या प्रयत्न होतोय. हे रोखण्याचं काम तुम्ही आम्ही करायला हवं. कृष्ण ही ऐतिहासिक व्यक्ती होती, पण या व्यक्तीला देखील बदनाम करत उच्च वर्णाने त्यांना कनिष्ठ मानलं आहे. अशा सर्व महामानवांच्या बदनामीला व इतिहासाची मांडणी मोठ्या हिमतीने खोडणं, लढणं गरजेचं आहे. अथवा आपण आपलं अस्तित्व हरवून बसू," असंही किरण माने म्हणाले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








