नवनीत राणाः जेव्हा ‘मातोश्री’वर नमाज पढला गेला होता...

जेव्हा ‘मातोश्री’वर नमाज पढला गेला होता...

फोटो स्रोत, Getty Images

हनुमान चालिसा आणि नमाजावरून सध्या महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'वर हनुमान चालिसा पठण करणार आहेत. मात्र, कायदा-सुव्यवस्थेचं कारण पुढे करत मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीसही बजावली आहे.

एकीकडे नमाज आणि हनुमान चालिसामुळे राजकारणाचा ऐन उन्हात राजकारणाचा पारा चढला असताना, इतिहासातला एक किस्साही अनेकजण सोशल मीडियासह इतरत्र शेअर करताना दिसतायेत.

तो किस्सा असा की, ज्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य जात आहेत, त्याच 'मातोश्री'वर एकेकाळी नमाज पठण झालं होतं.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या 'ठाकरे' सिनेमात हा किस्सा दाखवण्यात आलाय, तसंच त्या किश्श्यातले मेहमूद शेख यांनी 'झी चोविस तास' या वृत्तवाहिनीशी बोलतानाही तो किस्सा सांगितला आहे.

काय झालं होतं नेमकं 'मातोश्री'वर? मेहमूद शेख नामक मुंबईतले व्यवसायिक होते आणि दांगट नामक त्यांचे मित्र होते.

एकदा दांगट मेहमूद शेखना म्हणाले, आपण साहेबांना भेटायला जाऊ. तेव्हा शेख यांनी विचारलं, कोण साहेब? तर दांगट म्हणाले, बाळासाहेब ठाकरे.

त्यावर मेहमूद शेख तातडीनं म्हणाले, अरे कधीही, बाळासाहेबांना भेटायला कधीही तयार आहे.

ठाकरे सिनेमा

फोटो स्रोत, YOUTUBE/VIACOM

फोटो कॅप्शन, ठाकरे सिनेमातील एक दृश्य...

असं म्हणत दोघेही 'मातोश्री'वर गेले. मेहमूद शेख हे नमाज चुकवत नसत. 'मातोश्री'वर असताना अजान झाली आणि नमाजाची वेळ झाली. त्यावेळी मेहमूद शेख जायला निघाले. तर बाळासाहेबांनी विचारलं, कुठे जातोय?

त्यावर मेहमूद शेख म्हणाले, नमाजाची वेळ झाली, मला जावं लागेल.

मग बाळासाहेब म्हणाले, अरे इथेच नमाज पढा की.

मेहमूद शेख सांगतात की, मग बाळासाहेबांनी त्यांच्या माणसाला बोलावलं आणि त्यांच्या पर्सनल रूममध्ये मला नमाज पढायला जागा करून दिली.

मेहमूद शेख यांचा हाच किस्सा 'ठाकरे' सिनेमातही थोड्याफार फरकानं दाखवण्यात आलाय. सिनेमात मेहमूद शेख शस्त्रक्रियेसाठी मदत मागण्यासाठी 'मातोश्री'वर आल्याचे दाखवण्यात आले आहे. सकाळ वृत्तपत्रानं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलंय.

नवनीत राणा-रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा अखेर मुंबईत पोहोचले आहेत. ते मातोश्री समोर हनुमान चालिसा पठण करणार आहेत.

या प्रकाराला शिवसेनेने विरोध केला आहे. राणा दाम्पत्याच्या या भूमिकेमुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही आक्रमक झाल्या आहेत. आमच्या शिवसैनिकांची माथी भडकवू नका, ते तुम्हाला भारी पडतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

पहाटे अडीच वाजता राणा दाम्पत्य खाजगी वाहनाने नागपूर विमानतळावर पोहचले, त्यानंतर सकाळी साडेसहाच्या विमानाने नागपूर विमानतळावरून मुंबईला रवाना झाले.

नवनीत राणा आणि रवी राणा

फोटो स्रोत, Getty Images

यावेळी खासदार नवनीत राणा वाय प्लस दर्जाची सुरक्षा न घेता मुंबईत पोहोचल्या.

उद्या ते ठाकरे कुटुंबीयांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री समोर हनुमान चालिसाचं वाचन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

राणा समर्थक सायंकाळी 7 वाजता मुंबईला निघतील आणि उद्या सकाळी मातोश्रीवर राणा दाम्पत्यासह कार्यकर्ते हनुमान चालिसा म्हणणार, अशी माहिती युवा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाअध्यक्ष जितू दुधाने यांनी दिली आहे.

दरम्यान, राणा यांच्या खार येथील निवासस्थानी आणि मातोश्रीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शिवसैनिक घोषणाबाजी करत आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

रवी राणा यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेड लावले आहेत. हा रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आलाय.

नवनीत राणा आणि रवी राणा

मातोश्री हे मुख्यमंत्र्यांचं खासगी निवासस्थान आहे. तसंच कलानगर हा भाग मोठा वर्दळीचा आहे. तसंच कोणतंही आंदोलन करण्याची परवानगी फक्त आझाद मैदानात करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे 23 तारखेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला बजावली आहे.

भाजपला बंटी आणि बबलीची गरज - संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी रामा दाम्पत्याला बंटी बबलीची उपमा दिली आहे.

नागपुरात बोलताना ते म्हणाले, "राणा दाम्पत्याला जर स्टंटच करायचे असतील तर शिवसेनेलाही स्टंटचा अनुभव आहे. त्यांना मुंबईचे पाणी माहित नाही अजून. हनुमान चालीस वाचणे, रामनवमी हे श्रद्धेचे विषय आहेत. हे नौटंकीचे किंवा स्टंटचे विषय नाही. भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाची नौटंकी आणि स्टंट करून ठेवला आहे. त्यातली ही सर्व पात्रं आहेत.

"राणा दाम्पत्याला लोक यांना गांभीर्यानं घेत नाहीत. महाराष्ट्रात आम्ही सर्व सण साजरे करतो, रामनवमी, हनुमान जयंती आणि गुढीपाडवा साजरा करतो. भाजपाला आता राणा दांपत्यासारख्या बंटी आणि बबलीची आपल्या मार्केटिंगसाठी आवश्यक पडते अशी परिस्थिती आहे. मुंबईचे पोलीस आणि शिवसैनिक सक्षम आहे. भारतीय जनता पक्षाला आता मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड फिल्मस्टार्सची गरज पडली आहे."

दरम्यान पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याशी चर्चा केली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याबाबत चर्चा झाली असल्याचं उपायुक्तांनी सांगितलं.

राणा यांची मातोश्रीवर आंदोलन करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही.

2020 च्या ऐन दिवाळीत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाचा पवित्रा घेतला. शेतकऱ्यांचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुंबईत 'मातोश्री' वर धडक देण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

पण, पोलिसांनी त्यांना अमरावतीतच ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे आता काय होतंय यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)