उदगीर साहित्य संमेलन : भाऊ कदमचं रॉकस्टार स्टाइल स्वागत, पुस्तकप्रेमी शरद पवार अन् सासणेंचं भाषण - ब्लॉग

उदगीर
फोटो कॅप्शन, संमेलनादरम्यानचे क्षण
    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी, उदगीर साहित्य संमेलनातून

डिसेंबर महिन्यात नाशिकमध्ये 94 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले असताना एप्रिल महिन्यात उदगीरमध्ये होणाऱ्या संमेलनाला कोण येईल असा प्रश्न माझ्यासकट अनेकांना पडला होता, पण जेव्हा उदगीरच्या वेशीपासूनच स्वागताच्या कमानी लागलेल्या पाहिल्या तेव्हा मात्र अशी आशा मनात जागी झाली की स्वागताची तयारी जोरदार केली आहे म्हणजे लोकही भरपूर येतील.

21 तारखेला संमेलनस्थळावर पोहचल्यावर तिथे असलेली गर्दी पाहून सुखद धक्का बसला. अगदी मुंगी शिरायला देखील जागा नव्हती. साहित्य संमेलनात असा प्रघात असतो की दिवसा साहित्यावर चर्चा होते आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होतो. 21 तारखेला भाऊ कदम यांचा समावेश असलेला 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम होता. भाऊ कदम यांना पाहण्यासाठी लोक आतूर झाले होते. उदगीरकरांनी भाऊ कदम यांचं स्वागत एखाद्या रॉकस्टारप्रमाणे केलं.

भाऊ कदम यांना स्टेजवर पाहून लोक शिट्ट्या वाजवत होते, 'भाऊ कदम-भाऊ कदम' असं चीअर अप करत होते. अनेकांना वाटेल की ही गर्दी तर मनोरंजनासाठी झाली असेल पण एका मराठी कलाकारासाठी जर लोक येत असतील तर ही देखील सुखद बाबच आहे असं मला वाटतं. कारण एखाद्या मराठी कलाकारासाठी बेभान झालेले लोक तर मी पहिल्यांदाच पाहिले.

दुसऱ्या दिवशी सकाळीच ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. भारतीय संविधान, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, महात्मा फुलेंची पुस्तकं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं घेऊन ही ग्रंथदिंडी शहराच्या मध्यवर्ती भागातून निघाली. हजारोंच्या संख्येनी उदगीरकरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. शहरातील बहुतेक सर्व शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या ग्रंथदिंडीत सहभाग घेतला.

साहित्य संमेलन

शाळातल्या मुला-मुलांनी सुंदर ड्रेस परिधान करून या दिंडीत सहभाग घेतला. कुणी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती तर कुणी गांधीजींची, महात्मा बसवेश्वर, राणी लक्ष्मीबाई अशा विविध वेशभूषा करून ही मुलं उत्साहात भारत माता की जयच्या घोषणा देत निघाली.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत इतका मोठा कार्यक्रम या शहरात संपन्न झाला नसेल त्याची सर्व उणीवच या संमेलनाने भरून निघाली असं वाटलं.

विद्रोही साहित्य संमेलन

फोटो स्रोत, Tushar kulkarni

उदगीर हे शहर अंदाजे एक लाख लोकसंख्येचं आहे. या ठिकाणी अ-वर्ग नगर परिषद आहेत आणि या ठिकाणी 33 नगरसेवक आहेत यावरून तुम्हाला शहराचा अंदाज येईल. उदगीरचा किल्ला हा तर शहराचा मानबिंदू आहे. याच किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरीला होती.

22 तारखेला सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. उद्घाटन सोहळ्याला देखील प्रचंड प्रमाणात गर्दी होती. 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाला जितकी होती तितकी नसेल पण मंडपाच्या प्रवेशद्वारापर्यंत लोक उभे होते यावरून आपल्याला अंदाज येईल की लोक या कार्यक्रमाबद्दल किती उत्सुक होते.

तीन स्वतंत्र सभागृह, पुस्तकांसाठी प्रशस्त दालन या ठिकाणी देखील लोकांची वर्दळ पाहायला मिळाली.

उद्घाटन सोहळ्यात ज्ञानपीठ विजेते कोकणी साहित्यिक दामोदर मावजो आले होते. त्यांच्या उपस्थितीत राहण्यामुळे वाद निर्माण होईल का अशी एक अंधुकशी धाकधूक माझ्या मनात होती कारण दामोदर मावजो हे मराठी विरोधी आहेत असं काही लोकांचं मत होतं आणि त्या पार्श्वभूमीवर नेमकं काय होईल असा एक विचार मनात आला. दामोदर मावजो भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी वाचकांच्या आणि माझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.

कोकणी आणि मराठी भाषेचा ऋणानुबंध त्यांनी उलगडून दाखवला इतकंच नाही तर माणसाने व्यापक दृष्टिकोन ठेवावा हे देखील त्यांनी सांगितले.

शरद पवार हे गेल्या 6 दशकापासून सामाजिक जीवनात आहेत, त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात एका पक्षाचे प्रमुख म्हणून केली नाही, तर एक वाचकच म्हणून केली. मला पुस्तकं वाचण्याचा आणि जमा करण्याचा छंद आहे अशी त्यांची सुरुवात झाली. अनेक पुस्तकं मी वाचतो, काही पुस्तकं अपूर्ण राहतात अशी कबुली देखील त्यांनी दिली. तर काही पुस्तकांचा आशय समजून मी घेतो असं सांगून त्यांनी साहित्य रसिकांची मनं जिंकली.

शरद पवारांनी अनेक महत्त्वाच्या विषयांना हात घातला.

"विशिष्ट विचारधारेचा प्रचार ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे," असे ते म्हणाले.

"अडॉल्फ हिटलरने लिहिलेले माइन काम्फ हे त्याचे अत्यंत भयानक उदाहरण आहे असे मी समजतो. कुठल्याही विचारधारेचा विरोध नसावा ही बाब मान्य आहे पण त्या विचारधारेत लॉजिक असावे आणि इतरांच्या संस्कृतीचा देखील त्यातून सन्मान व्हावा."

ग्रंथदिंडी

साहित्य आणि राजकारणात समन्वय हवा, माध्यमांचा कॉर्पोरेट पद्धतीने वापर या मुद्दांना त्यांनी हात घातला. त्याच बरोबर त्यांनी हा प्रश्न तिथे उपस्थित असलेल्या आयोजकांना आणि श्रोत्यांना विचारला की या ठिकाणी महिला का कमी आहेत?

"1878 ला साहित्य संमेलन सुरू झाले. तेव्हापासून ते 1961 पर्यंत एकही महिला साहित्यिक या संमेलनाची अध्यक्ष बनली नाही. पुढे शांता शेळके, अरुणा ढेरे यांनी हे पद भूषवले पण आता आपण या मंडपात पाहिले तर लक्षात येईल की या मंडपात 10 टक्के देखील महिला नाहीत.

"जर त्यांना समान संधी नसेल, त्यांचा सन्मान होत नसेल तर त्या का येतील. याचा देखील विचार व्हायला हवा," असं पवार म्हणाले.

आवश्यकता भासल्यास साहित्य मंडळाने आपल्या घटनेत बदल करावा आणि किमान पाच संमेलनानंतर किमान एक तरी महिला अध्यक्ष असावी अशी महत्त्वाची सूचना त्यांनी वडीलकीची नात्याने केली.

शरद पवारांच्या भाषणानंतर मला आतुरता होती ती अध्यक्षीय भाषणाची. भारत सासणेंचे साहित्य धीरगंभीर आणि गूढ समजलं जातं, तसंच त्यांचं भाषण देखील गूढ होतं असंच वाटलं. जसं कवी कहता है म्हटलं जातं तसं ते स्वतःला की साहित्यिकांना लेखक असं संबोधित असावं असंच मला सुरुवातीला वाटलं. पण नंतर त्यांची स्टाइल लक्षात आली आणि भाषण ऐकत गेलो.

'एक हजार काबिल आदमी के मर जाने से इतना नुकसान नही होता, जो एक अहमक के साहिबे इख्तियार होने से होता है.' याचा अर्थ त्यांनी सांगितला की लष्करातले हजार अधिकारी मेले तरी नुकसान होत नाही, परंतु एखाद्या विदुषकाला अधिकार प्राप्ती झाल्यामुळे नुकसान होते असं मत त्यांनी मांडलं. त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही की कुणाचा संदर्भ दिला नाही. पण गंमत अशी झाली की ज्याच्या मनात जो विदूषक वाटतो त्यावरच त्यांनी हा हल्ला केला असं वाटलं.

काही माध्यमांनी थेट सांगितलं की त्यांनी नाव न घेता या राजकारण्यावर टीका केली. जे ते बोललेच नाही त्याची जबाबदारी त्यांच्या शिरावर का टाकली गेली असा प्रश्न मला पडला. त्यांचे भाषण पूर्ण ऐकलं तर लक्षात येईल की त्यांचे भाषण विचार करायला लावणारे होते. त्यांच्या भाषणाचा सुरुवातीलाच ते म्हणाले की मी का लिहितो हा प्रश्न वारंवार स्वतःला विचारतो. त्यांचे भाषण अंतर्मुख करणारे आणि एकूणच समग्र समाजाला आणि समाजाच्या भूमिकेला प्रश्न विचारणारे होते.

ते म्हणाले, लेखकाने सत्य मांडले पाहिजे आणि त्याचबरोबर त्याने सत्य निर्भिडपणे मांडले पाहिजे.

आज सर्वत्र एक चतुर मौन पसरले आहे असं ते म्हणाले. ज्या ठिकाणी अन्याय होत आहे त्याबाबत कुणीच काही बोलताना दिसत नाही हे एक चतुर मौन आहे. या मौनात भीती आहे, दहशत आहे, प्रलोभन आहे आणि विनाश आहे हे देखील ते म्हणाले.

'आज ज्या गोष्टी दिसत आहे त्याबद्दल मौन बाळगले, तर कदाचित या गोष्टी आपल्यासोबत देखील घडतील,' असा इशारा देखील त्यांनी दिला.

एखादे चांगले साहित्य हे चिरंतन टिकते असं म्हटलं जातं कारण त्यातील मूल्यं कधीच कमी होत नाहीत आणि ती काळानुरुप सुसंगत वाटतात. सासणेंच्या चाहत्यांना हे भाषण म्हणजे चिरंतन या प्रकारातलं वाटू शकतं. काही लोकांना असंही वाटेल की सासणेंना बोलायचं होतं तर त्यांनी थेट का उल्लेख केला नाही. त्यांनी तसा उल्लेख का केला नाही याचं कारण तेच सांगू शकतील पण त्यांनी सांगितलं नाही तरी त्यांच्या मताचा आदर करावा, कारण चांगल्या साहित्याचं काम हे चर्चा सुरू करणं हे आहे आणि त्यांच्या भाषणाने ही चर्चा निदान दिवसासाठी का होईना झाली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)