संजय राऊत : आर्थर रोड जेलला ‘सगळ्यात खतरनाक जेल’ का म्हणतात?

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी आर्थर रोड तुरुंग चर्चेचं केंद्र बनलं होतं. आताही संजय राऊत यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा आर्थर रोड तुरुंग चर्चेत आलंय.
आर्थर रोड कारागृह वेगवेगळ्या निमित्तानं चर्चेत असतं. मुंबईत दहशतवादी हल्ला करणारा आरोपी अजमल आमीर कसाब आणि 1993 मुंबई स्फोट खटल्याची सुनावणी आर्थररोड जेलमध्येच सुरू होती.
अनेक कुख्यात गुंड, त्यांचे शार्पशूटर, मोक्काअंतर्गत अटक करण्यात आलेले सराईत गुन्हेगार इत्यादी गुन्हेगारी विश्वातील कुख्यात लोक या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.
भारतातील सुरक्षित तुरुंगांपैकी एक तुरुंग म्हणून आर्थर रोड तुरुंगाची ओळख आहे. पण मुंबईतील हे अत्यंत सुरक्षित मानलं जाणं तुरुंग कसं आहे? या तुरुंगाबाबतच्या महत्त्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
1) आर्थररोड जेल कधी बांधण्यात आलं?
ब्रिटीश राजवटीत 1925-26 मध्ये आर्थर रोड जेल बांधण्यात आलं.
सर जॉर्ज आर्थर 1842 ते 46 या काळात बॉम्बे (आताचं मुंबई) प्रांताचे गव्हर्नर होते. त्यांच्या नावानंच या तुरुंगाचं नामकरण करण्यात आलंय.
पुढे 1970 मध्ये या मुख्य रस्त्याचं नाव साने गुरूजी मार्ग करण्यात आलं.
आर्थर रोड जेल सुरुवातीला दोन एकर जागेत बांधलं होतं. मात्र, आरोपींची वाढती संख्या लक्षात घेता नवीन बरॅक तयार करण्यात आले आणि सध्याचं आर्थर रोड जेल सहा एकर जागेवर पसरलंय.
मुंबई शहरातील हे सर्वांत मोठं जेल आहे.

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC
आर्थर रोड जेलचा इतिहास सांगताना एबीपी न्यूजचे वरिष्ठ क्राइम रिपोर्टर जितेंद्र दीक्षित सांगतात, "इंग्रजांच्या काळात आर्थर रोड जेलमध्ये सामान्य आरोपींसोबत ब्रिटिशांच्या विरोधात बंड पुकारणाऱ्यांनाही कैद केलं जायचं."
आर्थर रोड जेलचं खरं नाव 'मुंबई सेंट्रल प्रिझन' म्हणजेच 'मध्यवर्ती कारागृह' आहे. पण हे जेल पोलीस, कोर्ट आणि सामान्यांमध्ये आर्थर रोड याच नावाने जास्त प्रसिद्ध आहे.
मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी आणि मध्य रेल्वेच्या चिंचपोकळी स्टेशनपासून 10 मिनिटांच्या अंतरावर आर्थर रोड जेल आहे.
मुंबईत काम केलेले माजी पोलीस अधिकारी रोहिदास दुसार सांगतात, "त्याकाळी मुंबई बेटांचं शहर होतं. त्यामुळे आर्थर रोड जेल पुरेसं होतं. आता मुंबई शहर वाढलंय. त्यामुळे जेल कैद्यांसाठी पुरेसं नाही. जेलमध्ये मोठ्या संख्येने कैदी आहेत."
2) देशातील सर्वात 'खतरनाक' जेल?
आर्थर रोड जेलला 'अंडर ट्रायल' म्हणजे खटला सुरू असलेल्या आणि न्यायालयीन कोठडीतील कैद्यांचं जेल म्हणून ओळखलं जातं.
"आर्थररोड जेलला भारतातील सर्वात खतरनाक जेलमधील एक मानलं जातं," असं जितेंद्र दीक्षित सांगतात.
याचं कारण म्हणजे मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये दहशतवादी कारवायांच्या आरोपात अटकेत असलेले, अंडरवर्ल्ड गँग आणि इतर गंभीर गुन्ह्यातील आरोपींना कैद करण्यात आलंय.

फोटो स्रोत, Getty Images
साल 1993 मध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोटानं सुन्न झाली. मुंबईत गँगवॉर उफाळून आलं होतं. पोलिसांनी अटक केलेले 1993 बॉम्बस्फोटाचे आरोपी याच जेलमध्ये कैद होते. आजही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम, छोटा शकील, छोटा राजन आणि अरूण गवळी यांच्या गँगचे शार्पशूटर्सही आर्थररोड जेलमध्ये कैद आहेत.
दहशतवादी हल्ला, गँगस्टर्स आणि इतर गंभीर गुन्ह्यातील आरोपी कैदेत असल्याने आर्थर रोडला 'हाय सिक्युरिटी प्रिझन' म्हटलं जातं. एवढंच नाही तर फिल्मस्टार्स, अंडरवर्ल्ड डॉन, राजकारणी, नेते, उद्योगपती आणि वरिष्ठ पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांनी देखील अटक झाल्यानंतर आर्थर रोडची वारी केली आहे.
3) आर्थर रोड तुरुंगातील अंडा सेल
गंभीर किंवा दहशतवादासारख्या आरोपात अटकेत असलेल्या कैद्यांना ठेवण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये एक हाय सिक्युरिटी सेल आहे. या सेलमध्ये अत्यंत गंभीर गुन्ह्यातील आरोपीला एकटं ठेवलं जातं.

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE
आर्थर रोड तुरूंगातील हा सेल 'अंडा सेल' म्हणून प्रसिद्ध आहे.
आर्थररोड जेलचे जेलर नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, "जेलमधील हा हाय सिक्युरिटी सेल ओव्हल म्हणजे अंड्याच्या आकाराचा आहे. त्यामुळे याला अंडा सेल असं म्हणतात."
या सेलमध्ये कुख्यात गुंड, शूटर्स किंवा दहशतवादाचा आरोप असलेल्या आरोपींना ठेवलं जातं. या अंडा सेलमध्ये 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींना ठेवण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, AFP
आर्थर रोड तुरुंगात कैद्यांना ठेवण्यासाठी 14 जनरल बॅरेक, एक हाय सिक्युरिटी सेल आणि 6 स्वतंत्र बरॅक आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गेल्याकाही वर्षात जेलमधील बरॅकची संख्या वाढवण्यात आलीय.
गॅंगस्टर अबू सलेम आणि दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकरनं प्रत्यार्पण केल्यानंतर त्यांना आर्थर रोड जेलमधील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.
4) आर्थर रोड जेल आणि वाद
आर्थररोड जेलमध्ये दाऊद, राजन, गवळी आणि इतर गँगचे आरोपी कैद आहेत. वर्चस्वाच्या या लढाईत हे आरोपी नेहमीच एकमेकांसमोर येतात. या गँगमध्ये अनेकवेळा जेलमध्ये गँगवॉर झाल्याचे प्रकार घडले आहेत. 2006 मध्ये दाऊद आणि छोटा राजन गँग जेलमध्ये आमने-सामने आल्या होत्या.
जितेंद्र दीक्षित सांगतात, "जेलमध्ये कैदेत असणारे आरोपी हत्यार म्हणून जेवणाची थाळी आणि चमच्याचा वापर करतात. थाळी आणि चमचापासून हत्यार बनवतात. काही वर्षांपूर्वी दाऊदचा खास माणूस समजला जाणारा मुस्तफा डोसा आणि गँगस्टर अबू सलेम एकमेकांना भिडले होते. या हल्ल्यात अबू सलेम जखमी झाला होता."
गँगवॉरमुळे जेलच्या आत कैद्यांची हत्याही करण्यात आलीय. तर जेलमध्ये आरोपीकडे मोबाईल फोन आणि ड्रग्ज मिळाल्याच्या बातम्या सतत चर्चेत असतात. 2006 साली आर्थर रोडच्या तत्कालीन अधीक्षक स्वाती साठी यांनी ड्रग्जविरोधात मोठी मोहीम सुरू होती होती.
'मनी मॅन जेंटलमॅन. नो मनी मेंटल मॅन' अशी म्हण एकेकाळी आर्थर रोड जेलबाबत प्रसिद्ध होते, असं जितेंद्र दीक्षित सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
याचा अर्थ स्पष्ट करताना ते पुढे सांगतात की, "याचा अर्थ पैसेवाल्यांसाठी जेल हे जेल नसतं. मात्र ज्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांची अवस्था खूप वाईट होते. आर्थररोड जेलमध्ये कैदेत असलेले बाहुबली कैदी, श्रीमंत व्यक्तींच्या मुलांना जेलमध्ये त्रास देऊन त्यांच्याकडून पैसे वसूल करतात असे आरोप यापूर्वी झाले आहेत."
मात्र, जेल अधिकारी जेलमध्ये सुरक्षा योग्य प्रमाणात असल्याचा दावा नेहमीच करतात.
याच जेलमध्ये बलात्काराच्या आरोपात अटकेत असलेला अभिनेता शायनी आहुजाही कैद होता.
जेल अधिकारी सांगतात, "हायरिस्क आणि हाय प्रोफाईल आरोपींना वेगळं ठेवलं जातं. या आरोपींना शक्यतो एकत्र येऊ दिलं जात नाही. जनरल बॅराकमधील कैद्यांना हाय सिक्युरिटीमध्ये जाऊ दिलं जात नााही."
जेलमध्ये होणाऱ्या गँगवॉरबद्दल बोलताना राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित सांगतात, "जेलमध्ये गँगवॉरसारख्या घटना घडतात. त्यामुळे विविध गँगच्या कैद्यांना विविध ठिकाणच्या जेलमध्ये ठेवलं पाहिजे. जेणेकरून हे कैदी आमने-सामने येणार नाहीत."
5) 'आर्थर रोड जेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत'
आर्थर रोड जेलची एकूण क्षमता 800 कैद्यांची आहे.
आर्थर रोड जेलचे अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, "या जेलची क्षमता जरी 800 कैद्यांची असली तरी, जेलमध्ये साधारणत: 3000 पेक्षा जास्त कैदी बंद आहेत."
आर्थर रोड जेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याचा मुद्दा अनेकवर्ष उपस्थित होत होता. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने नवी मुंबईत तळोजामध्ये नवीन तुरुंग बांधल्यानंतर आर्थर रोड जेलमधील कैद्यांची संख्या कमी झाली. पण अजूनही क्षमतेपेक्षा जास्त कैदी तुरूंगात कैद आहेत.
राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित म्हणतात, "मुंबई, ठाणे या परिसरातील जेलमध्ये खूप मोठ्या संख्येने कैदी आहेत. याच्या तुलनेत राज्याच्या इतर जेलमध्ये कैद्यांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे मोठ्या शहरातील कैद्यांना बाहेरच्या तुरुंगात पाठवलं पाहिजे."
क्षमतेपेक्षा जास्त कैदी तुरूंगात असले की त्यांची योग्य काळजी घेतली जात नाही, असा आरोप वारंवार केला जातो.
6) 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी
मुंबईच्या आर्थररोड जेलमध्ये तब्बल 12 वर्ष मुंबई बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी सुरू होती. याच काळात अटकेत असलेला अभिनेता संजय दत्त आर्थर रोड तुरुंगातच कैदेत होता.
सुरक्षेच्या कारणामुळे मुंबई बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी करणाऱ्या टाडा कोर्टाचं कामकाज आर्थर रोड जेल परिसरात तयार करणाऱ्या विशेष न्यायालयातून सुरू होतं.
न्यायमूर्ती कोदे यांनी या खल्यात संजय दत्तसह 100 आरोपींना शिक्षा सुनावली होती. हे सर्व आरोपी आर्थररोड जेलमध्येच कैद होते.
7) अजमल कसाबसाठी बनवण्यात आलं स्पेशल कोर्ट
2008 मध्ये मुंबईवर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. यात दहशतवादी अजमल आमीर कसाबला अटक करण्यात आलं. अजमल कसाबलाही आर्थर रोड तुरुंगात अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, SABASSTIAN D'SOUZA
सुरक्षेच्या कारणास्तव अजमल कसाबबाबत सुनावणी करणारं कोर्ट आर्थर रोड तुरुंगाच्या परिसरातच उभारण्यात आलं. कसाबसाठी एक हाय-सिक्युरिटी बॅरेकही बांधण्यात आला होता. कसाबला कोर्टात नेण्यासाठी 20 फूट लांब बोगदा बांधण्यात आला होता.
कसाबला कोर्टाने फाशीची शिक्षा दिल्यानंतर त्याला पुण्याच्या येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.
8) आर्थर रोड जेलमध्ये कैदेत असलेले राजकारणी आणि अधिकारी
महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळही महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये कैदेत होते.
तर भ्रष्टाचार आणि इतर आरोपांमध्ये अटक करण्यात आलेले पोलीस आणि सरकारी अधिकारी यांनीदेखील आर्थर रोड जेलची वारी केली आहे.
9) आर्थर रोड जेलभोवती उभ्या राहिल्या इमारती
आर्थर रोड जेल संवेदनशील जेल असल्याने जेलभोवती उभ्या रहाणाऱ्या इमारती आणि मोनो रेलचा मुद्दा मोठा गाजला होता.
आर्थर रोड जेल रहिवासी भागात असल्याने सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा होता. त्यामुळे जेलच्या सभोवताली इमारत बांधण्यासाठी सरकारने काही नियम बनवले होते. जेलजवळ असणारी इमारत किती उंच असेल, किती मीटर्सवर असेल, इमारतीमधून जेल कसं दिसेल अशा विविध मुद्यावर सरकारने नियम घालून दिले होते.
माजी पोलीस अधिकारी रोहिदास दुसार म्हणतात, "आर्थररोड जेलच्या बाजूला उंच इमारतींना परवानगी कशी मिळाली? गगनचुंबी इमारती कशा उभ्या राहिल्या? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. या इमारतींमधून जेलमध्ये काय सुरू आहे हे सर्व दिसतं."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








