आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : समीर वानखेडे म्हणतात, 'मी फक्त कायदा पाळतो, जे योग्य आहे तेच करतो'

समीर वानखेडे

फोटो स्रोत, Ani

"लोक काय बोलतात हे मी मान्य करत नाही. मी फक्त कायदा पाळतो. रूल फॅालो करतो. जे योग्य आहे ते करतो, असं स्पष्टीकरण NCB मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलं आहे.

अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. त्याच्यावरील कारवाई वानखेडे यांच्या पथकानेच केली होती. पण क्रूझवर करण्यात आलेल्या या कारवाईवर राजकीय पक्षांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होतं.

बीबीसी प्रतिनिधी मयांक भागवत यांना दिलेल्या मुलाखतीत आपल्यावरील सर्व आरोपांवर समीर वानखेडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

अटकेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, "या प्रकरणी चौकशी सुरू असल्याने जास्त काहीच बोलता येणार नाही. हे प्रकरण कोर्टात आहे. मोठ्या प्रमाणावर डृग्ज जप्त करण्यात आली आहेत. विदेशी नागरिकांनाही या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. NCB प्रोफेशनल तपास यंत्रणा आहे. कायद्यांमध्ये जे लिहिलेलं आहे त्या प्रमाणे आम्ही काम करतो."

खासगी व्यक्ती सोबत असल्याच्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले, " याबाबत मुख्यालयाकडून स्टेटमेंट देण्यात आलंय मी जास्त काही बोलणार नाही. फक्त एकच सांगतो की त्यावेळी दोन नाही तर नऊ पंच होते.

यावेळी बॉलीवूडला लक्ष्य करत असल्याचा आरोप वानखेडे यांनी फेटाळून लावला. जानेवारी महिन्यापासून आम्ही 94 केसेस केल्या. गोव्यात 11 केसेस- 300 आरोपींना अटक केली. 12 गॅंग पकडल्या. यात सप्लायर्स आहेत, असं त्यांनी सांगितलं.

गोसावींवर केस दाखल आहेत, त्याच्या अनेक बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत. तुमच्या कारवाईनंतर नेहमीच आरोप का होतात, या प्रश्नांवरही वानखेडे यांनी उत्तर दिलं.

"या प्रकरणात आम्ही माहिती दिलीये. मी एवढंच सांगेन सर्वकाही कायद्याला धरून आणि कायद्यानुसार करण्यात आलंय. काही अवैध करण्यात आलेलं नाही. याबाबत प्रश्नांची उत्तरं आम्ही कोर्टात देऊ, मी फक्त कायदा पाळतो. कायदा दोन व्यक्तींसाठी वेगळा नसतो. सर्वांसाठी कायदा समान आहे. कायदा कोणतीही भेदभाव करत नाही, असं वानखेडे यांनी म्हटलं.

शिवाय या कारवाईमुळे दबाव येतो असं आपण मानत नाही, कायदा आहे, त्याप्रमाणे कारवाई होते, असं वानखेडे यांनी स्पष्ट केलं.

काय होते नवाब मलिकांचे आरोप?

आर्यन खानवरील कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

नवाब मलिक

फोटो स्रोत, @nawabmalikncp

फोटो कॅप्शन, नवाब मलिक

मुंबईमध्ये क्रूझवर एनसीबीनं कारवाई केल्यानंतर 2 जणांना सोडण्यात आलं. यातील एक जण भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा मेव्हणा आहे. याविषयीचे सगळे पुरावे उद्या सादर करणार असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेतले मुद्दे -

  • मुंबईमध्ये क्रूझवर एनसीबीनं कारवाई केल्यानंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मीडियाला बाईट दिली होती की, आम्ही 8 ते 10 जणांना ताब्यात घेतलं आहे.
  • मी दोन दिवसांपूर्वी प्रश्न विचारला होतं की, एक अधिकारी जो संपूर्ण प्रक्रियेला मॉनिटर करतो. तो असं व्हेग स्टेटमेंट कसं करू शकतो?
  • एकतर 8 लोक असतील किंवा 10 लोक असतील. किंवा 10 जणांना ताब्यात घेतलं गेलं असेल तर दोघांना सोडण्यात आलं असेल असं मी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
  • त्याबाबतीत मी उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. ज्या दोन लोकांना सोडण्यात आलं त्यांच्याबाबतीत व्हीडिओसह पुरावे सादर करणार आहे.
  • त्या दोन लोकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा मेव्हणा आहे. भाजपच्या कोणत्या नेत्यांशी बोलल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं? समीर वानखेडे कुणाकुणाशी बोलत होते? हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)