राकेश मारिया : सतत चर्चेत आणि शेवटी वादात सापडलेल्या अधिकाऱ्याची गोष्ट

फोटो स्रोत, AFP
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
प्रशासकीय सेवांसाठीचा पर्याय निवडण्याची वेळ.
पाचही पर्यायांच्या जागी एका उमेदवाराने लिहीलं होतं - IPS
त्याला विचारण्यात आलं - तुझ्याकडून चूक झालीय का?
या उमेदवाराचं उत्तर - मला IPSच द्या. दुसरं काही नको.
या उमेदवाराचं नाव होतं - राकेश मारिया.
तब्बल 36 वर्षांच्या सेवेनंतर फेब्रुवारी 2017मध्ये राकेश मारिया निवृत्त झाले तेव्हा ते महाराष्ट्राचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणजेच पोलीस महासंचालक होते.
आपल्या संपूर्ण कारकीर्दीत राकेश मारिया वेगवेगळ्या कारणांमुळे, वेगवेगळ्या केसेसमुळे चर्चेत होते. शेवटच्या काळात वादांमुळेही चर्चेत होते.
सध्या ते चर्चेत आहेत त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आत्मचरित्रामुळे. या पुस्तकाचं नाव आहे - लेट मी से इट नाऊ
उत्कृष्ट तपास अधिकारी
1981च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असणारे राकेश मारिया त्यांनी सोडवलेल्या काही मोठ्या केसेससाठी प्रसिद्ध आहेत.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
मार्च 1993मध्ये मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट, 25 ऑगस्ट 2003ला मुंबईत गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार इथे झालेले दोन बॉम्बस्फोट, पुण्यातला जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, आणि 26/11 चा मुंबई हल्ला या सगळ्या प्रकरणांच्या तपासात राकेश मारियांची महत्त्वाची भूमिका होती.
1993साली मुंबईत झालेल्या 13 साखळी बॉम्बस्फोटांचा तपास राकेश मारियांनी केला. त्यावेळी ते ट्राफिक विभागाचे डेप्युटी कमिशनर म्हणजेच पोलीस उपायुक्त होते.
माटुंग्यामध्ये पोस्टिंग असणाऱ्या मारियांचा खरंतर त्यावेळी गुन्हे तपासाशी थेट संबंध नव्हता.

फोटो स्रोत, Getty Images
12 मार्चला मुंबईतल्या 13 विविध ठिकाणी 13 बॉम्बस्फोट एकामागोमाग एक झाले. त्याचवेळी दादर पूर्वेतल्या आपल्या क्लिनिकसमोर निळ्या रंगाची स्कूटर बऱ्याचवेळापासून उभी असल्याचं सांगणारा डॉ. जयचंद मंदोत यांचा फोन माटुंगा पोलीस स्टेशनला आला.
ज्या ठिकाणी ही स्कूटर होती ती जागा स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर होती. मारियाच्या नेतृत्त्वाखालचं एक पथक या ठिकाणी पोहोचलं आणि या स्कूटरमध्ये स्फोटकं असल्याचं उघडकीला आलं.
वरळीमध्येही पोलिसांना स्फोटकांनी भरलेली एक व्हॅन सापडली. ही व्हॅन होती माहिममधल्या अल्- हुसैनी इमारतीत राहणाऱ्या रुबिना मेमन यांच्या नावावर.
मारियांच्या नेतृत्त्वाखालचं पथक मेमन यांच्या घरी पोहोचलं तेव्हा घराला कुलुप होतं. दरवाजा तोडून या घरात शिरल्यावर मारियांना दादर स्टेशनबाहेर पार्क असलेल्या त्या निळ्या स्कूटरची चावी सापडली. यावरूनच पुढे या स्फोटांशी असणारा टायगर आणि याकूब मेमनचा संबंध उघडकीला आला.
वाहतूक शाखेतल्या राकेश मारियांनी अशाप्रकारे बॉम्बस्फोटांचा उलगडा केला.
त्यानंतर मग महाराष्ट्र सरकारने त्यांच्यासाठी म्हणून खास पोलीस उपायुक्त (तपास) (Deputy Commissioner of Police - Detection) या पदाची निर्मिती केली आणि सगळा तपास त्यांच्याकडे सोपवला.
मारियांच्या या 93च्या स्फोट तपासातल्या भूमिकेविषयी उज्ज्वल निकम सांगतात, "मारिया एक चांगले अधिकारी होते. गुन्ह्याच्या तपासात ते रस घ्यायचे. त्यांची स्मरणशक्ती चांगली होती. 1993च्या बॉम्बस्फोटांच्या वेळी त्यांची तपासकार्यात बरीच मदत झाली होती. गुन्ह्यांविषयीच्या पोलिस तपासाचा त्यांचा अनुभव फार मोठा आहे."
त्यानंतर ते मुंबईच्या गुन्हे शाखेचे आधी उपायुक्त आणि नंतर सह-आयुक्त (Joint CP -Crime) झाले.
मुंबई आणि परिसरातल्या माफियाची दहशत मोडून काढण्यात राकेश मारियांचा मोठा वाटा आहे. अरूण गवळीसह इतर अनेक गँगस्टर्सना त्यांनी तुरुंगात धाडलं.
एटीएस - म्हणजेच दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख असताना मुंबईत गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा छडा त्यांनी 24 तासांत लावला आणि हनीफ सय्यद, त्याची पत्नी फहिम्दा आणि अश्रत अन्सारीला अटक करण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images
2008 मध्ये मुंबईत झालेल्या नीरज ग्रोव्हर हत्याकांडाने खळबळ उडाली. यामध्ये नीरज ग्रोव्हरची हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे-तुकडे करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपासही मारियांनीच लावला आणि त्यानंतर मारिया सुसाईराज आणि तिचा बॉयफ्रेंड एमिल जेरोम मॅथ्यू यांना अटक करण्यात आली.
26/11च्या हल्ल्यादरम्यान जिवंत पकडण्यात आलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबची सर्वांत पहिल्यांदा चौकशी राकेश मारियांनीच केली होती. त्यानंतर कसाब कस्टडीत असताना आपण जवळपास रोज कसाबची चौकशी करत होतो असं स्वतः मारियांनीच त्यांच्या 'लेट मी से इट नाऊ' या पुस्तकात म्हटलंय.
हा हल्ला घडत असताना राकेश मारिया कन्ट्रोल रूममधून परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. त्यांच्याकडूनच योग्य वेळेत मदत न पोहोचल्याने करकरे, कामटे आणि साळसकरांचा मृत्यू ओढावल्याचे आरोप त्यांच्यावर झाले होते.
26/11च्या हल्ल्यांचा संपूर्ण तपास हा मारियांच्या नेतृत्त्वाखाली झाला आणि 2012मध्ये कसाबला फाशी देण्यात आली.
राकेश मारियांची खासियत सांगताना पत्रकार प्रीती गुप्ता म्हणतात, "मारियांचं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्यं म्हणजे त्यांची स्मरणशक्ती. त्यांना केसच्या संदर्भासाठी कधी नोट्स पहाव्या लागल्या नाहीत. सगळं त्यांच्या लक्षात असायचं. 50 नावं तुमच्या - माझ्या लक्षात राहणार नाहीत. पण त्यांना तीच 50 आरोपींची नावं सांगितली तर ती त्यांच्या लक्षात असतील. दुसरी खासियत म्हणजे गुन्हे उलगडण्याची त्यांची पद्धत. अत्यंत काळजीपूर्वक, प्रत्येक बारकाव्याकडे लक्ष देत ते केस सोडवत. आरोपींची चौकशी करण्याची त्यांची पद्धत अगदी युनिक आहे. आधी ते पूर्ण बोलण्याची मोकळीक देतात. आणि आपण आता यांना जवळपास बगल दिली असं आरोपींना वाटत असतानाच ते त्याला एखाद्या मुद्द्यावरून नेमकं पकडत आणि मग स्वतःला अपेक्षित माहिती त्या व्यक्तीकडून काढून घेत."
शीना बोरा प्रकरण
राकेश मारियांच्या सेवेच्या शेवटच्या काळात घडलेला हा वाद. मीडिया चॅनलचे मालक असणाऱ्या पीटर आणि इंद्राणी मुखर्जींवर इंद्राणींची मुलगी शीना बोराची हत्या केल्याचा आरोप होता.
राकेश मारियांनी या हत्याकांडाच्या तपासात विशेष रस घेतल्याचे आरोप झाले. यावेळी राकेश मारिया मुंबईचे पोलीस आयुक्त होते तर देवेन भारती कायदा आणि सुव्यवस्था सहआयुक्त होते.
मारिया स्वतः या तपासावर लक्ष घालत होते. मुंबईतल्या खार पोलीस स्टेशनमध्ये ते तासन् तास पीटर मुखर्जींची चौकशी करत.

फोटो स्रोत, Getty Images
पण हा तपास सुरू असतानाच अचानक राकेश मारियांची 8 सप्टेंबर 2015 रोजी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तडकाफडकी बदली करण्यात आली.
आणि त्यांची पोलीस महासंचालक (DG) पदावर नेमणूक करण्यात आली. सत्यपाल सिंह यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने हे पद रिक्त झालं होतं.
मारियांची बदली 'ड्यू' होती आणि डीजीचं पद हे ज्येष्ठतेनुसार त्यांचं होतं असं यामागचं कारण सांगण्यात आलं.
मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून जावेद अहमद यांची नियुक्ती करण्यात आली. पण त्यावरूनही वाद झाला कारण जावेद अहमद हे मारियांना IPSमध्ये 1 वर्षं ज्येष्ठ आहेत.
आपल्या पुस्तकामध्येही मारियांनी या बदली प्रकरणाविषयी लिहीलंय. या बदलीमागे मंत्रालयातले ज्येष्ठ अधिकारी होते आणि त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिल्याचा आरोप मारियांनी केलाय.
राकेश मारिया लिहीतात, "मी मुखर्जींना ओळखतो असा खोटा प्रचार करण्यात आला. मी केलेल्या तपासाबद्दल संशय निर्माण करण्यात आला. मी त्यांना ओळखत नाही असं मी तेव्हाही स्पष्टपणे सांगितलं होतं. पण संशयाचं वातावरण कायम होतं. माझ्या जागी आलेले जावेद अहमद हे मुखर्जींना चांगलं ओळखतात हे मी गेल्यानंतर आठवड्याभराने समोर आलं. जावेद यांनी या मुखर्जी दांपत्याला ईदच्या पार्टीचं निमंत्रणही दिलं होतं. ही गोष्ट (तेव्हाचे) मुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) आणि गृहमंत्रालयाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना यांना माहित नव्हती का?"
मारिया यांनी केलेल्या या आरोपांबाबात बीबीसीनं जावेद अहमद यांच्याकडे विचारणा केली, पण त्यांनी त्यावर कुठलही उत्तर देणं टाळलं आहे.
कारकीर्दीतील नेमणुका
राकेश मारियांविषयी सांगितली जाणारी आणखी एक गोष्ट म्हणजे शहरी भागांतल्या त्यांच्या नेमणुका. त्यांच्या सोबतच्या इतर IPS अधिकाऱ्यांच्या तुलनेत राकेश मारियांचा बहुतेक कार्यकाळ शहरी भागांमध्ये गेला.
त्यांच्या सगळ्या महत्त्वाच्या नेमणुका या मुंबईतच होत्या. शरद पवारांचा मारियांवर वरदहस्त होता आणि मारियांची भरभराट काँग्रेस-एनसीपी सत्तेत असतानाच झाली असंही म्हटलं जातं.
राकेश मारियांनी पोलीस दलांत इतकी महत्त्वाची पदं भूषवूनही त्यांचे आयबी (IB) आणि रॉ (RAW) मध्ये फारसे चांगले संबंध नव्हते. या संस्थांमधल्या अधिकाऱ्यांसोबत त्यांचे कायमच औपचारिक संबंध राहिले. त्यामुळे अनेकदा त्यांना या संस्थांचं फारसं पाठबळ मिळालं नाही.
पत्रकारांच्या दृष्टीकोनातून
राकेश मारियांविषयी बोलताना माजी क्राईम रिपोर्टर तोरल वारिया सांगतात, "पोलीस अधिकाऱ्यांचे नेहमीच काही गँगमधले खबरी असतात. राकेश मारियांचं खबऱ्यांचं नेटवर्क चांगलं होतं, विशेषतः दाऊद इब्राहिम गँगमध्ये.
शिवाय त्यांचे साळसकरांशीही संबंध चांगले होते आणि साळसकरांचंही ग्राऊंड नेटवर्क चांगलं होतं. ते गुन्ह्यांचा तपास करताना अगदी हार्डकोअर पद्धतीने तपास करत नसत. ते आधी त्यांच्या खबऱ्यांच्या नेटवर्ककडून प्राथमिक माहिती आणि धागेदोरे मिळवत. आणि त्यातून ते प्रकरणाचा छडा लावत. अगदी मुळापर्यंत जाऊन ते तपास करत.
प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्यावर त्यांचा विश्वास होता. शिवाय 'इंटरोगेशन' करणं त्यांना आवडायचं. म्हणून अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी स्वतः आरोपींची उलटतपासणी घेतलेली आहे. बहुतेकदा तपास अधिकारी, पीएसआय किंवा सीनियर पीआय इंटरोगेशनचं काम करतात. पण मारियांना स्वतः उलटतपासणी करायला आवडायचं."

तोरल पुढे सांगतात, "मारियांची आणखी एक खासियत ते प्रत्येक लहानसहान गोष्टीची नोंद करून ठेवत. त्यांच्या लाल - निळ्या रंगाच्या डायऱ्या होत्या आणि त्यात अगदी बारीकसारीक तपशीलाच्या नोंदी असत. त्यांचा 'इन्व्हेस्टिगेटर माईंडसेट' होता. त्याकाळी कंप्युटर्सही नव्हते. म्हणजे 93च्या स्फोटांच्यावेळी RDX बद्दल कोणाला माहिती नव्हतं. तेव्हा मारियांनी त्याविषयीची नोंद करून ठेवली होती. तारखेनुसार ते प्रत्येक केसच्या नोंदी करून ठेवत. ती त्यांची सवय होती."
फिल्मी जगत आणि मारिया
राकेश मारियांचे वडील विजय मारिया हे फाळणीनंतर भारतात आले. सिनेमांमध्ये हिरो होण्याचं स्वप्न घेऊन ते मुंबईत आले. आणि नंतर चित्रपट निर्माते झाले. त्यांच्या 'कला निकेतन' या निर्मिती संस्थेने काजल, नील कमल सारख्या सिनेमांची निर्मिती केली.
तर बॉलिवुडच्या काही सिनेमांमध्ये मारियांवर आधारित पात्रं दाखवण्यात आलेली आहेत. 1993च्या बॉम्बस्फोटांवर आधारित अनुराग कश्यपच्या 'ब्लॅक फ्रायडे' सिनेमात के. के. मेनन यांनी मारियांची भूमिका वठवली आहे.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)










