उद्धव ठाकरेंचा टोला, 'गावचा सरपंच कोण अन् देशाचा पंतप्रधान कोण हेच कळत नाही'

फोटो स्रोत, Getty Images
"गावचा सरपंच कोण अन् देशाचा पंतप्रधान कोण हेच कळत नाही," अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. भाजपच्या होर्डिंगवर केवळ एकच चेहरा दिसतो त्यावरुन त्यांनी हा टोला लगावला.
कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन सभा घेतली. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्त ते बोलत होते.
ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. त्याचप्रमाणे काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या सभेवरून व त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेला त्यांनी यावेळी प्रत्युत्तर दिलं आहे.
यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "फक्त बाळासाहेब ठाकरेंचाच नव्हे. अटलजींचाही फोटो होता. नरेंद्र मोदींचाही फोटो होता. तुम्ही ही परिस्थिती निर्माण केली. तुम्हाला जर हिंदूहृदय सम्राटांबद्दल प्रेम असेल तुम्हीच त्यांच्या नावासमोर जनाब असं लावण्याचा नीच प्रयत्न केला नसता."
"अडवाणींनी यांना भगवी निष्ठा दाखवून दिली. आज आमच्या हृदयात शिवसेनाप्रमुख आहेतच. पण तुमच्या होर्डिंग्जवरचे बाकीचे नेते कुठे गेले? सरपंचाला पण एकच फोटो, पंतप्रधानाला पण एकच फोटो, तुमच्या होर्डींग्जवर ना अटलजींचा पत्ता ना आडवाणींचा पत्ता, म्हणजे आम्हाला कळतच नाही की हा गावचा सरपंच आहे की देशाचा पंतप्रधान," अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर तोफ डागली.
"भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. भाजपाची साथ सोडली म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही. भाजपासारखी आम्ही छुपी युती करत नाही, आम्ही समोरून वार करतो," असं ठाकरे म्हणाले.

फोटो स्रोत, @Dev_Fadnavis
"हिंदुहृदय सम्राटांनी निर्माण केलेली शिवसेना आता राहिलेली नाही," असं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस म्हणाले होते, त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "देशात भाजपाने बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फसला, लोकांनी झिडकरला.
"हिंदू हृदयसम्राट म्हणल्यावर नाव आणि चेहरा एकच येतो, तो म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते होऊ शकत नाहीत. हिंदू अडचणीत असताना घरी बसणारे आणि नंतर त्यावर प्रतिक्रिया देणारे हे प्रतिक्रिया सम्राट होऊ शकतात, पण हिंदुसम्राट होऊ शकत नाहीत," असं ठाकरे म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








