राज ठाकरे म्हणाले मंगळवारच्या सभेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील- वसंत मोरे

वसंत मोरे

फोटो स्रोत, Facebook/Vasant More

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी

राज ठाकरेंबरोबरची भेट यशस्वी झाली आहे. मी पूर्ण समाधानी होऊन जात आहे असं मनसे नेते वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. भोंग्याच्या मुद्यावरून वसंत मोरे नाराज झाल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

भेट झाली झाली असून मी समाधानी आहे. मंगळवारी ठाण्याच्या सभेत बोलावल्याचं मोरे यांनी सांगितलं. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं याच सभेत मिळतील असं राज ठाकरे यांनी सांगितलं असं मोरे म्हणाले.

मी मनसेचा कार्यकर्ता असून इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी मनसेतच राहणार असं मोरे यांनी स्पष्ट केलं. मोरे यांनी राज ठाकरेंबरोबरच्या भेटीचा फोटोही शेअर केला. या फोटोत नवनियुक्त पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबरही उपस्थित आहेत.

'मला माझ्या भागात शांतता हवी आहे' असं म्हणणारे मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे सध्या चर्चेत आहेत.

राज ठाकरेंनी शिवतीर्थावर केलेल्या भाषणामध्ये मशिदींवरील भोंगे काढले नाही तर त्याच्यापेक्षा मोठ्या आवजाचे स्पीकर लावण्याचा 'आदेश' मनसैनिकांना दिला होता. परंतु वसंत मोरे यांनी त्यांच्या प्रभागामध्ये स्पीकर लावणार नाही असं म्हणत एकप्रकारे राज ठाकरेंच्या आदेश पाळायला नकार दिला.

वसंत मोरे यांनी त्यांची भूमिका मांडल्यानंतर दोनच दिवसात त्यांना शहराध्यक्ष पदावरुन काढून टाकण्यात आलं. मोरेंचे सभागृहातील सहकारी साईनाथ बाबर यांना शहराध्यक्ष करण्यात आलं. पुणे मनसेतील धुसफूस अनेकदा मोरे यांनी बोलून दाखवली आहे. पक्षातील काही नेते आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकांवर आक्षेप घेत वेळोवेळी आपली नाराजी त्यांनी राज ठाकरेंकडे सुद्धा व्यक्त केली होती.

गुरुवारी मुंबईत राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला मोरे यांना बोलावण्यात आलं नाही, त्याचबरोबर कुठलिही पूर्वसूचना न देता त्यांना अचानकपणे शहराध्यक्ष पदावरुन देखील काढून टाकण्यात आलं. त्यानंतर बीबीसी मराठीशी बोलताना मी महाराष्ट्र सैनिक म्हणून पक्षामध्ये आहे आणि राहणार असं ते म्हणाले होते.

''शहराध्यक्ष पदावरुन का काढून टाकण्यात आलं हे मी इतर पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेईन परंतु लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या भागामध्ये मला शांतता हवी हीच माझी भूमिका असणार आहे. ज्या भागामध्ये मी निवडून येतो तो मुस्लिम बहूल भाग आहे त्या लोकांशी माझे जवळचे संबंध आहे. त्या लोकांचे मला फोन आले काही लोक मला भेटायला आले. त्यांनी त्यांची चिंता बोलून दाखवली आणि त्यातून मी असे स्पीकर लावणार नाही अशी भूमिका घेतली. त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे त्यामुळे मी भावनिक होऊन व्यक्त झालो'' असं देखील ते बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.

वसंत मोरे

फोटो स्रोत, Facebook/Vasant More

वसंत मोरे यांच्या भूमिकेचं अनेक राजकीय पक्षांकडून स्वागत करण्यात आलं. राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस, भाजप या पक्षांकडून त्यांना पक्षात येण्याचं निमंत्रण सुद्धा आलं. मोरे यांना पदावरुन काढून टाकण्यात आल्यानंतर मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी देखील राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिला.

वसंत मोरे कोण आहेत?

पांढरा शुभ्र सदरा, कपाळावर टिळा असा पेहराव असणाऱ्या वसंत मोरे यांना त्यांचे समर्थक 'तात्या' म्हणून हाक मारतात. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या स्थापनेपासून वसंत मोरे पक्षाशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्या गाडीवर त्यांनी 'राजसमर्थक' असं लिहीलं होतं. राज ठाकरेंच्या जवळचे आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून वसंत मोरे ओळखले जातात.

मनसेकडून लढवण्यात आलेल्या पुणे महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत वसंत मोरे कात्रजमधून निवडून आले. त्यानंतर सलग तीन निवडणुका ते जिंकत आले आहेत. 2017 च्या भाजपाच्या लाटेत देखील वसंत मोरे हे निवडून आले होते. वसंत मोरे यांना शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. सामाजिक क्षेत्रात लोकांसाठी काहीतरी करायला हवं या भावनेतून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

वसंत मोरे

फोटो स्रोत, Facebook/Vasant More

निवडून आल्यानंतर 2007 ते 2009 या काळात ते स्थायी समितीचे सदस्य होते, 2009 ते 2010 या काळात शहर सुधारणा समितीत देखील त्यांनी काम केले. 2012 ते 2014 मध्ये ते पुणे महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेते होते. 2021 मध्ये राज ठाकरे यांनी त्यांची पुणे शहराध्यक्ष म्हणून निवड केली होती.

वसंत मोरे यांच्यावर विविध 11 गुन्हे दाखल आहेत. कोव्हिड काळात महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या गाडीची काच फोडण्याचे प्रकार असोत की अपंग व्यक्तीची गाडीला पोलिसांनी लावलेला जॅमर हातोड्याने तोडणं असो. मोरे यांच्या आक्रमक शैलीमुळे अनेक तरुणांचं देखील त्यांना समर्थन मिळत गेलं.

मोरे यांनी जेव्हा महापालिकेच्या अधिकाऱ्याची गाडी फोडली होती

कोरोनामध्ये निधन झालेल्या नातेवाईकाचे पार्थिव नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने वसंत मोरे यांनी महापालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली होती. मोरे यांनी रुग्णालयातून मृतदेह नेण्यासाठी पालिकेच्या वाहन आगारातून रुग्णवाहिका मागवली होती. वारंवार फोन करुन देखील रुग्णवाहिका येण्यासाठी साडेतीन तास लागले होते. त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी महापालिकेच्या वाहन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन उदास यांची शासकीय गाडी फोडली होती.

वसंत मोरे

फोटो स्रोत, Facebook/Vasant More

'रुग्णांना रुग्णवाहिका मिळेना आणि तुम्ही अधिकारी गाडीत कसे फिरता ?' असं म्हणत लाकडी दांडक्याने त्यांनी महापालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली होती. नगरसेवकांच्या नातेवाईकांची अशी अवस्था असेल तर सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

...आणि थेट वसंत मोरे आणि कार्यकर्ते पीपीई किट घालून पालिकेत दाखल झाले

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. पुण्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. त्यात पुणे महानगरपालिकेने कोरोनामुळे जे रुग्ण घरी मृत्यूमुखी पडतील त्यांचा अंत्यविधी त्याच्या घरच्यांनीच करावा असा निर्णय जाहीर केला होता. महापालिका नातेवाईकांना पीपीई किट देत होती. या पालिकेच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुणे मनपा प्रशासनाची प्रतिकात्मक प्रेत यात्रा मोरे यांनी काढली होती. त्यावेळी वसंत मोरे आणि त्यांचे सहकारी पीपीई किट घालून थेट महापालिकेच्या आवारात दाखल झाले होते. त्यांच्या या आंदोलनाची मोठी चर्चा झाली होती.

वसंत मोरे

फोटो स्रोत, Facebook/Vasant More

त्याचबरोबर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना बेड मिळत नसल्याने वसंत मोरे यांनी एका हॉटेलच्या हॉलमध्ये 40 ऑक्सिजन आणि 40 आयसोलेशनच्या बेडचे हॉस्पिटल सुरु केले होते. जेव्हा त्यांच्या हॉस्पिटलला रेमडिसिव्हीरचा पुरवठा केला जात नव्हता तेव्हा मोरे यांनी महापालिकेत जाऊन आरोग्य अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते.

फेसबुकवरुन प्रसिद्धी

वसंत मोरे सोशल मीडियाचा वापर मोठ्याप्रमाणावर करतात. त्यांनी केलेली कामं आणि आंदोलनं याचे अपटेड आणि फेसबुक लाईव्ह ते सातत्याने करत असतात. या माध्यमातून ते जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या फेसबुक पेजला 12 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या प्रत्येक पोस्टला हजाराहून अधिक लाईक्स येतात. कधी एखादा फोटो तर कधी एखादी आक्रमक ओळ लिहून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात.

वसंत मोरे

फोटो स्रोत, Facebook/Vasant More

''राजकारणाची बदलेली दिशा पाहून त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. पुढे सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे हे त्यांनी ओळखलं आणि त्याचा चांगला उपयोग केला'' असं ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता सांगतात.

वसंत मोरेंनी भोंग्यांबाबत वेगळी भूमिका का घेतली ?

लोकप्रतिनिधी म्हणून मशिदींच्या भोंग्यांबाबत मोरे यांनी वेगळी भूमिका घेतली. या भूमिकेबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता म्हणाले, ''मोरे यांनी प्रॅक्टिल भूमिका मांडली आहे. मोरे ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतात त्या भागात मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेची माझ्या प्रभागात अडचण होईल हे त्यांनी प्रांजळपणे मान्य देखील केलं. पोटाला जात आणि धर्म नसतो असं देखील मोरे म्हणतात. त्यांच्या चुकलेल्या निर्णयांची देखील ते जाहीर कबुली देतात हा गुण राजकारणात कमी दिसून येतो.''

लोकमत पुणेचे वृत्तसंपादक अविनाश थोरात म्हणाले, ''मोरे हे कात्रज ग्रामपंचायत असल्याच्या काळापासून ते नागरी प्रश्नांवर काम करत होते. पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांनी स्वतःचा मतदारसंघ बांधला. मनसेच्या सुरुवातीच्या काळात अनेक मुस्लिम कार्यकर्ते या परिसरात होते. या भागात मुस्लिम मतदारही लक्षणीय आहे. विकास कामांच्या माध्यमातून मोरे यांनी त्यांना जोडले आहे. त्यामुळे मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न आला तेव्हा निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम मतदारांना नाराज करणे मोरे यांना परवडणारे नाही. त्यामुळे त्यांनी राज ठाकरेंपेक्षा वेगळी भूमिका घेतली.''

वसंत मोरे पुढे काय निर्णय घेतील?

वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरुन काढून टाकल्यानंतर सर्वच पक्ष त्यांना पक्षात घ्यायला उत्सुक आहेत. वसंत मोरे मी राज ठाकरेंचा मनसैनिक म्हणूनच राहणार असं म्हणत असले तरी ते रुपाली ठोंबरे यांच्यासारखा पक्ष बदलण्याचा निर्णय घेतील का अशी चर्चा करण्यात येत आहे.

याबाबत सांगताना मेहता म्हणाले, ''राज ठाकरे त्यांची भूमिका समजून घेतील का याची वाट मोरे पाहतील. त्यामुळे लगेच ते पक्ष सोडणार नाहीत. राज ठाकरेंनी त्यांना चर्चेला बोलावलं तर ते पक्षातच राहतील परंतु राज ठाकरे यांनी दुर्लक्ष केलं तर ते इतर पर्यायांचा विचार करतील.''

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)