You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वैभव वाघमारे ध्यानधारणा करण्यासाठी एक वर्षाच्या सुटीवर
- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) मधून निवड झालेले धारणीचे आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांनी आपण आणखी एक वर्ष राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच आपण ध्यानधारणा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
वैभव वाघमारे यांच्या वॉट्सअपवरील डिसप्ले फोटोवर त्यांनी याबाबतचे एक पत्र अपलोड केलं आहे. या पत्रात ते म्हणतात, "मी ध्यानधारणा करत आहे. या दरम्यानच्या काळात एक वर्ष मी राजीनामा देण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. या काळात मी सुटीवर असेन. तुमच्या प्रतिक्रिया पाहून मी भारवलो आहे. अनेक वरिष्ठ आणि काही आमदारांसह मी अनेकांना प्रतिक्रिया देऊ शकलो नाही. मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. ध्यानधारणा करण्याचं निश्चित झाल्याने मी तुम्हाला संपर्क करू शकणार नाही."
वैभव वाघमारे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलं होतं.
राजीनाम्याबाबत त्यांनी फेसबुकवरून माहिती दिली. या कृतीमागचे 'कारण आणि प्रेरणा तथागत' असल्याचे त्यांनी म्हटले. 'तथागत' हे गौतम बुद्धांना म्हटले जाते त्यामुळे वाघमारे हे गौतम बुद्धांचे कार्य करणार आहेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
आदिवासीबहुल भागात काम केलेल्या वाघमारे यांना एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखलं जातं. त्यांनी राजीनामा परत घ्यावा म्हणून अनेकांनी त्यांना विनंती केली आहे. त्यांच्या फेसबुक पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे ज्यात लोक त्यांना आपला राजीनामा परत घेण्याची विनंती करत आहेत.
आपल्या राजीनाम्याची पोस्ट त्यांनी सोशल माध्यमावर शेअर केली. मेळघाट सारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात मोहफुलाची बँक त्यांनी निर्माण केली होती.
आदिवासींसाठी मोहफुलाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळवून दिल्यामुळे आदिवासी समुदायात ते लोकप्रिय झाले होते.
सोशल माध्यमावर त्यांनी दिला राजीनामा त्यात काय म्हणाले वैभव वाघमारे?
राजीनामा देताना वैभव वाघमारे यांनी म्हटले आहे.
देशाच्या सर्वोत्कृष्ट नोकरीचा (IAS) राजीनामा दिला. हे जीवनात काहीतरी अजून चांगले व उदात्त करण्याच्या शोधापोटी केले गेले. निर्णय घेणे थोडेसे कठीण होते. या धाडसामागे कारण आणि प्रेरणा असलेल्या तथागतांचे आभार.
IAS, ( IRS, आणि IRAS) चे आभार, ज्याने फक्त तीन वर्षांत जीवनाचा इतका समृद्ध अनुभव दिला, जो अनुभव मिळण्यासाठी अन्यथा सामान्य आयुष्याचा साधारणपणे 20-30 वर्षांचा कालावधी लागला असता.
असं म्हणलं जात की आयएएस ही देशातील सर्वोत्तम सरकारी नोकरी आहे. माझा तर विश्वास आहे की ही जगातील सर्वोत्तम सरकारी नोकरी आहे. पण जगात जे सर्वोत्कृष्ट समजले जाते ते एखाद्याला आवडलेच पाहिजे, व त्याने ते आयुष्यभर केले पाहिजे हे आवश्यक आहे का?
भारतीय प्रशासकीय सेवा, व सेवेत कार्यरत असलेले चांगले अधिकारी, ज्यांना भेटण्याचा व ज्यांचे सोबत काम करण्याचा योग आला त्यांचे आभार.
तथापि, मला आशा आहे की हा राजीनामा लवकरात लवकर स्वीकारला जाईल आणि माझ्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीतून मला मुक्त केले जाईल. जन्मदिनाच्या दिलेल्या शुभेच्छाकरता सर्वांचे आभार.
वैभव वाघमारे मूळचे पंढरपूरचे आहेत. 2019 च्या बॅचमध्ये त्यांची IAS या पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील मंगरूळ पीर येथे परिविक्षाधीन कालावधीत तहसीलदार आणि मुख्याधिकारी पदाची धुरा सांभाळली.
2021 मध्ये मेळघाटच्या आदिवासी विकास विभागात त्यांची प्रकल्प अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी म्हणून ट्रांसफर झाली. अल्प कालावधीत त्यांनी अतिदुर्गम मेळघाटातील आदिवासींसाठी कल्याणकारी योजना अमलात आणल्या. त्यात मेळघाटातील 30 गावांमध्ये सुरू केलेली मोहफुलांच्या बँकेची खूप प्रशंसा झाली.
कशी आहे मोहफुलांची बँक
अधिकारी वैभव वाघमारे यांनी 30 गावांमध्ये मोहफुलांची बँक तयार केली होती. त्यानंतर जवळपास 300 गावांमध्ये ही बँक तयार करण्याचा त्यांचा संकल्प होता. वाघमारे यांनी स्वतः 30 गावांमध्ये बचत गट आणि गावकऱ्यांची मीटिंग घेतली, आणि मोहफूल म्हणजेच वनोपज मालाचा योग्य वापर कसा करावा हे त्यांनी समजून सांगितले.
त्या अंतर्गत काही बचत गटांचं ट्रेनिंगही झालं. त्यात दिलीप जांभू यांचही ट्रेनिंग झालं. दिलीप म्हणतात "वाघमारे हे असाधारण अधिकारी आहेत. आजपर्यंत अनेक अधिकारी होऊन गेले मात्र वाघमारे यांना आदिवासी समुदायाविषयी विशेष कळवळा होता."
मोहबँकेविषयी बोलताना दिलीप सांगतात, "काही महिन्यांपूर्वीच मोहबँकेची सुरुवात झाली होती. मोहबँक ही समिती आहे. त्यामध्ये जंगलातील विविध वनस्पतींचा वापर कसा करावा याचे सर्वांना प्रशिक्षण दिले जाते. महिला बचत गटांना ट्रेनिंग देऊन त्यांना रोजगारक्षम बनवण्यात येते.
मोहफुलावर प्रक्रिया करून लाडू, शिरा, बिस्कीट, चटणी, लोणचं, चवणप्राश आणि चिक्की इत्यादी वस्तू तयार करण्यासाठी या महिलांना प्रशिक्षण दिले जाते. वाघमारे यांच्या संकल्पनेतून ही बॅंक साकार झाली आहे.
"आता फॉरेस्ट विभागाची बैठक झाली. त्यानंतर या बँकेला दिशा मिळेल. योजना खूप चांगली आहे. आदिवासी पाड्यातील नागरिकांना लखपती बनवण्याचं वाघमारे यांचं स्वप्न होतं," दिलीप सांगतात.
'इगतपुरीला ध्यानधारणा'
वाघमारे विपश्यनेसाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीला आणि राजस्थानला जाऊन आले होते. त्यानंतर त्यांना सहा महिन्याची सुटी हवी होती, पण ती नाकारण्यात आली, असं एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.
राजीनामा परत घेण्यासाठी त्यांना अनेक फोन, मेसेज केले जात आहेत. राजीनामा परत घेण्यासाठी शंकर बाबा पापळकर यांनीही त्यांची समजूत काढली असं पापळकर सांगतात.
बीबीसीशी बोलताना शंकरबाबा म्हणाले "आमची जवळपास 2 तास चर्चा झाली. तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांची मेळघाटला गरज असल्याचं त्यांना संगितले."
"मेळघाटात त्यांचं अतुलनीय काम आहे. आमच्याही आश्रमात त्यांनी भेट दिली. पण राजीनामा नेमका का दिला हे आम्हाला समजले नाही," असं पापळकर म्हणाले.
राजीनामा परत घेण्यासाठी माजी प्रशासकीय अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी ही वाघमारे यांच्याशी संपर्क साधला.
चर्चेदरम्यान त्यांनी वाघमारे यांची समजूत काढल्याचं ते म्हणाले. या चर्चेत काय झालं याविषयी माहिती देताना खोब्रागडे म्हणाले "राजीनाम्याने फार काही साध्य होणार नाही असं मी त्याला म्हणालो. आयएएस विभागात व्यक्ती म्हणून नाही तर सामाजिक प्रतिनिधी म्हणून तुझी निवड झाली आहे. प्रशासनात राहूनही बुद्धांचे काम करता येते. नीतिमत्ता, इमानदारी आणि लोकांचे प्रश्न सोडवणे म्हणजेच बुध्दांचे काम आहे. आणखी अनुभव घेऊन पुढील पाऊल उचलायला पाहिजे. पण राजीनामा मागे घेण्यासाठी मी त्याला म्हणालो. त्यालाही ते पटत आहे," असं खोब्रागडे म्हणाले.
राजीनामा देण्यामागचे नेमकं कारण जाणून घेण्यासाठी बीबीसीने वैभव वाघमारे यांच्याशी अनेकदा संपर्क साधला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)