You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महात्मा फुले यांनी शेतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी 'हे' उपाय सुचवले होते...
- Author, प्राजक्ता धुळप
- Role, बीबीसी मराठी
भारतात ब्रिटीशांचं राज्य येऊन साधारण 60 वर्षं झाली असतील. शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर महात्मा फुले पोटतिडकीने लिहित होते. 1880च्या दशकाच्या शेवटी त्यांनी शेतीविषयी केलेलं लिखाण गावांमध्ये शेतकऱ्यांना वाचून दाखवायला सुरूवात केली होती.
जे लिहिलंय ते सत्याला धरून आहे याची शेतकऱ्यांकडूनच पडताळणी करत होते. तत्कालीन सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यासमोर कोणते बिकट प्रश्न उभे आहेत याचं सविस्तर वर्णन करत होते.
"कधीकधी शेतकऱ्याने गाडीभर माळवे शहरात विकण्याकरिता आणल्यास त्या सर्व मालाची किंमत बाजारात जास्ती किंमती वजनाने घेणारे-देणारे दगेबाज दलालांचे व म्युनिसिपालिटीचे जकातीस भरीस घालून गाडीभाडे अंगावर भरून त्यास घरी जाऊन मुलाबाळांपुढे शिमगा करावा लागतो." शेतीच्या मालाला योग्य तो भाव मिळत नसल्याचं फुले सांगत होते.
तर एकाच शेतजमिनीत घरातलेच वाटेकरी वाढल्याने शेतकऱ्याच्या जगण्यावर त्याचा कसा परिणाम होतोय याचं वर्णनही ते करत होते.
"शेतकऱ्यांमध्ये भाऊहिस्से इतके वाढले की कित्येकांत आठ-आठ, दहा-दहा पाभारींचे पेऱ्यावर गुजारा करावा लागतो. त्यांना एक-दोन बैल बाळगण्याची ऐपत नसल्यामुळे ते आपली शेते शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे खंडाने देऊन आपली मुलं-माणसे बरोबर घेऊन कोठेतरी परगावी मोलमजूरी करून पोट भरण्यास जातात."
फुले गावागावांत हे पुस्तक वाचत...
'शेतकऱ्याचा आसूड' हे पुस्तक असं जाहिरपणे चावडीवर, अक्षराची ओळख नसणाऱ्या स्त्री-पुरुषांसमोर वाचन होत तयार झालं होतं. त्यामुळे या पुस्तकाचा खरा वाचक केवळ लिहिता-वाचता येणारा वर्गच नव्हता तर निरक्षर असणारा कष्टकरी वर्ग त्याचा ऐकणारा श्रोता होता.
1883 साली महात्मा फुल्यांनी हे पुस्तक लिहून पूर्ण केलं, तेव्हा त्यांचं वय 55 वर्षं होतं. ते या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहितात- 'पुणे, मुंबई, ठाणे, जुन्नर, ओतुर, हाडपसर, वंगणी, माळ्याचे कुरुल वैगेरे येथील शूद्र गृहस्थांनी कित्येक वेळा हा ग्रंथ माझ्या तोंडून ऐकला व या ग्रंथात लिहिलेला मजकूर खरा आहे अशाविषयी त्यांनी आपल्या सह्या माझ्याकडे पाठविल्या आहेत."
बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनाही देखील 'शेतकऱ्याचा आसूड' लक्षपूर्वक ऐकला आणि आदर सत्कार केला असंही फुलेंनी लिहिलंय.
'शेतकऱ्याचा आसूड' या पुस्तकाच्या सुरूवातीलाच शेतकऱ्याच्या परिस्थितीचं अगदी चपखल वर्णन फुल्यांनी या शब्दांमध्ये केलंय-
विद्येविना मति गेली,
मतीविना नीति गेली,
नीतीविना गती गेली,
गतीविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले,
इतके अनर्थ एका अविद्येने केले.
'ब्राम्हणांवर नवे तर शूद्रांवर अवलंबून राहावं'
सरकारचं शिक्षण आणि शेतीचं धोरण कसं असावं यासाठी शेतकऱ्याला शिक्षित करत गुलामगिरीतून मुक्त करावं हे विचार फुल्यांनी केवळ लिखाणातूनच मांडले नाही, तर ब्रिटीश सरकारने धोरणात समावेश करावा यासाठी आग्रह धरला.
तसंच शिक्षणात शेतीचा समावेश करण्यासाठी त्यांनी हंटर आयोगासमोर दिलेल्या साक्षीत सरकारला महत्त्वाच्या सूचनाही केल्या. 1882 साली झालेली साक्ष सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची समजली जाते.
या साक्षीत फुलेंनी स्पष्टपणे सांगितलं की- "कष्टकरी शेतकरी जो कर भरतात त्या महसूलातून सरकार उच्चशिक्षणावर खर्च करतंय. हा खर्च योग्य नाही. त्या शिक्षणावरील खर्चाचा शेतकऱ्यांना काडीचा फायदा होत नाही. ती विद्वत्ता त्यांच्या वाट्यालाही येत नाही. तिचा पूर्ण फायदा समाजातील 'भटब्राम्हणांना' होतो."
पुढे जाऊन ते ब्रिटीशांना असंही सांगतात की, "सरकारने आपल्या आर्थिक वा राजकीय अडचणींवर मात करण्याच्या दृष्टीने ब्राम्हणांवर नव्हे तर शूद्रांवरच अवलंबून राहिलं पाहिजे."
शेतकरी विद्वान का नाही?
त्या काळी शेतकऱ्याच्या घरात पूजा-कर्मकांड, जातीतल्या परंपरेमुळे त्याची तथाकथित उच्चवर्णीय जातींकडून कशी फसवणूक, शोषण होतेय याचे दाखल देत फुलेंनी शेतकऱ्याच्या दयनीय अवस्थेचं चित्र उभं केलं. तर दुसरीकडे ब्रिटीश सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कसा नागवला गेलाय याचे दाखले दिले.
शेतकऱ्याची दारूण अवस्था कशामुळे झाली हे सांगताना फुले मांडतात-
- गाई आणि बैलांच्या ब्रिटीशांनी कत्तली सुरू केल्याने शेतीत लागणाऱ्या चांगल्या बैलाचं बेण कमी झालं आहे. त्यामुळे शेतीत चांगले बैल मिळत नाहीत. तर अतिवृष्टीमुळे राज्यात ओला दुष्काळ पडल्याने जनावरांना चाराही मिळत नाही. शेतीतल्या जनावरांची संतती क्षीण होत चालल्याने त्यांना अनेक प्रकारचे आजार होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात बैल मरत आहेत.
- शेतकऱ्याला बागायतीत चांगलं खत नसल्याने पीकही चांगलं काढता येत नाही.
- जास्त किंमतीचा शेतसारा भरावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे हाल होतायत, त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या अन्नावर आणि तब्येतीवरही होत आहे. त्यात साधीच्या संकटाचं थैमान सुरू आहे.
- कोलमडलेल्या कृषी व्यवस्थेमुळे शेतकरी कर्जबाजारी होतोय. सावकारांकडून शेतकऱ्यांचं अतोनात शोषण होतंय.
- शेतमाल परदेशात जात असल्याने त्याची पर्वा ब्रिटीशांना नाही. तर दुसरीकडे कित्येक वस्तू सरकार आयात करत असल्याने स्थानिक अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे.
- सरकारी कर्मचारी वर्ग ब्राम्हण असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या परिस्थितीशी काही देणं घेणं नाही, तसंच शेतकऱ्याच्या परिस्थितीशी तो असंवेदनशील आहे.
- शेतकऱ्याला विद्वान होऊ न देणं हे व्यवस्थेतल्या गोऱ्या आणि देशातल्या कर्मचाऱ्यांच्या फायद्याचं आहे. शेतकरी विद्वान झाले तर त्यांचं शोषण करता येणार नाही.
- थोडी जमीन असणारे शेतकरी आपली शेती कसून जंगलातल्या उत्पादनावर आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी तिथल्या गवतावर अवलंबून होता. ब्रिटीश वनखातं या शेतकऱ्याला जंगलापासून दूर करत.
'रमणीय सिमला पर्वतावर...'
शेतकऱ्यांची आणि शेतीची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी ब्रिटीश सरकारला उपाय सुचवले. हे उपाय सुचवतानाही फुल्यांची भाषा स्पष्ट, खोचक, मार्मिक उदाहरण देत समोर येते.
"आता मी गारशा थंड हवाशीर रमणीय सिमला पर्वतावर जाऊन कांही विश्रांती घेऊन आपल्या परम दयाळू गव्हर्नर साहेबांसमक्ष आपल्या समुद्रा पलीकडील सरकारच्या नावाने हाका मारून त्यांस शूद्र शेतकऱ्यांची सुधारणा करण्याविषयी उपाय सुचवतो."
महात्मा फुल्यांनी सुचवलेल्या उपायांमध्ये सामाजिक सुधारणांचीही झलक पाहायला मिळते. उदाहरणार्थ- शूद्र शेतकऱ्यांनी एकच लग्न करावं आणि मुलांची लग्न लहानपणी करू नयेत यासाठी सरकारने कायदा करावा.
चांगल्या शेतीसाठी हे उपाय...
- शेतमालाच्या करातून सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा पगार आणि पेन्शन कमी करावेत.
- अज्ञान शेतकऱ्यांना शिक्षित आणि विद्वान करण्यासाठी प्रयत्न करावेत.
- शेतकऱ्यांच्या मुलांसाठी परीक्षा घेऊन त्यांना पाटिलक्या द्याव्यात.
- शिक्षण सर्वांपर्यंत समान पद्धतीने पोहचवण्यासाठी शेतकरी वर्गातले शिक्षक नेमावेत. म्हणजे ते समाजातल्या सर्व वर्गांमध्ये मिसळतील.
- शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात शेतकी आणि आरोग्य, व्यावहारिक विषयांचा समावेश करावा.
- बैलांचं कत्तलीपासून संरक्षण करावं यासाठी कायदा करावा. तसंच शेतकऱ्यांना शेणखताचा मुबलक पुरवठा कसा होईल याकडे लक्ष द्यावे.
- शेतं सुपिक होण्यासाठी नियोजन करून बंधारे बांधावेत. जेणेकरून डोंगरदऱ्यांमधून पाण्याने वाहून येणारं खत शेतात मुरून मग पुढे नदी-नाल्यांना जाऊन मिळतील.
- डोंगरदऱ्यांमधील भागात तळी, तलाव सोयीसोयीने बांधावीत. तसंच लहानमोठी धरणं बांधल्याने बागायती क्षेत्राचा फायदा होईल.
- सिंचन बागायती क्षेत्र वाढवण्यासोबतच पाणलोटाच्या बाजूने शेताच्या बांधांनी वरचेवर दुरुस्त्या कराव्यात.
- झऱ्यांसारखे पाण्याचे स्त्रोत दाखवणारे नकाशे तयार करावेत आणि असे स्रोत राखणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे द्यावीत.
- देशातून तसंच परदेशातून शेळ्या मेंढ्यांची उत्तम पैदास होईल अशी बेणी खरेदी करून आणावी, त्याचा शेत सुपिक होण्यासही फायदा होईल.
- दरवर्षी श्रावणात शेतकऱ्यांच्या चांगल्या कामांचं प्रदर्शन घेऊन बक्षिसं द्यावी.
- तीन वर्षं उत्तम कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना पद्व्या द्याव्यात.
- नव्या पिढीतल्या शेतकऱ्यांना परदेशी शेतकीच्या शाळा पाहण्यासाठी न्यावं.
- सरकारी तिजोरीत शेतीच्या करातून कोट्यावधी रुपयांचा भरणाऱ्या शेतकऱ्यांचं शोषण थांबवावं.
शेतीतल्या सुधारणांची लांबलचक यादी सांगत फुले अखेर म्हणतात- "सदरी लिहिलेल्या गोष्टीचा विचार केल्याविना आमचे सरकार राज्याचा पाया या देशात मुस्तकीम होऊन, अक्षरशून्य शेतकऱ्यांच्या कपाळच्या लंगोट्या जाऊन त्यांचे हल्लीचे उपास काढण्याचे दिवस कधीच जाणे नाहीत"
महात्मा जोतिराव फुले यांचं आधुनिक भारताच्या जडणघडीणीत महत्त्वाचं स्थान आहे. वंचित, शोषित कष्टकरी जातीसमुहांना आणि गरीब वर्गाला चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी त्यांनी मांडलेले विचार दिडशे वर्षांनतरही तितकेच जिवंत वाटतात. आणि आजच्या काळाशी सुसंगतही वाटतात.
(संदर्भ: महात्मा फुले समग्र वाङमय- शेतकऱ्याचा आसूड, महात्मा फुले गौरव ग्रंथ, मेकर्स ऑफ इंडिया)
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)