You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महात्मा फुले : 'उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या घालमोड्या दादांना’ जेव्हा ज्योतिबांनी ठणकावलं होतं
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
'तुमच्या ग्रंथांमध्ये अखिल मानवाचे हित होईल याचे बीज नाही.'
महात्मा ज्योतीराव फुलेंनी जवळपास 120 वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका पत्रातलं हे एक वाक्य. हे पत्रच नंतर विद्रोही साहित्य संमेलन चळवळीला जन्म देणारं प्रतीक ठरलं.
नाशिक शहरात येत्या 3 ते 5 डिसेंबरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे तर 4 आणि 5 तारखेला विद्रोही साहित्य संमेलन होणार आहे.
नाशकात होणारं अखिल भारतीय साहित्य संमेलन हे 94 वं साहित्य संमेलन आहे तर 15 वं विद्रोही साहित्य संमेलन आहे. या दोन्ही साहित्य संमेलनांविषयी वेगवेगळ्या बातम्या तुम्हाला बीबीसी मराठीवर वाचता येतीलच, आज सुरुवात करू विद्रोही साहित्य संमेलनाच्या इतिहासाने. नक्की कोणती प्रेरणा विद्रोही साहित्य संमेलनाच्यामागे होती?
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ही चळवळ जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात समतावादी साहित्य-संस्कृती आणि विचारधारेचा पुकारा करते.
नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या प्रसिद्धीसाठी जे पत्रक छापलं आहे त्यात याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
या पत्रकात म्हटलंय, 'विषमतावादी सांस्कृतिक राजकारणाच्या विरोधात विद्रोही सांस्कृतिक चळवळ 1999 पासून महाराष्ट्रभर कार्यरत आहे. विषमतेच्याविरुद्ध सर्वकष चळवळीच्या कुशीतून आणि मुशीतून आमचे साहित्य जन्म घेते. त्यामुळेच ते माणसाच्या जगण्याचा साहित्याशी दुवा जोडत असते.'
महात्मा फुलेंचं ग्रंथकार सभेला पत्र
ज्योतिबा फुलेंच्या ज्या पत्रातून विद्रोही साहित्य चळवळीला प्रेरणा मिळाली असं म्हणतात, काय होतं त्या पत्रात?
या संमेलनाचे मुख्य संयोजक राजू देसले सांगतात, "1885 मध्ये महात्मा फुलेंनी ग्रंथकार सभेला एक पत्र लिहिलं होतं. तेव्हा ग्रंथकार सभा होत होत्या. ग्रंथकार सभा म्हणजे आजच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुर्वीचं रूप. त्यात न्यायमूर्ती रानडेंनी महात्मा फुलेंना आमंत्रित केलं होतं. त्यावेळी ज्योतिबांनी एक पत्र ग्रंथकार सभेला लिहिलं आणि त्यात म्हटलं, 'उंटावरून शेळ्या वळणाऱ्या तुमच्या घालमोड्या दादांच्या' साहित्य संमेलनाला मी येणार नाही."
"याचा अर्थ काय तर वास्तववादी जीवनाचा अनुभव न घेता शहरामध्ये बसून लिहितात आणि त्यावरून ते साहित्याची निर्मिती करतात. अशा साहित्य संमेलनामध्ये मी येणार नाही. ते म्हणाले होते, जेव्हा आमचे बहुजनातले लोक शिकतील, ते स्वतः साहित्यनिर्मिती करतील, साहित्य संमेलन घेतील ते खरं साहित्य संमेलन असेल, या पत्राच्या आधारावर या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची परंपरा सुरू झाली."
दलित, आदिवासी, ग्रामीण संयुक्त चळवळ
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर मराठी साहित्यात अनेक प्रवाह दिसायला लागले. अण्णाभाऊ साठे, अमर शेखांच्या शाहिरीतून एक सांस्कृतिक घुसळण झाली आणि समांतर साहित्य चळवळीचा पाया उभा राहिला.
त्यानंतर साठच्या दशकात लिटील मॅगझिन चळवळ उभी राहिली. १९६० च्या दशकात मराठीतील काही नवोदित बंडखोर कवींनी 'लिटल मॅगझिन' चळवळ सुरू केली होती. यात वसंत दत्तात्रय गुर्जर, राजा ढाले, सतीश काळसेकर, नामदेव ढसाळ, गुरुनाथ सामंत आदींचा समावेश होता.
नवोदित कवींच्या, विशेषतः वंचित वर्गातून येणाऱ्या कवींच्या कविता प्रस्थापितांच्या मासिकांमध्ये प्रसिद्ध होत नाही. त्यामुळे या कवींनी स्वतःचंच मासिक काढलं होतं.
सत्तरचं दशक कामगार चळवळींचं होतं. यातून अनेक दलित, कामगार, कष्टकरी आणि ग्रामीण जीवनावर लिहिणारे लेखक-कवी पुढे आले. त्यातून उभी राहिली दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्य चळवळ.
राजू देसले म्हणतात, "तो जो कालखंड होता, तेव्हा दलित, बहुजनांतून आलेल्या लेखकांची पहिली पिढी लिहायला लागली होती. प्रस्थापित साहित्यिक दलित साहित्याला साहित्यिकच म्हणत नव्हते. ग्रामीण साहित्याला हसत होते अशी परिस्थिती होती. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला समांतर साहित्य संमेलनं उभी राहिली. ही साहित्य संमेलनं दलित, आदिवासी आणि ग्रामीण या साहित्यासाठी होती. त्यांना दआग्रा असंही म्हणायचे."
ग्रामीण भागातले लोक स्वतःचे अनुभव लिहायचे. जे शहरात आलेले दलित समाजातले लोक होते, जे कष्टाची कामं करायचे, त्यांनी आपली परिस्थिती मांडली. वेगवेगळे प्रवाह मराठी साहित्यात येत होते. साठ आणि सत्तरच्या दशकात अशी सात संमेलनं झाली. पण त्यानंतर ती चळवळ चालवणाऱ्या लेखक-कवींमध्ये वैचारिक मतभेद झाले. त्यामुळे दआग्रा साहित्य संमेलनांची परंपरा थांबली.
त्यानंतर 1997 साली पुन्हा समांतर साहित्यची अभिव्यक्ती करण्याचं व्यासपीठ म्हणून विद्रोही साहित्य संमेलनाला सुरुवात झाली.
एक रूपया आणि एक मुठ धान्याची देणगी
विद्रोही साहित्य संमेलनाची परपंरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. उपेक्षितांना आपला आवाज मिळावा हा याचा उद्देश असतो.
मराठी साहित्य संमेलनासाठी सरकारी निधी, जय्यत तयारी, मंत्र्यांचा पाठिंबा असं चित्र आहे तर दुसरीकडे विद्रोही साहित्य संमेलनची व्यवस्था मात्र कष्टकरी, कामकरी वर्गाने दिलेली देणगी आणि शिध्यातून केली जाणार आहे.
नाशिक शहरातल्या अनेक दलित, कष्टकरी, कामगार वस्त्यांमधून अशा फेऱ्या काढून निधी आणि शिधा गोळा केला जातोय. सरकारी निधीची मागणी आयोजकांनी केलेली नाही.
कमीत कमी एक रूपया देणगी आणि एक मुठ धान्य आपल्या साहित्य संमेलनासाठी द्या असं आवाहन कार्यकर्ते वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये करत आहेत.
यामागची भूमिका समजावून सांगताना या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हावणे म्हणतात, "एखादा माणूस जेव्हा एक मुठ धान्य आणि एक रूपया देतो, त्यावेळेस त्याच्या मनात भावना तयार होते की माझाही यात हातभार लागला आहे त्यामुळे तो साहित्य संमेलनात सहभागी होतो. त्याला ते संमेलन आपलंस वाटतं. त्या एक रूपयातून ते संमेलन आपलंस वाटतंय. त्या धान्यातून आपलंस वाटतंय."
शासनाकडे निधी का मागितला नाही असं विचारल्यावर ते म्हणतात, "शासनाने जो काय निधी द्यायचा तो प्रस्थापित साहित्य संमेलनाला दिला आहे. आम्हाला मिळेलच याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आम्ही मागत नाही."
या विद्रोही साहित्य संमेलनाचं फलित काय असं विचारल्यावर राजू देसले म्हणतात, "या साहित्याच्या निमित्ताने ज्याला समजलं, जो बोलू लागला, कथा लिहून लागला, कादंबरी लिहू लागला, तो पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणार आहे आणि त्या प्रेरणेतून समाज उद्या बदलणार आहे."
हेही वाचलं का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)