You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
KGF 2 : 'यशमुळे केजीएफ आहे, तो नसता तर हा सिनेमा झाला नसता किंवा त्याची चर्चाही नसती'
- Author, मधु पाल
- Role, बीबीसी हिंदीसाठी
"काही लोकांना वाटतं माझ्यात अॅटिट्यूड आहे. पण खरं सांगायचं म्हणजे माझ्याविषयी कुणाचं काय मत आहे, त्यामुळे मला काही फरक पडत नाही," असं मत आहे रॉकिंग स्टार यश याचं.
केजीएफ सिनेमामुळे देशभर चर्चेत आलेला अभिनेता यश आता 14 एप्रिलला केजीएफचा दुसऱ्या पार्टमधून आपल्याला भेटायला येतोय.
केजीएफचा पहिला पार्ट 2018 मध्ये कन्नड आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बराच हिट झाला होता. त्यामुळे केजीएफच्या दुसऱ्या पार्टचीही अनेकांना उत्सुकता आहे.
केजीएफ-2 मध्ये सुपरस्टार यश सोबत संजय दत्त, रवीना टंडन आणि प्रकाश राज प्रमुख भूमिकेत आहेत.
या चित्रपटाच्या निमित्तानं चित्रटाचे दिग्दर्शक प्रशांत नील आणि अभिनेता यश यांच्यासोबत बीबीसी प्रतिनिधी मधु पाल यांनी संवाद साधला.
या सिनेमाची कल्पना कशी सुचली, यावर प्रशांत यांनी सांगितलं, "केजीएफ ही आई आणि मुलाची स्टोरी आहे. त्यावर आम्ही नंतर काम केलं. पण चित्रपटाली पात्रं, त्या अनुषंगाने येणारा ड्रामा यासाठीचं विश्व आम्ही तयार केलं. या स्टोरीला सोन्याच्या खाणीचा ऐतिहासिक संदर्भ आहेत."
चित्रपटातील हिरोच्या भूमिकेविषयी विचारल्यावर यश म्हणाला, "चित्रपटाच्या कथेत दम असेल तर लोकांना ती आवडते. लोकांना काम आवडलं की, कलाकार आयुष्यात आणि चित्रपटाच्या भूमिकेत आपोआप पुढे जातो. हा चित्रपट करताना खूप आव्हानं होती. पण हिरो असाच पुढे जात राहणार."
केजीएफ आता भारतीय चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प झाला आहे का या प्रश्नाचं उत्तर देताना यश म्हणाला, "मला खूप विश्वास होता. कारण ज्या पद्धतीनं या चित्रपटाची कथा आहे, ज्या पद्धतीनं आमच्या टीमनं काम केलं. ते पाहून मग हा चित्रपट सगळ्यांना पसंत पडेल असं मला वाटलं. मला वाटतं तुमचा हेतू चांगला असेल तर मग पुढचं सगळं व्यवस्थित होतं."
केजीएफ तुमच्यासाठी नशीब बदलणारा अनुभव होता का, या प्रश्नावर यश म्हणाला, "स्वत:वर विश्वास ठेवून आपण जे काम करतो त्यानं नशीब बदलतं. त्यामुळे मग आम्ही फक्त कामावर लक्ष केंद्रित केलं. आम्हाला काय करायचं यावर लक्ष केंद्रित केलं."
प्रशांत यांच्या मते, "योग्य व्यक्ती एकत्र येऊन केजीएफसारखा चित्रपट बनवण्यासाठी तुमचं नशीब असावं लागतं. याव्यतिरिक्त दुसरा काही लक फॅक्टर नसतो. एकतर लोकांना चित्रपट आवडतो, नाहीतर नाही आवडत.
"केजीएफ यशमुळेच इतकी उंची गाठू शकलाय. यशशिवाय केजीएफ झाला नसता. झाला असता तरी त्याची इतकी चर्चा झाली नसती."
यश आणि रॉकीमध्ये काय साम्य आहे, यावर यश म्हणाला, "हे दोघेही आक्रमक, फोकस्ड आहेत. दोघांमध्ये आत्मविश्वास आहे. कितीही संकट आलं तरी तो घाबरत नाही. मी KGFमधल्या रॉकीसारखाच आहे. समोर येणाऱ्या गोष्टींचा फारसा विचार करत नाही."
खिशात 300 रुपये घेऊन यश बंगळुरूला आला होता. आता त्याला जगभर 'रॉकिंग स्टार' म्हणून ओळखलं जातं.
आपल्या या प्रवासाविषयी बोलताना यश म्हणतो, "कोट्यवधी लोक असंच जगत असतात. मला जे आवडतं त्या क्षेत्रात मी काम करतोय त्याबद्दल मी नशीबवान आहे. तुम्हाला जे आवडतं ते कराल तर पुढे चालून तुम्हाला यश मिळतं. तुम्ही माझा प्रवास बघितला तर तुम्हाला तो अवघड वाटेल.
"पण मला अभिनेता व्हायचं असल्यानं मी जेव्हा काम करत होतो, त्या उत्साहात सगळा संघर्षही सामान्य वाटायचा. सगळं काही अटिट्यूडवर अवलंबून आहे. तेव्हाही आयुष्य सुखी होती आजही सुखीच आहे. मी आज माझं काम एन्जॉय करतोय ते महत्त्वाचं आहे."
तुझा नम्रपणा लोकांना आवडतो, असं म्हटल्यावर यशचं उत्तर होतं, "मला माहिती नाही की, माझे पाय जमिनीवर आहेत किंवा नाही. अनेक जण तर वेगळा विचार करत असतील. तुमचा दृष्टिकोन कसा आहे, त्यावर हे अवलंबून असतं. अनेकांना वाटतं माझ्यात अॅटिट्यूड आहे.
"पण इतरांना काय वाटतं त्यावरून मी माझं व्यक्तिमत्व नाही ठरवू शकतं. पण तुम्ही तुमच्या मुळांना धरून राहणं, स्वत:शी प्रामाणिक राहणं यावर मी विश्वास ठेवतो."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)