You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Lesbian : 'आम्ही दोघी प्रेम करतो, दोन मिनिटंसद्धा आम्ही एकमेकींशिवाय राहू शकत नाही'
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी, पुण्याहून
"आम्ही दोघी प्रेम करतो. कुठल्याही नवरा-बायकोमध्ये जसं नातं असतं, तसंच नातं आमच्यात आहे. मी सायलीला माझी पत्नी म्हणून स्वीकारलं आहे. तीसुद्धा मला नवरोबा म्हणते. आमच्यात पण छोटी-मोठी भांडणं होतात. पण दोन मिनिटंसुद्धा आम्ही एकमेकींशिवाय राहू शकत नाही," असं स्मिता सांगत होती.
स्मिता 29 वर्षांची, तर सायली 19 वर्षांची. (नावं बदललेली आहेत) गोंदियामध्ये एका लग्नामध्ये दोघींची भेट झाली. पहिल्याच भेटीत दोघी एकमेकींना आवडायला लागल्या. हळूहळू बोलणं सुरू झालं. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि शेवटी दोघींनी कायदेशीर बॉण्ड करुन लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.
'राईट टू लव्ह' या पुण्यातील तरुणांच्या ग्रुपच्या मदतीने स्मिता आणि सायली यांनी पुणे सत्र न्यायालयामध्ये नोटरीच्या माध्यमातून लिव्ह इनमध्ये राहण्याचा बॉण्ड केला आहे. लेस्बियन तरुणींच्या लिव्ह इनमध्ये राहण्याचा हा पहिलाच बॉण्ड आहे, असं राईट टू लव्हकडून सांगण्यात आलं.
स्मिता नागपूरमध्ये एका खासगी संस्थेत काम करते, तर सायलीचं 12 वी पर्यंतचं शिक्षण झालंय. दोघी सध्या नागपूरमध्ये एकत्र राहतात.
स्मिताला 18 वर्षाची असताना आपण इतर मुलींपेक्षा वेगळे आहोत, आपली आवड वेगळी आहे, असं जाणवायला सुरुवात झाली होती.
घरच्यांना ही गोष्ट कळल्यानंतर घरच्यांकडून काहीसा विरोध झाला. पण स्मिता तिच्या विचारांवर खंबीर होती. सायलीलासुद्धा सुरुवातीपासूनच मुलींकडे आकर्षित होत होती.
गोंदियामध्ये एका लग्नात दोघींच्या प्रेमाची सुरुवात झाली. स्मिताने सायलीला ती आवडत असल्याचं सांगितलं. सायलीने देखील लगेच होकार दिला.
सायलीच्या घरी त्यांच्या नात्याबद्दल कळलं, तेव्हा तिच्या घरच्यांकडून मोठा विरोध झाला. सायलीसाठी मुलांची स्थळं पाहण्यास सुरुवात झाली होती. घरचे आपलं लग्न लावून देतील, या भीतीने सायली गोंदीयावरुन स्मिताकडे नागपूरला पळून आली. काही दिवस स्मिताने सायलीला तिच्या मैत्रिणीकडे ठेवलं आणि त्यानंतर स्वतःच्या घरच्यांना सोडून तिने सायलीसोबत एकत्र राहण्यासाठी नागपूरमध्ये भाड्याचं घर घेतलं.
नागपूरमध्ये दोघी एकत्र राहत असताना सायलीच्या घरच्यांना त्यांचा पत्ता मिळाला. पोलिसांच्या मदतीने सायलीच्या घरच्यांकडून तिला घेऊन जायचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हा स्मिता आल्याशिवाय मी कुठेही येणार नाही, असं सायली म्हणाली. पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि सायलीला तिच्या घरच्यांना घेऊन जायला सांगितलं. तेव्हा स्मिता यांनी 'राईट टू लव्ह' या ग्रुपचे कायदेशीर सल्लागार अॅड. विकास शिंदे यांना फोन केला.
सायली ही स्वतःच्या इच्छेने स्मितासोबत राहत होती. सायली कायदेशीरदृष्ट्या सज्ञान असल्याने तिला स्मितासोबत राहता येणार होतं.
पोलिसांनी जर सायलीला बळजबरीने तिच्या घरच्यांसोबत पाठवलं तर पुढील परिणामांची जबाबदारी पोलिसांना घ्यावी लागेल, असं अॅड विकास शिंदे यांनी पोलिसांना बजावलं त्यानंतर पोलिसांनी स्मिता आणि सायली यांना त्यांच्या घरी पाठवलं.
377 कलम जरी सर्वोच्च न्यायालयाने हटवलं असलं तरी लेस्बियन लग्नाला अद्याप कायदेशीर स्वरुप प्राप्त झालेलं नाही. त्यामुळे पुन्हा असा प्रसंग येऊ नये म्हणून स्मिता आणि सायली यांनी लिव्ह इनमध्ये राहण्यासाठी कायदेशीर बॉण्ड करण्याचा निर्णय घेतला.
सायली सांगते, "लग्नात जेव्हा स्मिताला पाहिलं तेव्हापासूनच ती मला आवडायला लागली होती. हळूहळू आम्ही बोलू लागलो फिरु लागलो. त्यानंतर मी स्मितासोबतच राहण्याचा निर्णय घेतला."
दोघी गेल्या तीन महिन्यांपासून एकत्र राहत आहेत. दोघींना एकमेकींचा आधार वाटतोय. स्मिताला सायलीला पुढचं शिक्षण द्यायचं आहे.
सायलीच्या घरच्यांकडून तिची कागदपत्र मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. परंतु, स्मिता तिच्या विचारांवर ठाम आहे. सायलीला शिक्षण देऊन तिला चांगली नोकरी तिला मिळवून द्यायची आहे.
स्मिताच्या घरच्यांना आपली मुलगी लेस्बियन नसावी, असं वाटत होतं. पण स्मिताचा ठामपण पाहून त्यांनी तिला तिच्या मनाप्रमाणे राहण्याची परवानगी दिली.
स्मिता म्हणते, "मी लेस्बियन आहे याचं लोकांना काय वाटेल याचा मी कधीच विचार नाही केला. मी माझी लेस्बियन असल्याची ओळख कधी लपवून नाही ठेवली. सायलीच्या आई-वडील मला बोल लावत होते. अजूनही ते माझ्याबद्दल अपशब्द वापरतात. पण मला त्यांना दाखवून द्यायचंय की मी एक चांगली मुलगी आहे. तुम्ही जसा विचार करताय तशी मी मुळीच नाही."
सायली म्हणाली, "मला माहित होतं, समाज आमचं नातं स्वीकारणार नाही. पण मला स्मितासोबतच राहायचं होतं. त्यामुळे समाजालासुद्धा हे स्वीकारावंच लागणार आहे."
राईट टू लव्ह हा ग्रुप नेमकं करतो काय?
'राईट टू लव्ह' हा ग्रुप गेल्या सात वर्षांपासून प्रेम करणाऱ्या जोडप्यांना मदत करतो.
'राईट टू लव्ह' या ग्रुपचा प्रमुख के. अभिजित सांगतो, "जात, धर्म, लिंग विरहित प्रेमाला राईट टू लव्ह नेहमीच सपोर्ट करत आलं आहे. प्रेमाला आम्ही सपोर्ट करतो. कुठल्याही जोडप्याच्या मागे आम्ही खंबीर उभे राहतो. परिस्थितीनुसार आम्ही जोडप्यांना सल्ला देतो."
राईट टू लव्हच्या वतीने 88 आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्न लावून देण्यात आली आहेत. लिव्ह इनमध्ये राहण्यासाठीचा लेस्बियन जोडप्याचा ग्रुपने करुन दिलेला हा पहिलाच बॉण्ड आहे.
के. अभिजित पुढे म्हणाला, "प्रेमात पडलेल्या जोडप्याने काय खबरदारी घेतली पाहिजे कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, याचं मार्गदर्शन 'राईट टू लव्ह'च्या माध्यमातून करण्यात येतं. ज्या जोडप्यांना लग्न करायचं असतं त्यापैकी एकतरी व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी असावी. दोघांपैकी एकाच्या तरी घरच्यांना माहित असावं आणि त्यांच्या घरच्यांपैकी एकाचा तरी त्यांना पाठिंबा असावा हे लग्न लावून देताना राईट टू लव्हच्या माध्यमातून पाहिलं जातं."
लेस्बियन लिव्ह इनचा बॉण्ड कसा केला?
राईट टू लव्हचे कायदेशीर सल्लागार अॅड. विकास शिंदे यांनी लेस्बियन लिव्ह इनचा बॉण्ड करुन दिला. हा बॉण्ड कसा करता येतो याबाबत माहिती देताना शिंदे म्हणाले, "राज्यघटनेने कलम 21 नुसार जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे. त्यात प्रत्येकाला प्रेम करण्याचा, जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला आहे. सध्याच्या कायद्यानुसार स्री आणि पुरुषच लग्न करु शकतात. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारं कलम 377 रद्द केलं. त्यानंतर समलैंगिक संबंधाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला सुरुवात झाली.
असं असली तरी अद्यापही कायद्याने गे किंवा लेस्बियन लग्नाला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा लिव्ह इन रिलेशनशिपचा बॉण्ड करण्यात आला. कुठलीही सज्ञान व्यक्ती असा करारनामा करुन कायदेशीर संरक्षण मिळवू शकतात. लेस्बियन जोडप्यांना कोणी सपोर्ट करत नाही, त्यामुळे त्यांना कायदेशीरपणे एकत्र राहता यावा आणि कोणाच्याही घरच्यांनी एखाद्या पार्टनरला बळजबरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी या जोडप्याला कायदेशीर संरक्षण मिळावं यासाठी हा बॉण्ड तयार करण्यात आला."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)