You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरी काँट्रॅक्टरः एका उसळलेल्या चेंडूमुळे भारतीय कॅप्टनचं करियर कसं संपलं?
- Author, रेहान फझल,
- Role, बीबीसी प्रतिनिधी
साठ वर्षांपूर्वी बाउन्सर चार्ली ग्रिफिथ यांच्या एका चेंडूने भारतीय क्रिकेट संघाचे तत्कालीन कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्याला जखम झाली.
त्यांच्या डोक्यात घालावी लागलेली एक धातूची पट्टी 60 वर्षांनंतर शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आली, पण या घटनेमुळे त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द संपुष्टात आली.
नक्की काय घडलं?
ही घटना घडेपर्यंत नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी 10 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. ते भारतीय संघातील मुख्य फलंदाज होते आणि ते आघाडीला उतरत असत. वेगवान गोलंदाजीला सामोरं जाण्याची त्यांची क्षमता निःसंशयपणे मोठी होती.
भारतीय संघ 1962 साली वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर गेला होता. त्या वेळी दुसऱ्या व तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यानच्या काळात ते बारबाडोससोबत एक सराव सामना खेळणार होते.
या सामन्यात बारबाडोसने पहिल्यांदा फलंदाजी करत 390 धावा केल्या. भारताच्या बाजूने नरी कॉन्ट्रॅक्टर आणि दिलीप सरदेसाई डावाची सुरुवात करायला उतरले.
सर्वसाधारणतः नरी पहिल्यांदा स्ट्राइक घेत नसत. पण या वेळी सरदेसाई पहिल्यांदाच डावाची सुरुवात करण्यासाठी आलेले असल्यामुळे, नरी यांनी स्ट्राइकवर जायचा निर्णय घेतला. बार्बाडोसच्या वतीने गोलंदाजीची जबाबदारी मुख्यत्वे वेस हॉल आणि चार्ली ग्रिफिथ यांच्यावर होती.
पॅव्हेलियनची खिडकी
बीबीसीशी बोलताना नरी म्हणाले, "सामन्याच्या एक दिवस आधी एका पार्टीत वेस्ट इंडीजचा कर्णधार फ्रँक वॉरेलने आम्हाला ग्रिफिथच्याबाबतीत सावध राहायला सांगितलं होतं"
'ग्रिफिथची गोलंदाजी करण्याची पद्धत फारशी नीटनेटकी नाही, पण त्याचा चेंडू खूप वेगाने जातो, त्यामुळे फलंदाजाने स्वतःला इजा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी,' असं वॉरेल यांनी त्यांना सांगितलं.
पण लंच-ब्रेक झाल्यावर लगेचच हॉल यांनी सरदेसाई यांना शून्यावर बाद केलं आणि कॉन्ट्रॅक्टर यांना सावध राहायला वावच उरला नाही. सरदेसाईंच्या जागी फलंदाजीसाठी रूसी सुरती मैदानात आले. ग्रिफिथ अतिशय वेगाने गोलंदाजी करत होते.
नरी सांगतात, "ओव्हरच्या तिसऱ्याच बॉलनंतर सुरतीने मला ओरडून सांगितलं की, ग्रिफिथ बॉल फेकतोय. याबद्दल अंपायरला सांगावं, असं मी त्याला सांगितलं. ग्रिफिथने ओव्हरचा दुसराच बॉल माझ्या खांद्याच्याही वरून टाकला होता. तो बॉल मी सोडून दिला. तिसऱ्या बॉलवर कॉनरेड हंटने माझा कॅच जवळपास घेतलाच होता. त्या वेळी त्याने यशस्वीरित्या कॅच घेतला असता तर बरं झालं असतं, असं आज विचार करताना वाटतं.
त्या काळी साइट स्क्रिन नसायची. तर, ग्रिफिथने चौथा बॉल टाकण्यासाठी धावायला सुरुवात केल्यावर अचानक कोणीतरी पॅव्हेलियनमधली एक खिडकी उघडली. आता हा बॉल झाल्यावर ती खिडकी बंद करायला सांगायचं मी डोक्यात ठरवत होतो. अपेक्षेप्रमाणे पुढचाही बॉल शॉर्ट पिचवरून उसळत आला."
हा बॉल नरी कॉन्ट्रॅक्टर आयुष्यात कधीच विसरू शकणार नाहीत. ते म्हणतात, "उसळून वर आलेल्या बॉलपासून स्वतःचा बचाव करण्याकरता मी मान फिरवली, तर बॉल नव्वद अंशांमध्ये माझ्या डोक्याच्या मागच्या बाजूला आदळला. मी गुडघ्यांवर खाली बसलो. त्या वेळचे फोटो बघितल्यावर लक्षात येतं की, गुडघ्यावर बसल्यानंतरसुद्धा बॅट माझ्या हातातून सुटलेली नव्हती. पॅव्हेलियनमधली ती खिडकी उघडल्यामुळे माझं लक्ष विचलित झालं, त्यामुळे त्या बॉलच्या वेळी माझी एकाग्रता शंभर टक्के नव्हती."
असह्य वेदना
कॉन्ट्रॅक्टर तिथेच खाली कोसळले, तेव्हा चंदू बोर्डे पॅव्हेलियनमधून पाण्याचा ग्लास घेऊन मैदानात धावत आले.
चंदू सांगतात, "मी पिचवर पोचलो, तेव्हा नरी पूर्णपणे शुद्धीत होते. त्यांच्या डोक्यात प्रचंड वेदना होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मी त्यांना हाताला धरून पॅव्हेलियनमध्ये घेऊन गेलो. पण त्यांच्या हाताचा माझ्या हातावरचा दाब वाढत असल्याचं मला जाणवत होतं आणि त्यांना असह्य दुखत होतं."
भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक गुलाम अहमद आणि चंदू बोर्डे नरी यांना घेऊन रुग्णालयात गेले. तिथे त्यांचा एक्स-रे काढण्यात आला, तर डोक्याच्या मागच्या भागात रक्तस्त्राव होत असल्याचं दिसलं.
आत्ता तातडीने शस्त्रक्रिया केली नाही, तर नरी यांचं काहीही होऊ शकतं, असं डॉक्टरांनी सांगितलं. गुलाम अहमद यांनी मुंबईला फोन करून नरी यांची पत्नी व क्रिकेट नियामक मंडळाकडून संमती घेतली आणि डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सुरू केली. वास्तविक ते डॉक्टर प्रमाणित न्यूरोसर्जन नव्हते.
चेंडूची गती
चंदू बोर्डे सांगतात, "ऑपरेशन सुरू होतं तेव्हा रक्तबंबाळ झालेले विजय मांजरेकर तिथे आले. त्यांनासुद्धा ग्रिफिथचा बॉल लागला होता. नरी यांना मी, बापू नाडकर्णी, पॉली उम्रीगर, क्रिकेट पत्रकार पी. एन. प्रभू आणि वेस्ट इंडिजचे कर्णधार फ्रँक वॉरेल यांनी रक्त दिलं. शस्त्रक्रिया सुरू असताना त्या रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित झाला. गुलाम अहमद इतके अस्वस्थ झाले होते की त्यांनी एका वेळी दोन सिगरेटी फुंकायला सुरुवात केली होती."
या संघाचे आणखी एक सदस्य सलीम दुर्रानी यांना रक्तबंबाळ अवस्थेतील नरी कॉन्ट्रॅक्टर पॅव्हेलियनमध्ये परततानाचं दृश्य आजही लक्षात आहे.
दुर्रानी म्हणतात, "त्यावेळी नरी यांच्या कानातून आणि नाकातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. नरी शुद्धीत येईपर्यंत भारतीय संघाच्या कोणाही खेळाडूला झोप आली नाही. सगळे खेळाडू त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना करत होते."
नरी बेशुद्ध असताना फ्रँक वॉरेल रोज त्यांना बघायला रुग्णालयात येत असत, अशी आठवण दुर्रानी सांगतात. एके दिवशी चार्ली ग्रिफिथसुद्धा त्यांना बघायला रुग्णालयात आले.
आजच्या वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत ग्रिफिथ यांना किती गुण द्याल, असं मी बोर्डे यांना विचारलं. त्यावर ते म्हणाले, "ग्रिफिथ खूपच वेगाने गोलंदाजी करायचा, यात काही शंका नाही. पण त्या काळी हेल्मेट नव्हतं आणि चेस्ट गार्ड किंवा एल्बो गार्डसुद्धा नव्हतं, हे लक्षात घ्यायला हवं.
"त्या काळी फ्रंटफूट नो बॉलचाही नियम नव्हता, त्यामुळे ग्रिफिथसारखे गोलंदाज अगदी 55 फुटांवरून बॉल टाकत असत. काही वेळा वेगवान गोलंदाजांपासून बचाव करण्यासाठी आम्ही आमच्या खिश्यांमध्ये ग्लोव्हज भरून ठेवायचो."
चंदू आणखी एक गंमतीशीर किस्सा सांगतात, "1967 साली वेस्ट इंडीजचा संघ भारतात आला, तेव्हा चेन्नईतील सामन्यात मी त्यांच्या विरोधात 96 धावांवर खेळत होतो. त्या वेळीसुद्धा ग्रिफिथने नरीला टाकला तसाच चेंडू माझ्या दिशेने फेकला, आपण 96 धावांपर्यंत पोचलेलो असतो तेव्हा चेंडूवर आपलं लक्ष अगदी एकाग्र झालेलं असतं, पण ग्रिफिथचा तो चेंदू इतक्या वेगाने येत होता की मला तो दिसलासुद्धा नाही आणि माझ्या कानाच्या पाळीला स्पर्श करून सीमापार झाला आणि चार धावा मिळाल्या. संध्याकाळी रोहन कन्हाय माझ्या खोलीत येऊन म्हणाले, 'चंदू, हे शतक आपण साजरं करायला हवं. का, ते सांग बरं?' मी त्यांना का असं विचारलं, तर ते म्हणाले, 'तू अजून जिवंत आहेस, म्हणून. नाहीतर त्या चेंदूने तू गारद झाला असतास'."
डोक्यात धातूची पट्टी
त्या शस्त्रक्रियेनंतर सहा दिवस नरी कॉन्ट्रॅक्टर बेशुद्ध होते. सातव्या दिवशी पहिल्यांदा त्यांनी डोळे उघडले. त्यानंतर त्यांना फ्रान्समार्गे भारतात परत आणण्यात आलं. मग वेल्लोरमध्ये रुग्णालयात त्यांच्या डोक्यात धातूची एक पट्टी बसवण्यात आली.
नरी एक गंमतीशीर किस्सा सांगतात, "एकदा मुंबईला जाण्यासाठी मी दिल्ली विमानतळावर पोचलो. तर माझी तपासणी करणारा मेटल डिटेक्टर सारखा ब्लिप करायला लागला. तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मला वारंवार मेटल डिटेक्टरमधून जायला सांगितलं. शेवटी नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी स्वतःची ओळख करून देत सगळ्या घडामोडी त्यांना सांगितल्या आणि त्यांच्या डोक्यात धातूची पट्टी कशी बसवण्यात आली, तेही सांगितलं.
दुसरी संधी
नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी आणखी एकदा स्वतःचं मनोबळ दाखवून दिलं होतं.
1959 साली लॉर्ड्स मैदानावर ब्रायन स्टेथम यांच्या पहिल्या ओव्हरमधील एक चेंडू त्यांच्या बरगड्यांवर लागला आणि दोन बरगड्या तुटल्या होत्या. त्या वेळी नरी यांनी एकही धाव काढलेली नव्हती. पण त्यांनी मैदान सोडलं नाही, उलट ते 81 धावा करून पॅव्हेलियनला परतले होते.
ब्रिजटाउनमधल्या सामन्यात गंभीर इजा झाल्यानंतरसुद्धा नरी यांनी पुन्हा भारतीय संघातून खेळण्याची आशा सोडली नव्हती. परंतु, त्यांनी सातत्याने चांगली कामगिरी करूनसुद्धा भारतीय निवड समितीने त्यांना पुन्हा भारतीय संघात घेण्याचं धाडस दाखवलं नाही.
नरी कॉन्ट्रॅक्टर सांगतात त्यानुसार, एकदा भारतीय निवड समितीचे सदस्य गुलाम अहमद यांनी नरी यांच्या पत्नीला विचारलं, 'तुम्ही त्यांना पुन्हा खेळायची परवानगी कशी काय देऊ शकता?' त्यावर नरी यांची पत्नी म्हणाली, 'माझ्या परवानगीसाठी तो थांबणार आहे का?' "पण पुन्हा भारतीय संघातून खेळणं माझ्या नशिबात नव्हतं, त्यामुळे मग मी खेळलो नाही," असं नरी कॉन्ट्रॅक्टर म्हणतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)