प्रवीण तांबेची निवड केली म्हणून राहुल द्रविडला जेव्हा वेड्यात काढलं होतं...

"क्रिकेट फिल्डवर लागणाऱ्या जिद्दीचं प्रतीक म्हणजे प्रवीण तांबे." हे वाक्य आहे राहुल द्रविडचं.

"मला जेव्हा क्रिकेटरची गोष्ट सांग म्हटलं जातं तेव्हा अनेकांना वाटतं मी सचिन, कुंबळे, गांगुली, लक्ष्मण यांची गोष्ट सांगेन पण आज मी तुम्हाला प्रवीण तांबेची गोष्ट सांगणार आहे," असं राहुल द्रविड एका कार्यक्रमात म्हणाला होता.

सध्या प्रवीण तांबे चित्रपटाची चर्चा आहे त्यामुळे राहुल द्रविडचे हे जुने भाषण पुन्हा पाहिले जात आहे आणि त्यावर चर्चा देखील होत आहे.

आता 'कौन प्रवीण तांबे' म्हटल्यावर सर्वांना चटकन लक्षात येऊ शकतं की प्रवीण तांबे कोण आहे. IPL च्या 13 व्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सकडून प्रवीण तांबे खेळला होता. 41 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण आणि चमकदार कामगिरी यामुळे प्रवीण तांबे क्रिकेट चाहत्यांना माहिती झाला होता. पण सध्या प्रवीण तांबे चर्चेत आहे त्याचं कारण वेगळं आहे.

प्रवीण तांबेच्या आयुष्यावर आधारित चित्रपट हॉट स्टारवर प्रदर्शित झाला आहे. आपल्याच आयुष्यावरील चित्रपट पाहिल्यानंतर प्रवीण तांबे भावूक झाला आणि म्हणाला, "स्वप्नांचा पाठलाग करणं कधीच सोडू नका, स्वप्नं नक्कीच पूर्ण होतात."

सध्या प्रवीण तांबे कोलकाता नाइट रायडर्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये आहे. कोलकाता नाइट रायडर्सच्या टीमसोबत प्रवीण तांबेनी हा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर हा चित्रपट कसा वाटला असे प्रवीणला विचारले असता प्रवीण भावूक झाला.

चित्रपटात प्रवीण तांबेची भूमिका श्रेयस तळपदेनी केली आहे. या चित्रपटात प्रवीण तांबेचा संघर्ष दाखवला आहे.

2014 साली झालेल्या एका कार्यक्रमात भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडने प्रवीण तांबेची गोष्ट पहिल्यांदा सांगितली होती. या कार्यक्रमात राहुल द्रविड म्हणाला होता प्रवीण तांबे म्हणजे खेळासाठी असलेल्या जिद्दीचं मूर्तीमंत उदाहरण आहे.

प्रवीण तांबेनी 20 वर्षांहून अधिक काळ फर्स्ट क्लास क्रिकेटसाठी प्रयत्न केले होते पण त्याला कुठेच संधी मिळाली नाही पण त्याने कधीच हार मानली नाही. जसं जसं वय होत जातं तसं सराव करणं कठीण होत जातं उमेद संपत जाते पण प्रवीण तांबेची जिद्द कधीच कमी झाली नाही.

जेव्हा प्रवीण तांबे ट्रायल्ससाठी आला होता तेव्हा त्याला लगेच त्या वर्षी खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण त्याने उमेद सोडली नाही. त्याने एक दिवस सुद्धा सरावाचे सत्र चुकवले नाही. तो सातत्याने इतर खेळाडूंना भेटायचा आणि माझ्यात काय सुधारणा व्हायला हवी असं विचारायचा. नंतर त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये चमकदार कामगिरी केली.

प्रवीण तांबे सातत्याने गली क्रिकेट आणि मुंबईच्या मैदानावर खेळला आहे. त्याने कधीच हार मानली नाही.

प्रवीण तांबेची जेव्हा राजस्थान रॉयल्समध्ये निवड करण्यात आली होती तेव्हा मला टीमच्या सीईओंचा फोन आला होता असं राहुल द्रविडने या भाषणात सांगितले आहे. राहुल द्रविड पुढे सांगतो की, ते मला म्हणाले, हे तू काय करत आहेस, तू एका 41 वर्षाच्या व्यक्तीची निवड केली आहेस. तुला वेड लागलंय का?

"आपण राजस्थान रॉयल्स आहोत. आपल्याला तरुण खेळाडूंना पुढे आणायचे आहे. पण त्यावेळी मला आणि इतर प्रशिक्षकांना प्रवीणवर विश्वास वाटला. त्यात काहीतरी वेगळं आहे हे आम्ही पाहिलं आणि त्याने त्याच्यात काय आहे हे त्याने दाखवून दिले."

जर तुम्ही प्रवीण तांबेच्या आयुष्यावरील चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की, या भाषणाचा काही भाग चित्रपटात देखील वापरण्यात आला आहे.

सचिन तेंडुलकरला सुद्धा टाकली होती बॉलिंग

प्रवीण तांबेनी सचिन तेंडुलकरला देखील बॉलिंग केली आहे. 2001 मध्ये जेव्हा भारतात शेन वॉर्न येणार होता. तेव्हा लेग स्पिनची प्रॅक्टिस व्हावी म्हणून सचिन तेंडुलकरने मुंबईतील चांगल्या लेग स्पिनर्सला बोलवले होते.

हे लेग स्पिनर्स सचिनला नेट प्रॅक्टिस व्हावी म्हणून बॉलिंग करत असत. माजी क्रिकेटपटू आणि कमेंटटेटर आकाश चोप्राला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तांबेनी हा किस्सा सांगितला आहे. "तेव्हा आम्ही सचिन सरांसाठी तासनतास बॉलिंग करत होतो. सचिन यांना बॉलिंग करणे हे माझं स्वप्न होतं ते प्रत्यक्षात आलं होतं," असं प्रवीण तांबेनी म्हटलं आहे.

राहुल द्रविडची भूमिका आयुष्यात महत्त्वपूर्ण

राहुल द्रविडने आपल्या आयुष्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्याचं प्रवीणने स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

मी आज जे काही आहे ते राहुल द्रविड यांच्यामुळेच आहे, असं तो म्हणाला होता.

राजस्थान रॉयल्सला लेग स्पिनर्स हवे होते त्यांनी संभाव्य खेळाडूंना जयपूर येथे बोलवले. त्यात प्रवीण तांबे एक होता. जयपूरमध्ये तीन दिवसांच्या ट्रायल्स होत्या. त्या ट्रायल्स पाहूनच राहुल द्रविडने प्रवीण तांबेची निवड केली होती.

प्रवीण तांबेनी आयपीएलमध्ये 33 मॅचेस खेळल्या आहेत आणि 28 विकेट्स घेतल्या आहेत. प्रवीण तांबेला 2020 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने निवडले होते पण त्याची निवड रद्द करण्यात आली होती. प्रवीण तांबेनी त्या आधी अबूधाबी प्रिमिअर लीगमध्ये सहभाग घेतला होता.

देशाबाहेरच्या लीगमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयची परवानगी नाही. त्या कारणाने प्रवीण तांबेची निवड रद्द झाली होती. सध्या तो कोलकाता नाइट रायडर्सच्या सपोर्ट टीमचा भाग आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)