You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; अटकेची टांगती तलवार
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा INS विक्रांतप्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामीनावर उद्या (मंगळवारी) सुनावणी होणार आहे. सोमय्या यांनी अटकेपासून संरक्षण मागितलं होतं. मात्र त्यांना कोणतंही संरक्षण मिळालं नाही.
मुंबईच्या ट्रॉम्बे पोलीस ठाण्याने समन्स पाठवला आहे. या समन्सनुसार, किरीट सोमय्या यांना आज (9 एप्रिल) सकाळी अकरा वाजता ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हजर होण्याची नोटीस देण्यात आली होती.
INS विक्रांत निधी प्रकरणात ही कार्यवाही पोलिसांकडून करण्यात येत आहे. यामुळे ठाकरे सरकारवर सातत्याने गंभीर आरोप करणारे भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
भारतीय नौदलाची विमानवाहू युद्धनौका 'INS विक्रांत' वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा केला होता, मात्र हा निधी सोमय्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी वापरल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशद्रोह्यांना घरात घुसून अटक केली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी यावेळी केली.
या घटनाक्रमामुळे किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना यांना आता अटक होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नेमकं काय घडलं?
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर मुंबईतील ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मानखुर्द-ट्रॉम्बे याठिकाणी राहणारे बबन भोसले यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं ट्रॉम्बे पोलिसांनी सांगितलं आहे.
भारतीय नौदलातून निवृत्त झालेली 'INS विक्रांत' ही युद्धनौका वाचवण्यासाठी निधी गोळा करण्यात आला, मात्र हा निधी राज्यपाल कार्यालयात सुपुर्द केलेला नाही अशी तक्रार किरीट सोमय्या यांच्याविरोधात करण्यात आली आहे.
यासंदर्भात बोलताना ट्रॉम्बे पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक रेहाना शेख यांनी सांगितलं, बबन भोसले यांच्या तक्रारीनंतर "INS विक्रांतच्या डागडुजीकरता 57 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त पैसे गोळा करून ते राज्यपाल यांच्या कार्यालयात जमा न करता स्वत:च्या फायदा करता वापर करून फिर्यादी व इतरांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवला आहे."
किरीट सोमय्या यांच्याविरोधात कलम 406, 420 आणि 34 नुसार गुन्हा दाखल झाल्याचंही त्या म्हणाल्या.
गुरुवारी (7 एप्रिल) संजय राऊत यांनी यासंदर्भात ट्वीट केलं. ते म्हणाले, "किरीट सोमय्या हा महाराष्ट्रद्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे. लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण करणाऱ्या भाजपला जाब विचाराच लागेल."
7 एप्रिलला सकाळच्या सत्रात किरीट सोमय्या यांना जेव्हा पत्रकारांनी याप्रकरणी स्पष्टीकरण विचारले तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. याउलट ते खुर्चीवरून उठले आणि आपल्या गाडीत जाऊन बसल्याचं दृश्यांमध्ये दिसून आलं. त्यानंतर दुपारी सोमय्या यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "संजय राऊत आरोप करत असलेला 58 कोटी रुपयांचा आकडा कुठून आला? हे त्यांनी सांगावं. त्यांच्याकडे काय पुरावे आहेत?" असाही प्रश्न त्यांनी विचारला.
तर याच दरम्यान संजय राऊत दिल्लीहून मुंबईत परतले असता मुंबई विमानतळावर शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी संजय राऊत म्हणाले, 'विक्रांतसाठी जमा केलेल्या पैशांचं मनी लाँडरिंग केलं गेलं. तुम्ही वाघाला डिवचलं आहे. उद्धव ठाकरे यांचं लक्ष आहे. राजभवनातून आलेले पुरावे आमच्याकडे आहेत. कायद्यानुसार कारवाई होईल."
देशभरात किरीट सोमय्या यांनी त्यांच्या मुलाने पैसे गोळा केले आहेत, ते कुठे गेले? असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
'INS विक्रांत वाचवण्यासाठी निधी' हे प्रकरण काय आहे?
भारतीय नौदलातून 1997 साली निवृत्त करण्यात आलेली युद्धनौका 'INS विक्रांत' ही भारतीय नौदलाची पहिली विमानवाहू युद्धनौका होती.
INS विक्रांत ही युद्धनौका भारताने ब्रिटिशांकडून विकत घेतली होती. त्याची डागडुजी पूर्ण करून 1961 साली पहिली विमानवाहू युद्धनौका म्हणून INS विक्रांत भारतीय नौदलात दाखल झाली.
1962 च्या भारत-चीन युद्धात INS विक्रांतचा वापर करण्याची वेळ आली नाही. तर 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी विक्रांत सक्रिय होती पण युद्धात वापरण्याची संधी उपलब्ध झाली नाही.
परंतु 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात मात्र INS विक्रांतने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. बंगालच्या उपसागरात पाकिस्तान सैन्याचा सामना विक्रांतने केला होता आणि म्हणूनच INS विक्रांतच्या या कामगिरीमुळे निवृत्तीनंतरही या युद्धनौकेबाबत लोकांमध्ये एक भावनिक लाट पहायला मिळाली.
1997 रोजी आयएनएस विक्रांतला मुंबईत सन्मानाने निवृत्त करण्यात आलं. संरक्षण दलाचं कव्हरेज करणारे वरिष्ठ पत्रकार अमित जोशी सांगतात, "1997 मध्ये विक्रांतला निवृत्त केलं. युद्धात कामगिरी बजावल्याने विक्रांत भंगारात न काढता युद्ध संग्रहालय करण्याची घोषणा तत्कालीन यूती सरकारने केली. त्यानंतर अगदी 2013 पर्यंत युती,आघाडी अशी सरकारं आली-गेली पण प्रत्यक्षात युद्ध संग्रहालय कोणीही केलं नाही."
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि आता भाजपचे नेते नारायण राणे यांनीही त्यावेळी आयएनएस विक्रांतला भेट दिली होती असंही अमित जोशी सांगतात.
INS विक्रांत ही युद्धनौका निवृत्त झाल्यानंतर भारतीय नौदल दिवस साजरा करत असताना दरवर्षी नौदलाकडून सामान्य जनतेला ही युद्धनौका पाहण्यासाठीही खुली केली गेली होती.
अमित जोशी सांगतात, "मुंबईत नौदलाचा बेस कमी आहे. त्यात बीपीटी, क्रूझ, मालवाहतूक, मच्छिमार अशी सतत वर्दळ असल्याने भारतीय नौदलला सतर्कही रहावं लागतं. त्यात विक्रांत ही भव्य अशी युद्धनौका होती. त्याचं संरक्षण, पार्किंग, डागडुगी, व्यवस्थापन अशी सर्व जबाबदारी पार पाडावी लागायची. त्यामुळे निवृत्तीनंतर सात वर्षांनी या युद्धनौकेचा तळ कमकुवत झाल्याचं सांगत आता कोणालाही याठिकाणी परवानगी देता येणार नाही असं नौदलाने स्पष्ट केलं."
हा काळ 2013-2014 या दरम्यानचा होता. "त्यावेळी निवडणुकांच्या वातावरणात भाजपची हवा सुरू झाली होती. त्यामुळे त्या उत्साहात विक्रांतला वाचवण्यासाठी अनेक मोहिमा सुरू झाल्या. यात भाजपचे नेते किरीट सोमय्या देखील होते. हा निधी राज्यपाल किंवा केंद्र सरकारकडे देणार आणि विक्रांत युद्धनौका वाचवणार अशी मागणी जोर धरू लागली. पण शेवटी मुंबईतील दारुखाना याठिकाणी INS विक्रांत स्क्रॅप करण्यात आली."
किरीट सोमय्या यांना अटक होऊ शकते का?
ट्रॉम्बे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर 406, 420 आणि 34 या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कायदेतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 406 कलम म्हणजे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजेच विश्वासघात केल्याप्रकरणी लागू केलं जाणारं कलम आहे. तर 420 कलम हे फसवणुकीसाठी लागू केलं जातं.
तसंच 34 कलम हे गुन्ह्यात एकहून अधिक लोक सामील असल्यास कटकारस्थान केल्याप्रकरणी लागू केलं जातं.
वकील इंदरपाल सिंह सांगतात, "अशा प्रकरणांमध्ये पुढे 41A CRPC ची नोटीस दिली जाऊ शकते. त्यांचा जबाब नोंदवला जाऊ शकतो. तसंच या प्रकरणात अटक होण्याचीही शक्यता असते. गुन्हा सिद्ध झाल्यास जास्तीत जास्त 7 वर्षे शिक्षा होऊ शकते."
या प्रकरणात न्यायालयाकडून अटकपूर्व जामीनही मिळवता येऊ शकतो असंही त्यांनी स्पष्ट केलं.
खरं तर भारतात अशा अनेक मोहिमा राबवल्या जातात ज्यासाठी नागरिकांकडून वर्गणी मागितली जाते. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये आर्थिक गैरव्यवहाराबाबत गुन्हा नोंदवला जाऊ शकतो का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याविषयी बोलताना इंदरपाल सिंह सांगतात, "समजा गणेशोत्सवासाठी एखाद्या मंडळाने किंवा रहिवाशांनी वर्गणी गोळा केली. पण प्रत्यक्षात गणेशोत्सव साजरा केला नाही तर आर्थिक व्यवहारात शंका घेण्यास वाव असतो आणि आक्षेपही घेतला जाऊ शकतो."
किरीट सोमय्या यांचं स्पष्टीकरण
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी INS विक्रांत प्रकरणी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.
किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, "एफआयआरची कॉपी मला माध्यमांमुळे मिळाली आणि मला हसू आलं. एवढं हास्यास्पद काम उद्धव ठाकरेच करू शकतात." असा खोचक टोला त्यांनी लगावला.
"एका नागरिकाने केलेली तक्रार मी वाचली. वृत्तपत्रांमध्ये 58 कोटी रुपयांची रक्कम असल्याचं वाचलं पण एकही पुरावा त्यांनी दिलेला नाही. असेच आरोप राऊत यांनी यापूर्वी केले होते. त्याचं पुढे काय झालं? एसआयटीचं पुढे काय झालं? राकेश वाधवान नील सोमय्यांचा पार्टनर आहे काय झालं पुढे?" असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)