संजय राऊत प्रकरण : 'राजकारणाशी देणं-घेणं नाही, आम्हाला फक्त आमचं घर हवंय' - पत्राचाळीतले रहिवासी

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

"कुणावर कारवाई झाली, कोण आतमध्ये गेलं, कुणाला आतमध्ये ठेवलं, याच्याशी आम्हाला काहीच देणं-घेणं नाहीये. माझ्या आधीच्या चार-पाच पिढ्या या राजकारणामध्ये भरडल्या गेल्यात. राजकारणाचा हेतू साध्य झाल्यावर पुन्हा त्याच त्याच गोष्टी होतात."

"त्यामुळे पत्राचाळीच्या रहिवाशांना राजकारणाशी देणं-घेणं नाहीये. फक्त घर, भाडं, आम्हाला दिलेलं आश्वासन याच्याशीच देणं-घेणं आहे. सरकार येतं, सरकार बदलतं. पुन्हा त्याच गोष्टी घडतात. या चक्रव्यूहात आम्ही अडकलोय."

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कोर्टानं 4 ऑगस्टपर्यंत कोठडीत पाठवल्यानंतर बीबीसी मराठीनं पत्राचाळीतल्या रहिवाशांशी बातचित केली. त्यावेळी या रहिवाशांनी बीबीसी मराठीसोबत आज (1 ऑगस्ट) आपल्या भावना व्यक्त केल्या.

2008 साली पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सुरू झालेलं पत्राचाळीच्या घरांचं बांधकाम आजही पूर्ण झालेलं नाही. याउलट यात तब्बल 1 हजार 38 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगची चौकशी सुरू झालीय.

यापूर्वी म्हणजे 7 एप्रिल 2022 रोजी ज्यावेळी संजय राऊत यांच्या काही संपत्तीवर ईडीनं जप्तीची कारवाई केली होती, त्यावेळीही बीबीसी मराठीनं पत्राचाळीत जाऊन तिथल्या रहिवाशांच्या भावना जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी रहिवाशी काय म्हणाले होते, याची बातमी इथे देत आहोत :

'स्वत:चं घर असून भाडं देण्यातच आयुष्य गेलं'

मुंबईतल्या गोरेगाव पश्चिमेला पत्राचाळ नावाच्या परिसरात चाळीत 682 घरं होती. या घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांच्या सहमतीने म्हाडा, गुरूआशिष खासगी कंपनी आणि रहिवासी यांच्यात ट्रायपार्टी करार झाला.

13 एकरमध्ये रहिवाशांना 672 घरं बांधून देण्याचं ठरलं पण प्रत्यक्षात फसवणूक झाली असं रहिवासी सांगतात.

बांधकाम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांना विकासकाने भाडं द्यायचं असंही ठरलं. पण 2015 पासून आम्हाला भाडंही मिळत नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.

विजया थोरवे सांगतात, "भाडं भरण्यातच आमचं आयुष्य चाललंय. भाड्यातच एवढे पैसे जातात की तेवढ्या पैशात घर आलं असतं. मी तर माझं सोनं गहाण ठेवलंय, काही सोनं विकलं. परिस्थिती एवढी वाईट झाली की मुलाचं उच्च शिक्षणही त्याला हवं तसं घेता येत नाहीय."

"म्हाडा आणि विकासकाच्यामध्ये आमची अवस्था 'ना घर का ना घाट का', अशी झालीय," असं शशांक रमाणी हे रहिवासी सांगतात.

पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रहिवाशांनी सिद्धार्थ नगर रहिवासी समिती बनवली.

"बांधकाम सुरू झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की काम खूपच धीम्या गतीने होत आहे. शिवाय, आम्हाला कबूल केलेली जागाही परस्पर इतर खासगी विकासकांना विकली गेली हे सुद्धा आमच्या लक्षात आलं आणि मग आम्ही आंदोलन, उपोषण केलं." असंही रमाणी सांगतात.

दरम्यानच्या काळात रहिवाशांनी खेरवाडी पोलीस स्टेशन, म्हाडा यांच्याकडेही तक्रार केली होती.

ईडीचा तपास कसा सुरू झाला?

ईडीनेही एवढ्या वर्षांनंतर या प्रकरणाची अचानक दखल घेत तपास सुरू केला. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं ईडीचं म्हणणं आहे.

गुरूआशिष कंपनी ज्यासोबत रहिवाशांनी करार केला त्या कंपनीच्या संचालकांनी एफसआयची जागा परस्पर 9 विकासकांना विकल्याचं ईडीने म्हटलं आहे. गुरुआशिष कंपनीच्या संचालकांनी एफएसआय परस्पर 9 विकासकांना विकून 901 कोटी रुपये कमवल्याचा ठपका ठेवला आहे.

तसंच गुरूआशिषकडून मेडोज नावाचाही गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्यात आला आणि त्यासाठी ग्राहकांकडून 138 कोटी रुपये घेतल्याचंही ईडीने म्हटलं आहे.

गुरूआशिष कंपनीचे संचालक प्रवीण राऊत, राकेश कुमार वाधवान आणि सारंग वाधवान होते असंही ईडीने म्हटलंय. याप्रकरणी ईडीने 2 फेब्रुवारी 2022 रोजी प्रवीण राऊत यांना अटक केली. तर 5 एप्रिल 2022 रोजी ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची दादर आणि अलिबाग येथील संपत्ती जप्त केली.

'माझं लग्न फ्लॅट मिळणार म्हणून ठरलं पण...'

पत्राचाळ येथील रहिवासी प्रमोद राजपूत यांचं 1992 साली लग्न झालं. त्यावेळी एका खासगी बिल्डरकडून चाळींऐवजी इमारती बांधण्याचं काम सुरू झालं होतं.

"सासरे संरक्षण दलात होते. त्यांनी मला विचारलं माझी मुलगी कुठे राहणार? तेव्हा पत्राचाळीतलं घर त्यांना दाखवलं. ते म्हणाले इथे कशी राहणार? मग त्यांना काही इमारती झाल्या होत्या त्या दाखवल्या. त्यांना म्हटलं असं घर आम्हालाही मिळणार आहे. आज लग्नाला 30 वर्षे झाली. तेव्हापासन आम्ही घराची वाट पाहतोय. आता माझ्या मुली मोठ्या झाल्या. त्यांना तरी घर मिळणार का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

स्वत:च्या मालकीचं घर असूनही पत्राचाळ रहिवाशांना भाड्याने रहावं लागतं. परंतु अनेकांना मुंबईतलं भाडं परवडत नसल्याने काही रहिवासी गावी परत गेले असंही ते सांगतात.

प्रमोद राजपूत म्हणाले, "भाड्याच्या घरात राहिल्याने खर्च वाढला. अनेकांनी कर्ज काढलं. आता लोकांकडे पैसे नाहीत. मराठी लोक गेले यामुळे मुंबईच्या बाहेर. असं होत असेल तर मुंबईत मराठी लोक कसे राहणार."

घरं कधी मिळणार?

पत्राचाळ रहिवाशांचा प्रश्न सोडवणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलंय असं रहिवासी सांगतात.

22 फेब्रुवारी 2022 रोजी पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत पार पडलं.

2024 पर्यंत पत्राचाळ रहिवाशांना घराचा ताबा देणार असं आश्वासन सरकारने दिल्याचं रहिवासी सांगतात.

"किमान आमच्या जिवंतपणी आम्ही घर पाहू एवढीच अपेक्षा आता बाकी आहे," असं रमाणी म्हणाले.

संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी

संजय राऊत यांना न्यायालयानं 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.

संजय राऊत यांना 8 दिवसांची ईडीची कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती.

संजय राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयानं म्हणजेच ईडीनं रात्री उशीरा अटक केली. रविवारी दिवसभराच्या चौकशीनंतर ई़डीनं त्यांना संध्याकाळी ताब्यात घेतलं होतं.

त्यानंतर आज दुपारी संजय राऊत यांना कोर्टात आणण्यात आलं. कोर्ट परिसरात येताना संजय राऊत लोकांकडे पाहून 'जय महाराष्ट्र' म्हणाले.

संजय राऊतांच्या रिमांडवर दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. ईडीच्या वतीने वकील हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवाद केला.

ईडीच्या वकिलांनी मांडलेला युक्तिवाद-

  • प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होता त्याला HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले, असा दावा ईडीच्या वकिलांनी केली आहे.
  • अलिबागची जमिन याच पैशातून खरेदी करण्यात आली. राऊत कुटुंबाला पत्राचाळ प्रकरणात. थेट आर्थिक फायदा झालाय.
  • प्रविण राऊत फक्त नावाला होता. तो संजय राऊत यांच्यावतीनं सर्व व्यवहार करत होता.
  • मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो की दादर येथील घर आणि अलिबाग येथील जमीन सर्व व्यवहार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले.
  • संजय राऊत यांनी काही पुराव्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला.
  • रात्री 10.30 नंतर चौकशी करणार नाही

राऊतांच्या बचावात वकिलांचा युक्तिवाद -

  • संजय राऊत यांची अटक ही राजकीय हेतूनं प्रेरित आहे.
  • या प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रविण राऊत याला अटक करुन अनेक महिने झालेत. इतकी दिवस का नाही कारवाई केली कारण ही कारवाई राजकीय हेतूनं करायची होती.
  • संजय राऊत हार्ट रुग्ण आहेत. त्यांच्याशी उशीरा चौकशी करू नये.
  • राऊतांची चौकशी सुरू असताना वकीलांना उपस्थित राहू द्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)