You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय राऊतांवर ईडीची कारवाई, अलिबाग-दादरमधली संपत्ती जप्त
अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
संजय राऊत यांची अलिबाग येथील संपत्तीही ईडीने जप्त केली आहे.
अलिबाग येथील 8 भूखंड आणि दादर येथील फ्लॅट ईडीने जप्त केल्याची माहिती मिळते आहे, तसंच 1हजार 34 कोटींच्या पत्राचाळ जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणीही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
संजय राऊत यांनी संपत्ती जप्त केल्यानंतर ट्वीटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'असत्यमेव जयते!' असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, "अशा कारवायांपुढे शिवसेना झुकणार नाही. मी कष्टाने कमवलेली संपत्ती आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडेन."
यापूर्वी ईडीच्या धाडी आणि तपासाबाबत संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले होते. केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राज्यातील ठाकरे सरकार अस्थिर करण्यासाठी वापरत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करणार असल्याचंही ते म्हणाले होते. ईडीने नोटीस न देता ही मालमत्ता जप्त केल्याचंही संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.
'यापुढे कधीही गुडघे टेकणार नाही'
संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने ताब्यात घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. सरकार पाडण्यासाठी मला विचारणा झाली होती मी त्यांचं ऐकलं नाही म्हणून हा राजकीय दबाव आहे असं ते म्हणाले.
"दादरसाख्या भागात माझं फार फार तर टू रुम किचनचं घर आहे. एखाद्या मराठी माणसाचं असतं तसं. अलिबागला माझं गाव आहे. तिकडे साधारण 50 गुंठ्याची जमीन आहे. याला कोणी संपत्ती म्हणत असेल तर तेवढी संपत्ती आहे."
"मी झुकणार नाही, वाकणार नाही. यापूर्वी भाजपच्या काही लोकांनी मला सरकार पाडण्यासाठी धमक्या दिल्या होत्या. तेव्हाच मी म्हटलं की काहीही करा हे काम होणार नाही. यापुढे कधीही गुडघे टेकणार नाही. माझी संपत्ती कष्टाच्या पैशांची आहे. हा राजकीय दबाव आहे,"
आपल्याकडे एकही रुपया बेकायदेशीरपणे कमवलेला नाही असंही यावेळी संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
देशात लोकशाही राहिली आहे का? - आदित्य ठाकरे
'देशात लोकशाहीचं नाही तर दबावाचं वातावरण आहे, राजकीय हेतूने ईडीची कारवाई करण्यात आल्याचं' महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. 'जाहीर धमक्या होऊन ईडीच्या कारवाया होत असतील तर देशात लोकशाही राहिली आहे का, याचा विचार करणं गरजेचं असल्याचं' आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
"कुठल्याही प्रकारची नोटीस न देता, कुठल्याही प्रकारची चौकशी न करता जर अशा प्रकारची कारवाई होत असेल तर काय पद्धतीने केंद्र सरकारचा कारभार चालू आहे हे आपल्या लक्षात येतं असल्याचं" राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे - पाटील यांनी म्हटलंय.
ईडीने संजय राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईविषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी देखील ईडीच्या कारवाईबद्दल आपली मतं दोन दिवसांपूर्वीच व्यक्त केलीय. देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशानेच मत व्यक्त केलं असेल, तर हे जगजाहीर आहे की या एजन्सीचा दुरुपयोग व्हायला लागलेला आहे. किरीच सोमय्या जे बोलतात त्यानंतर दोन चार दिवसांत त्या घटना घडतात. त्यामुळे अॅक्युरेट प्रेडिक्शन करणारे गृहस्थ म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. आणि या एजन्सीच त्यांना कल्पना देऊनच कारवाया होतात असा एकंदर आभास सध्या तयार झालेला आहे."
'55 लाख परत का केले?'
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर याप्रकरणी यापूर्वीच आरोप केले होते. ते म्हणाले, "संजय राऊत यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन गैरव्यवहारात संजय राऊत यांचे आर्थिक पार्टनर प्रवीण राऊत यांनी घोटाळा केला. याप्रकरणात संजय राऊत यांनी मदत केली असावी, सहकार्य केले असावे असे दिसते. ईडीने संजय राऊत यांना समन्स पाठवल्यानंतर संजय राऊत यांनी ईडीला 55 लाख रुपये परत केले होते. ईडी आणि सोमय्या खोटं बोलत होते तर संजय राऊत यांनी 55 लाख परत का केले?"
55 लाख चेकने परत केले मग कॅश किती मिळाले असतील असाही प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
ईडीने प्रवीण राऊत यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. संजय राऊत प्रकरणातही ईडीने आता इथेच थांबू नये, त्यांचे विमान तिकीट, हॉटेल बिल्स अशा सर्व गोष्टींची चौकशी व्हावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
नरेंद्र मोदी यांनीही स्पष्ट केलं होतं की महाराष्ट्रातील सरकारने कितीही दबाव आणला तरी केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचं काम करतील असंही यावेळी सोमय्या म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)