You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नारायण राणे: संजय राऊतांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर
'संजय राऊत यांची केविलवाणी परिस्थिती झाली होती. त्यांना पत्रकार परिषदेत एवढा घाम का फुटला होता?
मर्दाला आपण मर्द आहोत हे सांगायची गरज का पडते? संजय राऊत यांना काल घाम का फुटला हे मी सांगणार', अशी सुरुवात करत नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेतून राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. संजय राऊतांना इतके दिवस शिवसेना भवन कसं आठवलं नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला.
'महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात लाचार मुख्यमंत्री' अशी टीका राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून केली. संजय राऊतांनी ज्यांच्यावर सातत्याने टीका केली त्यांच्या बरोबरीने सरकारमध्ये आहेत असंही ते म्हणाले.
"सतत आपण मर्द आहोत हे सांगण्याची गरज मर्दाला पडत नाही. जो घाबरलेला असतो तोच मी घाबरलेलो नाही असं सांगत असतो." शिवराळ भाषा म्हणजे मर्दानगी नव्हे. संजय राऊतांचा तोल गेला, त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे असा टोला राणे यांनी हाणला.
संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत उच्चारलेल्या अपशब्दांवरुनही राणे यांनी त्यांच्यावर टीका केली.
"संजय राऊत यांची मार्मिकमधून हकालपट्टी झाली. त्यानंतर ते लोकप्रभाला गेले. लोकप्रभामध्ये त्यांनी पराक्रम केले. लोकप्रभात असताना माननीय बाळासाहेबांविरुद्ध अनेक लेख लिहिले." असंही नारायण राणे म्हणाले. लोकप्रभामध्ये बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणं त्यांनी सोडलं नव्हतं असं राणे म्हणाले.
नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी काय उद्गार काढले होते याचाही दाखला दिला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संजय राऊत पत्रकार असताना टीका केली होती हे सांगण्यासाठी राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे उद्गार वाचून दाखवले.
प्रवीण राणे यांची ईडीने चौकशी केल्यामुळे संजय राऊत यांनी काल थयथयाट केला असं नारायण राणे यांनी सांगितलं.
"शिवसेना प्रमुख झालेत अशा आवेशात पत्रकार परिषद घेतली. इतके दिवस शिवसेना भवन का आठवलं नाही? संजय राऊत शिवसेनेत कधी झाले",? असा सवाल राणेंनी केली.
"पत्रकार नाही, संपादक नाही. भाषा त्या लायकीची नाही. बेजबाबदार का बोलत होते? राऊत यांनी संपादकपदी असताना जे शब्द वापरले ते वापरू शकत नाही. पत्रकार आहेस तर पुरावा दे", असं राणे म्हणाले.
"शिवसेना वाढवण्यासाठी काम करत नाहीत. राष्ट्रवादीसाठी काम करतात. तुमची संपूर्ण कुंडली माझ्याकडे आहे", असं राणेंनी सांगितलं.
"पगारी नेता आहे. सामनातून पगार मिळतो. ईडीकडून अटक होऊ शकते यामुळे पत्रकार परिषद घेतली. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर आणू असं म्हणाले होते. जनतेचे प्रश्न सोडवणं महत्त्वाचं आहे. राज्याची दयनीय अवस्था आहे. एसटीचा संप संपत नाही. रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे", असं राणे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "संजय राऊतांना मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा आहे. आज ना उद्या मुख्यमंत्रिपद मिळेल असं त्यांना वाटतं. त्यांना बोलताना घाम फुटतो. उसनं अवसान आणून बोलतात".
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईतल्या शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने भाजप-शिवसेना संघर्ष नव्याने अधोरेखित झाला आहे.
संजय राऊतांनी तब्बल तासभर चाललेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. यामध्ये किरीट सोमय्या लक्ष्यस्थानी होते. केंद्रीय यंत्रणांचा कसा गैरवापर केला जातो यासंदर्भात त्यांनी भाष्य केलं.
पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसे आम्ही वापरतोय हा आरोप केला. राकेश वाधवा हे यातील प्रमुख आरोपी आहेत. वाधवा यांच्या अकाऊंटमधून भाजपला 20 कोटी रुपये गेले आहेत. निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कोणाची आहे? ही कंपनी किरीट सोमय्यांची आहे. नील सोमय्याची आहे. आणि त्यांचा भागीदार राकेश वाधवा आहे. हे मी पुराव्यासहीत सांगत आहे. राकेश वाधवानशी यांचा आर्थिक संबंध आहे.
वसईला जमीन घेतली. एक सात कोटीला जमीन घेतली. यावर एक कंपनी सुरू केली. याचा डायरेक्टर नील सोमय्या आहे. Environment clearance नाही. आदित्य ठाकरे यांना आवाहन करतो की यात तात्काळ लक्ष घ्या, परवाने रद्द करा आणि या प्रकरणात नील सोमय्याला अटक करा.
पीएमसी बँक प्रकरणातील तपास ईडी करत आहे. हे सगळे डॉक्यूमेंट ईडीकडे मी तीन वेळा पाठवले आहेत. ईडीचा भ्रष्टाचार एवढा आहे की हे सगळे वसुली एजंट बनले आहेत. मी शिवसैनिक आहे. संघर्ष करेन .
फडणवीसांचा आणखी एक फ्रंट मॅन आहे. मोहित कंबोजने पत्रा चाळीत स्वत: मोहित कंबोजने जमीन विकत घेतली आहे.
साडेतीन नेते कोण हे उद्यापासून कळेल. अर्धा कोण, पाऊण कोण लवकरच कळेल असं राऊत यांनी सांगितलं.
अनिल परब, आनंदराव अडसूळ यांच्यासारख्या आमच्या नेत्यावर कारवाई करत आहेत, केंद्रीय तपास यंत्रणांचा गौरवापर सुरू आहे. खोटे आरोप केले जातात किंवा बदनाम केलं जातं. तुम्ही सरंडर व्हा नाहीतर कारवाई होईल असा दबाव टाकला जातो. बहुमत असताना भाजप नेते सरकार पाडण्याच्या तारखा का देतात?
राऊत पुढे म्हणाले, 170 आमदारांचं बहुमत कसं पायदळी तुडवू शकता? असं मी म्हटलं. तुम्ही मदत केली नाहीत तर तुम्हाला टाईट केलं जाईल असं सांगण्यात आलं. ठाकरे सरकारला धक्ता पोहचेल असं कोणतंही कृत्य आमच्याकडून होणार नाही. मी नावं आता सांगणार नाही पण भविष्यात जाहीर करू.
तुमचं सरकार आलं नाही म्हणून ईडीचा वापर करून हे करता? बाळासाहेबांनी आम्हाला गुडघे टेकायला शिकवलं नाही. मी नाही म्हणालो तेव्हापासून माझे निकटवर्तीय, नातेवाईकांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. माझी मुलं, नातेवाईक यांना बदनाम करण्यास सुरुवात केली", असं राऊत यांनी सांगितलं.
"महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे, बाहेरचे लोक येऊन आमच्या घरी येणार, बायका मुलींवर दबाव आणणार. हे असं राजकारण कधी झालं नाही",
राऊत म्हणाले, "ठाकरे कुटुंबियांनी अलिबागजवळ 19 बंगले बांधल्याचा आरोप मुलुंडच्या दलालाने केला आहे. माझं त्या दलालाला आव्हान आहे कधीही सांगा आपण बसेस करू आणि त्या बंगल्यावर पिकनिक काढू. तिकडे बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन. बंगले दिसले नाही तर त्या दलालाला जोड्याने मारू. 19 बंगले कुठे आहेत?
2024 नंतर काय करायचं ते बघू, आमच्या मुलीच्या लग्नाच्या हिशेबालाही लागले. फूलवाले, फटाके, मेहंदीवाल्याकडेही गेले. हे ईडीचं काम आहे का? असा प्रश्न राऊत यांनी केला.
आमच्या घरात तुम्ही शिरता, मुलांच्या कामाच्या ठिकाणी, दुकानात शिरताय. जिथे जायचंय तिथे जा पण टक्कर शिवसेनेशी आहे हे लक्षात घ्या असं राऊत म्हणाले.
सगळ्यात मोठा घोटाळा महाआयटीमध्ये झाला, 25 हजार कोटींचा घोटाळा आहे. निविदा न काढता टेंडर कसे मिळाले. अमोल काळे, धवांगळे कोण आहेत? मनी ट्रांसफर कसे झालेत ते सगळं सांगणार. तुम्ही शिवसेनेशी, महाराष्ट्राशी पंगा घेतला आहे.
महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र. महाराष्ट्र, झारखंड, बंगालचं सरकार पाडण्याचं कारस्थान सुरू आहे. त्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर सुरू आहे.
मोदी, शाहांना विचारायचे आहे की हीच तुमची लोकशाही आहे का? मी अमित शहांना कॉल केला होती. मी तुमचा आदर करतो पण हे चालू असलेलं बरं नाही, तुम्ही मला टॉर्चर करा पण माझ्या निकटवर्तीयांना लक्ष्य करू नका.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)