You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
औरंगाबादमध्ये तांदळाच्या दुकानात नोटांचा पाऊस, हवाला म्हणजे असतं तरी काय?
औरंगाबादमध्ये एका तांदूळ व्यापाऱ्याकडे छापा टाकून पोलिसांनी 1 कोटी 9 लाख रुपये जप्त केलेत.
हा सगळा व्यवहार हवालाचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं. याच दुकानातून शहरातील हवाला व्यवहार होत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या दृष्टीने आता जीएसटी आणि आयकर विभाग तपासणी करणार आहे. ही बातमी झी 24 तासने दिली आहे.
पोलीस काही दिवस या दुकानावर लक्ष ठेवून होते. या दुकानात मशीननं नोटा मोजणं सुरू असल्याचं कळल्यावर पोलिसांनी छापा टाकला, यावेळी दुकानातलं चित्र पाहून पोलीसही चक्रावले.
अनेक लोकं दुकानात जात होती, पण कोणतंही सामान न घेता रिकाम्या हाताने बाहेर येत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.
पोलिसांना संशय आल्याने दुकानावर छापा टाकण्यात आला. यावेळी दुकानाच्या ड्रॉव्हरमध्ये 200 आणि 500 रुपयांच्या नोटांची बंडलं आढळून आली. पोलिसांनी दुकानाच्या मालकाकडे याबाबत विचारणा केली. पण त्याला याचं उत्तर देता आलं नाही.
हवाला म्हणजे काय?
बेकायदेशीर पैसा लपवण्याचे अनेक मार्ग असतात. त्यातलाच एक म्हणजे हवाला. हा हवाला नक्की काय असतो, त्यांचं रॅकेट कसं चालतं आणि ही सिस्टिम नक्की किती वर्षं जुनी आहे, जाणून घेऊया
पैशाला हातही न लावता ते जगाच्या एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचवायचे. त्यासाठी बँकांची गरज नाही किंवा करन्सी एक्सचेंजचीही गरज नाही. कुठला फॉर्म भरायला नको, की शुल्कही लागणार नाही. गरज असते ती केवळ पैसे पाठवणारा, पैसे स्वीकारणारा आणि दोन मध्यस्थ यांची. यालाच 'हवाला' असं म्हणतात.
पारंपरिक बँकिंग यंत्रणा अस्तित्वात येण्याच्या खूप पूर्वीपासून ही पद्धत अस्तित्वात आहे. सोपी पद्धत आणि याच्याशी संबधितांना मिळणाऱ्या अनेक फायद्यांमुळं शेकडो वर्षांपासून हवाला अस्तित्वात आहे. या माध्यमातून जगभरात लाखो डॉलरचे व्यवहार होतात. विशेष म्हणजे हे कोण करतंय किंवा किती रक्कम आहे हेदेखील सांगितलं जात नाही.
बेकायदेशीर पद्धतीनं पैसे जगात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणं यालाच हवाला म्हणतात. यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती एजंट किंवा दलालांची. त्यांनाच मध्यस्थ म्हटलं जातं.
हे दलाल कोणत्याही व्यवहारांच्या नोंदी ठेवत नाहीत. त्यामुळं हवालाच्या माध्यमातून पैसे कुठून कुठे पाठवले जात आहेत, याची माहिती मिळण्यात ते सर्वात मोठा अडथळा असतात. तसंच मनी लाँडरिंग, अंमली पदार्थांची तस्करी आणि कट्टरतावादी संघटनांना पैसा पुरवण्यासाठीही त्यांचा वापर केला जाऊ शकतो.
"हवाला या गैरकृत्यांमध्ये थेट सहभागी नसून यासाठी वापरलं जाणारं एक साधन असू शकतं. प्रत्यक्षात ते पर्शियन आखात, पूर्व आफ्रिका, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण पूर्व आशियात पससरेलं आहे," असं माद्रिदच्या पॉन्टिफिसिया कोमिला युनिव्हर्सिटीमध्ये इंटरनॅशनल स्टडीजचे प्राध्यापक अल्बर्टो प्रिगो मोरेनो यांनी बीबीसी मुंडोशी बोलताना सांगितलं.
कसा चालतो कारभार?
अधिकृत बँकिंग व्यवस्थेच्या समांतर चालणारी आणि दलालांच्या विश्वासावर टिकून असलेली बेकायदेशीर व्यवहाराची पद्धत, अशी हवालाची व्याख्या सांगता येऊ शकते.
उदाहरण द्यायचं झाल्यास, याद्वारे न्यूयॉर्कहून एखादा व्यक्ती बँकेत खातंही न उघडताही इस्लामाबादला पैसे पाठवू शकतो.
त्यासाठी त्याला स्थानिक दलालांशी संपर्क साधावा लागतो. त्यांना डॉलरमध्ये रक्कम आणि पासवर्ड द्यावा लागतो. पासवर्ड रक्कम पाठवणारा आणि स्वीकारणारा यांनी ठरवलेला असतो. म्हणजे या परिस्थितीत दलालाही तो पासवर्ड माहिती असतो.
स्थानिक दलाल इस्लामाबादच्या दलालाशी संपर्क साधतो आणि त्याला रक्कम आणि पासवर्ड सांगतो. दुसरा दलाल तेवढीच रक्कम स्थानिक चलनामध्ये संबंधित व्यक्तीकडे पोहोचवतो. पैसा योग्य व्यक्तीला मिळाला हे समजण्यासाठी पासवर्डचा वापर केला जातो.
ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या काही तासांमध्ये पूर्ण होते. मोबदल्यात दलाल कमिशन म्हणून काही रक्कम आकारतात.
हवाला आला कुठून?
हवालाची सुरुवात नेमकी कुठून झाली याबाबत स्पष्ट माहिती नाही. मात्र काही जण 8 व्या शतकातील सिल्क रूटद्वारे भारताशी याचा संबंध जोडतात.
सिल्क रूट हा प्राचीन चिनी संस्कृतीचा व्यापारी मार्ग होता. इसवी सनपूर्व 200 वर्षांपासून ते दुसऱ्या शतकाच्या हन वंशाच्या काळामध्ये रेशमाचा व्यापार वाढला होता. पूर्वी रेशीम घेऊन जाणारे ताफे चिनी साम्राज्याच्या उत्तरेकडून पश्चिमेकडे जायचे.
मात्र, पुढे मध्य आशियाच्या काही जमातींशी संपर्क वाढल्यानंतर हा मार्ग हळूहळू चीन, मध्य आशिया, उत्तर भारत, सध्याचं इराण, इराक आणि सिरियाद्वारे रोमपर्यंत पोहोचला विशेष म्हणजे या मार्गावर केवळ रेशीम व्यवसायच चालत होता असं नाही, तर लोक त्यांच्या वैक्तिक उत्पादनांचा व्यापारही करत होते.
मात्र, सिल्क रूटवर नेहमी चोरी, लूटमार होत होती. त्यामुळं भारतीय, अरबी आणि मुस्लीम व्यापाऱ्यांनी संरक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या.
हवाला चा अर्थ 'मोबदला' किंवा 'च्या मोबदल्यात' असा आहे.
व्यापारी एका पासवर्डचा वापर करायचे. एखादी वस्तू, शब्द किंवा इशारा असा तो पासवर्ड असायचा. त्याच प्रकारची वस्तू, शब्द किंवा पासवर्ड दुसऱ्या व्यक्तीला सांगावा लागायचा.
या माध्यमातून पैसा किंवा सामान योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल याची खबरदारी बाळगली जात होती.
भारतात पहिली बँक ही 'बँक ऑफ हिंदुस्तान' होती. तिची स्थापना 18 व्या शतकात कोलकात्यात झाली होती. त्यावरून ही व्यवस्था किती जुनी असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो.
आज तंत्रज्ञानाचा विकास पाहता जग वेगानं पुढं जात आहे. त्यामुळंच हवालाचं काम करणंही सोपं झालं आहे. आजच्या काळात इन्स्टंट मॅसेजिंग अॅपद्वारे पासवर्डऐवजी कोड पाठवले जातात. त्यामुळं दलालांना त्यांच्या नेहमीच्या कामातही, अगदी सहजपणे हे व्यवहार करणं शक्य होतं.
मात्र हे व्यवहार गुप्तपणे का चालतात?
"याचं कारण म्हणजे अनेकदा यामध्ये काळा पैसा वापरला जातो. अनेकदा लोक कर चोरी करतात. तो पैसा याद्वारे पाठवला जातो. पण दुसऱ्या देशात हा पैसा पाठवताना दलालाचं कमिशन कमी राहील, याचाही प्रयत्न केला जातो," असं प्राध्यापक अल्बर्टो प्रिगो मोरेनो सांगतात.
असं होण्याचं आणखी एक कारण म्हणजे, समजा एखाद्याला अमेरिकेतून दुसऱ्या देशात असलेल्या कुटुंबाला वैध किंवा नेहमीच्या पद्धतीनं पैसे पाठवायचे असतील, तर त्याला अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात.
तुम्हाला बँकेच्या माध्यमातून पैसे पाठवायचे असतील, तर त्यासाठी एक ठराविक रक्कम असावी लागते. खातं उघडण्यासाठी तुमची ओळख, कायदेशीर स्थिती किंवा इतर काही कागदपत्रं आवश्यक असतात.
इतर मनी ट्रान्सफर सेवांसाठी अंतरराष्ट्रीय व्यवहारांवर 20 टक्क्यांपर्यंत कमिशन लागू शकतं. काहीही झालं तरी अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. मनी लाँडरिंगसारख्या गोष्टी टाळण्यासाठी हे केलं जातं.
दुसरीकडं हवालामध्ये मात्र असं काहीही करावं लागत नाही.
"यात संबंधित व्यक्तिला अपेक्षेपेक्षा लवकर पैसे मिळतात, शिवाय कमिशनही कमी द्यावं लागतं, त्यामुळं हे अधिक प्रभावी आहे," असं मत प्रिगो मोरेनो यांनी मांडलं.
"दलालांना त्यांचं नेटवर्क चांगलं ठेवावं लागतं. जेवढ्या अधिक लोकांशी त्यांचा संपर्क असेल, तेवढा त्यांचा व्यवसाय अधिक चालेल. त्यासाठी त्यांना कमी कमिशनमध्ये लोकांना जास्तीत जास्त फायदा द्यावा लागतो."
"दलाल किंवा मध्यस्थ विश्वसनीय असणंही गरजेचं असतं. पूर्वी व्याजाची पद्धत फार प्रचलित नव्हती, त्यामुळं दलालांना जास्त पैसा मिळवणं कठीण होतं. त्यामुळंच पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत मध्यपूर्व आणि आशियामध्ये हा जास्त पसरला. कारण याठिकाणी बँकिंग व्यवहारांवर अधिक प्रमाणात निगराणी आणि नियंत्रण ठेवलं जातं."
"काही ठिकाणी तर लोक बँकाँपेक्षा दलालांवर अधिक विश्वास ठेवतात. कारण हा त्या दलालांचा जुना, पिढीजात व्यवसायत असतो. बँकेपेक्षा तो लोकांना अधिक विश्वसनीय वाटतो," असं मोरेनो म्हणात.
"पूर्वीच्या काळात हवाला किंवा हुंडी अशा संकल्पना अत्यंत लोकप्रिय होत्या. पण आजच्या काळात त्याबाबतचा विचार बदलला आहे. कारण आधुनिक बँकिंगपेक्षा त्यांचं काम वेगळ्या प्रकारे चालतं," असं जर्मनीतील फ्रँकफर्टमधील मॅक्स प्लांक इन्स्टिट्युटमधील दक्षिण आशियाच्या कायदा इतिहास विभागाच्या संयोजिका मारिना मार्टीनं यांनी म्हटलं आहे.
किती मोठा आहे हवालाचा व्यवसाय?
पारंपरिक हवाला पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, पैशाची देवाण-घेवाण कोण करत आहे, हे सरकार किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांना समजत नाही.
व्यवहाराच्या अत्यंत कमी नोंदी असणं किंवा नोंदीच नसणं, यामुळं हेराफेरी पकडली जाणं कठीण असतं.
न्यूयॉर्कमध्ये झालेल्या 9/11 हल्ल्यातील दहशतवाद्यांनादेखील याच पद्धतींच्या माध्यमातून आर्थिक मदत पोहोचवण्यात आली होती, असं सांगितलं जातं.
केवळ अमेरिकेतच नव्हे, तर संपूर्ण जगामध्ये नवे नियम लागू झाल्यानं काही हजार डॉलरचा आंतरराष्ट्रीय व्यवहार करणंदेखील गुंतागुंतीचं बनलं आहे.
"9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिका हवाला हा दहशतवादी पोसण्याचा एक मार्ग असल्याचं मानत आहे," असं मार्टिन म्हटल्या आहेत.
"हवाला (आणि इतर अनधिकृत पद्धती) ला काही वर्षांपासून मनी लाँडरिंग आणि राजकीय भ्रष्टाचारापासून ते, मानवी अवयवांच्या तस्करीसारख्या अनेक गुन्हेगारी घडामोडींशी जोडलं गेलं आहे," असं त्या सांगतात.
2018 मध्ये संघटित गुन्हेगारी आणि करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टच्या एका चौकशीत काही गोष्टी समोर आल्या होत्या. दुबईमध्ये हवालासारख्या अनधिकृत पद्धतींचा वापर करू लाखो विदेशी कामगार भारत, फिलिपाईन्ससारख्या देशात कुटुंबाला पैसे पाठवतात, असं त्यात म्हटलं होतं. ही रक्कम 240 कोटींपेक्षा अधिक असल्याचं सांगण्यात आलंय.
अमेरिकेच्या ड्रग इन्फोर्समेंट ऑफिस (डीईए) ने फेब्रुवारी 2016 मध्ये कोलंबिया आणि हिजबुल्लाह संघटनेदरम्यान युरोपच्या माध्यमातून मनी लाँडरिंग आणि अंमली पदार्थांच्या तस्करीचे संबंध जाहीर केले होते. यात लाखो युरो आणि ड्रग्जचे व्यवहार झाल्याचं सांगण्यात आलं होतं.
डीईएच्या कागदपत्रांनुसार लेबनान मार्गे लाखो रुपयांचं ड्रग्ज मध्यपूर्वपर्यंत पोहोचले आणि त्या मोबदल्यात हवालाच्या माध्यमातून कोलंबियाला पाठवण्यात आले.
पूर्व आफ्रिका आणि विशेषतः सोमालियामध्ये शस्त्र तस्करीसाठी हवालाचा वापर करू लाखो डॉलरची अफरा-तफरी केली जाते.
विकसनशील देशांमध्ये रेमिटन्सच्या (पाठवली जाणारी रक्कम) माध्यमातून कुटुंबांच्या मदतीसाठी पैसे पाठवणाऱ्या कामगारांच्या संख्येत वाढ झाल्याचं, जागतिक बँकेनं स्पष्ट केलं आहे.
कोविड-19 च्या संकटामध्येही अधिकृत आकडे पाहता निम्न आणि मध्य उत्पन्न असलेल्या देशांमध्ये पाठवली जाणारी रेमिटन्स 2020 मध्ये जवळपास 400 खर्व रुपये होती. 2019 च्या तुलनेत ती केवळ 1.6 टक्के कमी आहे. 2019 मध्ये हा आकडा 406.31 खर्व रुपये एवढा होता.
मात्र, "रेमिटन्सचा प्रत्यक्षातील आकडा हा, अधिकृत आकड्यांपेक्षा बराच मोठा आहे," असंदेखील जागतिक बँकेनं स्पष्ट केलं आहे.
जागतिक पातळीर आता अर्थव्यवस्थांमध्ये सुधारणा पाहायला मिळत आहे. त्यामुळं 2021 आणि 2022 मध्ये निम्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधून पाठवली जाणारी, रेमिटन्सची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)